May 15, 2021
प्रेम

द परफ्युम फॅक्टरी (भाग ६)

Read Later
द परफ्युम फॅक्टरी (भाग ६)

द परफ्युम फॅक्टरी  (भाग  ६)

प्रसादच्या मनात काय चालू आहे ह्याचा अंदाज प्रसादच्या आत्याला कधीच आला होता. आता मात्र तिने प्रसादकडूनच खात्रीच करून घेतली होती. सुरवातीला प्रसादने काहीच नाही असे सांगून बघितले, पण आत्या पुढे त्याला सगळे मान्य करावे लागले. आत्यालाही सुधा आवडत होतीच. त्यामुळे आत्याने त्याला सुधाशी  मोकळेपणाने बोलायला सांगितले.

मात्र प्रसादाने आत्याला त्याच्या मनात चाललेला गोंधळ सांगितला. त्याने सांगितले आत्याला कि तो सुधा साठी योग्य नाही आहे. सुधाची स्वप्न वेगळी आहेत आणि तो लवकरच ह्या सगळ्यातून बाहेर पडेल. सांगूनही प्रसाद काही ऐकणार नाही असे समजून आत्यांनी विषय बदलला खरा पण मनात काहीतरी ठरवूनच...

तिथून पुढे...

 

" ह्या आठवड्यात आली नाही का हो सुधा? झाले का मग तिचे जायचे नक्की?" आत्याबाई पाक ढवळत म्हणाल्या. आज त्यांनी लाडवांचा पाक जमत नसल्याचे निमित्त काढून सुधाच्या आईला बोलावून घेतले होते.

"नाही हो आली ह्या रविवारी. काय तरी सबमिशन का प्रोजेक्ट च काम राहिलय असं म्हणत होती." पाकाचा चिकटपणा बघत सुधाची आई म्हणाल्या. "फार हट्टी आहे हो पोर. तीच खरं केल्याशिवाय काही खरं नाही बघा, इथेच जवळच कर इंटर्नशिप म्हंटल तर नाहीच ऐकलं तिनं. चालली आहे आता पुण्याला. अजून राहायची सोय व्हायची आहे. दोन ठिकाणी चौकशी केली पण तीन महिन्यांसाठी हॉस्टेल नाही मिळत. एक वर्षासाठी मिळत आहे."

" बंद करू का गॅस आता? बघा बरं तार आली का? " असं म्हणून आत्यानी थोडा विषय बदलला.

" हो... आता रवा टाकूया..."

आत्याचे काहीतरी नक्की चालू आहे असे वाटून प्रसाद बाहेरच्या खोलीतच बसून होता. समोर लॅपटॉप आणि कान मात्र आत स्वयंपाक घरात.  “आता हि काही बोलू नये माझ्याबद्दल म्हणजे झालं. आजच मी तिला सांगतो कि कोणाला काहीच बोलायचे नाही माझ्या आणि  सुधा बद्दल.”

" मी एक सुचवू का?" अत्याचा असा प्रश्न ऐकून थोडा घाबरला "हीच कायं चालू आहे? आता काय सुचवतीये हि?" असा विचार करत होता.

" सुचवा कि हो आत्याबाई ? तुम्ही का परक्या आहेत का?"

"माझा फ्लॅट आहे पुण्याला. मला जायचंच आहे तिकडे. जुने भाडेकरू नुकतेच सोडून गेलेत. त्यामुळे सध्या रिकामाच आहे. थोडी डागडुजी करून घ्यायची आहे मला. आणि काही बँकेची कामं पण आहेत. त्यामुळे दोन महिने तरी मला तिथे राहावं लागेल. तर सुधाला राहू दे माझ्या सोबत.

"असं म्हणता?  यांच्याशी आणि सुधाशी बोलते आधी आणि मग सांगते. पण तुम्हाला उगाच हिची अडचण कशाला? मिळेल कुठेतरी हॉस्टेल. जरा लाडातच वाढलीये पोर. शिस्त जरा कमीच आहे बघा. मदत तर राहिली  तुम्हाला त्रासच व्हायचा हीचा! बाहेर एकटी  राहिली कि जबाबदारी पण कळेल तिला."

 

"मला अडचण नाही हो सोबतच होईल तिची. आणि शिस्तीचे म्हणाल तर मी आहे ना? माझ्यासमोर तर शिस्तीतच राहील! बघा हो तुम्हाला पटले तर. नाहीतर मला एकटीलाच राहावे लागेल. सोबत कोणी असेल तर जरा बरं वाटलं असत मला."

"अहो पण तुम्हाला उगाच खर्चात कशाला पडायचे? बाहेर राहून जरा व्यवहार पण कळेल ना सुधाला! "

"काय हो? कसला खर्च येणार?.... आत्ताच तर म्हणाला मी काही परकी नाही म्हणून! काहीही तुमचं! तुम्हाला अगदीच काही वाटत असेल तर  मग माझ्याकडे पेयिंग गेस्ट म्हणून राहूदे. मग नाही वाटणार तुम्हाला खर्च वैगेरे काही. " आत्याबाईंनी चांगलेच लावून धरले होते. त्या सुधाच्या आईला पटवून दिल्याशिवाय काही गप्प बसणार न्हाव्त्या.

"आता हे पेयिंग गेस्ट म्हणजे काय हो आत्यासाहेब?"

"अहो पेयिंग गेस्ट म्हणजे पैसे देऊन घरच्यासारखे राहणे. पुण्यामध्ये बरीच मूलं मुली असं राहतात.हॉस्टेल पेक्षा जरा घरगुती वातावरणांत! चालेल ना तुम्हाला?"

आता मात्र सुधाच्या आईला काही बोलायला जागाच नव्हती. आत्याबाईंनी सगळ्याच शंका दूर केल्या होत्या. "तुम्ही तर सगळं सोडवलच म्हणायचं आत्याबाई! बोलते मी यांच्याशी आणि कळवते तुम्हाला. पण एक मात्र खर सांगते हो, एकटीला सोडायचा धीर न्हवता होत हो माझा. घोरच होता जीवाला. नुसता.  तुम्ही माझी सगळी काळजी दूर केली बघा. तुम्ही सोबतअसल्यावर मला काहीच काळजी नाही वाटणार तिची. "

" होय हो. काही काळजी करू नका तुम्ही सुधाची. माझ्यासोबत छान राहील ती. आणि मला पण मदत होईल तिची.तसं प्रसादचे पण काही काम असत अलीकडे पुण्याला त्यामुळे अधून मधून चकरा चालूच असतील त्याच्या. मला काही फर दिवस एकटीला राहू द्यायचा नाही पठ्ठया!"

बाहेरच्या खोलीतून प्रसाद कानोसा घेतच होता. आत्याचे बोलणे ऐकून जरा चक्रावूनच गेला होता. फ्लॅट होता अत्याचा पुण्याला. भाडेकरू पण नुकतेच सोडून गेले होते. पण बँकेचे कोणते काम आणि कसली डागडुजी काढली हिने काय माहिती? आणि वर शिवाय माझे काय काम काढली हिने तिकडे? काय घोळ घालते आत्या काय माहित? प्रसाद पुरता गोंधळला होता.

सुधाची आई गेल्या गेल्या लगेच तो आत्याकडे गेला आणि म्हणाला,"आत्या काय चाललंय तुझं ? काय बोलत होतीस तू सुधाच्या आईशी? काय काम आहे तुझं पुण्याला? मला आधी कधीच नाही बोललीस ते? आणि वर शिवाय माझं पण काम आहे म्हणून सांगितलंस?"

"हे बघ मी तुला फार काही सांगणार नाही. पण ह्या तीन महिन्यात सुधाशी बोल. तिला लग्नाला तयार कर. नाहीतर तीन महिन्यांनी मी तुझ्यासाठी दुसऱ्या  मुली बघायला चालू करणार आहे बघ. ठरव आता तूच काय ते."

"अगं पण आत्या... "

"पण नाही नि काही नाही."

"ठीकाय... पण एक प्रॉमिस कर. ती जर नाही तयार झाली तरी  तू कोणालाच काही बोलणार नाहीस. आणि तिलाही तू काही सांगणार नाही माझ्या भावनांबद्दल. "

"ठीक आहे मी नाही बोलणार कोणालाच काही. अगदी सुधाला पण. माझी खात्री आहे कि तुझे प्रेम समजेल तिला एक ना एक दिवस. आणि तू जिंकून घेशील तिला."

क्रमशः