आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते………
आज परत एकदा शालिनीताई आणि नलिनीताई पितृत्व रजेवर आपापली मतं मांडत होत्या. नलिनीताई आपली पारंपारिक , जुनी चाकोरीबद्ध भूमिका सोडायला तयार नव्हत्या आणि शालिनीताई त्यांना स्वतःचा नवा दृष्टीकोण समजावून सांगितल्याशिवाय गप्प बसू शकत नव्हत्या. चला तर बघूया कोणाची भूमिका कितपत योग्य आहे.
नलिनी - "आजकालच्या मुलामुलींचं वागणं किती विचित्र होत चाललं आहे. एक- एक बघावं ते नवलच !"
शालिनी - "नलू अग अस कोड्यात काय बोलते आहेस ? जरा स्पष्ट बोल ना."
नलिनी - "अगं आता हेच बघ ना माझ्या बहिणीच्या सुनेची मागल्या आठवड्यात डिलेव्हरी झाली आणि बहिणीच्या मुलाने चक्क महिनाभराची रजा टाकली. सांग याला काय म्हणावे?"
शालिनी - "नलू तू पितृत्व रजेबाबत बोलते आहेस का?"
नलिनी - "हो बाई बहिणीचा मुलगा - अमित असंच काहीतरी पॅटर्नल लिव्ह म्हणत होता खरं."
शालिनी - "अगं मग त्यात वावगं ते काय आहे? उलट छानच आहे की, होणारा नवा बाबा आपल्या बाळासाठी वेळ देतोय तर!"
नलिनी - "छे बाई मला नाही पटत हे ! एक तर दोनच महिन्यांपूर्वी त्याचं प्रमोशन झालेलं. आणि त्यात ही बायकोच्या बाळंतपणाची रजा , काय तर म्हणे पॅटर्नल लिव्ह!"
शालिनी - "यात न पटण्यासारखं काय आहे सांग बरं मला?"
नलीनी - "अगं कंपनीतील एवढ्या मोठ्या पदावर काम करणारा अमित आता बाळंतिणीच्या पलंगावर बसून बाळाचे लंगोट बदलणार आहे का ?"
शालिनी - "बरं बदललं अमितने आपल्या बाळाचे डायपर तर बिघडलं कुठे ?"
नलिनी - "पुरुषांच्या जातीला हे चांगलं दिसतं का ? आणि शोभत तरी का ?"
शालिनी - "अगं पण बाळाचं डायपर बदलणं यात चांगलं दिसणं आणि पुरुषाच्या जातीला शोभणं हे मध्ये आलंच कुठुन ? आपल्याला मूल होणार म्हणून त्या काळात पतीने आपल्या पत्नीसोबत राहावं, असं एखाद्या पुरुषाला वाटलं, घर काम, बाल - संगोपनात मदत करावी म्हणून त्यांना आपल्या कामातून (ते राष्ट्रीय कर्तव्य असो किंवा फार मोठे पद किंवा एखादी दहा ते सहाची नोकरी) सुट्टी घेतली तर त्यावर एवढी चर्चा ,वाद ,नाक मुरडणं अजूनही आपल्या समाजात का व्हावं ?
बाईला मूल होतं, स्तनपान करावं लागतं म्हणून तिनं करिअरला ब्रेक देत वर्ष-दोन वर्ष रजा घेतली किंवा एखादी छोटी-मोठी नोकरी सोडली तर ते तिच्या मातृत्वाचं कर्तव्य ठरतं , बरं मग त्याच वेळी बाळाच्या वडिलांचं काय ?
सगळ्या बाबांना मोठी रजा मिळतही नसेल, पण दहा वीस दिवस रजा मिळणे तर नक्कीच शक्य असतं. मुळात एक स्तनपान सोडलं तर बाळाला सांभाळतांनाची सर्व काम नवा बाबाही त्या विशिष्ट काळात करूच शकतो की.
आणि तू तर बघतेच आहे की अलीकडे घरात मदतीला वडीलधारे नसतात तेव्हा नव्या आई-बाबांना एकमेकांना सांभाळून घेत हा प्रवास करायचा असतो."
नलिनी - ( शालिनी ताईंचे बोलणं मध्येच तोडत) "अग पण माझ्या बहिणीकडे ती आहे शिवाय तिची सासू पण आहे. त्या दोघी मिळून छान सांभाळतील की बाळाला. त्यामुळे अमितने सुट्टी घेण्याची काही गरजच नव्हती."
शालिनी - "हे बघ नलिनी मुल जितकी आईचं असतात ना तितकीच बाबाची पण असतात. त्यामुळे जर आई बाळासाठी आपलं काम स्लो डाऊन करणार असेल तर बाबांनीही काही दिवस सुट्टी घेणे हे काय जगावेगळं किंवा बायकी नाही. मुळात बाळाचे लंगोट किंवा डायपर बदलणं हे काम पुरुषाचं नाहीच या मानसिकतेतून आपण बाहेर पडत नाही तोवर एकट्या बाईवर मुलांची जबाबदारी येणार आणि मग महिलादिनाला आपणच परिसंवाद भरवणार की, \"करिअर की घर , बाईसाठी काय महत्वाचं?\"
नलिनी - "तरीही शालिनी तू म्हणते ते मला तितकसं पटलेलं नाही बाई."
शालिनी - "मला एक सांग तुझ्या बहिणीची मुलगी- अनिता, अनिताचं नाव आहे ना तिचं?"
नलिनी - "हो अनिताच नाव आहे , बरं मग पुढे काय?"
शालिनी - "अनिता जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिचा नवरा तिची खूप काळजी घ्यायचा असं तूच मला सांगितलं ना!"
नलिनी - "अगं तुला तर माहितीच आहे ना अनिताला लग्नानंतर बरेच वर्ष मूल-बाळ होत नव्हतं. मग नंतर आय. वी.एफ. मुळे तिला प्रेग्नेंसी राहिली पण गर्भाशयाच्या नळीत, त्यामुळे तिच्या जीवाला धोकाही होता. म्हणून मग दुसऱ्यांदा डॉक्टरांनी आधी तिची गर्भाशयाकडे जाणारी ट्युबच काढून टाकली आणि नंतर आई.वी.एफ. केलं. फार जोखमीचं होतं बाई ते सगळं. पण अजय रावांनी ( अनिता चा नवरा) खूप साथ दिली हो अनिताला! दर महिन्याला तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन जाणं, तिचे हार्मोन्सचे इंजेक्शन्स, वेगवेगळ्या तपासण्या, आणि मग बाळंतपणाच्यावेळी स्वतः हजर होते अजयराव दवाखान्यात."
शालिनी - "आता तूच बघ अनिताला बाळ होताना काही समस्या होत्या म्हणून, तिच्या नवऱ्याने तिला छान मानसिक - भावनिक आधार दिला आणि अनिताने एका छान बाळाला जन्म दिला. त्यामुळे अजयरावांचं म्हणजेच जावईबापूंचं तुम्हाला सगळ्यांना केवढं कौतुक! पण त्याच वेळी स्वतःचा भाचा किंवा तुझ्या बहिणीचा मुलगा पितृत्व रजा घेतोय, हे तुम्हाला पचायला जरा जड जातंय नाही?
आणखी एक जर मुलीचा नवरा-तुमचा जावई मुलीला घरकामात मदत करत असेल, मुलांना शाळेत जाण्याकरीता तयार करत असेल, मुलीच्या दुखण्या खुपण्याकडे तिला मानसिक- भावनिक आधार देत असेल तर आपण म्हणतो , \"किती छान जावई मिळाला!\"आणि तोच जावई सासरी म्हणजे मुलीकडच्यांना आर्थिक किंवा इतर दुसरी कुठली मदत करत असेल तर सोने पे सुहागा पण……..
पण हेच कर्तव्य आपल्या मुलाने बजावले किंवा पूर्ण करतो म्हटलं , तर आपल्या भुवया उंचावतात. मुलाला आपण बायकोचा गुलाम किंवा इतर अनेक हीन दर्जाची बिरुदं लावतो. काय म्हणायचं आपल्या या मानसिकतेला?
म्हणजे मुलगा केवळ आईचा आज्ञाधारकच असावा पण जावई मात्र मुलीची काळजी घेणारा , मुलांचं करणारा असावा. किती स्वार्थी आणि दुटप्पी भूमिका आहे ही आपली नाही का!
आणखी एक तुला सांगते, शालू आजकाल मोठमोठ्या कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांना पॅरेंटल लिव्ह देतात. काहीठिकाणी केअरगीव्ह रजेची पण तरतूद असते आणि याशिवाय कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी 15 दिवसाची भरपगारी रजा ही काही कंपन्या देतात.
तर आपला जो मूळ मुद्दा होता की, पितृत्व रजा खरंच घ्यायला हवी का? तर 2015 आणि 2017 मध्ये फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी दोन वेळेस पेटरनिटी रजा घेतली होती. दोन महिने त्यांनी मुलं आणि घर सांभाळलं. तुला आठवत असेल तर ही चर्चा आपल्याकडे विराट कोहली ने पितृत्व रजा घेत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही झाली होती. तेव्हा तर आता हा भारतात जाऊन काय डायपर बदलण्याचा प्रशिक्षण घेणार का ?- असे विनोद सोशल मीडियावर फिरले. अजिंक्य रहाणेने पुढची कसोटी जिंकल्यावर अनेकांनी विराटला सल्ले दिले \"आता घरीच बस, डायपर बदल, बाळाची शी काढ आणि तीच तुझी लायकी आहे\". त्याच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठ हजार धावांचा पल्ला गाठला हे मी नवीन सांगायला नको. ट्विटर चे सीईओ पराग अग्रवाल त्यांनीही जाहीर केलं की दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ते तीन महिने पालकत्व रजा घेणार आहेत. 37 वर्षाच्या या सीईओकडे नव्यानंच मोठी जबाबदारी आलेली असतानाही ते म्हणाले की , "मला रजा घेणे गरजेचे आहे" आणि कार्पोरेटच्या बड्या बड्या कंपन्यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या निर्णयाचं कौतुक करणारे ट्विट्सही केले.
त्यामुळे शालिनी आपण आता आपली जुनी मतं, जुने विचार, जसे की सव्वा महिना बाळाचे तोंड पाहायचं नाही बाळंतिणीच्या पलंगावर किंवा तिच्या खोलीत जायचं नाही. हे सगळं सोडून नव्या बदलांना, नव्या विचारांना स्वीकारायला हवं. कारण हीच आता प्रत्येक कुटुंबाची आणि काळाचीही गरज आहे हो ना! बाबासाठी आणि आईसाठी ही जेव्हा दोन्ही महत्त्वाचं आणि सामायिक काम विभागणीसह जबाबदारीचं ठरेल तोच सुदिन म्हणावा!"
संदर्भ - मेघना ढोके यांचा नागपुर लोकमत येथून ५/३/२०२२ रोजी प्रकाशित लेख.
तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.
जय हिंद
७/३/२०२२