डायरीतलं ते पान

The Page Of Diary


डायरीतलं ते पान..
विषय - नाते मैत्रीचे


आकाशात निरव शांतता पसरली होती, तेजोहीन सूर्य क्षितिजावर आला, अन्वीने देवघरात निरांजन पेटवली अगरबत्तीचा तो मोगऱ्याचा दरवळ घरात दिमाखात फिरत होता. अन्वी कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आराम खुर्चीत येऊन बसली. आज नामंकीत डॉक्टर झालेल्या अन्वीला मनातलं शल्य स्वस्थ बसू देईना. डोळ्यामधला थेंब जसा कॉफीच्या पात्रात विरघळला अन कॉफीचा फुरका घेत अन्वीने भूतकाळात धाव घेतली.

अन्वी आणि सांची बारावीच्या या विद्यार्थिनी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकाच बैलगाडीची दोन चाके "मेड फॉर इच अदर" हे लेबल जणू यांच्या आयुष्याचं एकक होतं. सांचीच्या सतत बरोबर असणाऱ्या अन्वीला तिच्याशिवाय दुसरं सोबत कुणीच नव्हतं. जणू सांची आयुष्य बनलं होतं तिचं. अभ्यासात टाळाटाळ करत अन्वी सांचीशी धिंगाना घालायची. प्रेमाच्या या महासागरास दृष्ट ना लागो अशी कृष्णा-सुदामाची जोड़ी फुटलीच.

सांची अचानक अन्वीशी कानाडोळा करु लागली, प्रत्येक कृतीला आडवे उत्तर देऊ लागली. पण मैत्रीच्या या विश्वात अखंड बुड़ालेल्या अन्वीला हे काहीच दिसेना. अन त्यादिवशी सांची जरा मोठ्यानेच खेकसली. "काय ग , सतत मागे मागे असतेस.?"
मला माझही आयुष्य आहे. "प्रत्येक वेळी तू माझ्यासोबतच असावं का?"
तिचा नाजूक सुर आज भेसूर भासला. अन्वीचे डोळे आपसुक पाणावले. सांची रागाच्या भरात खुप काही बोलत अन अन्वी एखाद्या निद्रिस्त भंगलेल्या प्रतिमेसारखी स्तब्ध उभी. अश्रू पापण्याची सीमारेषा ओलांडून ओसंडून वाहत होते.
"मला तुझी जराही गरज नाही, माझ्या आयुष्यातून तू कायमचं निघुन जावसं. तरचं मी सुखाने जगु शकेन."
सांचीचे एक एक बाण अन्वीच्या काळजाशी ठोक्यांचे युद्ध खेळत होते. अन अश्रूची गतिही वाढवत होते.
" पण, पण सांचू अगं, मी माफ़ी मागते काही चुकलं का माझं.?"
\"मला काही एक ऐकायचं नाही.!\"
"तू सतत अशी मागे मागे फिरतेस मला अशी लोचट मैत्रीण नकोय.!" हा तीर ज़रा जास्तच भिडला, अन्वीच्या भावनेशी. सांची तिथून रागाने निघुन गेली, अन अन्वी अश्रू ढाळीत आजवरच्या तिच्या सोबतच्या आठवणीत रमुन रडू लागली. बुबळं लाल झाली, डोळे सुजलेले, केस विखुरलेले, व्यथा गुदमरलेली, भावना चिघळलेल्या, अन वेदना मेलेल्या. तिला तिथेच शांत झोपही लागली.

सकाळी अन्वीने चेहऱ्यावर हास्य मुखवटा, स्वाभिमानी जगण्याचा घेतलेला निर्णय, अन तिच्यापेक्षा यशस्वी होण्याचा केलेला मानस तिला स्वस्थ बसू देईना. प्रत्येक वेळी तिच्या पुढे सर्वात पुढे अन्वी असायची. ज्वाला डोळ्यात तशाच. नंतर कॉलेज वेगळी झाली. सांचीने सामाजिक क्षेत्रात आपलं आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला, अन अन्वीला मेडिकलला प्रवेश मिळाला.अभ्यास करत असताना मनात घुसलेले सांचीचे ते कडु शब्द अन्वीस अधिक प्रखर बनू लागले. मेडिकल टॉप करत अन्वी अमेरिकेतून सहा महिन्याचं ट्रेनिंग करुन परतली. यशाचं तोरण चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

आता ती वेळ आली आहे , तिच्या लोचट या शब्दाला उत्तर देण्याची. अन्वीच्या मनात सांची विषयीची काजळी साचतचं चालली होती. अन जुन्या मैत्रिणीकडून तिच्याबद्दल चौकशी करुन तिला आपल्या यशाचा तोरा आसमंती भिनलेला दाखवण्यासाठी अन लोचट मुलगी काय करु शकते या आगीची ज्वाला बुजविण्यासाठी अन्वीची स्वारी आदिवासी गावाकड़े रवाना झाली.

गाडी खाचखळगे पार करीत सावकाश गावात प्रवेश करु लागली. आदिवासी लेकरं नविन कोरी करकरीत गाडी पाहून अचंबित चेहऱ्याने अन उघड्या शरीराने गाड़ीमागे धावू लागली. दिलेल्या पत्यावर पोहचून गाडीनेही सुटकेचा श्वास सोडला.

पोहचल्यावर समजले की सांची बाहेर गेलीय.अन्वीने हॉल न्याहाळण्यास सुरुवात केली. एक साधे घर पण स्वच्छ्ता ,समृध्दी घरात नांदत होती. अन्वीचे लक्ष अचानक समोर असलेल्या चित्रफितकड़े गेले.

हो, अन्वी- सांचीची सुंदर चित्रफित भिंतीची शोभा वाढवत होती. डोळे आपसुक ओले झाले अन डोळ्यावरचा गॉगल तो पाण्याचे थेंब लपवत होता. पाण्याचा ग्लास उचलत अन्वीने त्या चित्रफितकड़े बोट करत मातोश्रीला प्रश्न केला,
"ती इमेज कोणाची आहे?"
ती, ती माझी सांची अन तिची मैत्रीण अन्वी. ती खुप मोठी डॉक्टर झालीय. आमची सांची सतत तिच्या यशाच्या कहाण्या सांगत असते.

अन्वीने डोळ्यावरचा चश्मा खाली घेतला, डोळ्यातल्या अश्रूत बुडालेले बुबळं मातोश्रीस सर्व काही सांगून गेली.
" अन्वी, अगं तुला पाहिल्यावर सांची खुप खुश होईल बघ.! " थांब, मी तिला फ़ोन लावून बोलावून घेते.
नको मावशी मी थांबते.
आज अन्वीला स्वतःच्या खुजेपणाची लाज वाटली.
समोर पडलेली डायरी अन्वीने उचलली. हो सांचीचीच होती डायरी.त्यावर अन्वीच्या यशाचे तोरण कोंदुन ठेवले होते. तिला सहज आठवण झाली ती बारावीच्या त्या वर्षाची ज्याने अन्वीचं आयुष्य बदलवलं. तीने मावशीला विनंती करून कपाटातील सांचीची जुनी डायरी घेतली. एकेक पान अगदी जुन्या आठवणीतुन प्रवास घडवू लागले. ओझरत्या आठवणी ताज्या होऊन डोळ्यांसमोर नाचू लागल्या. अन अन्वी अचानक स्तब्ध झाली. डायरीतलं ते पान नात्याला देवत्व बहाल करुन गेलं.

प्रिय अनू,
अगं, आज मी तुला बोलले त्याचे एकेक घाव माझ्या काळजाला भिडले ग. मला तुझ्यातला आत्मविश्वास कमी जाणवायला लागला होता, तुला माझी इतकी सवय झाली की तू स्वतःच आयुष्य विसरलीस. प्रत्येक वेळेस आधाराला मी असावं असं तुला वाटायचं.माझ्यासोबत राहून कोमट आयुष्य जगायला लागली होतीस ग तू. मला तुला या अवस्थेत पहावेना ग अनू, मला माहित आहे तुला हे घाव लागले असतील.आता तू पेटून उठावं, जिंकावं, यशस्वी व्हावं,अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्यावास. यश तुझचं आहे ग. फ़क्त मला तुझ्यातला आत्मविश्वास जागा करायचा होता. मी तुझ्यासोबतचं नातं तोड़लं ग आज, पण मी मैत्री जपली ना गं अनू...?
तुझीच सांचू..!!

हृदयातील पेटलेली आग डोळ्यातील पाण्यात विरुन गेली.अन अचानक गाडीचा आवाज आला अन अन्वी डायरी पुढ्यात ठेवून स्वतःला सावरून बसली. दारावर एक टिपिकल स्री. तिचा चेहरा थोडासा काळवंडलेला पण तेजस्वी लोचनी चांगल्या कामाची पावती देत होते. साड़ी अगदी साधी, चप्पल, केसांची सुंदर वेणी.

अनू , आत येताच अन्वीने तिला जोरदार मिठी मारली. अन अश्रूने तिची साडी ओली करु लागली. गुदमरलेल्या साऱ्या भावना बाहेर साडीवरती अश्रूरूपी सांडू लागल्या.
"माफ़ कर ग !"
अन्वीचा हा शब्द सुडाच्या विजलेल्या आगीसोबत बाहेर आला.
"ये असं नाही बोलायचं .!"
पुढ्यात पडलेली डायरी सांचीला सर्व काही सांगून गेली. मग शांत होऊन दोघीही सोफ्यावर बसल्या. अन पोहयाच्या आस्वादा बरोबर जुन्या आठवणी मधे दोघीही रंगून गेल्या.

आज अन्वीला आपल्या छोटेपणाची कुठेतरी लाज प्रकर्षाने जाणवली.


अन अचानक कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
राहुल?
"अशी अंधारात काय बसली बाल्कनीत ? लाइट तरी लावायचास ना.?" ओघळलेले अश्रू गालावरचे सुकून गेले होते अगदी मोगऱ्याच्या सुकलेल्या गजऱ्यासारखे .! तिने कॉफीचा कप टेबलवर ठेवला अन गुदमरलेली भावना तशीच हृदयाच्या एक कोपऱ्यात ढकलत अन्वी स्वयंपाक घरात घुसली . मागोमाग राहुलही तिच्या मागे गेला.

बाल्कनीत उरली होती ती निरव शांतता. हवेच्यावलयी घुसमटलेल्या अन्वीच्या भावना अन सर्वांना साक्ष देणारा तो कॉफीचा रिकामा कप...!

अन्वीच्या लपून हरवलेल्या आयुष्याचा दरवाजा उघडून तिच्या अस्तित्वाचा आरसा नकळत तिच्यासमोर उघडा करुन सांचीने तिच्या आयुषी सुखाचं कोंदन रचलं होतं. अन्वी जो भाळी सुडाग्नीची ज्वाला घेऊन यशस्वी झाली ती तर सांचीने दिलेल्या फुलांचा पुष्पहार होता. याची अन्वीस जेव्हा जेव्हा जाणीव होते, तेव्हा नकळत तिचे अश्रू पापण्यांची सीमारेषा ओलांडतात.

सुशांत भालेराव, डोंबिवली (पूर्व)
गोष्ट छोटी डोंगराएवढी.