Feb 23, 2024
मनोरंजन

हा कचरा कुणाचा?

Read Later
हा कचरा कुणाचा?

हा कचरा कुणाचा?


  

               कचऱ्याबद्दल आपल्या समाजात खूपच उदासीनता आहे. कचऱ्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते, अनेक आजार पसरतात तरीही रस्त्यावर, गल्ली-बोळात, गावाबाहेरची मोकळी जागा, एखादं मोकळं रान किंवा मैदान जिथे मोकळी जागा मिळेल तिथे आपण कचरा सरधोपटपणे फेकून देतो. कधी शेजारच्या किंवा बाजूच्या घरासमोर, अगदी बिनदिक्कतपणे फेकतो. वरून साळसूदपणाचा आव आणून फेकलेला कचरा आमचा नाहीच असं ही म्हणतो, पण हे असं करणं खरंच योग्य आहे का?


*************************************************


अजय- " सुधा, ए सुधा कुठे गेली ही बाई? घरासमोर कचऱ्याचा नुसता ढीग आणि घाणेरडा वास! काय म्हणावं हिला? सुधा ये सुधा."


सुधा -" काय झालं बेंबीच्या देठापासून बोंबलायला? किती जोरात ओरडत आहात!"


 अजय-" अगं हा घरासमोर, फाटकाच्या बाहेर किती कचरा? घराकडे येणाऱ्या रस्त्यावर इतकी घाण? रस्ता, रस्ता वाटत नसून नगरपरिषदेचा उकिरडा वाटतोय!"


सुधा -" मग मी काय करू?"


अजय-"काय करू म्हणजे? स्वच्छ कर ही जागा!"


 सुधा-" मी ती जागा स्वच्छ करणार नाही. ज्याने कचरा टाकला असेल तोच उचलेल ती घाण!"अजय- "म्हणजे तू हा कचरा उचलणार नाहीस तर?"


 सुधा -"नाही! अजिबात नाही!!"अजय-" मी तुला शेवटचं सांगतोय, उचल तो कचरा आणि स्वच्छ कर ती जागा!"


 सुद्धा (रडवेली होऊन) -"ओरडा तुम्ही माझ्यावरच ओरडा. घाण करतील बाकीचे आणि तुम्ही माझ्यावरच घाण स्वच्छ करण्याची जबरदस्ती करा."


अजय -"कोड्यात बोलू नको स्पष्ट काय ते सांग."


 सुधा -"आता आणखीन काय स्पष्ट सांगू? ते वरच्या माळ्यावर राहायला आलेले नवीन भाडेकरू सतत वरून काहीतरी खाली टाकत असतात. हा कचरा त्यांनीच टाकला. काल माझ्या डोक्यावर वरून कुंडी पडणार होती अगदी थोडक्यात वाचली मी. परवा त्या बाईंनी खरकट पाणी माझ्यावर फेकलं आणि त्यांची मुलं तर इतका धिंगाणा करतात की, अरे बापरे! मागच्या आठवड्यात त्यांच्या साऊंड सिस्टिमचा आवाज इतका मोठा होता की, आपल्या घरातील तुमच्या आईचा फोटो खाली पडून फुटला. त्यांची मुलं वरती एवढ्या उड्या मारतात की, असं वाटतं जणू भूकंप आला आहे आणि डोक्यावरच छत आत्ताच खाली पडून मी त्या ढीगाऱ्या खाली गाडले जाईल….." एवढे बोलुन सुधा रडायला लागली.
 अजय-"अस्स !थांब आत्ताच देशपांड्यांना बोलवतो आणि हा कचऱ्याचा प्रश्न निकालात काढतो."


            अजयने मोठमोठ्याने आवाज देऊन देशपांडे यांना बोलावले.
 देशपांडे -"काय झालंय अजयराव?"


अजय -"काय झाले काय? काय झाले? थोडसं घरभाडं जास्त मिळणार म्हणून तुम्ही कसले लोक आमच्या डोक्यावर आणून बसवले? " देशपांडे (अगदी शांततेने)- "डोक्यावर बसवले म्हणजे?"


 अजय -"म्हणजे आमच्यावरचा ब्लॉक तुम्ही त्यांना भाड्याने का दिलात? किती कचरा करतात ते! आणि त्यांची ती वानरसेना विचारू नका!"


 देशपांडे-"पण झाले तरी काय? जरा स्पष्ट सांगा ना!"


 अजय-"ते वरचे भिडे मास्तर स्वतःचा सगळा कचरा आमच्या दारासमोर फेकतात. त्या बाईने काल हिच्यावर खरकट पाणी फेकलं. परवा हिच्या डोक्यावर कुंडी पडता पडता वाचली. टीव्ही आणि साऊंड सिस्टिमचा आवाज असा की, जणू घर नसून थेएटर किंवा सार्वजनिक उत्सव मंडळ आहे. ते काही नाही,तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना कचरा फेकायला लावा, नाहीतर हे घर खाली करायला लावा."


 देशपांडे -"हे बघा अजयराव तुम्ही असा डोक्यात राग घालून घेऊ नका. आपण कचऱ्याचा प्रश्न सामोपचाराने मिटवू"............समजुतदारीच्या स्वरात देशपांडे बोलले.


 सुधा- "कसा मिटणार आहे सामोपचाराने हा प्रश्न? सांगा ना? सांगा!".


 देशपांडे-" हे बघा सुधाताई मी बोलतो भिडे मास्तरांशी".


           तेवढ्यात भिडे तिथे आले.


 देशपांडे-"भिडे मास्तर मी काय म्हणतो, फाटकाबाहेर कचरा तुम्ही फेकलात का?भिडे-"देशपांडे मी कशाला फेकन कचरा फाटकाबाहेर? कचरा कुठे फेकायचा ते सुद्धा मला कळत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?". -भिडे रागाने बोललेदेशपांडे-" नाही नाही भिडेजी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण अजयरावांना असं वाटतं की, तो फाटका बाहेरचा फेकलेला कचरा तुमचा आहे म्हणून, मी तुम्हाला विचारले"....... शक्य तेवढी आवाजात नरमाई ठेवत देशपांडे बोलले. भिडे -"अहो हा कचरा माझा असूच शकत नाही. हे बघा काय काय आहे त्या कचऱ्यात, सिगारेटची थोटकं, तंबाखूच्या पुड्या,अंड्याची टरफलं… मला या कसल्याच गोष्टींची आवड आणि व्यसन नाही."


अजय-" मग तुम्हाला काय म्हणायचं? मी ही सगळी व्यसन करतो? श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मी अंडी खाल्ली असं तुम्हाला म्हणायचं आहे का?"


 भिडे-" हे बघा अजयराव मी काही तुमचं नाव घेतलेलं नाही. मग माझ्या बोलण्याचा तुम्हाला इतका त्रास का होत आहे? "


 अजय-" हे बघा देशपांडे, मी तुम्हाला आधीच म्हणत होतो की, माझ्या मेहुण्याला वरचा ब्लॉक भाड्याने द्या, पण थोड्या जास्त घर भाड्याच्या मोहापायी तुम्ही हे कसले लोक इथे घेऊन आलात? "


 भिडे-" अजयराव शब्द जरा सांभाळून वापरा. आम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकं आहोत".


अजय- "हो ना! ते तर दिसतच आहे. वरून कचरा फेकता, खरकट पाणी सांडवता, कुंड्या खाली पाडता, घराचं तर नुसतं थेएटर केलं आहे."
भिडे -"एक मिनिट अजयराव, तुमची मुलगी धावाधाव करत होती म्हणूनच माझ्या दोन कुंड्या खाली पडून फुटल्या. माझी बायको खरकट पाणी बाहेर फेकायला जात होती, तेव्हा तुमच्या लहान्यानं तिला मागून धक्का दिला, आणि हो आधी तुमच्या घरच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी करा मग आम्हाला सांगा."


 अजय -"ते काही नाही देशपांडे, भिडे मास्तरांना कचरा उचलायला सांगा!"


 भिडे-" मी कचरा उचलणार नाही. "


                तेवढ्यात देशपांडे यांचा थोरला-माधव तिथे आला. माधव एक समाज सुधारक होता.


माधव-" काय झालं आहे? तुम्ही सगळे इतके वैतागलेले का दिसत आहात?" देशपांड्यांनी माधवला झालेला सगळा किस्सा सांगितला.


 माधव -"एवढच ना! बरं मी उचलतो हा कचरा. "


 तेवढ्यात अजयची बायको सुधा तिच्या दरवाजातून ओरडली-


सुधा -"अहो माझी सोन्याची अंगठी हरवली."अजय-"काय?सोन्याची अंगठी?"


सुधा -"सकाळी बोटात होती आता नाही आहे. " आणि ती रडायला लागली.


अजय -"आता बोटात नाही? तर मग गेली कुठे?"

सुधा -"कदाचित दुपारी कचरा फेकताना पडली वाटते. "


अजय -"काय? वेंधळी कुठली!"


        माधव कचरा उचलण्याच्या तयारीत होता तेवढ्यात कचऱ्यात सोन्याची अंगठी चमकली. अजयने माधवला कचरा उचलण्या पासून अडवले.


अजय-"असु दे! माधव मीच कचरा उचलतो."


भिडे- "का?एवढ्यात कशाची उपरती झाली तुम्हाला?"


अजय -"तुम्ही मध्ये बोलू नका भिडे."


 भिडे -"असे कसे! आतापर्यंत कचरा मी टाकला म्हणून तुम्ही शंख करत होतात ना! हा कचरा आता तर नक्कीच माझा आहे."


अजय -"बरं बरं हा कचरा आमचाच आहे, हे मी मान्य करतो."


भिडे -"सिगारेटची थोटकं? तंबाखूच्या रिकाम्या पुड्या?अंड्याची टरफलं?"


अजय -"त्याचं काय आहे ना, मी आहे कारकून ऑफिसमध्ये खूप काम असतं त्यामुळे हे सगळं करावं लागतं. मी मान्य करतो हा कचरा आमचाच आहे.कचरा अजयने उचलला हे वेगळे सांगायलाच नको, हो ना?


 


*******************************************


 आपल्या आजूबाजूला असे पुष्कळ लोक असतात की, जे केवळ सभ्यतेचा आणि चांगुलपणाचा आव आणतात. मुळात अनेक खोड्या आणि इतरांच्या आयुष्यात त्यांनीच काड्या केलेल्या असतात, पण तरीही आपण कसे साधे-सरळ आहोत ते इतरांना वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. 


*********************************************


वरील प्रसंग एका सत्य घटनेवर आधारित आहे.


 वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा तुमचे अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.

फोटो -साभार गुगल.

धन्यवाद.


जय हिंद.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//