Feb 24, 2024
जलद लेखन

पोरका भाग तीन अंतीम

Read Later
पोरका भाग तीन अंतीम


कुंती -"कर्णा शेवटी तू ही एक पुरुषच रे! स्त्रियांच्या निष्ठा, मर्यादा तुला कशा समजतील?

कर्ण -"राजमातेने एका मुलाला लग्न आधी जन्म दिला आणि मग नदी प्रवाहात सोडून दिलं. अशा व्यक्तींनी, स्त्रियांनी मर्यादांच्या बाता करू नये!"

कुंती -"कर्णा बोल! अजून बोल! आयुष्यभराची बोच, अनेक तपांचा सल, अपमानाचे आसूड आज माझ्यावर तू ओढ! आज माझं मातृत्व तुझ्या वाग्बाणंनी घायाळ व्हायला, तुला माझी आणि तुझी व्यथा सांगायला लटपटत आहे. पण आधी तू तुझा संतापदग्ध आत्मा शांत कर. मग आपण बोलू!"

कर्ण -"मी काय बोलणार? बोलण्याचा अधिकार सुतपुत्राला नसतो. तो केवळ आदेशाचा गुलाम असतो."

कुंती -"कर्णा तू क्षत्रिय आहेस हे किती वेळा सांगू तुला? अरे तुही माझ्यासारखा पोरका. माझ पोरक पण आजपर्यंत मी कधी कुणाला सांगितलं नाही, दिसूही दिलं नाही. पण माझ्या हृदयाची ती खोल तळातली जखम आज मी तुला दाखवणार आहे. शब्दांचा आश्रय घेऊन, माझी वेदना तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा निष्फळ प्रयत्न करणार आहे."


"मी मथुरेच्या राजाची शुरसेनाची कन्या. त्यांनी मला, मी लहान असताना आपल्या आत्ये भावाला मला न सांगता देऊन टाकलं. राजा शूरसेना ची पृथा मग कुंतीभोज राजाची कन्या कूंती झाली. काही काळ लोटला आणि एके दिवशी महर्षी दुर्वासा माझ्या वडिलांकडे कुंतीभोजांकडे आले. त्यांनी अनुष्ठान करायचे ठरवले होते, आणि मी अल्लड नवयौवना त्यांची सेविका झाले. दुर्वासांचे अनुष्ठान पूर्ण झाले त्यांनी मला आशीर्वाद रुपी "देवाहुती मंत्र" दिला. त्या मंत्राचा सामर्थ्य असं की मी पंचमहाभूतांना वशिभूत करून माझ्या पुत्रांचा पिता बनवू शकत होते.


आणि एकदा न राहून, घडू नये ते घडलं! मी वाड्याच्या सौंधात उभी होते. पूर्वेकडून रवीबिंब उदय होत होतं आणि मी अचानक मंत्रोच्चार केले. साक्षात सूर्यदेव माझ्यासमोर प्रकट झाले त्यांनी मला त्यांच्या बहुपाशात घेतले. एक तेजाचा, प्रकाशाचा गोळा माझ्यासारख्या एक य:कश्चित कन्येसह रत झाला आणि एक प्रचंड संक्रमण झालं. माझ्या उदरात तू गर्भ म्हणून वाढू लागला. क्षत्रिय कन्यांना दोन प्रकारचे पुत्र असतात- विवाहपूर्वीचे कानीनी आणि विवाहानंतरचे सहोढ. मी जर मथुरेत असते तर माझ्या आईला, बाबांना सांगून तुला आपलंसं केलं असतं, पण मी माझं मातृत्व -कुमारी मातृत्व कुंतीभोज बाबांना सांगू शकले नाही! कारण मला तो अधिकारच नव्हता. मी हतबल होते, एकाकी होते. अखेर हृदयावर दगड ठेवून तुझ्या जन्मानंतर, मी तुला माझ्यापासून विलग केले. पण मी आजही तुझ्यासाठी झुरते, तळमळते. चल कर्णा! माझ्यासह आपल्या भावांकडे चल. अधर्माचा पक्ष सोडून धर्माकडे ये."

कर्ण -:माते मला माफ कर. मला तुझी अगतिकता, असाह्यता कळली. पण आता तुझ्यासोबत येऊन मी सहावा पांडव होऊ शकत नाही. जेष्ठ असूनही मी कनिष्ठ कसा होवू? माते तुझा प्रेमळ हात, आशीर्वाद हेच माझं भाग्य! तुला वाटत असेल की, मी पांडवांचा नि:पात करेन तर ऐक अर्जुन सोडून मी कुणालाही मारणार नाही. एक तर अर्जुन नाहीतर कर्ण हा च या पृथ्वीतलावर जिवंत असेल. अर्जुनासह पांडव किंवा अर्जुनाशिवाय मी धरून पाच. असे तुझे पाच मुलगे नेहमी जिवंत असतील. ह्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही आणि तुला देऊ शकत नाही."

आणि कर्ण आपल्या वाटेने निघून गेला.


युद्धात कर्णाला वीर मरण आले. पण त्यानंतर मृत्यूपासून कर्ण नवा झाला. कर्ण गेला आणि कुंती त्याच्याशी समरस झाली. कुंतीही पोरकीच होती. तिच्या एकाकी पणाचा भग्न वारसा कर्णाकडे काय तो आला. आपले उपेक्षित मातृत्व झुरून, झुरून जगताना तिने कृष्णाकडे सतत दुःखाचे वरदान मागितले आणि जीवनाच्या शेवटच्या बिंदूपर्यंत ती जगली. कर्णाच्या मागून फरफट जाण्यात तिने स्वतःच्या मातृत्वाची धन्यता मानली.


समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.

**********************************************
फोटो साभार गुगल

संदर्भसूची


1.मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय लेखक रणजीत देसाई.

3. व्यासपर्व लेखिका दुर्गाबाई भागवत.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//