युद्धाचा दिवस ठरला. कुरूंचे सेनापती होते पितामह भीष्म. पण त्यांनी दुर्योधनाला सरळ निक्षून सांगितलं,\"जर कर्ण युद्ध करणार असेल तर मी हाती धनुष्य किंवा खडग धरणार नाही.\" नाईलाजाने कर्ण युद्धभूमी बाहेर राहिला.
त्याच दरम्यान देवेंद्राने कर्णाकडून त्याची अभेद्य कवच कुंडले दानात मागून घेतली. अशाच एका अपरान्हं दुपारी कर्ण गंगेच्या पाण्यात आपली सूर्यपासना करीत होता. ओंजळीने सूर्याला अर्घ्य देत होता. शेवटी कर्णाने उच्च रवाने विचारले, "कुणी याचक आहे?" कुठलाच आवाज आला नाही आणि कर्ण माघारी फिरला.
गंगेच्या किनाऱ्याजवळ ची वाळू तप्त झाली होती, आणि दूर कोणीतरी श्वेत वस्त्रधारित व्यक्ती कर्णाचे निळे उत्तरीय डोईवर घेऊन उभी होती. कर्णाला आश्चर्य वाटले \"कोण असावे?\" माणसाचं मन? वासना? की साक्षात मृत्यू? पण कसलाच कयास त्याला करता येईना! जवळ गेल्यावर त्याला समजले ती श्वेत वस्त्रधारी व्यक्ती एक स्त्री आहे. कर्ण तीला टाळून पुढे जाऊ लागला, तसा त्या स्त्रीने आवाज दिला
कुंती -"कर्णा थांब!"
कर्ण -"कोण?" त्याने मागे परतून बघितल्यावर त्याला राजमाता कुंती दिसली. एका क्षणात प्रेम, करुणा, ओढ आणि मग तेवढ्याच वेगात क्रोध, संताप, तिरस्कार आणि द्वेष त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला.
कुंती -"कर्णा म- मला तुझ्याशी बोलायचं आहे!"
कर्ण -"राजमाता कुंती देवींना सूतपुत्र कर्ण वंदन करीत आहे."
कुंती -"कर्णा तू सूतपुत्र नाहीस. तू सूर्यपुत्र आहेस. तू क्षत्रिय आहेस."
कर्ण -"राजमाता मी सूर्यपुत्र असूनही माझ्या पित्याने माझे पितृत्व कधीही स्वतःकडे घेतलं नाही, आणि माता? माझ्या मातेने मला नाळ कापल्या क्षणी अश्व नदीच्या पदरात सोडलं."
कुंती -"कर्णा नको रे हृदयाला घरे पडतील असं बोलू! मी, मी तुझी जननी आहे. कर्णा मी तुझी जननी,माता आहे. ये! माझ्या पदराखाली ये!! माझ्या हृदया जवळ ये!!! माझ्या लेकरा."
कर्ण -"तू तुम्ही माझी जननी? हाs हाs हा s कसं शक्य आहे राजमाता हे? तुम्ही केवळ पांडवांची जननी आहात! त्यांच्यासाठीच तुमची सारी ममता. मी एक शूद्र सुतपुत्र, सारथी अधीरथाचा पुत्र कर्ण."
कुंती -"नाही! नाही! त्रिवार नाही! तू माझा अंश आहेस. मी तुझी माता आहे. कर्णा माझ्या मुला! मी तुला जन्म दिला आहे, नऊ महिने माझ्या उदरात तू वाढला आहेस. तू माझीच सावली आहेस रे!"
कर्ण -"नऊ महिने उदरात तर प्रत्येक सामान्य स्त्री आपला गर्भ वाढवते माते. पण तू? तुला माझं नातं, माझं नाव, माझं अस्तित्वच नको होतं, म्हणून तुम्हाला असं नदी प्रवाहात सोडून दिलंस? आयुष्यभर तळमळण्यासाठी, मातेच्या प्रेमाला झुरण्यासाठी? राजमाता मातृत्व ते असतं जे राधा आईने मला दिलं. माझ्यावरच्या पुत्र प्रेमाने तिची वांझ कुस उजवली आणि शोण मला बंधू म्हणून लाभला. आयुष्याच्या प्रत्येक कठीण समयी मी एकटा जळत होतो. सूतपुत्र म्हणून साऱ्या जगाची अवहेलना सहन करत होतो, तेव्हा कुठे होता तुम्ही? रणरंगभूमी, द्रोपदी स्वयंवर, परशुरामांचा शाप त्यावेळी तुमचं मातृत्व केवळ पांडवांना कुरवाळत होतं."
©® राखी भावसार भांडेकर.