...आणि ती दुर्गा झाली

She In Form Of Durga For Saving Infants Life


या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता l
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःll


असं म्हणतात की स्त्रीचे सर्वात सुंदर रूप किंवा भूमिका असते ती मातेची. कारण ती क्षणकालाची पत्नी पण अनंतकालाची माता असते. मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता.

आज मी तुम्हाला अशाच एका मातेची गोष्ट सांगणार आहे.....


ती एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातली मुलगी. शिकून खूप मोठा व्हायचं,आई-वडिलांचे नाव काढायचं असं मनाशी ठरवत, भविष्याची स्वप्न रंगवत ती जगत होती. पण घरची परिस्थिती बेतास बात म्हणून तिने बारावीला चांगले गुण असूनही परिचारिका व्हायचं ठरवलं, आणि बी.एस.सी. नर्सिंग केलं.त्या अभ्यासक्रमातही ती उत्तम गुणांनी पास झाली आणि स्थानिक जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात रुजू झाली.



यथावकाश तिचं लग्न झालं. पण म्हणतात ना देव सगळ्यांना सगळं देत नाही. काहीतरी हातचं राखूनच ठेवतो. तिलाही मातृत्वाचे दान मिळालच नाही. ह्या गोष्टीची खंत तिला होतीच. पण तरीही इमाने एतबारे ती तीचं कर्तव्य पूर्ण करत होती. तिच्या नवऱ्याची तिला साथ असल्याने क्षणभर का होईना तिला तिच्या दुःखाचा विसर पडे.


पण एकदा न राहून तिने तिच्या नवऱ्याकडे विषय काढलाच-


ती -" अहो माझ्यामुळे तुम्ही कशाला मनस्ताप सहन करता? मला घटस्फोट देऊन, तुम्ही दुसरे लग्न करा. तुम्हाला निदान पित्याचं सुख तरी मिळेल."


तो -"तुला असं वाऱ्यावर सोडून देण्यासाठी का मी तुझ्याशी लग्न केलं? ज्या क्षणी तुझं पाणी ग्रहण केलं त्याच क्षणी, तुझ्या सुखदुःखाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. आता परत हा विषय नको. रात्र फार झाली आहे शांतपणे झोप."


घरी सासूचे टोमणे, जावांच्या कुत्सीत नजरा,नवऱ्याची असह्य अगतिकता ती निमुटपणे सहन करत होती.



त्या दिवशीही तिला घरी परतायला वेळ झाला होता. रात्रपाळी करून ती नुकतीच घरी परतली होती आणि तिच्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.


सासू -" आलात का महाराणी घरी? आज पितृमोक्ष अमावस्या, पितरांना जेवू घालायचं आहे आणि ह्यांच्या नोकऱ्याच संपत नाही. काल रात्रपाळी केली म्हणून आता काय दिवसभर आराम करणार आहेस की, येणार आहेस मदतीला?"



 ती  -"चहा पिते, फ्रेश होते आणि लगेच स्वयंपाक करते."


मोठी जाऊ -"आली मोठी स्वयंपाक करणारी. जा आधी आंघोळ करून. ये पारोशी कुठली!"


ती -"छोट्या वहिनी, मला चहा देता का करून? तुमचा सगळा आंघोळीचा स्वयंपाक सुरू आहे आणि माझं अजून सगळं आवरायचं आहे."



लहान जाऊ -"आता तू मागितला तर चहा द्यावाच लागेल. न देऊन कसं चालणार ? नाही तर भाऊजींचे गाल फुगतील आणि आज सणाला ते तुझ्यासाठी म्हणून उपाशीच राहतील."


लहान जावेनी करून दिलेला चहा तिने मुकाट्याने पिला आणि ती आंघोळीला गेली. आंघोळ झाल्यावर ती स्वयंपाक घरात आपल्या सासू आणि जावांना मदत करू लागली.


स्वयंपाकातली मदत तरी कसली तर पोळ्यांसाठी कणीक भिजवून द्या, वड्यांची डाळ बारीक करून द्या,आलं लसणाची पेस्ट करून द्या, अशी सगळी वरची काम तिला सांगितली जात. मुख्य स्वयंपाकाला तिला कधीच हात लावू दिला जात नव्हता कारण तिला मूलबाळ नव्हतं. ती वांझोटी होती.


पण म्हणतात ना काळ कुणासाठीच थांबून राहत नाही.उकिरड्याचेही दिवस पालटतात.

दुसऱ्या दिवशी घटस्थापना होती. घरची पूजा लवकर आटपून ती रुग्णालयात हजर झाली. त्यादिवशी तिची ड्युटी नवजात शिशु अति दक्षता विभागावर होती. शॉर्टसर्किटमुळे त्या विभागातल्या व्हेंटिलेटरला आग लागली. वार्डातून येणारा धूर पाहून सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला, आणि पालक,डॉक्टर,परिचारिका तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी एस.एन.सी. यु. विभागाकडे धाव घेतली आणि तेथील नवजात शिशूंना बाहेर काढले.


एन.आय.सी. विभागातील व्हेंटिलेटरला आग लागताच त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या, या दुर्गेने आग लागलेल्या व्हेंटिलेटर वरील नवजात शिशुला तातडीने उचलून बाजूला केले. त्या शिशुला आगीमुळे कोणतीही इजा झाली नाही आणि खऱ्या अर्थाने त्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ही शुभ्रवेशातील सेवापरी त्यादिवशी, त्या क्षणी दुर्गा झाली आणि त्या शिशुचे प्राण वाचवले.



त्या बाळाच्या आईसाठी तर ही साक्षात संतान लक्ष्मी झाली होती, कारण या दुर्गेने प्रसंगावधान राखून त्या बाळाचे प्राण वाचवले होते.


लेखिका राखी भावसार भांडेकर.




***********************************************

संदर्भ - 25 सप्टेंबर 2022 ला अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील एन. आय. सी. यु. विभागातील व्हेंटिलेटरला लागलेल्या आगीच्या घटनेवर आधारित.