सासू सुनेच्या जुन्या नात्याची नवी सुरुवात अंतिम भाग

Story Of A Mother In Law And Daughter In Law


दुसऱ्या दिवशी दुपारी रेवा छोटूला झोपवत होती . आजे सासूबाई पण झोपल्या होत्या तेव्हा रेवाच्या सासूबाई रेवाच्या खोलीत आल्या.

रेवाला किंवा तिच्या सासूला आजे सासूचा धाक म्हणून असा नव्हता पण त्या दोघीच नव्हे तर संपूर्ण जाधव कुटुंबाला आजी विषयी आदरयुक्त भीती होती. रेवाच्या आजे सासुबाई स्वातंत्र्योत्तर काळातल्या हाडाच्या शिक्षिका. वक्तशीर आणि शिस्तप्रिय, शिवाय कामात दिरंगाई आणि वेळेचा अपव्यय त्यांना अजिबात खपत नसे.

आधी पण रेवाची सासु रेवाकडे यायची पण ते केवळ सणावाराच्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशीच्या कामाची विशेषतः नैवेद्याच्या स्वयंपाकाच्या सूचना आणि पूर्वतयारी करण्यासाठी सांगायला. आजे सासूला कामात आणि देवकार्यात कुचुराइ अजिबात खपत नसे. कधीकधी रेवा मनाशीच विचार करायची आपल्या सासू च्या लग्नाला एवढी चाळीस-पंचेचाळीस वर्ष झाली, पण अजूनही त्या आजे सासूबाईंच्या विचारांनं आणि हिशोबानं सारं करतात. देवाचं करताना किती काटेकोरपणे नियम पाळतात.

तेवढ्यात सासुबाई म्हणाल्या - \"रेवा जागी आहेस का ग? कि डोळा लागला तुझा?

रेवा -\"या ना आई ! जागीच आहे मी\".

सासू - \" रेवा आज तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तुझे आई-वडील दोघेही गेले. तुला एकदम पोरकं झाल्यासारखा वाटत असेल. पण अगं हे कधी ना कधी होणारच! आई-वडील का कधी कोणाच्या जन्माला पुरले?
पण तू जरा धीरानं घे . रडायला येत असेल तर रड पण त्या दुःखात स्वतःला बुडवू नको स्वतः ला, मला आजही आठवतं माझी आई गेली ना! तेव्हा तर मला माहेराहून परतल्यावर रडायला वेळच मिळाला नाही. घरातली काम करताना सतत धाक वाटायचा, माझ्या डोळ्यातली आस्व पाहून माझ्या सासूबाई रागे तर भरणार नाहीत ना! तुला तर माहिती आहे त्यांना भरल्या घरात रडलेलं अजिबात आवडत नाही. पण आपले जन्मदाते असे दूर निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी येणं, उदास वाटणं, वेळी-अवेळी डोळे भरून येणे अगदी सहाजिकच आहे ग! पण तू खूप मनस्ताप करून घेऊ नकोस!


सासूच्या प्रेमळ समजावण्याने आणि घरातील इतर लोकांच्या सहकार्याने रेवा आता बऱ्यापैकी सावरली होती. दोघी जावांनी घरकाम आणि इतर जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. नलिनी पण आता बऱ्यापैकी सणावाराला घरच्यांसोबत आनंदाने सहभागी होत होती.

काही महिन्यांनंतर रेवाच्या सासूने रेवाला सुचविले, \"रेवा तु एम .कॉम. झाली आहेस. छोटू पण आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे आणि शाळेत ही जातो आहे. तू घरीच अकाउंटचे ट्यूशन का नाही सुरू करत? नलिनी ने तिचं बुटीक छान सांभाळलं आहे. आणि तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? अगं मलाही खूप वाटायचं नोकरी करावी, किंवा एखादा छोटा-मोठा व्यवसाय करावा, पाण्या सासुबाई स्वतः शिक्षिका असूनही त्यांनी मला नोकरी किंवा व्यवसायाकरिता कधी प्रोत्साहन दिले नाही. माझी बारावी झाली आणि लग्न होऊन मी सासरी आले. मग मुलं, घर, संसार , यातच रमले. पण तू मात्र काहीतरी करावं असं मला फार वाटतं.

सासूच्या प्रोत्साहनाने आणि सुनील च्या सहकार्याने रेवाने अकाउंटचे कोचिंग क्लास घ्यायला सुरुवात केली.


मधल्या काळात सुनील चे पण मन परिवर्तन झाले हे वेगळे सांगायलाच नको.

खरंतर सासू-सुनेच्या जुन्याच नात्याची ही एक गोड नवी सुरुवात झाली म्हणाना !


समाप्त.


©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all