सासू सुनेच्या जुन्या नात्याची नवी सुरुवात भाग 2

Story Of A Mother In Law And Daughter In Law



रेवाचं शहर आलं. छोटूला कडेवर घेऊन ऑटोनं ती घरी पोहोचली. दारातच छकुली तिला येऊन बिलगली,\"मम्मी तू एवढे दिवस मामाकडे नको जात जाऊस. मला तुझी फार आठवण येते\". बाबांच्या वेळी तेरा दिवस छकुली माहेरी राहिली म्हणून सुनीला राग तर आलाच होता पण, तिकडून परतल्यावर तिला ताप आल्याने त्यांने तेव्हाच रेवाकडून कबूल करून घेतले होते की ,वर्षश्राद्धाला तो छकुलीला तिच्याबरोबर पाठवणार नाही आणि तिनेही मग तिला न्यायचा आग्रह धरला नाही. सहा वर्षाची कोवळी पोरं अगदी कोमेजून गेली होती दहा-बारा दिवसात.

खोलीत गेल्यावर रेवा फ्रेश झाली. बाथरूम मधून आल्यावर बघते तर खोलीत पलंगावर सासुबाई पाणी घेऊन बसल्या होत्या. रेवा जरा अवघडली एक क्षण तिला सूचेचना काय बोलावं?

सासू - ये रेवा, घे पाणी घे प्रवास करून दमली असशील.

रेवा - हो घेते आई. पाच मिनिटात करते हं स्वयंपाकाला सुरुवात.

सासू - त्याची काळजी तु करु नकोस . आधी बस माझ्याजवळ, डोळे किती सुजले आहेत ग तुझे! आई-बाबांची फार आठवण येते आहे का?

रेवा सासु जवळ बसली, तिला हुंदका अनावर झाला आणि ती रडायला लागली. सासूने मायेने तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला आणि समजावलं.

सासू - रेवा बाबा तुझे बाबा आता थकले होते .झाडाच पिकलं पान आज ना उद्या गळणारच होतं. पाठोपाठ तुझी आई पण गेली . तुला सावरायला ही वेळ मिळाला नाही. पण एका दृष्टीने ते बरेच झाले म्हणा तसही नवरा गेल्यावर बाईला फारशी किंमत नसते माझ्या आईच्या अनुभवावरून सांगते हे मी. आपल्याकडेही तुझ्या आजे सासू च तब्येतीचं काही ना काही गार्हाणं सुरू होतं त्यामुळे निवांत बोलायला सवडच मिळाली नाही. शिवाय सुनील चा स्वभाव तु ओळखूनच आहे. सुनील नं मला काही बोललेलं अनिल ला खपायचं नाही. शिवाय सुनील ना कुठलंही टोक काढायला आवडत नाही. तो नेहमीच आपल्याच कोशात राहणारा आहे. पण आता तू सावर स्वःताला. सोन्यासारखी मुलं आहेत. आपलं घर भरलेलं गोकुळ आहे. ते आता तूच सांभाळ. नलिनी चा बुटिकचा व्याप दिवसेंदिवस वाढतोच आहे त्यामुळे ती मदतीला आहे पण आणि नाही पण. नलिनी -अनिल ची बायको - रेवाची मोठी जाऊ. दोन मुलांची आई. रेवा ची सासू परत समजावू लागली-\"अगं जून्यांनीच जागा अडवून ठेवली तर नव्यांनी प्रगती कशी करायची? आणि तुझ्या बाबां बद्दल बोलशील तर श्रीकृष्णा ने ही म्हटलंच आहे आत्मा अमर आहे\".

सासूच्या या दोन-चार वाक्याने रेवाला खूप धीर आला. नलीनीने रेवाला जेवायला हाक मारली. दोघी जावा आज अनेक महिन्यांनंतर सोबत जेवल्या होत्या. या आधी नलिनी ने बुटीक मधून आली की सरळ आपल्या खोलीतच जेवायची. जेवणानंतर ची सगळी आवरासावर झाल्यावर नलिनी म्हणाली - \"रेवा आताशा बुटीक मधून आल्यावर फार दमल्या सारखं होतं !पण माझं प्रोफेशन माझं पॅशन आहे. मी एक काम करते सकाळचा स्वयंपाक मी करत जाईन रात्रीचं तेवढे तू बघ बाई ! शिवाय आई आहेतच तुझ्या मदतीला\".


©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all