पेंटागॉन च रहस्य आणि डिटेक्टिव्ह निशा

“Crime is common. Logic is rare.”

"भिकाजीभाई तिराजीभाई भणगे शिक्षण संस्था संचालित आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात मी निशा आणि मी केदार आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो!"

रंगमंचावरचा पडदा बाजूला होताच हि घोषणा झाली आणि टिळक सभागृह टाळ्या शिट्यांनी दणाणलं!

कॉलेजचा आणि विशेषतः BTBS चा वर्षातून एकदा होणारा हा इव्हेंट आणि त्यामुळं गर्दीनं ऑडिटोरियम गच्चं भरलं नसतं तरंच नवल होतं! कॉलेजचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं होतं. त्यामुळं कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना आमंत्रणं अगदी दरवर्षी जायची आणि जवळपास सगळेच वेळात वेळ काढून इकडे हजरही राहत असंत पण यावर्षी या कार्यक्रमावर एक वेगळंच सावट पसरलेलं होतं, आणि याचं कारण होतं,

 ' या मोठ्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी कॉलेजमधल्या एका मुलीचं अचानक गायब होणं'

बदनामीच्या भीतीनं कॉलेज प्रशासन आणि संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबायचा प्रयत्न चालू ठेवला असला तरीही कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून या घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरूच होती.

"आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्रीकांत पानसकर आणि कॉलेजचे प्राचार्य पाटील सर आणि इतर मान्यवरांना मी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते" निशानं असं सांगितल्यावर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली.

श्रीकांत पानसकर म्हणजे शहरातली मोठी असामी. शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योगपती अशी त्यांची ख्याती होती. भक्कम आर्थिक स्थिती असल्यामुळं त्यांचा शहराच्या राजकारणावरही प्रभाव होता. श्रीकांतजींना  स्वतः राजकारणात रस नसला तरी त्यांच्या आसपासच्या वर्तुळातील लोकांकडून राजकारणात मोठं होण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला जायचा.

"Success belongs to those who never think twice while making decisions"

हे असं स्क्रिप्ट मध्ये नसलेलं वाक्य केदार बोलला आणि निशाचं डोकं फिरलं! केदारची हि नेहमीची सवय होती. त्याला माईक हातात आल्यावर काय बोलू आणि काय नको असं होऊन जायचं! एका जागी स्वस्थ नं बसता सतत समोर चाललेल्या प्रत्येक गोष्टीत बोलायचंच आणि त्यात पण ग्रुपमध्ये एखादी मुलगी असली तर मग त्याच्या उत्साहाला उधाण यायचं! एकामागून एक फालतू जोक सुरु व्हायचे ज्यावर अर्थात त्यावर कुणीच हसायचं नाहीच पण तो किती मूर्ख आहे हे दिसायचं!

"तुला सांगून कळत नाही का रे? आहे ते सोडून एक्सट्रा काय अक्कल पाजळत असतो दरवेळी?"

निशा बॅकस्टेज आल्यावर केदार वर उचकली. केदार काहीच बोलला नाही. स्टेजवर काही केलं तरी इथं तिच्यासमोर बोलून काहीच उपयोग नव्हता. निशाला मनात आलेलं लपवता येत नव्हतं ती बोलून मोकळी व्हायची. त्यामुळं समोरच्याला काय वाटेल वगैरे प्रश्न तिला पडायचेच नाहीत. केदार तिथून पुढे स्क्रिप्ट ला चिकटून राहिला. यावेळी निशा ची  एरवी प्रेक्षा जास्तच चिडचिड होतं होती. कॉलेजची एक मुलगी अशी गायब होते आणि कॉलेज हा असा कार्यक्रम करतंय आणि आपण त्यात सहभागी पण होतोय याचा तिला त्रास होतं होता.

यावर्षी थोडंसं टेन्शन असलं तरीही कार्यक्रम मात्र नीट पार पडला.

दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती. एक्सट्रा क्लासेस वगरे नसले तरी निशा सकाळी कॉलेजवर पोचली. काही प्रोफेसर्स नी तरीपण extra classes  ठेवलेले होते. वऱ्हांड्यात पोरांची तुरळक गर्दी दिसत होती, काही  प्रोफेसर्स ये जा करत होते.

प्रिन्सिपल केबिन शेजारी गर्दी होती म्हणून निशा नक्की काय चालूये बघायला तिकडे गेली तेव्हा काही प्रोफेसर मॅडमच्या बोलण्यावरून तिला समजलं कि कॉलेजमधली जी मुलगी गायब झालेली होती , तिचे आई वडील कॉलेजमध्ये आलेले होते, सोबत एक हवालदार सुद्धा आलेला होता. त्या हवालदाराने मुलीचे आईवडील, प्रिन्सिपल सर यांना सोडून सगळ्यांना तिकडून निघायला सांगितलं आणि गर्दी कमी करून केबिनचा लाकडी दरवाजा आतून लावून घेतला. 
निशा 'नक्की काय प्रकरण आहे हे कळायलाच पाहिजे' असा विचार करत करत तिथून निघाली.

प्रिन्सिपॉल केबिन कडून लायब्ररीकडे जाताना एका क्लासरुममधून काहीतरी पडल्याचा जोरात आवाज झाला. कोण पडलं कि काय म्हणून निशा त्या वर्गाकडे धावली, ती पोहोचतीये तोच कुणीतरी आतून वर्गाचं दार धाडकन लावून घेतलं. नक्की काय प्रकार आहे हे बघायला ती वर्गाच्या खिडकीकडे गेली पण तोपर्यंत कुणीतरी आतून पळत जाऊन खिडकी सुद्धा लावून घेतली आणि खिडकीची वरची खिट्टी लावल्याचा सुद्धा निशाला अगदी स्पष्ट आवाज आला. निशाला खिडकीशेजारी उभी राहून आत नक्की काय चालूये त्याचा अंदाज घ्यायला लागली. दिवसा उजेडी कॉलेजच्या एका क्लासरुममध्ये खिडक्या दारं लावून नक्की काय चाललंय? हे तिला समजेना. तसं बघितलं तर या क्लासरुमची इमारत कॉलेज कॅम्पसपासून एका कोपऱ्यात अशीच होती. कॉलेजचं बांधकाम जुनं, दगडी असं होतं, क्लासरूमच्या खिडक्या मोठ्या मोठ्या होत्या, सगळ्याच वर्गाचे आणि खिडकीचे दरवाजे लाकडी होते आणि त्याला कड्या होत्याच पण वरच्या बाजूला जुन्या पद्धतीच्या खिट्ट्यासुद्धा होत्या. त्या इमारतीमध्ये कॉलेजची मोठी लायब्ररी होती आणि चार छोट्यामोठ्या क्लासरूम्स होत्या.

 "ते होईलच पण मला तेवढ्यावर शांत बसायचं नाहीये...अजून खूप काही करणं बाकी आहे"

तो देशमुख सरांचा आवाज होता. निशाला कॉलेजमध्ये आल्यापासूनच हे देशमुख सर इतर प्रोफेसर्स पेक्षा विचित्र वाटले होते. त्यांनी कधी कुणाला त्रास वगैरे दिला असं जरी ऐकिवात आलेलं नसलं तरी त्यांच्या सवयी सर्वसामान्य नव्हत्या आणि हीच गोष्ट निशाला खटकत होती आणि म्हणूनच निशाच्या मनात या सरांबद्दल एक विशिष्ठ समज निर्माण झाला होता..कॉलेजमध्ये एक प्रोफेसर असून संधी मिळेल तेव्हा मुलींच्या मागे मागे करणे, त्यांच्याशी कामाशिवाय इतर गोष्टी बोलणे, त्यांच्याशी उगाच जवळीक साधायचा प्रयत्न करणे हे सगळं देशमुख सरांचं रोजच काम होतं.

आतून स्पष्ट अस्पष्ट असा बोललेला आवाज येतंच होता. मी असं बाहेर उभं राहून ऐकणं चुकीचं होत पण दुसरा पर्यायच नव्हता.. या मुलीच्या कॉलेजमधून गायब होण्याबद्दल कळल्यापासून मला सतत हेच देशमुख सर या सगळ्यात कुठेतरी गुंतलेले असतील असं वाटत होतं. त्याचं वागणं आणि बोलणं संशयास्पदच वाटत होतं. हातात सबळ पुरावे असल्याशिवाय कुठला आरोप करणं बरोबर नाही त्यामुळं हे ऐकल्यापासून मी आणि श्री त्याच्या मागावरच होतो असं म्हणलं तरी चालेल.

श्रीनंच या देशमुखबद्दल मला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. आम्ही दोघंजण मिळून या केसवर काम सुरु केलं.

हो, केसवर, मी निशा, मला डिटेक्टिव्ह व्हायचंय, हि आमची पहिली केस-  एक मुलगी हॉस्टेल मधून गायब झालेली होती, या देशमुखवर आमचा संशय होता आणि श्री होता माझा वॉटसन!  

"मी तुला नंतर भेटतो, तोपर्यंत सगळी तयारी पूर्ण व्हायलाच पाहिजे एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं" आतून येणारा हा आवाज देशमुख सरांचाच आहे हे ओळखू येण्याएवढा स्पष्ट ऐकू येत होता.

"कसली तयारी करतोय हा?" मी स्वतःशी विचार करायला लागले.

या कॉलेजमध्ये आमचं पाहिलं लेक्चर देशमुखनेच घेतलं होतं. तुम्ही मला उर्मट समजलं तरी चालेल पण तो कॉलेजमध्ये प्रोफेसर असला आणि खरंच चांगलं शिकवत असला तरी हा संशय पक्का होऊ लागल्यापासून त्याला सर म्हणणं तर लांब पण आदरानं बोलणंही शक्य नव्हतं.

याचा अजून काही प्लॅन नसेल? नक्की काय करणारे हा? स्नेहा नंतर अजून एका मुलीला? माझं डोकं जोरात पळायला लागलं आणि तेवढ्यात देशमुख सर क्लासरुममधून बाहेर पडायला लागले, मी लगेच मागं वळून दुसऱ्या दिशेला भरभर चालत सुटले आणि डावीकडच्या लायब्ररीत घुसले. मी त्यांचं बोलणं असं चोरून ऐकतिये हे त्यांना कळलं असतं तर मी अडचणीत आलेच असते शिवाय मला तो करत असलेल्या उलटसुलट कामांचा  शोध लावता आला नसता.

'आपली पूर्ण तयारी झाल्याशिवाय शत्रूला आव्हान द्यायचंच नाही, हार आपलीच होते आणि ती कधीच न भरून निघणारीही असू शकते'

गुरुजींनी सांगितलेला पहिला नियम होता. गुरुजींना भेटून बाहरेच महिने झाले होते, त्यांना भेटायला जायचंच होतं पण या देशमुख बद्दल मला बरंच काही ऐकायला मिळत होतं, एका मुलीनं कॉलेज होस्टेलच्या पाचव्या मजल्यावरून आत्महत्या केली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला फारसं काही माहित नव्हतं पण ती जाण्याआधी ३ दिवस आधी या देशमुख सरांच्या घरी गेलेली होती असं मला तिच्या मित्राकडून कळलं होतं. सुबोध त्याच नाव आणि जी गेली ती स्नेहा. सुबोध तिच्या मागे लागलेला होता आणि स्नेहा त्याच्यकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळं सुबोध कायम ती काय करते? कुठे जाते याकडं लक्ष ठेवून राहायचा. त्यादिवशीही स्नेहा याला संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर देशमुख सरांच्या कॉलनीत जाताना आणि मग घरात जाताना दिसली होती. एका बियरवर तो हे सगळं सांगायला तयार झाला. या केसबद्दल काहीतरी ठोस माहिती घेऊनच मग हे सगळं गुरुजींच्या कानावर घालायचं ठरवलं होतं.

आधी मला या सगळ्यात सुबोधचा यात हात असेल असं वाटत होतं पण तसं नव्हतं, स्नेहाच्या आजूबाजूला फिरण्याशिवाय सुबोध बाकी काहीच करत नव्हता त्यामुळं तिच्या आत्महत्येचं कारण तो असणं शक्य नव्हतं आता माझा संशय होता तो देशमुख सरांवर. कॉलेज वर २-३ दिवसातून एकदा तरी पोलीस चक्कर मारून जात होते. मला हि पहिली केस माझ्या पद्धतीनं सोडवायची होती.

मी निशा साने, BA च्या पहिल्या वर्षात शिकते,  मला लोकांमध्ये, ते कसा विचार करतात, त्यांचे आपसात असलेली नाती कशी तयार होतात आणि कशी बिघडतात यात रस आहे थोडक्यात मला मानस शास्त्रामध्ये खूप रस आहे, त्यामुळं माझा ग्रॅज्युएशन चा विषयही मानसशास्त्रच आहे. मी विषय जरी ती घेतला असला तरी मी लेक्चरला कधीच नसते कारण मला जे वाटलं होत त्यापैकी काहीच आपल्या पुस्तकात सापडत नाही आणि कुणी तस काही शिकवतही नाही. मी त्यापेक्षा माझा अभ्यास लोकांना भेटून आणि न भेटताहि त्यांचं चोवीस तास निरीक्षण करून करत असते.

मी तासंतास बस स्टॉपवर, रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर, कॅफेंमध्ये आणि जिथं गर्दी असेल तिकडं रेंगाळते आणि जे आपल्या देशात एका मुलीला शोभत नाही त्यामुळं अनेक विचित्र नजर माझ्याकडं येत असतात, काहीजण बोलायचीही प्रयत्न करतात, मी सगळ्यांना उत्तर देते, सुरुवातीला हे सगळं विचित्र वाटलं पण आता सवय झालीये आणि उलट याची मजा येते. एक नवीन स्वभाव जाणून घेण्याची संधी मिळत राहते. माझे मित्र मैत्रिणी फार नाहीयेत कारण मुलींना मी त्यांना त्यांच्यासारखी वाटत नाही आणि मुलांना मी त्यांच्यातलाच एक वाटते! पण मी ना माझा स्वभाव बदलत ना हि माझी ड्रेसिंग स्टाईल बदलते कारण माझ्याबद्दल कोण काय विचार करत आणि नाही करत यामुळं मला नाही फरक पडत. मी मला पाहिजे तेच करते, मला पाहिजे तसंच वागते आणि तसंच बोलते.

एकच मित्र आहे मी कशीही वागले तरी तो कायम सोबत असतो, श्रीकांत नाव आहे त्याच, श्री म्हणते मी त्याला. त्याला स्वतःला काय व्हायचंय माहित नाही पण मी त्याला जेव्हा सांगितलं कि मला डिटेक्टिव्ह व्हायचंय तेव्हापासून तो मला जास्तीत जास्त मदत करत असतो, माझ्याच सोबत असतो, त्यावरून काहीजण त्याची कॉलेजमध्ये चेष्टा पण करतात पण तो नाही जात कुठं, माझ्याच सोबत असतो, मैत्री पक्की आहे आमची!

आता मलापण त्याची सवय झालीये पण आमच्यात फक्त मैत्रीचं आहे, फार काही नाही आणि तसं काही पुढं होईल असंही वाटत नाही.

"स्नेहा सतीश काळे, तिचं पूर्ण नाव."

दोन कटिंग मागवून आम्ही टेबल ला येऊन बसलो आणि श्री बोलायला लागला. कॅंटीनमध्ये आज जास्त गर्दी नव्हती. सुट्टीचा दिवस असल्यामुळं एक्सट्रा लेक्चरवालेच फक्त कॉलेजवर दिसत होते.

"आई वडील काय करतात तिचे?" मी विचारलं.

"रोजंदारीवर काम करतात, हातावरचं पोट आहे" त्यानं सांगितलं.

"पण तू कुठून काढली माहिती?" त्याला मध्येच थांबवत मी विचारलं.

"तिची रूममेट श्वेता. स्नेहा गायब झाल्यापासून सगळं कॉलेज बोलतंय तिच्याबद्दल. ती गायब व्हायच्या तीनेक दिवस आधी देशमुखच्या घरी गेली होती. सुबोध न बघितलं होत तिला, सुबोध तिकडेच देशमुखच्या शेजारच्या गल्लीत राहतो आणि सुबोधला हि स्नेहा आवडत असल्यामुळं तो मागावर होता तिच्या."

हि माहिती नवीनच होती माझ्यासाठी.

"त्यांचं काही चालू होत? म्हणजे सुबोध आणि..." मी विचारलं.

"नाही, त्यानं विचारायचा प्रयत्न केला होता पण तिने इंटरेस्टच नाही दाखवला, त्यानं नाद सोडला नव्हता तिच्या मागून फिरत होता पण बोलायचं धाडस नव्हतं त्याचं. स्नेहलला त्यानं देशमुखच्या गल्लीत आणि नंतर त्याच्या घरी जाताना पण बघितलं." श्री कडून इतकी माहिती एकदम मिळेल असं मला वाटलंच नव्हतं.

आता काहीतरी हालचाल करायला पाहिजे होती. नाहीतर सकाळी जे ऐकलं होत त्यावरून अजून काही प्लॅन करण्यात तो देशमुख यशस्वी होऊ शकला असता.

"आपण देशमुखच्या घरी जाऊन काही मिळतंय का बघतील तर?"

"ते तर करावंच लागेल पण आत्ता नको आधी स्नेहाबद्दल अजून काय माहिती मिळतिये ते बघूया"

"पण स्नेहा त्याच्याच घरी असली तर?"

"म्हणजे किडनॅपिंग?"

"why not? possible आहे..."

"बघूया पण मला नाही वाटत तो किडनॅप केलं तरी तिला स्वतःच्या घरी ठेवेल. श्री हे फक्त किडनॅपिंग नाहीये त्याच्या डोक्यात अजून काहीतरी आहे, खूप मोठं काहीतरी, तू एक काम कर मला थोड्या वेळात मंदिराच्या मागे भेट आपण टिकूनच त्या हैवानाच्या घरी जाऊ. मी घरी जाऊन आजीची औषध देऊन लगेच येते, ओके?"

श्री कधीच नाही म्हणायचा नाही. त्यामुळं आणखी वेळ न घालवता ठरल्याप्रमाणे दोघे आपापल्या सायकली घेऊन मार्गाला लागलो.

🎭 Series Post

View all