माहेरवाशिणी अंतीम भाग

Feelings Of Married Women


आधीच्या भागात आपण पाहिलं की चौघी मैत्रिणी त्यांच्या संसारा आणि मुलाबाळांबद्दल गप्पा मारत होत्या. या भागात बघूया त्यांच्या मनात आई वडील आणि भावंडांबद्दल तसेच माहेरा विषयी काय भावना आहेत…

चौथी -"आधी दादा माझ्या मुलांचे फार कौतुक करायचा, संध्याकाळी फिरायला न्यायचा, खेळणी-खाऊ, उन्हाळ्यात आईस्क्रीम अगदी ठरलेलं असायचं. पण त्याचं लग्न झाल. त्यालाही मग मुलं बाळ झाली, मग हळूहळू सगळं चित्र पालटलं."


पहिली -"हो ना नितीनच्या (लहान भाऊ) लग्नात आईने मला पहिला मान म्हणून गर्भ रेशमी पैठणी घेतली होती तर मीना (नितीन ची बायको) सत्यनारायणाला तिलाही पैठणी घेतली नाही म्हणून त्यानंतर अनेक वेळा मला टोमणे मारत होती."


दुसरी -"माझी वहिनी तर एवढा तोरा दाखवते ना! आपण तिच्या मुलांसाठी कपडे, खेळणी नेली तर म्हणते…

वहिनी -"आम्ही आता असे कपडे घालत नाही, तुम्ही आणलेल्या खेळण्यांचे प्लास्टिक चांगल्या क्वालिटीचे नाही, मुलांना आता अशी खेळणी आणू नका."

तिसरी -"आधी उन्हाळ्यात सुट्टी घालवल्यावर परतताना, आई कुरडई, पापड, सांडगे, दही मिरच्या, लोणची आणि वाळवणाचं किती सामान द्यायची! आता तर वहिनी स्पष्टच म्हणते…

वहिनी -"बाजारात सगळं विकत मिळतं वन्स. बाहेरूनच घेत जा. माझ्याच्याने होत नाही आता."

तिसरी -"मला सांगा आपण काय माहेराहून भारी भारी साड्या आणि वाळवणाच्या पदार्थासाठी जातो का ग?"

चौथी -"अजिबात नाही! आपल्या आयुष्याचा अनमोल ठेवा- आपलं बालपण आपण तिथे घालवलेलं असतं ग! त्या अमूल्य आठवणी, आणि जन्मदाते मायबाप, भाऊ-बहिणी कितीही विसरू म्हटलं ना तरी विसरता येत नाही."


दुसरी -"बाबा गेल्यावर आईचं ते मोकळ कपाळ, मंगळसूत्रा विना सुना गळा, अंगातल्या फिकट रंगाच्या साड्या बघून, मनाला फार वेदना होतात ग! मी सासरी परतताना माझी ओटी भरू शकत नसल्याचे शैल्य आणि तिचं ते उदास भकास डोळे बघवत नाही ग!"


चौथी -"आई-बाबांच्या खोलीतला बाबांचा फोटो, त्यांचे लिखाणाच टेबल, चष्मा, रोजनिशी, बिलांच्या नोंदी आणि रिकामी आराम खुर्ची बघुन मन अगदी गलबलून येतं ग!"

पहिली -"आई गेल्यावर पप्पा पण एकटे झाले आहेत. वहिनीला भाजीपाला, वाण-सामान आणून देतात, सकाळी संध्याकाळी फेरफटका ही मारतात, लहानग्या नातवाचा अभ्यास घेतात. दिवे लागणीला त्याला स्तोत्र, प्रार्थना शिकवतात. पण एकांतात म्हणतात….


बाबा -"तुझी आई फार लवकर गेली. तुझ्या आईसाठी काही करता आलं नाही, काही करण्यासाठी तिने वेळच दिला नाही. आठवणी उरल्यात आता फक्त."


पहिली -"बाबांचा तो केविलवाणा चेहरा मग घरी परतल्यावर सारखा नजरेसमोर येतो. खरच ग माहेर असते आयुष्यभराचा ठेवा. एक अनमोल आठवण. असा अनमोल ठेवा जो कधी सरतही नाही आणि सोबत सासरी नेताही येत नाही."

चौथी -"लग्न झाल्यावर माहेराहून सासरी परतताना घरातून लवकर पाय निघतच नसे. गाडीची वेळ व्हायची तरीही बॅग भरायची इच्छा होत नसायची.


मग आईच म्हणायची…

आई -"अग लवकर कर. गाडीची वेळ होते आहे."

तिसरी -"माहेरच्या भिंतीवरचे आपले ते ठसे, अंगणातली ती दुडू - दुडू धावलेली पावलं. भिंतीवरच्या फोटोंमधल्या बालपणीच्या आठवणी सारच कसं बरं आपल्याला सोबत नेता येईल? आणि मग ती माहेरची माणसं, ते अंगण, ती झाडं! ते तरी कशाच्या भरवशावर जगतील? त्यांनाही आपली ओढ असतेच ना! ते म्हणतात ना \"लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते\" ते कदाचित याचसाठी असेल.

"माय आणि माहेरची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही."


समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.

फोटो साभार गूगल.


🎭 Series Post

View all