माहेरवाशीणी भाग एक

Feelings Of Married Women


माहेरवाशीणी भाग एक


आज जवळपास तीन-चार वर्षानंतर त्या सगळ्याजणी एकत्र जमल्या होत्या. एकमेककींना बघून त्यांना खूप आनंद,उत्साह आणि छान छान वाटत होतं.

सुरुवातीच्या नमस्कार, चमत्कारानंतर हळूहळू गप्पांचा रोख घर-संसार, मुलं बाळ, सासू-सासरे अशा नेहमीच्या विषयांकडे वळला.


पहिली -"अग माझ्याकडे तर खाण्याचे इतके नखरे आहेत की विचारूच नको."


दुसरी -"नाहीतर काय ग! एक तर सकाळी इतकी घाईची वेळ, त्यात प्रत्येकाच आपलं काहीतरी वेगळंच."

तिसरी -"हो ना! मुलांचा डबा, नवरा, सासू-सासऱ्यांचा नाश्ता आणि मध्येच माझा दीर काहीतरी पिल्लू सोडतो. सगळ्यांसाठी जे केलं ते त्याला नकोच असतं. वेगळेच काहीतरी पाहिजे असतं."


चौथी -"सकाळी सहाला किचन मध्ये मी गेली की, माझ्या सासऱ्यांची कॉफी, मग माझा आणि सासूबाईंचा चहा, अहोंचा ग्रीन टी नाहीतर ब्लॅक टी आणि मुलाचे दूध."

तिसरी -"एवढ्याने होत नाही म्हणून, लहान दिरांना मिल्कशेक हवा असतो."

दुसरी-"इकडे आपली घड्याळाच्या काट्याबरोबर शर्यत लागलेली असते आणि तिकडे नवऱ्याला डोळ्यासमोरच्या वस्तू दिसत नाही."

पहिली -"नाहीतर काय! तरी रोज रात्री मी रावांना बजावते की, गाडीच्या किल्ल्या, पैशाचं पाकीट, रुमाल टेबलावर काढून ठेवला आहे, तर त्यांना कधी टाय दिसत नाही तर कधी बुटाची लेस बांधता येत नाही."

दुसरी -"एखाद्या दिवशी लवकर उठून कोणी आपल्याला मदत करत नाही. मुलांची आंघोळ, ब्रश, त्यांचा डबा, पाण्याची बाटली आपणच भरा."

चौथी -"सासूबाईंची भजन, सासऱ्यांचा मॉर्निंग वॉक महत्त्वाचा पण कोणी लेकराला शूज, सॉक्स पण घालून देत नाही."


तिसरी -"खालून व्हॅन,ऑटोवाला हॉर्न वाजवत राहतो पण इकडे कुणाचीच वेळ चुकता कामा नये."

पहिली -"नाही तर काय! माझी मोठी आता सातवीत आहे पण तिचा स्वतःचा डबा सुद्धा ती भरत नाही."


दुसरी -"अग लहानांचं तर जाऊच दे! पण नवरा आंघोळीला जातो तर त्याचे कपडे पण बेडवर काढून ठेवावे लागतात."


चौथी -"हो ग बाई! आपण जर प्रेसचे कपडे काढून ठेवले नाहीत तर, अलमारीतल्या बाकीच्या कपड्यांची ऐशी-तैशी झालीच समजा."

तिसरी -"आणि कहर म्हणजे माझ्या रूमच्या बाजूलाच गॅलरी आहे तिथेच कपडे वाळवायचं स्टॅन्डही आहे. पण सांगितल्याशिवाय नवरा ओला टावेल वाळत घालेल तर शपथ!"

पहिली -"मला तर ओला टावेल पलंगावर अजिबात आवडत नाही. पण एकही दिवस त्या ओल्या टॉवेल साठी माझं तोंड वाजत नाही असं होत नाही."


दुसरी -"वर खाण्यापिण्याचे नखरे असेल की बस! असं वाटतं कुठेतरी पळून जावं."

तिसरी -"अगदी खर आहे ग बाई! कधी कधी तर असं वाटतं की, दिवस रात्र स्वयंपाक घरात उभा राहण्यासाठीच माझा जन्म झाला आहे की काय?"

चौथी -"मुलांचा डबा, नवरा, सासू-सासऱ्यांचा नाष्टा, परत अहो दहाला ऑफिसला जाणार म्हणून डब्याची तयारी. जीव अगदी रडकुंडीला येतो ग!"

पहिली -"आमच्याकडे तर लोणची, चटण्या, पापड, दोन भाज्या, भात, पोळी, भाकरी असं सगळंच हवं असतं. मुलांना त्यांच्या आवडीचं डब्यात. ओहोंचा ऑफिसचा डबा, सासऱ्यांसाठी पोळी खात नाही म्हणून भाकरी आणि सगळं कोरडं कोरडं होतं म्हणून मग वरण भात."


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


फोटो साभार गूगल.



🎭 Series Post

View all