Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

सिंधुताई सपकाळ..... एक संघर्ष यात्रा.

Read Later
सिंधुताई सपकाळ..... एक संघर्ष यात्रा.


आपण सर्वजण आयुष्यात पदोपदी निराश होतो. छोट्या छोट्या अपयशाने आपल्याला जीवन नकोसे होते. ज्या गोष्टींनी आपल्याला निराश वाटतं त्या गोष्टीही अगदी क्षुल्लक असतात. परीक्षेत कमी मिळालेले गुण किंवा नोकरी व्यवसायात न गाठता आलेलं टार्गेट आणि गेला बाजार अगदी फालतू गोष्ट म्हणजे, एखाद्या दिवशी इंटरनेट स्लो असणे, एखादं प्रचंड आवडणार ॲप ओपन न होणे, एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला वारंवार फोन करूनही त्या व्यक्तीने फोन न उचलणे. या सगळ्यांवर कळस म्हणजे समाज माध्यमांवर टाकलेले आपले फोटो आणि त्यावर न मिळालेला लाईक्स आणि आपल्याला नको असलेल्या नकारात्मक टिप्पण्या म्हणजेच कमेंट्स.

ती एक सरिता खळाळत वाहणारी, जीवनदायिनी. स्वतःच्या दोन्ही तिरा वरचे जीवन समृद्ध करणारी, गर्भिणी चे व्रत घेतलेली, समाजासाठी, स्त्रीयांसाठी , अनाथांसाठी ,रंजल्या-गांजल्या साठी झटणारी एक सुवर्ण शलाका. दुःखाच्या असीम सागरात, निराशेच्या अंधारात आशेचा नवकिरण बनली ती. रूढी शरण समाजात नव विचारांचे स्फुल्लिंग चेतवणारी, दुर्दैवाच्या अथांग सागरात निश्चल पणे उभे राहून सार्‍या मानवजातीसाठी दिपस्तंभ बनली ती! पण आमचे दुर्दैव हेच , कि ती असताना तीला मिळाली केवळ अवहेलना, ढोंगी समाजाची तुच्छ आणि हीन वागणूक, पण ती होती सौदामिनी काळोख्या अंधार्‍या रात्रीत लखलखणारी, समस्त मानवजातीला नवदिशा, नव प्रेरणा देणारी.

वनवासींची माय असलेल्या प्रतिभा संपन्न विदर्भ कन्या \"सिंधुताई सपकाळ\".

वर्धा जिल्ह्यात पिंपरी मेघे या खेडेगावात राहणाऱ्या अभिमान साठे यांची मुलगी चिंधी. ते जातीने नंद गवळी. अशिक्षित. पण त्यांनी मुलीला शाळेत पाठविले. आईला त्यांचे शाळेत जाणे आवडले नव्हते. मराठी चौथीची परीक्षा दिल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी श्रीहरी सपकाळशी त्यांचा विवाह झाला आणि सौ सिंधू सपकाळ होऊन त्या सासरी नवरगाव येथे नांदायला गेल्या. सासरी कारभार लहान दिराच्या हाती होता. नवरा जंगलात म्हशी चाऱ्याला घेऊन जाई. त्याचा जास्तीत जास्त वेळ जंगलात जात असे. घरात सासू, मोठा दीर, लहान दीर, दोन जावा एकत्र राहत. सर्वांनी सिंधुताईंना छळले. नवऱ्याने छ ळा बरोबर हक्काची बायको म्हणून भोगले. सासरी सिंधुताईंच्या हालाला सीमा नव्हती.

सिंधुताईंच्या सामाजिक कार्याचा श्री गणेशा त्या सासरी असताना \"शेणखताच्या लढयाने\" झाला होता. दमडाजींना स्वतःच्या अधिकारात शेणखत टाकून डबल उत्पन्न काढण्याचा अधिकार जंगल खात्याने दिला होता व 35 एकर जमीन दिली होती. राहायला चाळ दिली होती. त्या सर्व जागेत गरीब भूमिहीन राहत गरिबांच्या शेणखताचे 20 ट्रक असत परंतु शेणखत गोळा करण्याची साधी मजुरी सुद्धा त्यांना मिळत नव्हती. हा अन्याय प्रकार सिंधुताईंच्या कणखर मनाला मानवला नव्हता. त्यामुळे सर्व आदिवासी व गरीब दुबळ्या आपल्या जातीच्या गवळी बांधवांना एकत्र करून त्यांच्या शासन यंत्रणेला, जंगल खात्याला हलवले होते. वरिष्ठांकडून चौकशी झाली. खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी दमडाजींच्या शेताचे लहान लहान तुकडे करून आदिवासींना दिले. तसेच त्यांचे चाळीत राहणे बंद केले. आदिवासींना हक्क मिळवून दिला.


लढा जिंकल्यानंतर त्या आपल्या रोजच्या कामाला लागल्या. रात्री-दिवसा दळण-कांडण करणे, 360 गाईंचे शेण गोळा करणे, स्वयंपाक पाणी घरातली बाकी इतरही काम त्या करत होत्या. याच दरम्यान त्यांना चौथ्या वेळेस दिवस राहिले होते. बाळंतपण जवळ आले होते. त्यावेळी अपमानाने पेटून उठलेल्या दमडाजीने सिंधुताईंच्या यजमानांच्या कानात विष ओतले.की हा गर्भ त्यांच्यापासून राहिला आहे. संशयाने घेरलेल्या श्रीहरींनी त्यांना डोक्यावर घाण्याचे घडे घेऊन घराकडे येताना पाहिले. दारातच उभे राहून त्यांना कुलटा, पापिणी, बदमाश अशी भूषण दिली. सिंधुताई भांबवल्या. ते शब्द त्यांचे अंतकरण भेदुन गेले. दुःखातीरेकाने त्या खाली कोसळल्या. लाथा घालीत नवऱ्याने त्यांना ओढत नेऊन गाईच्या गोठ्यात टाकले. त्याच मध्यरात्री बेशुद्धावस्थेत त्या बाळंत झाल्या. मुलगी जन्मली. शुद्धीवर आल्यावर जवळच्या ओढ्यावर जाऊन त्यांनी मुलीला स्वच्छ केले. दगडाने नाळ कापली.परंतु घरातल्या कोणीही त्याची दखल घेतली नव्हती. घरी सगळेजण जेवले होते. सिंधुताई आशाळभूतपणे घरी दोन घास मिळतात का ते पाहत राहिल्या. पण त्या घरात सिंधुताईंचा एक जीव वनवासी झाला होता.

त्यानंतर त्यांच्यावर अनेक वाईट प्रसंग गुजरले. त्यांच्या स्वतःच्या आईने सुद्धा त्यांना घरात घेतले नाही. खायला अन्न सुद्धा दिले नाही. त्या स्मशानातलं पीठ घेऊन त्याची चितेवर भाकरी भाजत आणि स्वतःचं पोट भरत. प्लॅटफॉर्मवरच्या भिकाऱ्यांसोबत राहून त्या गाणी म्हणत आणि रात्र काढत. शेवटी दीनदुबळ्यांसाठी, पिडलेल्या, नडलेल्यांसाठी त्यांनी स्वतःची मुलगी ममता हिच्यावर ममता न करता तिला दगडूशेठ हलवाई ट्रस्टला देऊन दिले.
सिंधुताईंनी स्वतःची पोटची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. एवढेच नव्हे तर १५ डिसेंबर २०१३ रोजी सासर-माहेराने आयोजित केलेला माईं चा सत्कार सोहळा पार पडल्यावर ,माई जेव्हा उपस्थितांना भेटण्यासाठी मंचावरून खाली उतरत होत्या, तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला त्यांना कोणीतरी रडत असल्याचा आवाज त्यांनीं ऐकला. त्यांनी त्यांच्या दिशेने पाहिलं ,त्यांचे पती हमसून हमसून रडत होते . त्या त्यांच्याजवळ गेल्या, त्यांनी हसत हसत रडणाऱ्या पतिचा हात आपल्या हाती घेतला . थोडासा कुरवाळला ,स्वतःच्या पदराने डोळे पुसले. पतीला त्यांनी आठवण करून दिली कि ,\"मी दहा दिवसाची ओली बाळंतीण होती तेव्हा तुम्ही हाकललं तेव्हा, माझ्या पातळाला गाठी होत्या.आता तुमच्या धोतराला गाठी आहेत. रडू नका कुणी कुणाचं नसतं. माझा ऐका ,इथं खोकत , चिकत पडू नका. माझ्याकडे चला ,पण माझी एक अट आहे , पती म्हणून येऊ नका . आता मला तुमची पत्नी होता येणार नाही . ‌माझं बाळ बनुन या. मी तुमची पण आई व्हायला तयार आहे आणि त्यांना माई स्वतः सोबत घेऊन आल्या.


सिंधूताई नेहमी आपल्या भाषणात म्हणायच्या कि,माझ्या एकाही शाळेला कुठलंही सरकारी अनुदान नाही. माई नेहमी म्हणायच्या \"गुरुजी तुम्ही ज्ञानदाते आहात. तुम्हीच घडवू शकता उद्याचा भारत. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांवर ही प्रेम करा. विद्येपासून कोणीही वंचित राहू नये याची तमा बाळगा. परिस्थिती गंभीर आहे. माझ्या महाराष्ट्रातील गुरुजींनो पगारासाठी नव्हे, तर विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यादानाचे काम करा.


सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. याशिवाय माईंनी बाल निकेतन हडपसर, पुणे . सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा. अभिमान बाल भवन, वर्धा . गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा. (गोपालन) आणि सप्तसिंधू महिला आधार व बाल संगोपन व शिक्षण संस्था, पुणे. या संस्थान ची ही स्थापना केली.


२२ देश फिरून आलेली हाफ टाइम चौथी शिकलेली २८२ जावई, ४९ सुनांची सासू ,आणि हजारोंची माय वयाच्या 74 व्या वर्षी ४ जानेवारीला आपल्यातून निघून गेली.

शृंखला पायी असू दे ,मी गतीचे गीत गाईन,

दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही,

कोंडलेल्या वादळांच्या , ह्या पहा अनिवार लाटा,

माणसांसाठी उद्याच्या, येथून निघतील वाटा,

पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू,

निर्मितीच्या मुक्त गंगा , द्या येथे मातीत वाहू,

नांगरऊ स्वप्ने उद्याची, येथे फुलतील शेते,


घाम गाळील अज्ञान येथे , येथून उठतील नेते.


                          -बाबा आमटे.©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.

संदर्भ

1.मी वनवासी लेखिका सिंधू ताई सपकाळ.
2.दिनांक 4 जानेवारी 2022चा नागपूर येथून प्रकाशित लोकमत वृत्तपत्र.
3.इतर माहिती व फोटो साभार गुगल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//