जरा विसावू या वळणावर (रजोनीवृत्ती आणि ती) अंतिम भाग

Changes During Monopause


असं म्हणतात भारत हा आता सगळ्यात जास्त तरुण देश आहे म्हणजे आधी जी मदर इंडिया होती ती आता मिस इंडिया तर आहेच पण शिवाय ग्रॅनी इंडियापण होणार आहे. म्हणूनच या आजी असणाऱ्या किंवा आजी होणाऱ्या माता, भगिनींनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं म्हणून हा लेखन प्रपंच.

ऋतुप्राप्ती आणि रजोनीवृत्ती ह्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील घडणाऱ्या दोन अतिशय महत्त्वाच्या घटना. पण काही सामाजिक संकेत आणि लाजेखातर या विषयावर फारसे बोलले जात नाही. त्यातल्या त्यात रजोनिवृत्ती हा विषय तर फारच नाजूक म्हणून या लेखातून त्याविषयी थोडसा बोलण्याचा,स्वत:चे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


*********************************************


मागच्या भागात आपण पाहिलं की मीना स्वतःहून संजयकडे जाते कारण,आधीच्या आठवड्यात दोन-तीनदा तिने संजयला नाकारलं होतं. आता बघूया मीना आणि संजयचं नातं खुलत की परत ये रे माझ्या मागल्या….


रात्री मीना स्वतःहून संजयजवळ गेली. मग संजयलाही राहावलं नाही. मीनाने स्वतः पुढाकार घेऊनही शेवटी ती फुललीच नाही. स्वतः शांत झाल्यावर संजय तिला चिडून म्हणालाच,


संजय -"मीना तुझी इच्छा नव्हती तर पुढाकार का घेतलास? मला तुझ्या मनाविरुद्ध काहीच करायला आवडत नाही माहिती आहे ना तुला? मग तरीही?"

संजयच्या या वाक्याने मीना मात्र रडायला लागली आणि ती संजयच्या मिठीत शिरली.

मीना -"अहो आजकाल माझं असंच होत आहे. विनाकारण चिडचिड, वैताग, अनावश्यक राग कारण अकारण संताप होतो माझा. मुलांवर मी इतकं चिडण योग्य नाही, पण माझं मलाच कळत नाही काय होतं आहे ते? गेल्या आठ-दहा महिन्यांपासून माझे पिरेड्स पण अनियमित झाले आहेत. आपण उद्या डॉक्टर कडे जाऊयात का?"

संजय -" बरं ठीक आहे, जाऊयात उद्या डॉक्टरकडे."

दुसऱ्या दिवशी मीना आणि संजय स्त्रीरोग तज्ञांकडे गेले. मीनाने स्वतःची समस्या डॉक्टरांना सांगितली.

डॉक्टर -"हे बघा मिसेस संजय, वयाच्या चाळीशीत अनियमित पाळी, चिडचिड, संताप उगाच राग किंवा मूड स्विंग ही सगळी लक्षणे खरंतर रजोनिवृत्तीची असतात. पण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत ती वेगवेगळी असू शकतात. परिवारातील विशेषतः आईकडील आई, मावशी, बहिणी यांच्याप्रमाणे ती कमी जास्त असू शकतात. कधीकधी हे रजोनिवृत्तीचे वय पन्नास पर्यंतही असू शकतं. तर कधी कधी अगदी तीस-पस्तीसही.

मुळात स्त्री जन्माला येतानाच स्त्रीबीजाचा एक साठा किंवा ठेवा घेऊन जन्माला येत असते. पुढे वयात आल्यावर दर मासिक पाळीत काही ठराविक स्त्रीबीज बाहेर पडतात,तर उरलेली हळूहळू आपोआप सुकून जातात.

ज्यावेळी स्त्रीचे सगळे स्त्रीबीज सुकून जातात त्यावेळी तिला पाळी येणे बंद होते. पण पाळी जायच्या शेवटच्या टप्प्यात अनेकींना तुम्ही सांगितलेली लक्षणे आणि त्रास संभवतात. विशेष म्हणजे या काळात अस्थि विसर्जन जोरात किंवा जलद व्हायला लागतं म्हणजे हाड ठिसूळ होतात. अंगावरून गरम वाफा गेल्यासारखं वाटतं, जीव घाबरा होतो, रात्रीची झोपही स्वस्थ राहत नाही, ती विस्कळीत होते. जोडीदाराचा सहवास नकोसा वाटतो, वैवाहिक सुखही टोचायला लागतं."

मग संजयकडे वळून डॉक्टर त्याला सांगायला लागले -"या काळात जोडीदाराने मात्र घरातल्या स्त्रीला समजून घेणे गरजेचे आहे. तिच्या कलाने घेतल्याने हा काळही सुखकर होऊ शकतो."

मग डॉक्टर मीनाला उद्देशून म्हणाले -"या काळात तुम्ही कॅल्शियम, हिमोग्लोबिन आणि इतर चाचण्या करून घ्यायला हव्यात. पाळी येताना जसे तुम्ही स्त्रिया जुळवून घेताना तसंच आता पाळी जाणार ही मानसिक तयारी करणं ही आवश्यक आहे. त्यासाठी थोडासा व्यायाम, योगा, ध्यानधारणा करणे, सकस आणि ताजा आहार घेणं. कॅल्शियम, आयरन विटामिन युक्त भोजन सेवन करणे हे महत्त्वाचं."

डॉक्टरांना भेटल्यावर मीनाच्या अनेक शंकांचे निरसन झालं होतं. संजयही आता मीनाला छान समजून घेत होता. दोघेही आता सकाळचा चहा आणि थोडा व्यायाम सोबत करत होते. नेहा आणि नितीन आईला घर कामात मदत करत होते. संजय ही स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायचा. ऑफिसमध्ये जाताना रुमाल, पैशाचं पाकीट, गाडीची चावी, ऑफिसचा डबा याच्यासाठी तो आता मीनाची दमछाक करत नव्हता. नितीन स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायचा आणि अभ्यासालाही न सांगताच बसायचा.




समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.


कथा मालिकेचा हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत

**********************************************

संदर्भ

डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचा स्त्रिया आणि रजोनीवृत्ती या विषयावरील ब्लॉग.

🎭 Series Post

View all