Feb 25, 2024
नारीवादी

जरा विसावू या वळणावर (रजोनीवृत्ती आणि ती) भाग 2

Read Later
जरा विसावू या वळणावर (रजोनीवृत्ती आणि ती) भाग 2


रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यामध्ये स्त्रीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडत असतात. विशेषतः भावनिक चढ उतार अधिक होत असतात. वयाच्या या टप्प्यापर्यंत मुलं मोठी झालेली असतात. त्यांच्या फारशा जबाबदाऱ्या नसतात. नवराही त्याच्या नोकरी व्यवसायात गुंतलेला असतो. घरातील सासू-सासऱ्यांचा जबाबदारी तिच्यावर आली असते. त्यांचं दुखणं खूपणं ,आजारपण घरातल्या या स्त्रीलाच बघावं लागतं. क्वचित प्रसंगी माहेरीही आई-वडिलांकडे एखादी दुखद घटना घडून त्यांचा आधार नाहीसा झालेला असतो. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये भावनिक चढ-उतार जास्त बघायला मिळतात. हा काळ असतो तो घरातल्यांची जबाबदारी एका हाती सांभाळणाऱ्या या खऱ्या नायिकेला सांभाळण्याची, भावनिक आधार देऊन तिला समजून घेण्याची.

***************************************************


मागच्या भागात आपण पाहिलं की मीना सकाळी लवकर उठून नेहा नितीन आणि संजयसाठी डबा बनवत होती, पण नितीनच्या घाईमुळे तिला सँडविच बनवताना चटका लागला त्याचा परिणाम म्हणजे मी न प्रचंड वैतागली आणि तिची बडबड सुरू झाली…..

मीना -"समजता कोण रे तुम्ही स्वतःला? जरा पाच दहा मिनिटं वेळ झाला तर काय बिघडणार आहे एवढं? मी इथे केव्हापासून सगळं एकटीच करते आहे, पण घरातल्या कोणालाच माझी मदत करावीशी वाटत नाही. फुकटची मोलकरीण घरात आणून ठेवली आहे. नितीन एवढा घोडा झाला तरी, प्रत्येकवेळी तुला सांगावं लागतं दूध पी, बदाम खा. तू स्वतः काहीच करू नकोस."

तेवढ्यात आतल्या रूममधून नेहा ओरडली

नेहा -"आई माझा कॉलेज युनिफॉर्म प्रेस नाही केला का तू?"

मीना -"घ्या ह्या बाईसाहेबांचा आपलं वेगळंच! अगं टेबलवर बघ प्रेसच्या, आणि नसेल प्रेस युनिफॉर्म तर स्वतः करून घे. दिवसभर यांचं कॉलेज, क्लासेस आणि उरलेल्या वेळात मोबाईल. मी आहेच सगळ्यांच सगळं करायला."

मीना खरंतर चिडून गेली होती, नितीनने दोन सँडविच खाल्ले आणि तो गेला, पाठोपाठ नेहाही कॉलेजच्या रस्त्याला लागली. तिच्यासाठी केलेली कॉफी तशीच राहिली होती. मीनाची बडबड,सोबतच उतू गेलेली कॉफी आणि गॅसच्या ओट्यावरचा पसारा पाहून संजय काही न बोलताच, काही न खातापिता ऑफिसला जायला निघाला होता.


संजय -"मीना मी निघतो. संध्याकाळी घरी यायला कदाचीत वेळ होईल."

मीना -"अहो थांबा ना! मी पटकन चहा करून देते. थालीपीठाचे पीठ मळुन तयार आहे. दहा मिनिटात थालीपीठ पण करून देते."

संजय -"नको मला आधीच वेळ झाला आहे. महत्त्वाची मीटिंग आहे आज, वेळ करून चालणार नाही."

मीना -"पण तुम्ही चहाही घेतला नाही."

संजय -"ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये घेईन. येतो मी. तू फक्त शांत रहा."

संजय निघून गेला आणि घरातली शांतता एकदम मीनाच्या अंगावर आली. अचानक तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली, मनातल्या मनात मीना स्वतःलाच दोष देऊ लागली.

मीना -\"मुलं डबा न घेताच गेली. आज नेहाचं प्रॅक्टिकल आहे आणि मी सकाळी सकाळी उगाच चिडचिड केली. संजयही चहा न घेताच गेले. पण आजकाल मला हा त्रास जास्त होत आहे.\"

मन हलकं करण्यासाठी मीनाने  मैत्रिणीला फोन लावला.

मैत्रीण -"मीना मला ही रजोनिवृत्तीची म्हणजे मोनोपॉजची लक्षणे वाटत आहेत. म्हणजे बघ अनियमित पाळी, उगाच चिडचिड, कारण-अकारण डोळ्यातून वाहणारे अश्रू, ही सर्व लक्षण मला तरी ऋतू समाप्तीचीच वाटतात."

मीना -"आज-काल मला ह्यांच्याजवळही जावेसे वाटत नाही. त्यांचा स्पर्शही नकोसा वाटतो. मागल्या आठवड्यात ते दोन-तीनदा जवळ आले पण मी मात्र तोंड फिरवलं."

मैत्रीण -"मीना तू एखाद्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं. सोबत संजयरावांनाही घेऊन जा, म्हणजे त्यांनाही कळेल तुझी समस्या काय आहे ते."

मीना -"हो बघते कसं जमतंय ते."

संध्याकाळी मात्र मीनाने स्वतःच्या मनाला आवरलं. सोफ्यावरचे कपडे, मुलीची कॉलेजची बॅग, मुलाचं क्रिकेटचं सामान इकडे तिकडे पसरलेलं बघून, मीनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. रात्रीच्या जेवणात सर्वांना आवडतील असे प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवले. नेहाकरता आलूचे पराठे, नितीनकरता नूडल्स आणि संजयसाठी खास शाही पनीर आणि व्हेज पुलाव. कंपनीची मीटिंग लवकर आटोपल्याने संजयही घरी लवकर आला होता. ती संध्याकाळ आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबत घेतलं. आज खूप दिवसानंतर ते चौघे एकत्र जेवले होते.

संजयही कंपनीला प्रदेशातलं प्रोजेक्ट मिळालं म्हणून खुश होते. रात्री मुद्दामच मीना छान तयार झाली. केसांचा छानसा बन बनवला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. ओठांवर दिसेल न दिसेल अशी लिपस्टिक लावली, आज तिने आकर्षक नाईटी पण घातली होती. संजय दिवसभराच्या दगदगीने थकला होता, म्हणून तो लगेच बेडरूमकडे गेला. तो झोपण्याच्या तयारीत होता, पण मग मीनानेच पुढाकार घेतला तिलाही मनात कुठेतरी संजयला गमावण्याची भीती होतीच.

*********************************************
पुढच्या भागात बघूया मीना आणि संजयचं नातं खुलतं की मीनाच्या चिडचिडने त्या नात्यात परत दुरावा येतो. तोपर्यंत हा भाग कसा वाटला त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.

©® राखी भावसार भांडेकर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//