Feb 24, 2024
प्रेम

अनपेक्षित पार्सल

Read Later
अनपेक्षित पार्सल

अनपेक्षित पार्सल 

 


           आज घरून निघताना त्याला जरा उशिरच झाला होता . तसाही तो नेहमी व्हायचाच , नाही असं नाही ! पण आजकाल त्याला त्याच्या , त्याच त्या रटाळ आयुष्याचा म्हणजेच - बोरिंग रुटिन लाईफचा कंटाळा आला होता . रोजची त्याची सकाळ बायकोच्या - मुलांच्या मागे , शाळेसाठी उठवण्यासाठीच्या चिडचिडीणे व्हायची . घरातला , मुलांनी केलेला पसारा आवरतांना त्याची बायको दोन्ही मुलांपैकी एखाद्याच्या पाठीत धपाटा नक्की घाली . शिवाय तिच्या तोंडाचा पट्टा राजधानी एक्सप्रेस ला मागे टाकी.             लग्नानंतर सुरुवातीला बायकोला घरकामात त्याने मदत केली की , त्याची आई लगेच म्हणे - " लावलं का सुनबाई ने तुला कामाला? एवढे वर्ष झाले मी घरात राबराब राबते , मला नाही केली तू कधी कुठलीच घरकामात मदत . काय सुनबाई घरी आल्या-आल्या लावलं का माझ्या लेकाला तु कामाला ?"


तो - " नाही ग आई सकाळी तिला धावपळ होते म्हणून जरा मदत करत होतो."


आई - " माझी धावपळ नाही दिसली तुला कधी. मला तर तू चक्क पाण्याचा ग्लास सुद्धा हाती मागत होता."


बायको - " आणि तुम्ही तुमच्या लाडक्या बंड्याला तो पाण्याचा ग्लास हातात नेऊन देत होत्या."


           आणि सासू-सुनेची जुगलबंदी सुरू होत असे. हां बिचारा मात्र अगदी स्थितप्रज्ञासारखा शक्य तेवढा शांत राही . स्वतःच आवरुन , नाश्ता तोंडात कोंबुन , चहाचे दोन घोट पोटात रिचवुन , जेवणाचा डबा घेवून शक्य तेवढ्या लवकर तो त्याच्या बाईकला किक मारी अन् ऑफीसचा रस्ता धरे . 

             

              एव्हाना तुमच्या हे लक्षात आलंच असेल की , तो एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय , मध्यमवयीन गृहस्थ . दिसायला इतर चारचौघां सारखा सामान्य , आर्थिक परिस्थिती बेतास बात ,शिक्षणाचं म्हणाल तर बी. कॉम. ची पदवी आणि एका प्रायवेट बँकेत कारकुनाची नोकरी . 


                  महामारीने त्याचा पगार अर्ध्यावर आला होता . नोकरी टिकली याचंच त्याला त्याचंच आश्चर्य वाटे ! इतरांसारख्याच महागाई , पेट्रोलच भडकलेले भाव , सिलेंडरच्या वाढणाऱ्या किंमतीने जेवणाची हरवलेली चव, नोकरीतले वाढते टार्गेट , हया समस्या त्याच्या आयुष्यात होत्याच , पण त्याच बरोबर बायकोची त्याच्या वरची विनाकारणची वसवस , मुलांचा नको इतका वात्रटपणा आणि अभ्यासातली जेमतेम प्रगती, याशिवाय त्याच्या आई - बायकोच ( सासू - सुनेचं ) कधी शितयुध्द तर कधी महायुध्द त्याच्या पाचवीलाच पुजलेलं . सासू-सुनेच्या शाब्दिक चकमकीत त्यानं कधी आईची बाजू घेऊन बायकोचा रोष पत्करला नाही आणि बायकोची बाजू घेऊन आईचं मनही दुखवलं नाही. तो , हया सगळ्या गोष्टींकडे जमेल तेवढा कानाडोळा करण्याचा प्रयत्न करी . आपण भलं - आपलं काम भलं असं तो केवळ ऑफीसचं नव्हे तर घरी ही वागे . रस्त्यावरच्या लाल थांब्यावर त्याला मग घरी घडलेला प्रत्येक प्रसंग आठवत राही .

        

            पण एक दिवस अचानक दुपारी एक-दीड वाजता त्याच्याकरीता ऑफिस मध्ये एक पार्सल आलं. काहीतरी ऑफीशियल असेल म्हणून त्याने ते पार्सल स्वीकारलं आणि उघडलं तर त्यात चक्क एक परफ्युमची सुंदर आकाराची बाटली आणि एक छापिलं पत्र होते . 


             कुठे कसा आला वारा 

             गेला अंगाला वेढुन 

             अंग उरले न अंग 

             गेले अत्तर होऊन 

                                      -इंदिरा संत


            हे वाचून त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. एक क्षण त्याला वाटलं हे पार्सल आपलं नाही, कुणा दुसऱ्याचं आहे . त्यानं शिपायाला बोलावलं , पार्सलच्या कागदावर च नाव तीन-तीनदा तपासलं , तर त्या पार्सल वर त्याचं नाव लिहिलेलं होतं.


              त्या अनपेक्षित पार्सल नं त्याला खरं तर खूपच छान वाटत होतं. परत एकदा तरुण झाल्यासारखं. त्यानंतर त्याच्या करता हे अनपेक्षित पार्सल येणं जवळपास महिनाभर सुरू होतं.


            कधी त्या मिस्ट्री बॉक्समध्ये एखादा पेन असे , तर कधी गॉगल , कधी मनगटी घड्याळ , तर कधी डायरी . या सगळ्या भेटवस्तू सह एखादी चारोळी किंवा कधी कधी एखादी कविता लिहिलेली असे. पण मराठी चारोळ्याच जास्त असत.


             त्या पार्सल मधून येणाऱ्या वस्तू फार महाग नव्हत्या . पण खूप जाणीवपूर्वक , त्याची आवड लक्षात घेऊन , त्या वस्तू पाठवल्या सारख्या वाटायच्या . एकदा त्या अनपेक्षीत डब्यात त्याच्यासाठी \"हार्टशेप\" ची किचेन आली आणि सोबतच्या पत्रात चंद्रकांत गोखले ची चारोळी.


               तू माझा आहेस हे 

               किती छान आहे

               नाहीतर हे जग नुसतंच

               माणसांचं रान आहे


           त्यांनं हि चारोळी वाचली आणि या चारोळीतले शब्द त्याच्या हृदयात जणू रूतूनच बसले. सुरुवातीला जेव्हा एक-दोनदा अनपेक्षित भेटवस्तू त्याला मिळायला लागल्या , तेव्हा त्यांनं स्वतःच्या मनाचा तळ धुंडाळला. एकदा दोनदा नव्हे , तर प्रत्येक वेळीच पत्रातलं काव्य वाचून तो त्याच्या कॉलेजच्या जुन्या दिवसांमध्ये रमून जाई …… पण तरीही कोणी त्याला असं अनपेक्षित भेटवस्तू पाठवणार आठवलचं नाही . कारण त्याने कधीच कुणाला प्रेमाची कबुली दिली नव्हती….. त्याचा भिडस्त आणि अबोल स्वभाव , शिवाय मध्यमवर्गीय घरातलं टिपिकल संस्कारी वातावरण , त्यामुळे कोणाला मनातल्या भावना सांगण्याची त्याची हिंमत झाली नाही. 


                   पण तरीही प्रथम वर्षाची वर्षा त्याला खूपच आवडे. सुंदर , गोरीपान , शेलाट्या बांध्याची, लाजाळू , मधाळ बोलणारी, कायम मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी , चालती बोलती जापानी बाहुलीच वाटे त्याला ती! दिसायला एकदम मस्त !!खरं मॅरेज मटेरियल!!! तिच्या नावाने ह्याच्या मनाला गुदगुल्या होतं, मनावरून मोरपीस फिरे , पण तरीही एकट्यात कधी ती ह्याला भेटलीच नाही आणि ह्याने स्वतः चं मन कधी तिच्या जवळ उलगडून दाखवलं नाही.             पण मग एकदा न जाणो काय झालं आणि ती एकदम हा एकटा असताना ह्याच्याशी बोलली. एक सुंदर लालचुटुक गुलाब आणि एक चिट्ठी तिने पटकन त्याच्या हातात दिली आणि मैत्रिणींच्या गराड्यात नाहीशी झाली.


             त्या कागदावर केवळ चार ओळी लिहिलेल्या होत्या - 


             मनाच्या वहीत जपलंय

             तुझ्या प्रेमाचा एक पान

             निर्भेळ प्रेम माझं

              डोळ्यातून तू जाण


      नंतर केवळ महिनाभर त्यांचं प्रेम रुजलं आणि त्यानंतर काही दिवसातच तीचं कॉलेजमध्ये येणं बंद झालं. एकदा तिच्या मैत्रिणीला यांना विचारलं सुद्धा तर तिनं सांगितलं- "वर्षाचं लग्न ठरलं आहे , पंधरा दिवसानंतर चा मुहूर्त आहे."


              त्या एका वाक्या सरशी त्याच्या पोटात काहीतरी एकदम ढवळलं आणि मनात काहीतरी तटकन तुटलं. पण त्यानंतर प्रेम नावाच्या विषयाला त्याने पूर्णविराम दिला तो कायमचाच.


               पण आता त्याच्या नावाने येणाऱ्या त्या अनपेक्षित पार्सलमूळे , तो पुन्हा एकदा मनाने तरुण झाला. आता घरी येता जाता तो आरशात बघून वारंवार आपले केस नीट करू लागला. नाही म्हणायला केसांची स्टाईलही बदलवली त्याने . आता फक्त रविवारीच नव्हे तर रोजच सकाळी उठून , तो जॉगिंग आणि योगासने व प्राणायाम करू लागला. बायकोने त्याला एखादं काम सांगितलं तर चिडण्या ऐवजी तो तिला लहान-सहान कामात मदत करी आणि काहीतरी मनाशीच गुणगुणत राही , संध्याकाळी उगाच इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा तो घरी लवकर जाऊन , कधी मुलांचा अभ्यास घेत होता तर कधी स्वतःच्या आईबरोबर वेळ घालवू लागला.


           त्याच्या मध्ये झालेल्या बदलांचं आणि चांगल्या वागण्याचं रहस्य काय म्हणून बायको आणि आई एकमेकींकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकत होत्या. त्याच्या मुलांना त्यांचा बाबा आता आधी पेक्षा जास्त स्मार्ट आणि ऍक्टिव्ह वाटू लागला होता.


           तिकडे त्याच्या ऑफिस मधल्या ड्रॉवरमध्ये शिंपल्यावर कोरलेलं त्याच्या नावाचं इंग्रजी अक्षराचं पेपर वेट , बेल्ट , ऑफिस बॅग , शर्टाचे कफलिंग , कॉलर बटन , गॉगल, कॅप , वॉलेट आणि प्रत्येक वस्तूबरोबर प्रेम संदेश यांनं जागा व्यापली होती.


             एखाद्यावेळी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला तर , तो त्याचे ड्रावर उघडून त्या वस्तूंवर अलगद हात फिरवी , ते छापील प्रेम-संदेश अनेक वेळा वाचून काढी . कधी कधी तो मनातल्या मनात विचार करी- "आपण विवाहित आहोत, दोन गोंडस मुल आहेत आपल्याला. आपल्यासाठी कोण कशाला पाठवेल या वस्तू? कॉलेजमधली वर्षा तर फार वर्षापूर्वीच तिच्या वाटेने पुढे निघून गेली."

         

   तर कधी त्याला वाटे - "या अनपेक्षीत भेटवस्तू कदाचित आपल्यासाठी नाहीतच ऑफिस मधल्या त्या न्यूकमर साठीच  कोणीतरी पाठवत असेल , पण मग पार्सल वर आणि पत्रांवर आपलं नाव कसं काय?"

    

              पण काहीही असो त्या अनपेक्षित पार्सल साठी आणि त्या प्रेम पत्रांसाठी त्याच्या मनाला एक हवीहवीशी हुरहुर लागे. एखाद दिवशी ते पार्सल आलं नाही तर त्याला फार बेचैन वाटत असे. आणि तो आतुरतेने त्या प्रेमपत्रांची वाट पाहत राही.


                एकदा त्या पार्सल मध्ये एक ब्रांडेड आकाशी निळ्या रंगाचा शर्ट आणि एक सुंदर अशी चारोळी लिहिलेलं पत्र आलं , पत्रात लिहिलं होतं -


               व्याकूळ झालेलं हिरव रान

               एकेक फांदी एकेक पान

                नदी-नाले लावून बसले

                 तुझ्या शब्दांकडे कान

                 आतुर झाले फुलण्यासाठी

                 काटे ,कुटे , बाभूळ बन

                   निदान त्यांच्या साठी तरी

                  तू फक्त हो म्हण……..

                

                                   -ज्ञानेश वाकुडकर


                " उद्या तुमचा वाढदिवस आहे हा शर्ट घालून खाली दिलेल्या पत्त्यावर संध्याकाळी सात वाजता नक्की भेटायला या कोणीतरी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत आहे."


                 त्याने मनात विचार केला की ह्या अनोळखी व्यक्तीला माझा वाढदिवस सुद्धा माहिती आहे. म्हणजे नक्कीच कोणीतरी खूप जवळची व्यक्ती असणार. मनातल्या मनात असे विचार करतच तो घरी पोहोचला. आणि नित्याप्रमाणे रात्री झोपला.


                दुसऱ्या दिवशी सकाळी दरवर्षीप्रमाणे  त्याच्या आईने त्याला औक्षण केलं आणि 501 रुपये वाढदिवसाची भेट म्हणून दिले ‌. बायकोने पण औक्षण केलं आणि एक डार्क मरून रंगाचा शर्ट गिफ्ट केला आणि आज तोच शर्ट ऑफिस मध्ये घालून जा म्हणून आग्रह करु लागली.


बायको - "आवडला ना तुम्हाला शर्ट ? मग आज तुम्ही हाच मरून शर्ट घालून ऑफिस मध्ये जायचं बर का!"


            नकाराचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन…तो - "हो हो नक्कीच ! छानच आहे शर्ट . अगं पण खूपच डार्क रंग आहे याचा. तुला माहिती आहे मी सगळे फिकट रंग घालतो."


बायको - "ते काही नाही , डार्क वगैरे काही नाही तुम्हाला आज हा शर्ट घालून ऑफिसमध्ये जावं लागेल."


             बायकोचा आग्रह तो मोडू शकला नाही आणि निमूटपणे त्याने बाईकला किक मारली. आज ऑफिस मध्ये त्याचे काही कामात फारसं लक्ष लागत नव्हतं. नजर सारखी घड्याळाकडे जात होती. साडेपाच चा टोला पडला आणि ह्याने आवरा-आवरी केली. मिळालेला आकाशी शर्ट , गॉगल , मनगटी घड्याळ , पेन , शिम्पल्याचे पेपर वेट आणि हार्ट वालं किचेन , सगळ्या सगळ्या वस्तू आणि ती सगळी प्रेमपत्र व्यवस्थित एका डब्यात छान पॅक केली आणि नियोजित ठिकाणी पावणेसातला पोहोचला.


           ते एक छान रेस्टॉरंट होतं. शहरात नवीनच सुरू झालेलं. मागे एक दोनदा बायको त्याला म्हणाली सुद्धा की , \"आपण जाऊया तिथे\" पण याने नेहमीप्रमाणे टाळलच होतं.           आता ते रेस्टॉरंट बघून त्याला मनात कसं तरी वाटलं. फंक्शन हॉल कुठे आहे म्हणून त्यानं रिसेप्शनिस्टला विचारलं. ती सूचक हसली आणि एक गुलाब त्याला देऊन , तिने हॉल कडे अंगुलीनिर्देश केला.


             तो त्या हॉलच्या आत पोहोचला तर तिथे त्याच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली होती. सुंदर फुलांची सजावट , त्याच्या फोटोसकट वाढदिवसाचं बॅनर , आकाशी रंगाचे फुगे , इलेक्ट्रिकच्या दिव्यांनी हॉल उजळुन निघाला होता. त्यानं हॉलमध्ये पाय ठेवताच क्षणी त्याच्यावर डोक्यावर फुलांचा वर्षाव झाला. त्यांची दोन्ही मुलं धावत येऊन बाबाला बिलगली. आई- बायको , बहिण- जावई , सासु- सासरे आणि जवळचे चार-पाच मित्र सगळ्यांनी एक साथ \"हॅपी बर्थडे टू यू\"  म्हणून गजर केला. या सगळ्या मुळे तो इतका हुरळून गेला की , त्याला एक क्षण वाटलं आपण स्वप्नातच आहोत. त्या क्षणी बायकोने त्याला बारीक चिमटा काढला. तो चटकन भानावर आला. केक कापल्यावर , स्नेहभोजन घेऊन सगळे आपापल्या घरी परतले. रात्री बायको त्याला म्हणाली..


बायको - " तुम्ही माझ्यावर खरंच खूप प्रेम करता. मला तर बाई वाटलं होतं ,तुम्ही तो निळा शर्ट घालून येणार की काय!"


           त्यानं एक क्षण चमत्कारिक दृष्टीने तिच्याकडे पाहिलं , ती म्हणाली.....


बायको - "ती सगळी पार्सल , प्रेम पत्र मीच पाठवत होते आणि हो माझी मागच्या तीन महिन्याची बचत तुमच्या वाढदिवसाला खर्च झाली."


         त्याने तिला प्रेमाने जवळ ओढलं आणि खोलीतला लाईट बंद केला…….


********************************************


 वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत…


फोटो - साभार गुगल


जय हिंद.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//