पाळी...बापरे...अळीमिळि गुपचीळी अंतीम भाग

The Menstrual Story


आई - जिथून बाळ बाहेर येतं तिथून. म्हणजे जिथून आपल्याला सु होते ना , त्या भागाला लागूनच अजून एक मार्ग असतो मुलींमध्ये .त्याला योनी किंवा वजईना असे म्हणतात. तुला हे सगळं एकदम लक्षात नाही राहणार. गुंतागुंतीचं असतं हे खूप. बाकी माहिती हळूहळू देईन मी तुला. शाळेच्या अभ्यासक्रमात सुद्धा असतं हे सगळं पुढे."

छोटू - "पाळीच्या वेळेस दुखतं का ग तुला खूप?" आपल्या आईला दर महिन्याला असं रक्त येतं असा विचार करून छोटूला वाईट वाटलं होतं.

आई -"हो दुखतना पोट, मांड्या, कंबर ,कधीकधी डोकं दुखतं, चिडचिड पण होते. पण करणार काय? काहीच इलाज नसतो त्याला. सगळ्याच बायकांना होतो हा त्रास. निसर्गाची रचनाच आहे तशी."

आईचं हे वाक्य ऐकून छोटूला निसर्गाचा अक्षरशः राग आला त्याला वाटलं निसर्गाने स्त्रियांवर अन्याय केला आहे.

छोटू - "काय करता मग तुम्ही? कसे थांबवता रक्त? यावर काही औषध आहे का?" छोटू चे प्रश्न थांबतच नव्हते.

आई - "चार-पाच दिवस येतच राहतं हे रक्त हळूहळू. त्यासाठी मग आम्हाला पॅडस् वापरावे लागतात. म्हणजे जसे लहान मुलांसाठी डायपर्स असतात ना तसं. ते लावून मग आम्ही नेहमीप्रमाणे दिवसभराची कामं करू शकतो. त्रासदायक आणि गैरसोयीचं असतं हे. पण आता इतक्या वर्षांमध्ये सवय होऊन गेलेली आहे. मी आठवीत असताना मला पाळी सुरू झाली होती." आईने तिच्या बद्दल सांगितलं.

छोटू -"आम्ही काही करू शकतो का ग तुमच्यासाठी?"

आई -"थोडी थोडी मदत जशी तु मला रोज करतोस ना तशी .बस अजून काही नाही."

छोटू विचार करायला लागला आई, आजी, काकी ,ताई ,त्याची लाडकी मावशी, आणि वर्गातल्या इतर मुली या सगळ्यांना हा त्रास होत असेल नाही ! पण त्यासोबतच त्या सगळ्यांना एक सॉलिड सुपर पावर ही मिळाली आहे त्या गोष्टीचं त्याला थोडं समाधान वाटलं.

आई -"बाळा, ही इतकी अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की ,अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. कितीतरी गोष्टी अजून शास्त्रज्ञांना पण माहित नाही आणि समजले नाहीत."

छोटूच्या दादाने छोटूला काही व्हिडिओ दाखवले, ॲनिमेशन वाले, समजायला एकदम सोपे. आपलं शरीर म्हणजे एक जादूची पेटी आहे याची छोटूला आधी पुसटशी कल्पनाही नव्हती आणि आपल्या शरीराच्या आत एवढ्या साऱ्या गोष्टी एकाच वेळी घडतात हे बघून तर आश्चर्यच वाटलं.

रात्री झोपताना छोटूचे डोक्यात अनेक विचार येत होते आणि त्याला झोपच येत नव्हती एवढं सगळं समजल्यानंतर त्याचे प्रश्न अजून वाढतच होते. तेवढ्यात आईचे शब्द कानावर पडले.

आई - "थोडी घाई केली का मी? हे सगळ छोटूला सांगायला?"

बाबा - "नाही मला नाही वाटत तसं .आता जग इतका फास्ट झालाय ना . सगळ्यांच्याच वय अलीकडे यायला लागलाय. आणि तसेही तुला काय वाटतं तू नसतं सांगितलं तर त्यानी दुसरीकडून माहिती नसती मिळवली? उलट बरं झालं! एक तर त्याने सरळ तुला येऊन विचारलं. आणि तू ही त्याला आढेवेढे न घेता सगळं लगेच आणि सोप्या भाषेत मोकळेपणाने समजून सांगितलं."

आई - "मला त्याला खात्री पटवून द्यायची होती की, तो आपल्याला कधीही ,कुठले प्रश्न विचारू शकतो. न घाबरता, न लाजता म्हणून देऊन टाकली सगळी माहिती. जास्त विचार न करता."

बाबा - "चुकीच्या मार्गाने चुकीची माहिती मिळवण्यापेक्षा अपेक्षेपेक्षा लवकर मिळणं कधीपण परवडतं, तुम्हा बायकांना जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा, तुम्ही तरी कुठे कळत्या वयात असता? तुम्ही करताना मॅनेज बरोबर सगळं. आम्हाला तर फक्त ऐकायचं त्याबद्दल. समजून घ्यायलाच हवं की."

आई - "मुलं किती लवकर मोठी होतात ना मला आपली लहान बाळाचे वाटत होती ती!"


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


***********************************

आजकाल मुला-मुलींचं दोघांचाही वयात येण्याचं वय अलीकडे आलेलं आहे .त्यामुळे योग्य वेळी, योग्य वयात त्यांना जर पालकांकडून आणि घरच्यांकडून योग्य ती माहिती मिळाली तर मुलं चुकीच्या गोष्टी करणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टींचा टॅबू पण होणार नाही.


संदर्भ

संध्या घाटपांडे यांच्या पाळीची गोष्ट या ब्लॉग वरून साभार.

इतर माहिती व फोटो साभार गूगल.


🎭 Series Post

View all