चमचमीत चटकदार लोणचं

All Over The World Near About Each N Every One Love's Pickles Here Is The History And Journey Of Different Types Of Pickles

चमचमीत चटकदार लोणचं 


            आज परत एकदा देशपांड्यांचं घर हास्य, विनोद, गडबड, दंगा, मस्ती, लगबग आणि मस्करीच्या रंगात जणू न्हाऊन निघालं होतं. त्याला कारणही अगदी तसंच होतं. देशपांड्यांच्या तीनही मुली त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेवून उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आणि माहेरपणासाठी माहेरी आल्या होत्या. 


             आता उन्हाळा आणि माहेरपण म्हटलं की सासुरवाशिणीसाठी सुनेपे सुहागा किंवा आजकालच्या आधुनिक भाषेत आइसिंग ऑन द केक नाही का?   

                      हया बच्चे कंपनीत सगळ्यात लहान मुल होतं रमाचं वय वर्षे पाच आणि  सगळ्या मावस भावंडात मोठी होती राधा. खरंतर राधाचं लग्न जमलं होतं आणि दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्तही निघाला होता. त्यामुळे पुढे लग्नाच्या तयारीत, घाईगडबडीत राधाला आजीकडे यायला जमणार नव्हतं म्हणूनच मग तीनही बहीणींनी एकमत करून आईकडे पंधरा दीवस एकत्र येण्याचं ठरवलं आणि देशपांडेचं शांत, संयमी घर एकदम नवचैतन्याने भरलं. 

    

            भल्या सकाळपासून घरात, गप्पांचे, विनोदाचे आवाज, स्वयंपाक घरात विविध पदार्थांचे खमंग, जिभेला \"पाणी सुटणारे\" सुवास, तर अंगणातल्या आंब्याला बांधलेल्या झोपाळ्यावर कधी भांडणाचे, कधी रुसव्या फुगव्याचे, तर कधी रडारडीचे आवाज घुमु लागले.

      

             थोडक्यात देशपांडेचं घरही माहेरपण , आनंद, मस्करी, रुसवे, फुगवे, अशा अनेक भावनांच्या सरीमधे अक्षरश: न्हाउन निघाल होतं.         


                      एका सकाळी देशपांडेबाईंनी लोणच्याचा घाट घातला. कारण राधाला तिच्या आजीच्या हातचं लोणचं खूप आवडायचं आणि सगळ्या नातवंडात राधा थोरली असल्याने ती अगदी लाडाची होती. लोणच्याचा तो थाट पाहून मधली मीना आईला लगेच म्हणाली…


 मीना - " काल राधानं लोणच्या ची गोष्ट काढली आणि तू लगेच लोणच्या च्या तयारीला लागली." 


आई - "अग राधाच्या लग्नाला खुप वेळ आहे अजुन. पण चार-आठ दिवसांनी तुम्ही सासरी जाणार ना! मग सोबत दयायला नको का लोणचं?"


 रमा -" आई अग हे लोणचं सोबत नेणं म्हणजे अगदी जिकरीच काम. त्यातलं तेल सगळे कपडे खराब करेल ना! आणि बाजारात मिळतात ग सगळ्या प्रकांची लोणची."


आई -" अग मिळु देत बाजारात, पण त्या विकतच्या लोणच्याला घरच्या लोणच्या सारखी चवं आणि सर दोन्ही नाही."



राधा -" अगदी बरोबर म्हणते आहेस आजी तु. अग रमा मावशी बाजारात विकत मिळणाऱ्या लोणच्यात घरच्या लोणच्याची आपुलकी कशी येणार? शिवाय त्या लोणच्यात काय-काय आणि कसं टाकलयं, स्वच्छता, आरोग्य, आणि पोषणमूल्य यांच काही महत्त्व आहे की नाही ?"


 रमा - "अग बाई लग्न ठरल्यामुळेच का राजकन्येत एवढा बदल झाला? बाहेरचं हॉटेलचं आवडी ने खाणारी आमची लाडकी आता आम्हाला घरच्या पदार्थाची महती सांगत आहे." रमा उपरोधीकपणे म्हणाली. 


राधा - "अग मावशी लग्न ठरलय म्हणुनच तर सगळ्या गोष्टी घासुन - तपासुन नको का घ्यायला ? लोणच्याच्या बरणीवर जरी सर्व पदार्थांचे तपशील दिले असले तरी काहीना काही  प्रमाणात त्यात प्रिझर्वेटीव्हज टाकलेली असतातच आणि एक गोष्ट खरी सांगु का तुला मला ना आजीच्या हातचं कैरीचं लोणचं खूप आवडतं आणि तुझ्या होणाऱ्या जावयालाही."



         रमा, मीना डोळे मोठे करून राधाकडे बघत होत्या. 


 राधा - "अग असं काय बघताय माझ्याकडे? कॉलेजमध्ये घरून डबा घेऊन जायची मी. आणि त्या डब्यात भाजी पोळी सोबत आजीच्या हातचं चटकदार लोणचं. कधी कैरी, तर कधी आवळ्याचं, कधी लिंबाचे तर कधी मिर्चीचं लोणच. 

     राज माझ्या डब्यातलं सगळ लोणचं एकटाच खाऊन टाकायचा. अग त्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या तासंतास चालणाऱ्या प्रॅकटीकलमध्ये कुठे श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती, मग कॅन्टीनमधे जाऊन काही विकत घेऊन खाणं तर दूरच राहिलं. म्हणुनच आजीचं लोणचं आणि आजीही माझी आणि राजची आवडती आणि लाडकी झाली बरका!"


             तेवढ्यात राधाची आई मीरा तिथे आली. 

मीरा - " मावशी भाचीमधे काय एवढया गुजगोष्टी सुरु आहेत गं !"


 रमा -" ताई जावईबापूंच्या आवडी निवडी सांगत होती राधा."


  मीना - " तिचे, आणि जावईबापूचं आईच्या लोणच्यावरचं प्रेम".


         एवढे बोलून सगळ्या हसायला लागल्या. 


आजी-" राधा आज मी तुला लोणचं कसं बनवायचं ते शिकवते .  ते ,तू लक्षपूर्वक बघ आणि मग सासरी गेल्यावर तुच बनवत जा तुझ्या आवडीच लोणचं."


               आधी ज्याचं लोणचं घालायचं तो जिन्नस (कैरी, लिंबु, मिरची, फ्लॉवर, गाजर वगैरे वगैरे ) व्यवस्थित निवडुन घ्यायचं, मग ते देठ काढून धुवून , पुसून स्वच्छ कोरडं करायचं. अजुनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणुन हलकेच पेटत्या गॅस वर सुकवुन घ्यायचं. मगच चिरुन ,मसाला घालून लोणचं तयार करायचं.                  


                    लोणच्याचा मसाला पण घरीच बनवायचा बर का राधे! तिखट, हळद, मीठ सुध्दा हलकेच तव्यावर गरम करून घ्यायचं. सगळं कसं निर्जल हवं. मग काय बिशाद लोणचं खराब व्हायची? ज्या बरणीत लोणचं ठेवायचं ती बरणी पण एक खास पद्धतीत ठेवायची. ती बरणी पण आधी स्वच्छ धुवून, पुसुन गॅसवर थोडी गरम करून निर्जल करायची. मग बरणीच्या खाली तळाशी, मीठ पिसरवायचे त्यावर लोणचं घालायचं, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर दयायचा . मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याची कड, एका बाजुला फाडुन व्यवस्थित बांधायचा आणि मग झाकण लावायचं.      


        लोणच्याचा मसाला करतांना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडुन, साफ करून, निरनिराळे भाजुन, एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारिक करून ठेवायचं. तेव्हाच तो मसाला खमंग होतो बरं का!"


          आजीची मसाला बनवण्याची रेसिपी आणि कृती राधा अगदी मन लावून बघत होती. लोणचे बनवता , बनवता मग राधानेही लोणच्याविषयी सगळी माहिती , लोणच्याचा इतिहास आणि जगाच्या पाठीवर कुठल्या देशात लोणच्याला काय म्हणतात ते आजीला आणि तिच्या मावश्यांना सांगितले.


राधा -"लोणच्याचं मूळ भारतीय यावर काही लोक ठाम असतात. प्रांतोप्रांतीची लोणच्याची विविधता पाहिली तर भारताला लोणच्याचा देश म्हणायला तशी काही हरकत नाही. पण लोणच्याला स्वतःची अशी निश्चित  जन्मभूमी नाही. इतिहासकारांच्या मते जगभरात विविध ठिकाणी एकाच कालखंडात मनुष्याने लोणच्याचा अविष्कार केला असावा असा अंदाज आहे. बेचव , सपक जेवणाला रुची आणायची तर सोपा उपाय म्हणून आपण लोणच्याकडे बघतो.


             आदिमानवाच्या साठवण वृत्तीचा परिपाक म्हणजे ही लोणची. उद्या शिकार मिळेल ना मिळेल त्यासाठी आजच तरतूद हवी असं वाटण्याच्या काळापासून आजवर माणसाला साठवण करून पदार्थांच्या चवी ढवित बदल करायचं वेडच आहे. आगामी काळासाठी अन्न टिकवून ठेवण्याची धडपड म्हणजे लोणचं.


            मिठात आणि आम्लयुक्त द्रावणात बुडवून ठेवलेले अन्न बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही , हा खरं तर वैज्ञानिक शोध. त्यातूनच खारवून  , मुरवणे हा खाद्य इतिहासातला महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. गेली चार एक हजार वर्ष सर्वच संस्कृतींमध्ये माणसं हाती गवसलेल्या प्रत्येक खाण्यायोग्य वस्तूच लोणचं घालत आली आहेत. बारकाईनं पाहिलं तर हा \"नो फायर कुकिंग\" म्हणजे \"अग्नी स्पर्श विरहित\" प्रकार.


            लोणच ही काही फक्त भारतीय मक्तेदारी नाही बरं का तर शिष्ट , आखडू ब्रिटिश लोक पण लोणची घालतात आणि मोकळेढाकळे अमेरिकनसुद्धा. मनमौजी इटालियन , फ्रेंच आणि मध्यपूर्वेतील वाळवंटी देशात पण लोणची घातली जातात. इतर घटक वेगळे पण आयत्यावेळी कामाला येणारे तोंडीलावणे म्हणून लोणचे असते.


             कोरियातली किमची किंवा जर्मनीत साॅअर् क्राॅउट म्हणजे पचपचीत म्हटल्या जाणाऱ्या कोबीचा जबरदस्त कायापालट. रशियात टोमॅटोचं, जपानमध्ये वांग्याचं तर मध्यपूर्वेत लिंबाचं, मिरचीचं लोणचं हे लोणच्यांच्या दुनियातले बिनीचे शिलेदार.


           आपल्या भारतात त्यातही महाराष्ट्रात लोणचे आणि वरण-भात हि अतूट जोडी. रोजच्या साध्या जेवणाला लोणच्याने एक वेगळाच झटका येतो. मराठी लोणची मुख्य करून कैरी, लिंबू , मिरची , आवळा यांची. पण याव्यतिरिक्त भारतात अनेक पदार्थाची लोणची आहेत. बनारस मधील भरवा लाल मिरची लोणचे, राजस्थान मधील कैर सांगरी , पंजाब हरियाणा येथील शलगम , गोबीचे , आदिवासी समाजातील करवंद , भोकर आणि मोहचे लोणचे, कोकण गोव्यातील बिल्कुल तेल नसणारे निव्वळ मिठातील बाळ कैरीचे आणि गोव्यातील मांसाहारी लोणचे. अशी हजारो प्रकारची लोणची आहेत.


           राधा चे लोणच्या च्या प्रांतातील हे ज्ञान पाहून तिची आई  , दोन्ही मावश्या आणि आजीने डोळे मोठे करून तोंडाचा आवासला नसता तरच नवल !


         

          आजीने सांगितलेली लोणचं करण्याची पद्धत राधाने अगदी मनात साठवून ठेवली आणि सगळ्या महिला मंडळाने वामकुक्षीसाठी कूलरकडे मोर्चा वळवला.


समाप्त



संदर्भ - १) शुभ प्रभू साटम यांचा १४ मे २०२२रोजी लोकमत नागपूर येथील प्रकाशित लेख.


  २) मेघना सामंत यांचा १३ नोव्हेंबर २०२१ रोजी लोकमत नागपूर येथून प्रकाशित लेख.


फोटो - साभार गुगल.


**************************************************

     

        वाचकहो आता उन्हाळा संपत आला आहे जून महिन्यात पाऊस पडला की सगळ्या गृहिणीकडे लोणचं बनवण्याची लगबग सुरू होईल, म्हणूनच हा खास लेख समस्त गृहिणींना समर्पित.



           लेख कसा वाटला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.



जय हिंद.

🎭 Series Post

View all