किमयागार भाग दोन

Story Of A Brother


मागच्या भागात आपण पाहिले की, नाना यांची भगिनी मधुरा हिने नानांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले होते आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नानांच्या 61 च्या कार्यक्रमावेळी होता. नाना एक एक प्रकरण वाचत होते………


जर आईमुळे घराला घरपण आहे तर बाबा मुळे त्या घराच्या भिंती संरक्षित आहेत. आई आहे घराला घर बनवणारी तर बाबा आहे त्या घराचं उन्हापावसात भिजणारं पण तरीही अभेद्य राकट आणि तेवढच खंबिर छत.

नाना एकेक प्रकरण वाचत होते- पहिल्या प्रकरणात नानाने मधुरा आणि नितीन ला आई-वडील गेल्यावर कसं कष्टाने मोठ केलं त्याबद्दल सांगितलं होतं. मधुरा जणु काही आत्मकथनच करत होती.
मधुरा - "मी तर पाच - साडेपाच वर्षाची वडील तर मला आठवतही नव्हते. आई गेली तेव्हा मात्र मी तिच्यासाठी खूप खूप रडायाची, मला अजुनही आठवतं नाना मला कडेवर घेऊन अंगणभर फिरवायचा तर कधी रात्री झोपताना गोष्टी सांगायचा. नितीन मोठा होता, सात आठ वर्षाचा त्याला सारं कळे पण तो काहीच बोलत नव्हता आणि रडतही नव्हता. आई गेल्याने जणू एकदम तो समजदार आणि समजूतदार ही झाला होता.

रोज सकाळी उठून जसं आई अंगण झाडायची , सारवायची ,रांगोळी टाकायची, दादा ही अगदी तसच करायचा . आमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा ,माझी आंघोळ, कपडे, वेणी ,डबा भरून ,स्वतःच्या सायकलवर मला आणि नितीन शाळेत घेऊन जायचा . गौरी-गणपतीला तालुक्याच्या गावी जाऊन, मेळावे आणि जत्राही दाखवायचा. आकाश झुला ,इलेक्ट्रिक रेल्वेत बसवायचा, खेळणी, बाहुल्या ,फुगे ,किती- किती वस्तू घेऊन द्यायचा मला नाना ! नितीन मात्र काहीच घेत नसे. नाना तेव्हा एवढे पैसे कसे खर्च करायचा आणि कुठून आणायचा याचा विचारच मनात येत नव्हता आणि ते वयही तसं नव्हतं. पण आता मात्र कळत पावसाळ्याचे चार महिने , नाना पाटलाच्या मळ्यात आणि शेतात सकाळी दोन तास कामाला जायचा मग तिकडून आल्यावर आमची शाळेची तयारी आणि परत दिवसभर शाळेत शिकवायचा.

पाटलाचा नंदू अभ्यासात कच्चा होता. शिवाय उनाड, पाटलाने दादाला नंदू ची जबाबदारी दिली. नंदू आता आमच्यासोबतच राहायचा. नितीन अंगण झाडायचा, मग नंदू आणि नितीन सारवण करायचे, मी रांगोळी काढायची ,स्वयंपाकासाठी ची भाजी चिरणे ,कणिक मळणे, लसूण सोलणे, कांदा चीरणे,शेंगदाण्याची भरड ,वरण भाताचा कुकर सारं दादा नं आम्हाला शिकवलं. पण मग मी दहा-बारा वर्षाची झाल्यावर आजूबाजूंच्या म्हणण्यानुसार, आता घरात एक बाई माणूस असणं आवश्यक होतं. म्हणून मग दादा ने लग्न केलं.


दादाचं लग्न झालं. पण वहिनी विषयी माझ्या मनात जरा अढीच होती. भावकितल्या बायका म्हणाल्या, "आता जरा शंकराला सुख मिळेल . त्याचा कामाचा ताण जरा तरी हलका होईल. " पण मला मात्र वाटायचे की, \"नाना माझ्यापासून दुरावेल करण नाना मला माझ्या हक्काचा माणूस वाटायचा\". मला वाटायचे गिरीजा वहिनी, नानाला माझ्यापासून तोडेल पण ती नावाप्रमाणेच गिरीजा होती. नानाच्या संसाराला गिरिजा वहिनींनी समर्थपणे साथ दिली .आधी मी वहिनी केलेल्या स्वयंपाक खायची नाही किंवा कधी भाजीत तिखट आणि कधी कधी वरणात मुद्दाम मीठ किंवा पाणी टाकून द्यायची. तेव्हा वाटायचे नाना आता वहिनीला ओरडेल, पण रागावणे हा नानाचा स्वभावच नाही आणि नितीन वहिनीला सांगायचा की, मी ती बदमाशी केली आहे म्हणून,पण वहिनी ही मला कधी रागे भरली नाही.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.




🎭 Series Post

View all