किमयागार रिपोस्ट

Story Of A brother


किमयागार…………... मुलांचं आयुष्य घडवणारा जादूगार म्हणजे बाप



त्या दिवशी नाना जोशी म्हणजेच जोशी मास्तरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाची तयारी अगदी जोरात सुरू होती. आधी सपत्निक सत्यनारायण पूजा , मग होमहवन आणि त्यानंतर ग्रंथतुला ,शर्करा तुला, आणि नाणे तुला झाल्यावर, ६१ दिव्यांनी औक्षण आणि सगळ्यात शेवटी मधुरा- नानांची कनिष्ठ भगिनी - यांनी नानांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन असा कार्यक्रम ठरला होता.

. नाना जोशी अर्थात शंकरराव जोशी तालुक्याच्या गावी प्राथमिक शाळेत नोकरी करणारे प्राथमिक शिक्षक. पण तेवढीच त्यांची ओळख नव्हती, नानांनी केवळ आपली भावंड मधुरा आणि नितीन यांचेच आयुष्य घडवले असे नव्हते तर, आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या मुलांच्याही जीवनाला त्यांनी आकार दिला होता. गावच्या पाटलांच्या सहकार्याने नानांनी गावातच एक आदर्श शाळा निर्माण केली होती. त्यामुळे नानांच्या एकसष्टी ला केवळ आप्तेष्टच नव्हे तर, त्यांचे माजी विद्यार्थी आणि गावातील इतर काही मान्यवर ज्येष्ठ मंडळी ही उपस्थित होते.


नाना जोशी म्हणजे एक शांत , सरळ, पापभीरू,संयमी व्यक्तिमत्त्व, पण हाडाचे शिक्षक. राहणीमान अगदी साधे पण विचारांवर मात्र सानेगुरुजी , महात्मा गांधीजी यांचा प्रभाव. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना केवळ साक्षर करुन केवळ अक्षर ज्ञानच दिले नाही ,तर व्यवसायाभिमुख जेवढे शिक्षण- प्रशिक्षण त्यांना देता येत होते, तेही दिले . गांधीजींच्या बुनियादी तालीम विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या शाळेत नक्कीच उमटले होते.

नाना चे विद्यार्थी बागकाम करत ,सुतारकाम शिकत, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मूलभूत जोडणी आणि बेकरीचे पदार्थ बनवण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते . कुणी ग्रंथपालाचे काम करत होते तर, कुणी अकाउंटचे. आता तर नानांनी स्वतःच्या नोकरीच्या शेवटच्या पाच वर्षात विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे ही सुरू केले होते.



सत्यनारायण, होमहवन ,ग्रंथ तुला ,शर्करा तुला , आणि नाणे तुला झाल्यावर नानांच्या पत्नी - गिरिजा वहिनी, भगिनी मधुरा, लहान भावाची पत्नी सुनीता ,कन्या मीरा ,आणि स्नुषा रमा- नानांचा लेक नारायण यांची पत्नी, या पाच सवाष्णींनी नानांना औक्षण केले.


औक्षण झाल्यावर मधुराने -नानांच्या भगिनीने -\"किमयागार………. मुलांचे आयुष्यात घडवणारा\" जादूगार या नावाचे नानांन वर लिहिलेले पुस्तक, स्थानिक माजी सैनिक प्रताप सिंग चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. एकेक मान्यवर नानांन विषयी आपला आदरभाव व्यक्त करत होता. पण नाना मात्र पुस्तक वाचण्यात रमले होते. प्रस्तावनेतच मधुराने वडिलांविषयी च्या तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.


\"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी\" , किंवा \"प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई \" - आईची महती सांगणारी अशी कितीतरी काव्ये अनेक कवींनी लिहिली आणि गायली आहेत . आईची महती खरोखरच थोर आहे. तिच्या त्यागाची, समर्पणाची सर कशालाच येणार नाही . पण बापही मुलांच्या आयुष्याचा दिपस्तंभ असतोच. आई लेकराला शिकवते - मायेचा ओलावा, प्रेमाची ऊब, नात्यांचा गोडवा तर बाप सांगतो जगाचा कोरडा व्यवहार. आई देते संस्कार, जिव्हाळा, त्याग, यांची शिदोरी तर बाप सांगतो जगाचा भावना रहीत , रोखठोक, हिशोब.


‌‌ आई आपल्या सहवासाने ,आपुलकीच्या , ममतेच्या अमृतानं घराला घरपण देते. आपल्या लेकरांना जिवाच रान करून जपते, वाढवते. तर बाप आपल्या छातीचा उभा कोट करून व्यवहारही, निष्ठुर, निर्दयी, स्वार्थी जगाची सारी वादळे एकटाच झेलतो, घरा बाहेरच थोपवतो, आयुष्यभर त्याच्या स्वाभिमानावर, लायकी वर होणारे घाव झेलत शुर शिपायासारखा तो लढत राहतो. तरीही तो कधी थकत नाही, झुकत ही नाही, आपल्या शिस्तीतच, राकट रागाचं कुंपण घालून कोवळ्या रोपट्याला रूजवण्यासाठी संरक्षण देत राहतो.



©® राखी भावसार भांडेकर.


जय हिंद.

फोटो साभार गूगल.



🎭 Series Post

View all