राखी........... धागे प्रेमाचे

Sometimes some unknown relations have more love and affection than blood relations

             राखी……….. धागे प्रेमाचे





 रमा - " मीरा झाली का ग तयारी? आरतीचं ताट काढलस का? सगळ्या राख्या व्यवस्थित ठेवल्यास का तबकात?


 मीरा - " आई किती प्रश्न विचारते आहेस ग तू! बघ, मी आरतीचे ताटपण तयार केलं आणि पाटाखाली रांगोळी काढून त्यावर कुंकू ही टाकलं बर का!


 रमा - " गुणाची माझी बाई! जा, आता शेजारच्या मीनाताई ला बोलावून आण! आणि हो आज आपल्या चिंटू ला पहिल्यांदा औक्षण मीनाताई करेल बरं का! दरवर्षीप्रमाणे या वर्षी मी आधी चिंटूला औक्षण करणार असा हट्ट नको करू हं!"



मीरा - " बरं बाई! तू जसं म्हणशील तसं!! या वर्षी मीनाताई ची लग्नानंतरची पहिली राखी पौर्णिमा म्हणून तू असं म्हणते आहेस ना आई!"


 रमा - " हवं तर तसं समज, पण आज कुठलाच बालिशपणा करायचा नाही हां! छान शहाण्यासारखं वागायचं.


 मीरा - " आई एक प्रश्न विचारू का? "


 रमा - "हं आता अजून काय विचारायचं आहे?"


 मीरा - " आई, मीना ताई, माझी आणि चिंटूची मानलेली बहीण, पण गेल्या दोन-चार वर्षापासून तू दरवर्षी मीनाताईला रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आपल्याकडे नियमितपणे बोलावते, छान पाहुणचार करते आणि मस्त मस्त गिफ्ट पण देते असं का? "

           तेरा चौदा वर्षाची मीरा रमा ला विचारत होती.


        

           क्षण दोन क्षण रमा भूतकाळात हरवली आणि एक मोठा उसासा टाकून सांगू लागली -



रमा -"मीरा कोरोना च्या दुसऱ्या लाटेत तुझे बाबा आणि मी, आम्ही दोघेही संक्रमित झालो होतो. सगळीकडे टाळेबंदी होती. तुझ्या बाबांचा कोविड चा रिपोर्ट पॉजिटिव आल्यानंतर अगदी दोन दिवसातच त्यांची तब्येत खूपच खालावली सगळी हॉस्पिटल्स, दवाखाने अगदी पूर्णपणे भरले होते. तुझ्या बाबांना कुठल्याच हॉस्पिटल मध्ये, कुठलाच डॉक्टर ऍडमिट करायला तयार नव्हता, कारण कुठल्याही दवाखान्यात एकही रिकामा बेड शिल्लक नव्हता. इकडे माझी पण प्रकृती फारच बिघडली होती. त्यावेळी मीनाताईचे आई-बाबा अगदी देवासारखे धावून आले आपल्या मदतीला.



                मीनाताई च्या बाबांनी- भावे काकांनी, आपल्या प्रभागातल्या नगरसेवकांना विनंती करून, तुझ्या बाबांना कोविड सेंटरला ऍडमिट करायची व्यवस्था केली. मीनाची आई तुला आणि छोट्या चिंटूला त्यांच्या घरी घेऊन गेली. कारण तुम्ही दोघं फार छोटे होते आणि कदाचित माझ्या सोबत राहिल्याने तुम्हालाही कोरोना झाला असता.



               त्या परीक्षा पाहणाऱ्या काळात मीनाच्या आईने अगदी सख्ख्या बहिणी प्रमाणे माझी काळजी घेतली. त्या, माझ्या औषधांची विचारपूस करायच्या, मला जेवणासाठी आग्रह करायच्या, कधी फळ, कधी ज्युस तर कधी औषधी पाठवायच्या, तुझ्या बाबांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करायच्या.


               कधी कधी माझे मन अगदी निराश होई,मला खूप रडू यायचं आणि अनामिक भीतीने जीवाला खूप हुरहूर लागे, त्यावेळी मीनाची आई मला भावनिक आणि मानसिक आधार देत होती.


      आपला चिंटू अगदी चार-पाच वर्षांचा होता तेव्हा... रात्री झोपताना त्याला मीच लागेल. पण माझ्यामुळे तुला आणि चिंटूला कोरोना होऊ नये म्हणून, मीनाताईने तुम्हा दोघांना स्वतःजवळ ठेवून घेतले. तुझ्याशी आणि चिंटूशी ती खेळायची, रात्री झोपताना तुम्हाला गाणं म्हणायची, गोष्टी सांगायची, तुला आणि चिंटूला छान छान खाऊ करून द्यायची. आपल्या चिंटूची आंघोळ, सु-शी तिनेच पाहिले होते त्या काळात!



              मीनाताई ने आपल्या चिंटूची आणि तुझी खूप काळजी घेतली तेव्हा. तुमच्यावर अगदी सख्ख्या भावंडां प्रमाणे प्रेम केलं. अगदी द्रोपदी-कृष्णासारखं.


मीरा - "द्रोपदी-कृष्णा सारखं! आई ती चिंधीची गोष्ट सांग ना!"


रमा - " अग मीरा आज सणाचा दिवस. आज नाही पुन्हा कधीतरी सांगेन हो!"


मीना - " काकू सांगाना ती चिंधीची गोष्ट. तुम्ही खूप छान सांगता!" दरवाजातून घरात येताना मीरा बोलली.


 रमा -" अग बाई मीना! तू कधी आलीस? "


 मीना -" जेव्हा तुम्ही माझं कौतुक मीराला सांगत होत्या. पण आता विषय टाळू नका बरं! श्रीकृष्ण-द्रोपदीची चिंधीची गोष्ट सांगा!


 रमा -" बरं बाई सांगते…….

          तिन्ही लोकात ब्रह्म विणा खांद्यावर टाकून फिरणारे नारद एकदा भक्ती प्रेमाची गाणी म्हणत कृष्णाकडे आले. खरे तर नारद हे, तिन्ही लोकात म्हणजे, स्वर्ग-पृथ्वी-पाताळ, सुर-नर-असुर अशा तीनही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना अनेक अनुभव येत. अनेक लोकांना जवळून पाहायची संधी त्यांना मिळे.देव-मनुष्य-दानव सगळ्यांची वृत्ती आणि प्रवृत्ती ते अगदी जवळून अनुभवत.नारदमुनी स्वतः मात्र अगदी निस्पृह आणि जगत कल्याणासाठी झटणारे. 


                तर यावेळी काय झाले श्री कृष्ण भगवान पांडवांकडे पाहुणे आले होते. नारद मुनींना बघून कृष्णाने त्यांना वंदन केले आणि क्षेमकुशल विचारले त्यावर नारद म्हणाले.


नारदमुनी -" देवा आज मी तुमच्यावर दावा करण्यासाठी आलो आहे. मी त्रिलोकात तुमची स्तुती करत फिरतो. कृष्ण म्हणजे समदृष्टी, नि:पक्षपाती असे सगळ्यांना सांगतो. पण एकाने मला हटकले आणि म्हंटले- \"नारदा पुरे कर तुझे श्रीकृष्ण पुराण! तो कान्हा स्वतः च्या सख्ख्या बहिणीला- सुभद्रेला सोडून, मानलेल्या बहीणवर- द्रोपदी वर जास्त प्रेम करतो बरं का! कसली समदृष्टी? नी कसले काय?\"

                       घ्या आता मी काय बोलणार? माझ्या मनातला संशय दूर करून मला खरे काय ते सांगा!"


 श्रीकृष्ण -" नारदा मी अगदी निष्क्रिय आहे. जो मला स्वतःकडे ओढेल मी त्याचा होतो. तुम्ही तुमच्या मनाची दारे उघडून ठेवा, माझा वास तिथेच आहे तुमच्या हृदयात. पण जर तुम्ही तुमच्या मनाची द्वारे बंद केली तर मी तुमच्या हृदयात कुठून सामावणार? माझ्यावर द्रोपदी ने अधिक प्रेम केले म्हणून मी तिचा झालो. सुभद्रेचा प्रेमाचा दोरा कच्चा असेल म्हणून बाकीच्यांनी अशी वदंता उठवली की मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं".



                  "नारदा तू आता एक काम कर सुभद्रकडे धावत-पळत जा. तिला सांग श्रीकृष्णाचं बोट कापलं आहे. एक चिंधी दे बांधायला. तिने जर दिली तर घेऊन ये. नाही दिली तर द्रौपदी कडे जा. तिलाही तेच सांग"



            नारद मुनी गेले सुभद्रेकडे. सुभद्रा त्यांना म्हणाली


सुभद्रा -" ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता. कैलासावर, ब्रम्हालोकी, पाताळात कुठे काय पाहिलंस? कुठे काय दिसलं? तुझं आपलं बरं. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश, नवीन प्रसंग. आज नंदनवन, उद्या त्रिभुवन, परवा कैलास. अरे एवढी घाई काय आहे? "


नारद -" सुभद्रा ताई बसायला वेळ नाही आहे. श्री कृष्णाचे बोट कापले आहे. भळाभळा रक्त वाहते आहे. बोटाला बांधायला चिंधी असेल तर द्या!"


सुभद्रा -" नारदा आता चिंधी कुठे रे शोधू? हा पितांबर यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. हा शालू कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शप्पथ. चिंधी नाही रे!  


नारद -" बरे तर मी द्रोपदी ताईंकडे जातो." असे म्हणून नारद निघाले.


             द्रौपदी आपल्या महाली कृष्ण कृष्ण म्हणत कृष्णाच्या मुर्ती करिता हार बनवत होती. नारदाला समोर बघून म्हणाली,

द्रौपदी -"ये नारदा हा हार आता तुलाच घालते.माझा कृष्ण माझ्या घरी आलाय म्हणून ईथे आलास ना! नाहीतर तुला कुठे वेळ आहे आमच्या घरी यायला?


           नारद घाबरा घाबरा आवाज करून द्रोपदीला सांगू लागले -


नारद -" द्रोपदी अगं गप्पा मारायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे बरं पटकन. "


द्रौपदी -" अग बाई! कृष्णाचे बोट कापले? किती लागलं रे? खूप रक्त निघत आहे का? अरेरे!"


                   माधवाचं बोट कापलं म्हणून, द्रोपदीने नेसलेल्या पैठणीचा पदर कापून कृष्णाच्या बोटाला बांधायला चिंधी दिली.


रमा -" सुभद्रेने कपड्यांची किंमत केली तर, द्रौपदीने तिच्या आणि माधवाच्या नात्याची. म्हणूनच आयुष्यात काही नाती असतात की, ती अगदी जीवापाड जपावी लागतात. जशी मीना ताईने आणि तिच्या आईने जपलीत."


              एवढे बोलून रमाने कृष्ण-द्रोपदीची गोष्ट संपवली.मीना आणि मीरा या दोघींनी चिंटू ला राखी बांधली.






*********************************************


संदर्भ - श्यामची आई, लेखक सानेगुरुजी 



 फोटो -साभार गुगल 



 वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत.


धन्यवाद!


 जय हिंद


**********************************************