प्रेमा तुझा रंग कसा ? अंतिम भाग

Life's Different Shades Of Love

प्रेमा तुझा रंग कसा? अंतिम भाग




           मागच्या भागात आपण पाहिले की रवी आणि वसूचं लग्न होतं. रवी या नात्यांमध्ये खूप समजूतदारपणे वागतो, तो वसुंधरेला भावनिक आणि मानसिकरित्या तयार होण्यासाठी आणि त्यांच्या नात्याला स्वीकारण्यासाठी तिला हवा तेवढा वेळ घे असं सांगतो.


           रितीनुसार आता वसुंधरा देशपांडेंची अवनी सबनीस झाली होती. अवनीच्या वडिलांना देवाज्ञा झाली होती. तर रवीच्या आईला पक्षाघात . अवनी आणि रवीच्या संसारवेलीवर किरण , शलाक  आणि रश्मी नावाची सुंदर फुलं उमलली होती . मधल्या काळात घटना अशा घडल्या की रवीचा अचानक राजकारणात प्रवेश झाला. मुळातच रवीचं स्वच्छ चारित्र्य आणि कामाविषयी समर्पण , याशिवाय रवीच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे आणि कार्यशैलीमुळे तो त्याच्या पक्षातील अनेक महत्त्वपूर्ण पदं भूषवू लागला होता. एक महत्त्वाचा राजकीय नेता असल्याने रवी अवनीला आणि कुटुंबाला हवा तसा वेळ देऊ शकत नव्हता आणि त्याचं शल्य रवीला मनात बोचत होतं. त्यातच कॉलेज रियुनियनचा कार्यक्रम ठरला आणि रवी अवनीला स्वतःसोबत कॉलेज रियुनियन करता पुण्याला घेऊन गेला . तिथे अवनीची भेट परत आकाशशी झाली . आता बघूया अवनी , आकाश आणि रवी यांच्या नात्याचा काय शेवट होतो ते.

         


*********************************************************


        रवी आपल्या खोलीमध्ये आरशासमोर उभा राहून तयार होत होता. जॅकेटच्या खिशामध्ये रुमाल व्यवस्थित ठेवताना त्याला , आरशात अवनी खोलीत येताना दिसली. तिचा चेहरा जरा उतरलेला होता, म्हणून रवीनं

 तिला विचारलं- अवनी काय झालं? बरं नाही का वाटत तुला?



अवनी - "काही नाही रे! जरा डोकं दुखतय , नेहमीचाच मायग्रेनचा त्रास."

   

      रवी तिच्या जवळ बेडवर बसला आणि विचारलं -"काय झालं अवनी? तू औषध नाही घेत आहेस का वेळेवर?"



अवनी - "घेते आहे रे ! पण माहित नाही या आठवड्यात जरा जास्तच त्रास होतो आहे."


रवी - "अवनी मी तुला कितीवेळा सांगितलं स्वतःकडे लक्ष देत जा, स्वतःची काळजी घे."

 अवनीने फक्त एक उसासा टाकला.




रवी - "अवनी तुला माहिती आहे एवढ्यात मी तुझ्याकडे आणि आपल्या घराकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीये. अग निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आज ही माझी रॅली आहे. तू प्लीज वेळेवर औषध घे."



अवनी - " मला माहिती होतं रवी तू असंच काहीतरी बोलणार. एवढ्या वर्षाच्या आपल्या संसारात हे वाक्य किमान हजार वेळा तरी तू बोलला आहेस. म्हणूनच मी तुला माझ्या तब्येतीचं काही सांगत नाही."


            रवीने अवनीचा हात आपल्या हातात घेतला आणि कुरवाळला.


रवी - "मला माफ कर . पण मी काय करू? या निवडणुकांमुळे मी वैतागलोय . माझं प्रोफेशनच तसं आहे."




अवनी - "असू दे रे , माझी त्याबद्दल काही तक्रार नाही."

          

           रवीने अवनीच्या हाताला कुरवाळला आणि हळूच तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले. अवनीने आपलं डोकं रवीच्या खांद्यावर ठेवलं.



रवी - "अवनी काळजी घे ग! माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. तुझा उदास चेहरा मी पाहू शकत नाही. बर मी काय म्हणतो, आपल्या कॉलेजचा रियुनियन चा कार्यक्रम 15 दिवसांनी आहे .जाऊया का?"



अवनी - "नको रे मला आताशा कुठे जावसं वाटत नाही."


रवी - "अवनी जाऊया ना! मुलांना बघायला आहेत घरी सगळेजण ,आणि तुलाही जरा चेंज होईल . जुने मित्र-मैत्रिणी भेटले की फ्रेश वाटतं."



अवनी - "नको रे ,मी तर तो आमच्या मैत्रिणींचा ग्रुप ही लिव केला आहे. तेच ते विषय. मुलांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांचं आजारपण, आणि नवऱ्याची व्यथा .या तीन विषयांशिवाय चौथ्या विषयावर बोलत नाही कोणी."


रवी - "म्हणूनच म्हणतो ,चल जाऊ या कार्यक्रमाला! मी तसं कळवतो सगळ्यांना."



अवनी - "नको न रवी ,माझी इच्छा नाहीये."


रवी - "आता मी तुझं काहीएक ऐकणार नाही आहे. दोन दिवसांचा कार्यक्रम आहे पुण्याला रिसॉर्टवर, आणि आपण दोघे जाणार आहोत . मला रॅलीला जायला वेळ होतोय, रात्री लवकर यायचा प्रयत्न करेन."

           

             आणि रवी त्याच्या निवडणुकांच्या रॅली करता निघून गेला.


            अवनी मग दहा - बारा वर्षे मागे भूतकाळात गेली. तिला तिचा तो ग्रॅज्युएशनचा काळ आठवला आणि त्यातले सगळे मित्र ,मैत्रिणी आणि आकाशही.


         रवीची आणि आकाश ची मैत्री जमली. रवी त्याच शहरात राहणारा, उच्च मध्यमवर्गीय घरातलं ज्येष्ठ अपत्य, पण आजपासून तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मध्यमवर्गीयांकडे जसं वातावरण असतं ना अगदी तसंच वातावरण त्याच्याही घरी होतं. हुशार आणि आर्थिक स्थिती चांगली म्हणून रवीचे त्याच्या घरी फाजील लाड झाले नाही. त्याचेच काय पण त्याच्या इतर दोन लहान भावंडांचे फालतू लाड झाले नाही . वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, मोठ्यांचा आदर हे रवीच्या घरचं ब्रीद होतं.

      

      आर्किटेकला असताना रवी आणि आकाश यांची छान मैत्री जमली आणि रंगलीसुद्धा. पण मुळातच रवीचा स्वभाव वक्तशीर असल्याने तो त्या मित्रांच्या टोळक्यात कधी रमलाच नाही. त्यांच्याच काॅलेजमधे होती अवनी! पूर्वीची वसुंधरा , ती पण अभ्यासात खुप हुशार ,लाडाकोडात वाढलेली, गर्भ श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. वसुंधरा आणि रवी यांची पण छान मैत्री होती.


            आकाश आणि वसुंधराच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नव्हतं. पण जेव्हा लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र आकाशने घरातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांना जास्त महत्त्व दिलं आणि वसुंधरा, आकाशपासून दुरावली. त्यातच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने , केवळ वडिलांची इच्छा आणि आग्रहाखातर वसुंधरा देशपांडेची ती अवनी सबनीस झाली होती.


    


         तेवढ्यात घरातल्या कामवाल्या बाईने अवनीला आवाज दिला आणि सासूबाईंच्या औषधाची वेळ झाली ते सांगितलं. अवनीच्या सासूबाई कुठलंही औषध स्वतः घेत नसत त्यांना प्रत्येक वेळी अवनीच लागे. अवनीची विचारशृंखला तुटली, आणि ती आपल्या रोजच्या व्यवहारांना लागली. बघता बघता पंधरा दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही.


           कॉलेज रियुनियनच्या त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रवीनं , अवनीला आग्रहाने बॅग पॅक करायला सांगितली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं म्हणून , अवनीची आई-मुलांना सांभाळायला- अवनीच्या सासूबाईकडे लक्ष ठेवायला-अवनी कडे रात्रीच आली होती. घरून निघताना अवनीला जरा टेन्शन होतं कारण अवनीची मुलं फार हुड होती आणि सासूबाईंना प्रत्येक कामात अवनीच लागे.


            रात्रभर प्रवास करून अवनी आणि रवी पुण्याच्या त्या रिसॉर्टवर पोहोचले, जिथे आकाशनं कॉलेज रियुनियन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.


            रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ सायलीच्या वेलीची छान कमान होती. रियुनियन करता येणाऱ्या सगळ्यांचं पारंपरिक पद्धतीने औक्षण करून खस - हिना चं अत्तर लावून , गुलाब पाणी शिंपडून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीमध्ये गेल्यावर सगळ्यांना सकाळी दहा वाजता पारंपारिक वेशभूषा करून येण्यासाठी सगळ्यांना सांगण्यात आलं. सागर - सरिता पंजाबी वेशभूषेत आले , तर तरु-लता यांनी गुजराती पेहराव घातला होता , निशा - रजनीश बंगाली बनून आले होते , यामिनी आणि क्षितिज यांनी कश्मीरी वेशभूषा केली होती , तर रवी-अवनी हे महाराष्ट्रीयन पेहरावात आले होते. महाराष्ट्रीयन वेशभूषे मध्ये रवी आणि अवनी चा जोडा अगदी राजेशाही दिसत होता. आकाश मात्र महाराष्ट्रीयन शेतकऱ्याच्या वेशभूषेत होता.


              सगळेजण फार वर्षानंतर एकमेकांना भेटत होते त्यामुळे गप्पा-गोष्टी , जुन्या आठवणी , एकमेकांची थट्टा मस्करी आणि विनोदाला नुसतं उधाण आलं होतं . दुपारी अगदी पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत होता . पुरणाची पोळी , कटाची आमटी , बासुंदी , श्रीखंड- पुरी , कोशिंबिरी , ओल्या डाळींची , शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी. कुरडई - पापड , मसाले भात , भरल्या वांग्याची भाजी , कैरीचं लोणचं , वडे - भजे असा सगळा साग्रसंगीत बेत होता. इतकं छान , रुचकर आणि चविष्ट पारंपरिक भोजन झाल्यावर सगळेजण वामकुक्षी घ्यायला आपापल्या खोल्यांमधे परतले.


               संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम होता.

        रवीनं - " सुर तेची छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे." हे गाणं म्हंटलं.


अवनी - "सांग तू माझा होशील का?"हे गाणं गायली.


आकाश - "कितीदा नव्याने तुला आठवावे , डोळ्यातले पाणी नव्याने वहावे." हे गाणं म्हंटलं.


           आकाश त्याचं गाणं इतकं समरसून आणि भाऊक होऊन म्हणत होता की , सगळेजण अगदी स्तब्ध झाले. गाणं संपल्यानंतर टाळ्या वाजवण्याचे भान सुद्धा कोणाला राहील नाही.


         कार्यक्रम झाल्यावर काहीजण शेकोटीभोवती गप्पा मारत बसले होते. तर काही मंद संगीतावर साथीदारासह डान्स करत होते. आकाश , अवनी आणि रवीच्या गप्पा रंगल्या होत्या,पण रवीला एक महत्त्वाचा फोन आल्याने तो काही कामानिमित्त बाहेर गेला . 

   

             अवनी आकाशच्या कार्यक्रम नियोजनाचं तोंड भरून कौतुक करते.


अवनी - " कार्यक्रमाचे आयोजन खूप छान केलंस."


आकाश - " धन्यवाद वसु."


अवनी -"आकाश मी आता वसुंधरा देशपांडे नसुन , अवनी रवी सबनीस झाले आहे."


आकाश - " अच्छा , आय एम सॉरी वसु . चुकलंच सौ. अवनी रवी सबनीस."


             आकाशच्या बोलण्यावरून आणि आवाजाच्या लेहज्या त्यावरून कळत होतं की , तो किती दुखावला गेला आहे. अवनीने विषय बदलायचा म्हणून त्याला विचारलं-


अवनी - " तू एकटाच ? लग्न वगैरे……"


आकाश - "नाही , नाही केले लग्न."



अवनी - "का नाही केलं लग्न ? कुणी भेटली नाही ?"


आकाश -"होती एक… पण…"


अवनी - "मग?"


आकाश - " तिचं दुसऱ्याशी लग्न झालं. आता आयुष्यात प्रेम नाही उरलं , तर लग्न कोणासोबत करणार? प्रेमभंगाचा दारुण अनुभव घेतला मी. आता हिम्मत नाही होत परत एखाद्या नात्यात गुंतण्याची."


            आकाशच्या या बोलण्याने अवनी अगदी शांत झाली . तिचा चेहरा म्लान झाला आणि डोळ्यात अश्रू दाटून आले, पण अवनीने ते अश्रु गालावर ओघळू दिले नाही , त्यांना डोळ्यांच्या कडांवरच अडवले.


आकाश - " सगळा दोष माझ्या एकट्याचाच होता का ? माझी चूकही सांगितली नाहीस आणि निघून गेली तू माझ्या आयुष्यातून . माझं अख्खं जीवन आता वैराण वाळवंट झालं आहे. माणसाला जगण्यासाठी नाती आणि ध्येय दोन्ही असावे लागतात आणि माझ्या आयुष्यात यापैकी आता काहीच नाही."


            अवनीला खरंतर खूप गहिवरून आलं पण तिने स्वतःला सावरलं.


अवनी - "आपल्या आयुष्यात जे झालं त्याला जेवढी मी जबाबदार आहे तेवढाच तुही. तू तुझ्या कुटुंबात आणि धेय्या मागे इतका वेडा झाला होतास की , तुला माझाही विसर पडला.


          आपल्या ग्रुप मधले सागर-सरिता , निशा- रजनीश , तरु-लता छान मजा मस्ती करत होते. याच सगळ्या जणी तू माझ्यावर जीव तोडून प्रेम करायचा, माझ्या रुसल्यावर माझी समजूत काढण्यासाठी तू जिवाचा किती आटापिटा करायचा हे मला वारंवार पटवून द्यायच्या , पण ते सगळं आता बंद झालं होतं. त्या सगळ्यांना एकमेकांची साथ होती आणि मी मात्र अगदी एकटी पडली होती.


          त्यातच माझ्या बाबांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. तेव्हाही मी तुला बरेचदा संपर्क साधण्यासाठी फोन केला पण तु मला सतत टाळतच राहिलास . पण रविने मात्र मला आणि माझ्या आईला खूप मानसिक आणि भावनिक आधार दिला. त्याच्यामुळेच माझ्या वडिलांना योग्य वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांचे प्राण वाचले. आणि बाबांची इच्छा म्हणून मला रविशी इच्छा नसूनही लग्न करावं लागलं.



          पण खरं तर रवीचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. लग्नानंतर त्याने मला इतकं छान समजून आणि सांभाळून घेतलं की आता हाच जन्म नाही तर पुढला प्रत्येक जन्म मला रवीच माझा जीवनसाथी म्हणून हवा आहे.

      

               आकाश एकमेकांवर भाळण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो, पण साथीदाराला सांभाळण्यासाठी अख्ख आयुष्य द्यावं लागतं . आता रवीच माझं भविष्य आणि भवितव्य सुद्धा आहे. मी आता कर्तव्याने आणि निष्ठेने ही केवळ रवीलाच बांधिल आहे .


              तेवढ्यात रवी परतला आणि अवनीला घरी चलण्यासाठी घाई करू लागला,त्याच्या आईची तब्येत जास्त बिघडली होती, अवनी तात्काळ सामानाची बांधाबांध करून रवीसह तिच्या भाव विश्वात निघून गेली. आकाश मात्र त्या दोघांच्या पाठमोर्‍या आकृतीं कडे एकटक बघत राहिला आणि नकळत अश्रू त्याच्या डोळ्यात साचून आले.


*********************************************


            कथेच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आकाशचे डोळे पाण्याने डबडबले आणि धरणीवर दवबिंदू सांडले. आकाश स्वतःच्या प्रेयसीची - धरणीची आठवण - म्हणून रडू लागला. कधी त्याने वसुंधरे साठी धुक्याची सुंदर गर्भरेशमी शाल पाठवली . तर कधी दहीवराचा मोत्याचा कंठा. कधी इंद्रधनूची पैठणी तर कधी शरदाचं रुपेरी चांदणं.


               पण वसुंधरेची निष्ठा आता रवि शी जोडली गेली होती , रोज सकाळ संध्याकाळ त्यांचं मीलन होत होतं आणि आकाश मात्र जन्मभर झुरतं होता.



        वाचकहो कथा कशी वाटली तुमचे अभिप्राय नक्की नोंदवा.



जय हिंद.

🎭 Series Post

View all