प्रेमा तुझा रंग कसा ??? भाग 1

Lifes Different Shades Of Love

प्रेमा तुझा रंग कसा? भाग 1


   एक लफ्जे मोहब्बत का अदनासा फसाना है

   सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना है

   ये इश्क नही आसाँ बस इतना समझ लीजिये

   एक आग का दरिया है और डुब के जाना है


ज्यांनं आयुष्यात कधीही प्रेम केलं नाही असा माणूस मिळणं विरळाच. खरं तर आपण सर्वजण कधी ना कधी कुठे ना कुठे कोणावर तरी भाळलो असतो. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर त्या व्यक्तीसह कल्पनेत विराजमान झालेलो असतो. आयुष्याच्या वाटेवर ती त्या व्यक्तीची सोबत आपल्याला निरंतर हवी असते. आपण आपल्या प्रत्येक विश्वासावर हृदयाच्या ठोक्यावर त्या व्यक्तीचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं असतं

     

       ऐसी कोई जवानी नही जिसकी कोई कहानी नही.खरं ना?


             दुर्गाबाई आपल्या ऋतुचक्र या पुस्तकात म्हणतात पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीच खरं प्रेम आकाशावर पण दैवयोगाने लग्न होतं सूर्याबरोबर.


           आकाश रडते ते पावसाच्या रूपाने. त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मिलन सांजसकाळी होते. त्या वेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहीवराचे अश्रू गाळते.



*********************************************


आई - "वसू काय झालं गं ? तुझा चेहरा इतका रडवेला का झाला आहे?"


वसु - "आई आज माझं आणि आकाश च भांडण झालं."


आई - "बर मग?"


वसु - "सगळे मुलं ना असेच असतात! खोटारडे!! बदमाश!!!"


आई - "आता नीट सांगशील का नक्की काय झालंय ते ? की नुसती चिडचिड करशील?"


वसू- "आकाश ला माझी काहीच काळजी नाही. त्याला पर्वा फक्त त्याच्या कुटुंबाची आणि मित्रमंडळींची."


आई - "वसु मी तुला आधीही खूप वेळा सांगितलं अजूनही समजावते, अगं प्रेम करून त्याला पूर्णत्व देणं मोठं कठीण काम! प्रत्येकालाच जमेल असं नाही. प्रेम म्हणजे त्याग, दुसऱ्याची काळजी, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार स्वतःच्या भावनांच्या आधी करावा लागतो प्रेमात. प्रेम म्हणजे एक प्रकारची साधनाच! प्रेमात घिसडघाई काय कामाची? आणि आकाश च म्हणशील तर तो मला कधीच प्रेमाबाबत गंभीर वाटलाच नाही."


वसू- "आई प्लीज असं नको ना बोलू."


आई - "बाळा तुझ्यापेक्षा आयुष्याचे कितीतरी पावसाळे जास्त पाहिले आहेत मी . तुझी काळजी वाटते म्हणूनच हे बोलते. अगं जसं कॉलेजमध्ये गेल्यावर प्रॅक्टिकल करावं लागतं ,प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो, तसाच आकाश प्रेमाबाबत विचार करतो."


वसू- "म्हणजे मी नाही समजले!"


आई- "अगं इतकं साधं , सरळ कसं तुझ्या लक्षात येत नाही? आकाश साठी प्रेम म्हणजे कॉलेजात गेल्यावर करावी लागणारी इतर चार गोष्टीं सारखीच गोष्ट. तो मला तुझ्या बाबत फारसा गंभीर वाटत नाही. अगं तुझ्या बाबतचं काय? तो स्वतः बाबत आणि आयुष्य बाबतही मला कधीच गंभीर वाटलाच नाही."


वसु- "खरंच ? मग मी आता काय करू?"


आई - "तू रवीचा विचार का नाही करत?"


वसु - "अगं तो खूप गंभीर स्वभावाचा आहे आणि काटेकोर पण, फारच शिस्तप्रिय आणि वक्तशीर. कॉलेजमध्ये तर त्याच्याजवळ माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. सतत तो त्याच्या अभ्यास, सबमिशन, प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल आणि परीक्षा यातच  गुंग असतो. माहित नाही त्याला माझ्याबद्दल काय वाटतं."


आई - "वेडी आहेस वसू तू. तुला आठवत तुझ्या वाढदिवसाला जेव्हा तो घरी आला होता तेव्हा त्याने किती सुंदर ब्रेसलेट दिलं होतं तुला. आणि घरात आल्यापासून घरी परत जाईपर्यंत तो तुलाच बघत होता. अगदी पापणीही लावत नव्हती त्याची."


वसू - "अय्या ! खरंच? पण मग माझ्या कसं लक्षात आलं नाही हे?"


आई- "वसु मी काय म्हणते तू जरा रवीचा विचार कर ना! आता लग्नाचा विचार व्हायला हवा वसू प्रेमाचा नाही!"


              वसुंधरा एक उत्साही, सुंदर, आनंदाचं सळसळत व्यक्तिमत्व लाभलेली नवतरुणी, रुपयौवना. जिच्या सौंदर्याला उपमाच नाही अशी सौंदर्यवती, ललना. गर्भ श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक मुलगी . अभ्यासात खूप हुशार.

                 आकाश आणि रवी दोघेही तिचे सीनियर. पैकी आकाश बडबडा, रसिक मनाचा, कविता-चारोळ्या करणारा. गझलांच्या राज्यातला बेताज बादशाह. खरंतर आकाशला पेंटिंग मध्येच आवड आणि गती होती आणि त्याला करिअरही त्यातच करायचं होतं. पण वडीलांसाठी म्हणून त्याने आर्किटेक्टला प्रवेश घेतला. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला वसुंधराशी त्याची ओळख झाली आणि तो तिच्यात गुंतत गेला.


         वसुंधरा आणि रवी यांची आधीपासूनच ओळख होती पण अगदी जुजबी. नाही म्हणायला वसुंधरा चे बाबा आणि रवी चे वडील हे नात्याने दूरचे एकमेकांचे आते-मामे भाऊ. त्यामुळे वसुंधराचं कार्य - प्रसंगाला रवी कडे येणं-जाणं होतंच. पण मधल्या काळात ते येणं जाणं काहीसं बंद झालं होतं.


         वसुंधरेचे आधीच ठरलेलं होतं आर्किटेक्ट लाच प्रवेश घ्यायचा. आणि रवीच्या वडिलांचा बिल्डींग अंड कन्स्टृक्शनचा व्यवसाय असल्यामुळे रवीने पण आर्किटेकलाच प्रवेश घेतला.


            आकाश च्या उमद्या , विनोदी, उत्साही व्यक्तिमत्त्वाची कॉलेज मधल्या सगळ्या मुलींना भुल पडली नसती तरच नवल. पण आकाशने प्रेमाची कबुली दिली वसुंधरेला.


             कॉलेजचा मोस्ट फेवरेट हॅंडसम हंक मिळाल्यावर वसुंधरेला काही सुचलंच नाही आणि तिने आकाशच्या प्रेमाचा स्वीकार केला. आर्किटेक्ट पूर्ण झाल्यावर वसुंधरा चे वडील तिच्यासाठी वरसंशोधन करत होते.


            आईने वसुला वडीलांची इच्छा सांगितली आणि म्हणूनच वसुंधरा ने आकाश कडे लग्नाचा विषय काढला. पण आकाशला एवढ्यात कुठलच बंधन नको होतं . त्याला त्याच बॅचलर लाइफ एन्जॉय करायचं होतं. शिवाय कुटुंबातल्या भावंडांच्या आणि इतर जबाबदारही आकाशवर होत्याच.


              आकाश त्याच्या घरातला थोरला. तारका आणि नक्षत्रा नावाच्या दोन जुळ्या लहान बहीण. ध्रुव आणि सनी नावाचे दोन धाकटे भाऊ. आकाश चे वडील पोस्टातून नुकतेच निवृत्त झाले होते. तर त्याची आई गृहिणी होती.


             आकाशला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की तारका आणि नक्षत्राचे विवाह झाल्याशिवाय त्याच्या लग्नाचा घरात कोणी विचारही करणार नाही. म्हणूनच तो वसुंधरेला टाळू लागला.


            आकाश ला एका नवीन फॉर्ममध्ये नोकरीही मिळाली होती. नवी नोकरी, नवी जबाबदारी , बहिणींच्या विवाहाची आणि भावांच्या शिक्षणाची तजवीज करण्यातच आकाश पुरता गुरफटून गेला होता.


           थोडाफार मोकळा वेळ मिळाला तर आकाश तो वेळ मित्रांनो बरोबरच घालवत होता. आकाशचं वसुंधरेला वारंवार टाळणं , वसु च्या अगदी ची जीव्हारी लागलं होतं. वसूचा स्वाभिमान दुखावला कि , तीच्यातल्या सौंदर्यवतिचा अहंकार हे सांगणं जरी कठीण असलं तरी आकाशचं तिला वारंवार दुर्लक्षित करणं वसुला प्रचंड भावनिक - मानसिक त्रास देत होतं. म्हणूनच एकदा न राहवून वसूने आकाशला फोन केला.


वसू - "हॅलो."


आकाश - "हां बोल."


वसू - "अरे मी वसू बोलते आहे."


आकाश - "हो ग बाई ! मला माहिती आहे. लवकर बोल. मला एक महत्त्वाचं काम आहे."


वसू - "आकाश किती बदलला रे तू! आधी केवळ फोन वरच्या नुसत्या माझ्या हॅलो ने सुद्धा तुला माझा मूड कसा आहे हे कळायचं आणि आता………."


आकाश - "वसू तेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो. केवळ मजा , मस्ती आणि अभ्यास एवढंच आपलं विश्व होतं. पण आता माझ्यावर घरच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. पुढच्या महिन्यात नक्षत्रा चा साखरपुडा आहे. त्याही कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. तेव्हा लवकर काय ते सांग? दहा मिनिटांनी माझं प्रेझेंटेशन आहे."


वसू- "बेस्ट ऑफ लक आकाश तुझ्या प्रेझेंटेशन साठी. आपण नंतर बोलु .  सद्ध्या तुझ्याजवळ वेळ नाही आहे माझ्याशी बोलायला आणि माझं म्हणणं ऐकून घ्यायला. बाय आकाश."



                  आकाश त्याच्यावरच्या जबाबदाऱ्यांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेला होता. इच्छा असूनही तो वसूला  वेळ देऊ शकत नव्हता. कामाच्या व्यस्ततेमुळे एक-दोनदा वसू चे फोन तो उचलू शकला नाही आणि कॉल बॅक ही करू शकला नाही. मधल्या काळात नक्षत्राचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. आणि त्याच कौटुंबिक कार्यक्रमात तारके करिता एक चांगलं स्थळ चालून आलं. आकाश च्या आई-वडिलांना कित्ती आनंद झाला होता! दोन महिन्यांन् नंतरचा - अगदी चार दिवसांच्या फरकाचा- दोघींच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला.


              या सगळ्या घाईगरडबडीत, कार्यक्रमांच्या धावपळीत वसू आकाश यांच्यात खूप दुरावा निर्माण झाला. वसू जेव्हा फोन करायची आकाश तिला टाळायचा. आधी बहीणींचे साक्षगंध आणि नंतर त्यांच्या लग्नाची तयारी, शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्या त्यामुळे खरंतर आकाशला सवडच नव्हती वसुशी बोलायची. आधी वसूच्या सतत सोबत असणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, लहान मोठ्या फुटकळ भांडणांमध्ये वारंवार वसू ची मनधरणी करणारा आकाश , आता कर्तव्याला अधिक प्राधान्य देत होता. त्यामुळे वसू प्रचंड चिडली होती.

        

         बहिणींची लग्न होणं किती महत्वाचं आहे आणि भावांचं शिक्षण पूर्ण करणं ही त्याची जबाबदारी आहे हे आकाशने एक-दोनदा वसुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही. पण मुळातच श्रीमंतीत आणि लाडात वाढलेल्या वसुला ह्या गोष्टी समजणं जरा अवघडच होतं. तिच्या मताप्रमाणे आकाश च्या आयुष्यात केवळ आणि केवळ तिलाच प्राथमिकता हवी होती, बाकी इतर गोष्टींना आकाशने दुर्लक्षित करावं अशी तिची इच्छा होती.


            आकाश च्या बहिणींची लग्न आणि त्याच्या भावांचे शिक्षण ही सर्वस्वी आकाश च्या आई-वडिलांची जबाबदारी आहे असं वसुचं स्पष्ट मत होतं.


           त्यामुळेच आकाशचं स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देणं वसुला अजिबात खपलं नाही. आणि हळूहळू वसू आणि आकाश यांच्या नात्यात खूप दुरावा निर्माण झाला. वसू आता आकाशला फोन करत नव्हती. तो फोनवर व्यवस्थित बोलला नाही म्हणून दिवस दिवस रडत हि नव्हती. आकाशला भेटण्याचे , त्याच्यासोबत वेळ घालवण्याचे, आणि कधीकधी त्याच्यावर रागेभरण्याचे वसूने जमान्या पूर्वीच बंद केले होते.


*********************************************


           पुढल्या भागात बघूया वसू आणि आकाश त्यांच्या नात्याला लग्नबंधनात बांधू शकतात की नाही.

🎭 Series Post

View all