Feb 25, 2024
नारीवादी

हरवलेलं माहेर अंतीम भाग

Read Later
हरवलेलं माहेर अंतीम भाग


मीरा , ज्या वाड्यावर एकही दिवस विना पाहुण्याचा गेला नाही, लाकडी जिन्या खालची बाळंतिणीची खोली सहा महिन्यापेक्षा जास्त कधी रिकामी राहिली नाही, जो दिवाणखाना रोज रात्री काचेच्या हिरव्या , निळ्या, पिवळ्या हंड्या झुंबरांनी प्रकाशित व्हायचा आणि ज्या दिवाणखान्यातल्या सागवानी लाकडी बंगळी वर बसून जिथं माझ्या वडील- चुलते- काकांनी मसलती केल्या, ज्या माजघरात आत्या- मावश्या- आज्या आणि काकींच्या पैंजणांचा, हिरव्या चुड्यांचा , सासरच्या कटू अनुभवांच्या आणि नवऱ्याच्या प्रेमाच्या , गुजगोष्टी झाल्या तर कधी लहान-मोठ्या कप-बशी तील वादळांच्या , कुरबुरींचा आवाज घुमला, ज्या स्वयंपाक घरात सतत चूल पेटी असायची. ओसरी वरच्या फर्माईशी जिथे पूर्ण व्हायच्या , ज्या देवघरात अनेक पूजा-अर्चा,व्रत-उद्यापन,होम-हवनं झाली, वाड्याच्या चौकात जिथं घरातल्या लेकी - सुनांनी अनेक मंगळागौरीची जागरण केली , कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात भुलाबाईची गाणी म्हटली, वाड्याच्या पडवीत पणजी आजीनं उन्हाळ्याच्या वाळवणाची रखण केली, घरातल्या सगळ्या कर्त्या पुरुषांच्या कर्तृत्वाने आणि गृहलक्ष्मींच्या दातृत्वानं भांडारघर धनधान्याने ओसंडून भरून वाहायचं ते सारंच काळाच्या पडद्याआड गडप झालं.

अग सासर कितीही श्रीमंत असू देत नवरा कितीही प्रेम असू दे शेवटी माहेर ते माहेरचं असतं हो ना ?


मीरा आता फक्त आठवणी उरल्या आहेत गं. माहेरच्या आठवणींच्या चार भींती नाही. मायेचं , आधाराचं छप्पर नाही. ते अंगण जिथे आम्ही सगळी चुलत भावंड एकत्र भातुकली खेळलो. उन्हाळ्याच्या रात्री चांदण्यांच्या टिपूर आकाशाखाली भावंडांसोबत दंगामस्ती केली, दिवाळी - दसऱ्याला आतीषबाजी केली त्या सगळ्या आठवणी आता केवळ मनात साठवून राहिल्या आहेत.

माहेरची ऊब आणि आईच्या पदराचा विसावा - यासारखं हक्काचं आणि प्रेमाचे ठिकाण विवाहित स्त्री साठी या जगाच्या पाठीवर कुठेच नाही.


अग सासर कितीही श्रीमंत असू देत .नवरा कितीही प्रेमळ असू दे, पण शेवटी माहेर ते माहेरचं असतं ना? माहेरची सर जगातल्या कुठल्याच राजेशाही महालाला येत नाही.

मीनाच्या या भावपूर्ण वाक्याने मीरालाही गलबलून आलं. आणि दोघीही मैत्रिणींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि एकमेकींना गळा मिठी मारली.
समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.

*********************************************

वाचकहो कथा कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत

जय हिंद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//