हरवलेलं माहेर
उन्हाळ्यातली रणरणती दुपार. अजगरासारखा सुस्त पडलेला काळभोर डांबरी रस्ता आणि त्या रस्त्यावरची अगदीच तुरळक वर्दळ. मीराचा लहाना कुलरच्या हवेत शांत झोपला होता तर थोरली - अमृता युट्युब पाहण्यात गुंग होती. मीरानेही मग मोबाईल वरच्या अनेक समाज माध्यमांचा विरंगुळा म्हणून आधार घेतला. तर तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये ओळखीचं नाव दिसलं - मीना. पण काही केल्या मीराला संदर्भ लागत नव्हता म्हणून मग शेवटी मीनाची सगळी माहिती मीरानं वाचून काढली. आणि तिच्या लक्षात आलं की मीना म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तिची बालमैत्रीण मीना देशमुख होती आणि सध्या ती नागपुरातच राहात होती.
मीरानं मग मीनाला मेसेंजर वरून मेसेज करून तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि मग दोघींच्या आठवणींचा धबधबा अगदी ओसंडून वाहायला लागला.
त्यांच्या त्या रम्य बालपणात दोघीही कितीतरी वेळ अगदी रमून गेल्या होत्या. मीराने मीनाला घरी येण्याचं आमंत्रण दिलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मीना , मीराच्या घरी आली.
मीरा - "मीना कित्ती दिवसांनी भेटतोय!"
मीना - "नाही ग खूप वर्षांनी भेटतोय!"
आणि दोघीही अगदी खळखळून हसल्या.
मीरा - " हो ना खूप छान वाटलं तुला बघून पण तू अजूनही तशीच आहेस वीस वर्षापूर्वी होती तशीच!"
मीना - "आणि तू पण!"
तेवढ्यात मीराचा मुलगा जय तिथे आला आणि तिला आईस्क्रीम मागू लागला. मीराने जयला आईसक्रीम दिलं आणि मीनाशी ओळख करून दिली.
मीरा -"जय हि माझी बालमैत्रीण मीना म्हणजे , तुझी मीना मावशी , तिला हॅलो कर."
जय -"हॅलो मीना मावशी."
एवढं बोलून तो तिथून पळाला आणि खेळण्याच्या रूम मध्ये जाऊन खेळू लागला.
मीना -"मीरा तुझा जय अगदी तुझ्यासारखा दिसतो बरं का!"
मीरा - "हो मातृमुखी आहे तो, आणि माझी मुलगी - अमृता पित्रृमुखी. मीना तुला किती मूलबाळ आहेत गं ?"
मीना - " एकच मुलगा - सारांश."
मीरा - "वा ! नाव तर खूपच छान आहे."
मीरा आणि मीना दोन्ही बालमैत्रीण. एकाच गावात, एकाच भागात राहणाऱ्या. एकाच शाळेत जाणाऱ्या , एकाच वर्गात शिकणाऱ्या आणि एकत्रच खेळणाऱ्या अगदी जिवश्च कंठश्च बालमैत्रीणी.
मीराचे वडील पोस्टात होते तर मीनाचे वडील अकोला जवळच्या \"शिवर\" गावचे मोठे जमीनदार. शंभर दीडशे एकर शेती. गावाकडे मोठा वाडा , जमीन , जुमला. अगदी जुन्या मराठी सिनेमात दाखवतात तशीच देशमुखी आणि गावात मानमरातब.
मीनाला एक लहान भाऊ होता राजू. मीनाच्या आणि राजूच्या शिक्षणासाठी मीनाची आई अकोल्याला दोन खोल्यांच्या घरात राहत होती. मीना आणि मीरा आजूबाजूलाच राहायच्या त्यामुळे त्यांच्यात छान गट्टी जमली होती.
खरेतर मीनाचे वडील हे पाच भावंडांमधले सगळ्यात मोठे. बाकी इतर चार भावांना प्रत्येकी दोन - तीन मुलं होती . आणि ती पण शिक्षणासाठी मीना सोबतच त्या दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहायची.
दिवाळी दसरा उन्हाळ्याच्या सुट्टीत मीना तिच्या गावाला - शिवरला जायची. तिकडून परत आल्यावर शेतातल्या आंब्याच्या झाडावर चढण्याची, चिंचा बोर खाण्याची , नदीत डुंबायची , बैलगाडीच्या सवारीची मजा मीराला सांगायची. मीरालाही मग शेतात- नदीवर जावेसे वाटे. एकदा मीनाने , मीराच्या आईला विनंती केली आणि मीरा , मीनाच्या गावाला गेली.
*********************************************
लेखिका राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा