दि लूप होल सिझन 2 भाग ३२

This Is A Suspens Story


अभिज्ञा अगम्यला घेऊन पाचव्या आणि शेवटच्या कथेत पोहोचले. ते एका जंगलात पोहोचले होते. अभिज्ञाने अगम्यला एका दगडावर बसवले. अगम्य थोडा दमला होता आणि त्यातून त्याच्या हाताच्या दंडावर वार बसल्यामुळे त्याच्या दंडातुन रक्त येत होते. ते पाहून अभिज्ञा खूपच घाबरली होती. तिने तिच्या जवळ असलेला रुमाल त्याच्या दंडाला बांधला आणि त्याला काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ अगम्य तू ठीक आहेस ना?”

अगम्य,“हो मी ठीक आहे! तुला मी म्हणालो होतो ना की माझ्या मागे येऊ नकोस! का आलीस माझ्या मागे?पाहिलेस ना त्या माणसाने तुझ्यावर कसा वार केला ते! तुला काही झालं असतं म्हणजे?” तो रागाने तिला बोलत होता.

अभिज्ञा,“ तू चीड चीड करू नकोस आता! तू ठीक आहेस का ते सांग आधी आपण थोडा वेळ थांबू या का?” ती म्हणाली.

अगम्य,“ तुला आता काही बोलत नाही तू चल घरी मग तुला सांगतो आणि आपल्याकडे वेळ नाही थांबायला चल आता पुढे काय वाढून ठेवले आहे ते पाहू!” तो उठून इकडे तिकडे पाहत म्हणाला.

अभिज्ञाने फक्त होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे अंदाज घेत पुढे निघाले. सगळीकडे फक्त जंगल मोठी मोठी झाडे-,झुडपे दिसत होती ते वाट काढत पुढे जात होते आणि त्यांना लांबून एका ठिकाणी एक चिखलमातीचे घर दिसले.पण बाकी कथाच्या पेक्षा या कथे मधील लढाई खूप अवघड असणार आहे हे दोघांना देखील माहीत होते.दोघांनी एकमेकांना पाहिले आणि दोघे दबक्या पावलांनी सावधपणे त्या घराकडे निघाले. ते घरा जवळ पोहोचले तर घराच्या दारात त्यांना 13-14 वर्षाची एक मुलगी दिसली. ती नक्कीच मधु असणार हे दोघांनी ही हेरले होते. म्हणून दोघे तिच्या जवळ गेले आणि ती त्यांना हळूच म्हणाली

मधु,“ तुम्ही दोघे यायच्या आधीच सूर्यकांत इथे आला आहे!आणि ती चेटकीण……” ती पुढे बोलणार तर समोर चेटकीण आणि सूर्यकांत हजर होते.

सूर्यकांत,“ अलासच तू गेल्यावेळी वाचला होतास पण यावेळी तू वाचणार नाहीस तू स्वतःच मरणाच्या दाढेत आला आहेस!” असं म्हणून सुर्यकांत क्रूर हसला.

अगम्य,“ गेल्यावेळी ही तू हरला होतास आणि आता ही हरणार आहेस सुर्यकांत! अभी मी याला पाहतो तू जा आणि ती पेंटिंगच्या तुकड्याची बरणी शोध!” तो सुर्यकांतला पाहत म्हणाला.

त्याच्या बोलण्या सरशी अभिज्ञाने त्या घराच्या दाराकडे धाव घेतली पण तिच्या समोर चेटकीण उभी होती. दोघींची झटापट सुरू झाली.इकडे सुर्यकांत अगम्यवर वार करू लागला. अगम्य आणि सुर्यकांतची देखील झटापट सुरू झाली. मधु हे सगळं पाहत होती. तिने अगम्यला काही तरी इशारा केला आणि ती परस दारी केली. अगम्य सुर्यकांतचे लक्ष विचलित करण्यासाठी अभिज्ञाला मुद्दाम ओरडला.

अगम्य,“ अभिज्ञा घे ती बरणी आणि पळ!” ते ऐकून सूर्यकांत बरोबर त्या चटकीणीचे ही लक्ष विचलित झाले.


सूर्यकांत आणि चेटकीण अभिज्ञा कुठे आहे ते पाहत होते पण अभिज्ञा कुठेच दिसत नव्हती. सुर्यकांतने अगम्यला वळून पाहिले तर तो ही तिथे नव्हता. सुर्यकांतच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि तो चेटकीणीला घेऊन परस दाराकडे पाळला. अगम्य आणि अभिज्ञा मधुच्या इशारावरून मागच्या बाजूला गेले. मागे त्या घराला आणखी एक दार होते. त्या दारातून मधूने त्या दोघांना घरात नेले तिथे एका खोलीत अनेक प्रकारच्या बरण्या ठेवल्या होत्या. अगम्य आणि अभिज्ञा प्रत्येक बरणी घाईने चाचपत होते.तेवढ्यात अभिज्ञाच्या हाताला ती पेंटिंगचा तुकडा असलेली बरणी सापडली. तिने त्या बरणी खोलून पेंटिंगचा तुकडा काढण्याचा प्रयत्न केला पण ती बरणी तिला उघडली नाही. शेवटी तशीच बरणी घेऊन ती अगम्य आणि मधु पुढच्या दाराकडे निघाले आणि तो पर्यंत सुर्यकांतने आणि चेटकिणीने तिघांना गाठले.अगम्य स्वतः मागे राहिला आणि त्याने सूर्यकांत आणि चेटकीणीला अडवले. त्याने अभिज्ञा आणि मधूला पुढे पाठवले. त्या दोघी पुढे दाराच्या बाहेर आल्या आणि अगम्यने सुर्यकांत आणि चेटकीणीला चकवले आणि तो ही दाराच्या बाहेर पडू लागला पण त्या गडबडीत त्याला त्या दाराची चौकट चोरात डोक्याला लागली. तरी तो न थांबता घराचे दार लावून अभिज्ञा आणि मधूला घेऊन पळत सुटला मधू पुस्तकाच्या शेवटच्या पानातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत होती. अभिज्ञाच्या हातात बरणी होती आणि सुर्यकांत आणि चेटकीण त्यांच्या मागे धावत होते. सुर्यकांतची शक्ती कमी झाल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता तर चेटकीण जशी घरा पासून लांब जाईल तशी तिची काळी जादू क्षीण होत होती.त्यामुळे ते दोघे अगम्य आणि अभिज्ञावर काळ्या जादूने वार करू शकत नव्हते. मधू एका गुहे जवळ आली आणि ती त्या गुहेकडे बोट दाखवत म्हणाली.

मधू,“ तुम्ही दोघे या गुहेतून पुस्तकाच्या बाहेर पडा लवकर!”

अगम्य,“ पण तुला एकटीला आम्ही इथे सोडून कसे जाणार तू आम्हाला मदत केली म्हणून त्या दोघांनी तुला काही केले तर?” त्याने काळजीने विचारले.

मधु,“तुम्ही विसरत आहात की हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे काही नियम आहेत त्या नियमानुसार या पुस्तकातील पात्रांना कथेत लिहले गेले असेल तरच इजा पोहोचवता येते त्यामुळे ते दोघे माझा काही बिघडवू शकणार नाहीत! तुम्ही जा!” ती म्हणाली आणि अगम्य-अभिज्ञाने गुहेत प्रवेश केला. तोड चालल्यावर ते पुस्तकाच्या अदृष्य पायऱ्या उतरून बाहेर आले.ते बाहेर आले आणि अहिल्याबाई, अभिज्ञाच्या आईचे ध्यान भंगले. महामृत्युंजय यज्ञ आता पूर्ण झाला होता. राहुल आणि मीरा पालाश विधीसाठी बसले होते. पालाश विधीची सगळी तयारी झाली होती.सातूच्या पिठाची बाहुली तयार करून छोटी चिता रचून मंत्रोच्चार चालले होते. अगम्य आणि अभिज्ञा गुरुजी जवळ गेले आणि अभिज्ञाने त्यांच्या हातात त्या पेंटिंगच्या तुकड्याची बरणी दिली. ती बरणी मात्र गुरुजींना देखील उघडली नाही म्हणून मग ती बरणी बाबांनी हातात घेतली आणि विशिष्ट मंत्रोच्चार करून ती बरणी उघडली. त्यातील पेंटिंगचा तुकडा त्या सातूच्या बाहुलीवर ठेवून राहुल करावी त्या छोट्या चितेला अग्नी देण्यात आला. ते सगळं अगम्य आणि अभिज्ञा पाहत होते पण अचानक अभिज्ञा तिथेच बेशुद्ध पडली!

अभिज्ञाला काय झाले असेल?


🎭 Series Post

View all