दि लूप होल पर्व २(भाग ९)

This is a thriller and suspense story

        पूर्वेकडे सूर्य त्याची सोनेरी किरणे उधळून सगळी सृष्टी प्रकाशाने न्हाहूमाखू  घालत होता. अभिज्ञा उठली अगम्य अजून गाढ झोपलेला होता. तिने त्याच्याकडे एकवार पाहिले आणि त्याच्या  कपाळावरून  हळुवार हात फिरवून ती  आवरायला निघून गेली. ती तयार होऊन खाली गेली. अज्ञांकला तिने तयार करून शाळेत पाठवून दिले. तो पर्यंत तिचे आई- बाबा आणि अहिल्याबाई डायनिंग टेबलवर तयार होऊन आले. अभिज्ञाच्या आईने तिला विचारले.

आई,“अभी  अमू उठला का ग?” त्यांनी विचारले.

अभिज्ञा,“ मी पाहते कारण मी खाली आले तेंव्हा तो अजून झोपलाच होता मग मी ही उठवले नाही त्याला!” ती म्हणाली

अहिल्याबाई,“ बरं मग चहा घेऊन जा आणि नाष्ट्याला त्याला घेऊन ये! काल संध्याकाळ पासून तो खाली आलाच नाही आणि त्याचा हात थांबला का दुखयचा? आज डॉक्टर येणारच आहेत म्हणा ड्रेसिंगला! तेंव्हा सगळंच चेक करून घे अभी!” त्या काळजीने बोलत होत्या.

अभिज्ञा,“त्याचा हात आता दुखायचा थांबला आहे. पण डॉक्टर आले की आपण त्यांना सांगू या! मी चहा घेऊन जाते आणि त्याला घेऊन येते खाली नाष्टा करायला!” असं म्हणून ती चहा घेऊन बेडरूममध्ये गेली तर अगम्य अजून झोपलेलाच होता.

     तिने चहा टीपॉयवर ठेवला आणि बेडवर बसून अगम्यच्या केसातून हात फिरवत म्हणाली.


 

अभिज्ञा,“ उठा देशमुख साहेब सकाळचे नऊ वाजून गेले आहेत! अजून किती झोपणार सूर्य माथ्यावर आला आहे!”


 

अगम्य,“ काय ग तुझी कटकट झोपू दे अजून थोडा वेळ!”तो कूस बदलून म्हणाला.

अभिज्ञा,“  अरे उठ बरं आता! इतका वेळ झोपलास  तर नाष्टा कधी करणार सकाळची औषधे कधी घेणार! डॉक्टर येणार आहेत आज आहे का लक्षात आणि अजून एक तू प्रॉमिस केलं होतास की तू आज त्या स्वप्नांबद्दल सगळं सांगशील!” ती त्याला हात धरून उठवत म्हणाली.

अगम्य,“ काय ग अभी झोपू पण नको देवूस तू! जा चहा घेऊन ये! मी तो पर्यंत…” तो उठून बसलेला परत झोपत म्हणाला पण अभिज्ञाने त्याच्या पुढ्यात चहा धरला आणि ती म्हणाली.

अभिज्ञा,“ हा घे चहा आणि उठ आता! झोप नाही होत पूर्ण तर रात्रीचे कशाला जागावे आणि जागवावे माणसाने!” ती गालातल्या गालात हसत खोडसाळपणे म्हणाली.

     अगम्यला तिच्या बोलण्याचा रोख कळला आणि तो चहा घेऊन म्हणाला.

अगम्य,“ हुंम बरी आठवण केली तू! मी आजकाल विसरतच आहे बघ” तो चहाचा कप टीपॉयवर ठेवून म्हणाला.

अभिज्ञा,“ काय रे!काय विसरलास तू?” तिने निरागसपणे विचारले.

अगम्य,“ अग गोड मॉर्निंग होत नाही आजकाल!” तो तिला जवळ ओढत सुचकपणे हसत म्हणाला.

अभिज्ञा,“फाजीलपणा बास झाला अमू! उठ आणि आवर लवकर किती वेळ झाला बघ  नाष्टा कधी करणार तू? आणि सगळे तुझ्यासाठी थांबले आहेत नाष्टा करायचे!” ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली.

अगम्य,“ ठीक आहे आवरतो मी” तो उठून जात म्हणाला.

       तसं अभिज्ञा ही उठली आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

अभिज्ञा,“ अदू पेक्षा आज्ञाधारक झाला की तू तर!” ती हसून म्हणाला.

अगम्य,“ सोड बरं बास झाले मला उशीर होतोय!” तो तोंड फुगवून म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा! तुला उशीर होतोय का? हे तर मला माहीतच नव्हतं.

 अगम्य,“हो!”  असं म्हणून तिचे हात सोडवून निघून गेला.


 

          अभिज्ञा त्याला पाहून  विचार करू लागली अरे देवा हा तर खरच फुगला की काय केलस अभी तू आता याचा हा फुगा लवकर फुटणार नाही!एकतर याचा मूड बरेच दिवस झालं खराब आहे. सारखा टेन्शनमध्ये दिसतो आणि वरून हे दुखणं आहेच की काल रात्री पासून जरा मूड मध्ये होता. आज ही कुरकुर करत उठला पण बरा होता मूड आता अजून चिडला. तू पण ना तुला त्याचा सहवास त्याच्या खोड्या आणि लगड हवी असते.  उगीच त्याला सतावायचे! आता भोगा आपल्या कर्माची फळे! आता त्याला मानवता मानवता अख्खा दिवस  जाईल आणि आज ऑफिसला ही जायचं आहे. ती हाच विचार करत डोक्याला हात लावून उभी होती तो पर्यंत अगम्य अंघोळ करून आला आणि अभिज्ञाला म्हणाला.

अगम्य,“ अभी माझे केस जरा पुसून देतेस का? माझा हात वर उचलताना दुखतो आहे.तरी बरं त्या डॉक्टरने व्हॉटर प्रूफ पट्टी बांधली आहे.” तो ड्रेसिंग टेबल समोर उभा राहून बोलत होता. अभिज्ञा त्याच्या बोलण्याने भानावर आली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातातील टॉवेल घेऊन त्याचे केस पुसत म्हणाली.

अभिज्ञा,“ सॉरी अमू!” ती आरशात त्याला पाहत म्हणाली.

अगम्य,“ते कशासाठी आणि?” तो आश्चर्याने म्हणाला.

अभिज्ञा,“ ते मी मघाशी..” ती खाली मान घालून म्हणाली.

अगम्य,“ तू अजून तिथेच आहेस काय हे अभीज्ञा! अग एव्हढ्या तेव्हढ्या कारणाने रुसायला आता मी आणि तू पण नवीन नवरा-बायको राहिलो आहोत का? एक मुलगा आहे आपल्याला!काही वर्षातच आपण म्हातारे होऊ!” तो हसून  एकाच हाताने  केस विंचरण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

अभिज्ञा,“ वयच काय आहे रे आपले? तू हो म्हातारा मी काय इतक्यात म्हातारी वगैरे होणार नाही आणि आपला अदू फक्त सहा वर्षांचा आहे!” ती काहीशी चिडून टॉवेल झटकत म्हणाली.

अगम्य,“ बरं बाई नको होऊ म्हातारी चिरतरुण राहा! अवघड आहे बाबा! माणसाने कसे वागावे काय माहीत? जर रुसल-फुगल तरी राग आणि समंजसपणा दाखवला तरी राग!” तो नाटकीपणे म्हणाला.

अभिज्ञा,“ तू ना जसा आहेस तसा राहा उगीचच खूप समंजस बनायला जाऊ नकोस!बरं चला आता आधीच उशीर झाला आहे. माणस ताटकळली आहेत तुमच्यासाठी!” ती  वळून जात म्हणाली.

अगम्य,“ बरं!” असं म्हणून त्याने तिला मागून मिठी मारली.

अभिज्ञा,“ काय हे आता दार उघडे आहे! चल लवकर!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

अगम्य,“ आत्ता तूच म्हणाली ना की मी जसा आहे तसा राहाव म्हणून मग! ” तो तिच्या कानात कुजबुजला

अभिज्ञा,“ हो म्हणाले कारण तू तसाच आवडतोस मला पण आता शहाण्या सारखा वाग आणि चल ना दहा वाजता आले. डॉक्टर अकरा वाजता येणार आहेत. मला ऑफिसला जायचं आहे खूप काम आहेत अगम्य आणि तू आज ते सांगणार म्हणालास ना! चल ना!” ती म्हणाली आणि अगम्यने तिला सोडले आणि म्हणाला.

अगम्य,“ चल मग! आणि तू ऑफिसमधून कधी येणार माघारी मग तेंव्हा सांगेन मी!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हो मी आत्ता जाऊन लंचला घरीच येणार आहे. मग जेवण झाली की भरवू सभा!” ते बोलत बोलत खाली गेले.त्यांना पाहून अहिल्याबाई म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ किती उशीर! बसा आणि नाष्टा करा लवकर!”

अभिज्ञा,“ आऊ; साहेबांना मी गेल्यावर उठवले मग तिथून यांचा श्री गणेशा!” ती हसून म्हणाली.

आई,“ राहू दे राहू दे इतकं काही बोलायची गरज नाही हो टोचून पोराला! तो आजारी आहे म्हणून नाही तर तुझ्या आधी उठून सप्तचक्र साधना करतो पहाटे आणि मग तुला उठवतो!” त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो सासूबाई माझं चुकलं!इथून पुढे नाही बोलणार तुमच्या लाडक्या जावयाला!” ती नाटकीपणे हात जोडून म्हणाली आणि सगळे हसले.


 

               अकरा वाजता  अगम्यचे ड्रेसिंग करायला आणि त्याचे चेकअप करायला डॉक्टर जैन आले. त्यांनी ड्रेसिंग केले. त्यानंतर बी. पी. वगैरे तिथेच हॉलमध्ये अगम्यला सोफ्यावर झोपवून चेक केले.आणि सगळ्यांच्या प्रश्नार्थक आणि  गंभीर नजरा पाहून बोलू लागले.

डॉ.जैन,“अरे इतके गंभीर होऊ नका! रिलॅक्स! He is fine now! बी.पी  मागच्या  वेळे पेक्षा कमी आहे. बाकी सगळं नॉर्मल आहे आणि हो जखम ही बऱ्यापैकी भरत आली आहे!मी मेडिसीन्स बदलून देत आहे आज काळजी घ्या” ते म्हणाले.

     

              हे ऐकून सगळ्यांना हायसे वाटले पण डॉ. जैन यांनी जाताना अभिज्ञाला खुणेने बाहेर बोलवून घेतले आणि ते नेमके अहिल्याबाईनी पाहिले होते. अभिज्ञा डॉक्टर बरोबर बाहेर गेली. अभिज्ञा बोलू लागली.

अभिज्ञा,“ डॉक्टर anything serious?” तिने काळजीने विचारले.

डॉ. जैन,“ मिसेस देशमुख अगम्यला कोणत्या गोष्टीची काळजी किंवा स्ट्रेस आहे का? कारण त्याचा बी. पी. काही केल्या नॉर्मल होत नाही आहे. जर असच सुरू राहील तर इतक्या कमी वयात त्याला कायम स्वरुपी बी. पी.च्या गोळ्या घ्याव्या लागतील आणि त्या नाही घेतल्या तर पुढे जाऊन हार्ट अट्याक येऊ शकतो. या सगळ्याचा परिणाम त्याच्या आयुर्माणवर होऊ शकतो. मी आत काही बोललो नाही कारण आऊसाहेब आणि तुमचे  आई वडील आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत!” ते म्हणाले.

अभिज्ञा,“ तुम्ही काय बोलता आहात ते कळतंय डॉक्टर मला! तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्यावर गोळीबार झाला आणि त्यात अगम्य जखमी झाला.त्याचे टेन्शन कदाचित त्याने घेतले असावे. कारण अजून तरी ते हल्लेखोर सापडले नाहीत!” ती म्हणाली.

डॉ. जैन,“ हो माहीत आहे मला पण त्याचा अगम्यच्या तब्बेतीवर परिणाम होत आहे. तुम्ही थोडं लक्ष द्या त्याच्याकडे आणि प्लिज काळजी घ्या!” असं म्हणून डॉक्टर निघून गेले आणि अभीज्ञा विचारांच्या तंद्रीत घरात येत असताना अहिल्याबाईनी तिला दारातच अडवले.

अहिल्याबाई,“ काय म्हणत होते अभी डॉक्टर?” त्यांनी काळजीने विचारले.

अभीज्ञा,“विशेष काही नाही आऊ! चला मला ऑफिसला जायचे आहे आऊ लंचला मी घरी येणार आहे लंच नंतर अगम्य सगळं सांगतो म्हणाला आहे” ती विषय बदलत म्हणाली.

अहिल्याबाई,“ विषय नको बदलू अभी मी तुला डॉक्टरने बाहेर ये म्हणून खुणावलेले पाहिले आहे.सांग लवकर काय म्हणत होते डॉक्टर?काळजी करण्यासारखे काही…” त्या काळजीने विचारत होत्या तोच अभीज्ञा त्यांना थांबवत म्हणाली.

अभीज्ञा,“ काळजी करण्यासारखे आहे पण आणि नाही पण!”

अहिल्याबाई,“ म्हणजे ग?” त्यांना काही कळले नाही.

अभीज्ञा,“ आऊ अगम्यचा बी.पी. नॉर्मल होत नाही. त्यामुळे त्याला कायमची बी.पी. गोळी घ्यावी लागू शकते आणि जर नाही घेतली तर त्याच्या आयुर्माणावर परिणाम होईल असं डॉक्टर म्हणत होते.हे काळजी करण्याचे कारण आहे आणि त्याच टेन्शन कमी झाले की बी.पी आपोआप कमी होईल की म्हणून काळजी करण्याचे कारण नाही असे म्हणाले मी! पण तुम्ही जरा त्याच्याशी बोला आऊ! म्हणजे त्याला बरं वाटेल!” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ बरं मी बोलेन त्याच्याशी पण हे शुक्ल काष्ट कधी संपणार आहे काय नाहीत? नाही तरी अमू प्रत्येक गोष्टीचे जास्तच टेन्शन घेतो त्याची काळजी वाटते ग मला!” त्या भरल्या डोळ्याने बोलत होत्या.

अभीज्ञा,“ नका करू काळजी आऊ होईल सगळं ठीक आणि मी आहे की  त्याची काळजी घ्यायला.आऊ डोळे पुसा आधी अगम्य इकडेच येतो आहे.त्याने तुमच्या डोळ्यात पाणी पाहिलं तर चिडले आणि हजार प्रश्न विचारेल!” ती घराकडे तोंड करून उभी राहिली होती आणि अहिल्याबाई घराकडे पाठ करून उभ्या होत्या त्यामुळे अभीज्ञाने अगम्यला बाहेर येताना पाहिले आणि ती अहिल्याबाईना म्हणाली. त्यांनी लगेच डोळे पुसून घेतले. अगम्य आला आणि त्या दोघींना म्हणाला.

अगम्य,“ किती  वेळ झालं काय करताय बाहेर दोघी? अभी तुला ऑफिसला जायचे आहे ना? मग जा की ग लवकर आणि लंच टाईमला वेळेवर ये!” तो म्हणाला.

अभीज्ञा,“ हो ही काय बॅग घेतली की निघालेच!आऊ चला मी निघते!” ती असं म्हणाली आणि तिघे ही वाड्यात गेले.

        अभिज्ञा ऑफिसला निघून गेली. अगम्य खरं तर आता घरात बसून वैतागला होता पण त्याला चांगलं माहीत होतं की घरातले त्याला डॉक्टरने ग्रीन सिग्नल दिल्या शिवाय उंबरा ही  ओलांडू देणार नाहीत. ते कमी की काय म्हणून अहिल्याबाईनी सिक्युरिटी खूपच कडक केली होती.आज अभिज्ञा ऑफिसला गेली तर तिच्या बरोबर दोन शस्त्रधारी सुरक्षा रक्षक होते. तो वरती त्याच्या रूममध्ये  पुस्तक वाचत  पडला होता. अहिल्याबाई त्याला बोलण्यासाठी गेल्या होत्या कारण मघाशी अभिज्ञाला जे डॉक्टरने सांगितले त्यामुळे त्यांना अगम्यची अजूनच चिंता वाटत होती. त्यांना पाहून अगम्य उठून बसत म्हणाला.

अगम्य,“आऊ येणा!”

अहिल्याबाई,“ अरे उठतोस कशाला राहा की पडून!” त्या बेडवर बसत म्हणाल्या.

अगम्य,“  कंटाळा आला आहे मला आता सारख झोपून राहण्याचा!”तो वैतागून म्हणाला.

अहिल्याबाई,“ बच्चा असं म्हणून कसं चालेल अरे तुला बरं वाटायला नको का ? आणि तू एकदा नीट झालास की थोडीच थांबणार आहेस आधीच तुझ्या पायाला भिंगरी बांधली आहे. या फॅक्टरीतुन त्या फॅक्टरीत तर कधी पुण्याचं ऑफिस तर कधी शेती!” त्या त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या आणि अगम्य त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत म्हणाला.

अगम्य,“ हुंम! या सगळ्यामुळे अभिज्ञावर आणि तुझ्यावर उगीच कामाचा स्ट्रेस आला!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ स्ट्रेस कसला त्यात एवढा मोठा डोलारा मी संभाळलाच की इतकी वर्षे! बरं ते जाऊदे तू कसला स्ट्रेस घेतलास अमू!” त्यांनी हळूच विषयाला हात घातला.

अगम्य,“ अग मी कसला स्ट्रेस घेणार आता?” तो सहज म्हणाला.

अहिल्याबाई,“ बच्चा मी तुझी आई आहे! माझ्या डोळ्यातून काही सुटणार आहे का? आणि  तुझा बी.पी अजून नॉर्मल होत नाही मग सांग  बरं अमू कसला ताण आला आहे तुला इतका?” त्यांनी काळजीने विचारले.

अगम्य,“ अग अजून कसला ताण असणार आऊ! हेच अभिज्ञावर झालेला हल्ला आणि तिचा अपघात! माझ्यावर ही हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला म्हणे! याच सगळ्याच टेन्शन आणि अजून तो हल्लेखोर पकडला गेलेला नाही.त्यातून त्या स्वप्नांचे टेन्शन आहेच की  म्हणून टेन्शन येत! कधी ही काही ही होऊ शकते आऊ!” तो काळजीने बोलत होता.

अहिल्याबाई,“ तू म्हणतो ते बरोबर आहे अमू पण टेन्शन घेऊन काय होणार बेटा! तुझ्या तब्बेतीवर परिणाम दुसरं काही साध्य होणार नाही त्यातून आणि हल्लेखोराचे म्हणशील तर पोलीस तपास करत आहेत तो पकडला जाईल लवकरच! आणि तुला पडणाऱ्या स्वप्नांच किंवा त्या अनुषंगाने  पुढे येणाऱ्या संकटाच म्हणशील तर आज सविस्तर सांग काय ते! त्यावर काही तरी मार्ग निघेलंच की! मागच्या वेळी केलाच ना सामना मग! तू नको ना इतकं टेन्शन घेऊ बच्चा त्याचा तुझ्या तब्बेतीवर परिणाम होत आहे. तू आणि अभी खुश तर आम्ही खुश अमू! तू जर टेन्शन घेतलंस आणि तुला काय झालं तर आम्ही काय करणार आहे? म्हणून सांगते टेन्शन नको घेवून!होईल सगळं ठीक!” त्या समजावत होत्या.

अगम्य,“ हुंम! मी नाही घेणार टेन्शन आऊ!” तो म्हणाला.

★★★★

         अभिज्ञा लंचच्या वेळेत घरी आली. सगळे जेवले आणि हॉलमध्ये जमा झाले. आता सगळे अगम्यकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.अगम्य सगळ्यांना पाहून हसला आणि अभिज्ञा चिडून म्हणाली.

अभिज्ञा,“ हसायला काय झालं रे? इथे सगळ्यांचा जीव टांगणीला लागला आहे आणि तू हसत आहेस!”

अगम्य,“ हसू नाही तर काय करू मग सगळे मिळून माझ्याकडे असे पाहताय जसा की मी आज कोणत्या तरी मोठ्या गुन्ह्याची कबुली देणार आहे.” तो हसून म्हणाला.

बाबा,“ पुरे झाली प्रस्तावना अमू! सांग बाबा एकदाच काय ते?” ते गंभीर होत म्हणाले.

अगम्य,“ हो हो सांगतो! त्या घटने नंतर आपण इथे आलो कायमचेच राहायला त्यानंतर  एक वर्ष चांगले गेले. नाही म्हणजे मी अधून मधून दचकून उठत होतो पण त्याच इतकं काही नव्हतं. पण त्या नंतर मला स्वप्न पडू लागली. सूर्यकांत माझ्या स्वप्नात येतो तो मला धमकवतो आधी तो नुसता लांबून बोलायचा म्हणजेच स्वप्नांची तीव्रता कमी होती. पण तो हळूहळू जवळ येऊ लागला आणि आता तर तो मला नुसता धमकावत नाही तर माझा गळा ही दाबतो स्वप्नात येऊन!” तो म्हणाला.

आई,“ पण तो तुला काय धमकवतो अमू आणि त्या पेंटिंगमध्ये नेमकं काय झालं तुझ्या बरोबर? ते आज तागायत तू आम्हाला नाही सांगितलेस” त्यांनी विचारले.

अगम्य,“ पेंटिंग मध्ये मी गेलो तेव्हा सूर्यकांत खूप खुश झाला पण मी सरळ त्या बंगल्यात शिरलो तेव्हा त्याला कळून चुकलं की मी का आलो आहे त्यामुळे तो खूप  चिडला! त्याच्यात आणि माझ्यात झटापट झाली आणि अभिज्ञाने माझ्या गळ्यात घातलेले ओमचे लॉकेट ही तुटून पडले आणि तो चांगलाच चेकळला! माझ्यावर हल्ला करू लागला. मी त्याला प्रतिकार करत कसा बसा त्याच्या स्टुडिओत पोहचलो आणि त्या पेंटिंगचे प्रतिरूप घेऊन त्याला आत कोंडून तिथून पळालो पण तो स्टुडिओचे मागचे दार उघडून माझ्या मागे आला त्याने कुराडी सारख्या त्याच्या जवळच्या हत्त्याराने माझ्यावर हल्ला केला आणि ते हत्त्यार  माझ्या खांद्याला लागले. तरी मी पळत होतो जिवाच्या आकांताने पण त्याने परत मला गाठले आणि मला पाय धरून पाडले. हे सगळं तिथे असणारे पेंटिंगमध्ये अडकलेले लोक पाहत होते ते मदतीला आले आणि त्यांनी सुर्यकांतला धरून ठेवले आणि मी  तिथून बाहेर पडलो. पेंटिंग आऊकडे दिली. आऊने ती जळात टाकली आणि भिंतीवरची पेंटिंग ही जळाली  मी  मात्र बेशुद्ध झालो नंतरच मात्र मला काहीच आठवत नाही मला शुद्ध आली त्या नंतर ही तीन दिवसां नंतरचे मला सगळे आठवते! पण हे सगळं करताना आपल्या हातून काही तरी चूक झाली आहे किंवा काही तरी राहून गेले आहे!” तो गंभीरपणे म्हणाला.

अहिल्याबाई,“ असं का वाटतं तुला अमू आणि तो सूर्यकांत काय बोलतो तुला?त्यांनी विचारले.

अगम्य,“ कारण आऊ तो स्वप्नात गेल्या दोन वर्षांपासून मला सांगत आहे की तो परत येणार आहे एका नव्या रुपात! आणि मनाच्या पेक्षा दुप्पट तागदिनी  दुप्पट  बळाने  आणि या वेळी तो अभिज्ञाला या सगळ्यात ओढणार आहे असं तो म्हणत आहे. म्हणून तर अभिज्ञा आणि माझ्यात भांडण झाल्यावर तेच निमित्त करून अभिज्ञाला माझ्या पासून दूर केले. मी तिला माफ तेंव्हाच केले होते पण मला तिच्यावर या सगळ्याचे सावट पडू द्यायचे नव्हते!” तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला.

अभिज्ञा,“ तू वेडा आहेस का अगम्य? किती दिवस झालं एकटाच सगळं सहन करत आहेस!आधीच हे सगळं सांगितलं असतस तर आपण काही तरी उपाय शोधला असता ना!” ती नाराजीने म्हणाली.

अहिल्याबाई,“ बरोबर बोलत आहेस तू अभिज्ञा पण उपाय शोधण्याच्या आधी आपल्याला आपण काय चूक केली आणि त्या वेळेस आपल्याकडून काय राहिले? हे शोधावे लागेल आणि आता सूर्यकांत कोणत्या रुपात येणार हे ही शोधावे लागेल आणि त्यासाठी पुन्हा ही गोष्ट जिथून सुरू झाली तिथे म्हणजेच नाशिकला जावे लागेल आणि त्या अघोरी बाबांना शोधावे लागेल कारण तेच आपल्याला मदत करू शकतात!” त्या म्हणाल्या.

अगम्य,“ हो आऊ तू बोलतेस ते बरोबर आहे” तो म्हणाला.

     अहिल्याबाईनी अगम्यची समजूत काढली त्यामुळे त्यांना ही बरे वाटले आणि अगम्यला ही! संकट काळी एकमेकांना विश्वासात घेऊन जर एकमेकांशी बोललो तर खरंच माणसाला एक वेगळीच उभारी मिळते आणि संकटाशी दोन हात करण्याचे बळ ही!

सूर्यकांत कोणत्या नवीन रुपात आता अगम्यच्या आणि अभीज्ञाच्या आयुष्यात येणार होता?आणि असे कोण होते जे अगम्य आणि अभीज्ञाच्या जीवावर उठले होते?

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule




 





 

  







 

🎭 Series Post

View all