May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग ८)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग ८)

     अभीज्ञाने फोन केला आणि अर्ध्या तासात अहिल्याबाई आणि तिचे आई-बाबा अज्ञांकला घेऊन माघारी आले. आज्ञांकने अगम्यला पाहिले आणि  त्याच्या जवळ बेडवर  बसून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

 

अज्ञांक,“ बाबा तुझ्या हाताला काय झाले रे? आई सारखा तू ही पडलास का? आणि आऊ आजी म्हणत होती की तू म्हणे पाच  दिवस झोपला होतास? इतके दिवस कसा झोपलास रे तू?” 

 

अभीज्ञा,“ अरे हो हो! श्वास तरी घे अदु! याची प्रश्नांची बुलेट ट्रेन सुटली! अदुचे बाबा द्या आता उत्तर!” ती हसून अगम्यकडे पाहत म्हणाली.

 

अगम्य,“ हो रे अदु मी ना पडलो बघ म्हणूनच माझ्या हाताला लागलं ना!” तो त्याला जवळ बसवून घेत म्हणाला.

 

आज्ञांक,“ तू आणि आई असे रे तुम्ही! सारख पडता!” तो डोक्याला हात लावून मोठ्या माणसासारखे पण निरागसपणे म्हणाला आणि या त्याच्या बोलण्यावर आणि कृतीवर सगळेच हसले.

 

बाबा,“ चला अदु शेठ आपण खाली जाऊ! तुम्हाला flowers दाखवतो! हा तुम्हाला बोलू देणार नाही मी घेऊन जातो याला आणि हो अभी फॉर्मेलीटीज मी पूर्ण करतो.संध्याकाळी डिशचार्ज देणार आहेत ना अमुला! पण तो पर्यंत दुपारची जेवण करून घेऊया सगळे! मी अदूला फिरवून आणतो.”ते म्हणाले

 

अगम्य,“ sorry बाबा या वयात तुमची काळजी मी घ्यायची तर माझ्यामुळे तुम्हांला धावपळ करावी लागत आहे.” तो नाराजीने म्हणाला.

 

बाबा,“  ओय अमू! मी काही इतका ही म्हातारा नाही झालो आणि याची परत फेड व्याजासह घेणार मी माझी सेवा करवून!” ते हसून म्हणाले आणि अज्ञांकला घेऊन निघून गेले.

 

        आता वेळ होती अहिल्याबाईंच्या इमोशनल ड्राम्याची. हे  ओळखून अगम्य अहिल्याबाईंकडे पाहत म्हणाला.

 

अगम्य,“ आऊ तू जर रडारड करणार असशील तर मी झोपतो! तुझं रडून वगैरे झालं की मला उठाव!” तो अहिल्याबाईंना तिरकस पाहत म्हणाला.अहिल्याबाई त्याच्या जवळ बसून त्याला हलकासा गालावर फटका मारत म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“कार्ट्या तुला प्रत्येक वेळी कशी रे मस्करी सुचते! एक तर पाच दिवस झाले इथे मस्त झोपला होतास आणि आमची मात्र झोप उडवलीस! आज उठलास आणि लागलास मस्करी करायला!  बच्चा I am sorry!खरच मी तुला विचारायला हवं होतं काय झालं ते? आणि तू रूम मधून बाहेर नाही आलास तर तुझी समजूत काढून तुला खायला घालायला ही हवं होतं! खरंच अमू मी आई म्हणून कमी पडले बघ!” त्या डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत बोलत होत्या.

 

अगम्य,“ असं काही नाही आऊ! तू कुठेच आई म्हणून कमी नाही पडलीस! खरं तर मीच चुकलो! बरं बंद कराना तो विषय! उगीच माझा बी.पी आणखीन नका वाढवू! आणि या हॉस्पिटलमध्ये पाच दिवस राहून मला कंटाळा आला आहे घरी चला लवकर! पण आऊ तुझा हात खूपच जड आहे ग! अजून झिणझिण्या येत आहेत माझ्या गालाला!” तो नाटकीपणे बोलत होता.

 

अहिल्याबाई,“ अभी झाली याची नाटक परत सुरू! हॉस्पिटलमध्ये राहून कंटाळा यायला तुला पाच दिवसा पासून आपण कुठे आहोत हे तरी माहीत होते का रे! कार्ट्या तुला सहा वर्षाच पोरग आहे तरी तुझ्यातील लहान मूल काही जात नाही! आणि काय रे सारख फुगल की अन्न-पाण्यावर काय राग काढतोस रे! नालायका त्याचा किती वाईट परिणाम होतो तुझ्यावर!तू ना खूप जास्त शेफारला आहेस तू चल घरी तुला सुता सारखा सरळच करते बघ! तू फुग आणि बसच परत उपाशी मग तू आहेस आणि मी आहे!” त्या अगम्यला प्रेमळ दम देत होत्या.

 

अगम्य,“ मातोश्री हात जोडतो! ते पण सध्या जोडता येत नाहीत म्हणा तरी हात जोडतो पण  कृपा करा तुमचा तो जड हात तेव्हढा नका वापरू! बाकी मी नाही देणार आता त्रास तुम्हाला!” तो पुन्हा नाटकीपणे म्हणाला आणि सगळे हसले.

 

अभीज्ञा,“ आऊ याची नाटक संपणार नाहीत!”

 

आई,“ काय ग ये अभी जास्त बोलू नकोस त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होतो आपण म्हणून तू वाचालीस नाही तर तुझ्या ही गालावर नक्षी उठणारच होती. बास झालं अमू आरामकर आता थोड्यावेळाने जेवू आपण आत्ता अकरा वाजले आहेत.” त्या म्हणाल्या.

 

      अगम्यने नुसती मान हलवली. अहिल्याबाईंनी त्याला झोपायला मदत केली आणि त्याला पांघरुन घातले व त्या अगम्यच्या कपाळावरून हात फिरवत राहिल्या.अगम्य थोड्याच वेळात झोपी गेला आणि अहिल्याबाईंनी डोळे पदराने टिपले.ते पाहून अभीज्ञाच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

★★★★

 

       अगम्य घरी येवून आज सात दिवस झाले होते. अहिल्याबाई त्याची ट्रीटमेंट डॉ.काळेंच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून करवून घेत होत्या. त्या दिवशी जे काही घडले त्या नंतर त्यांचा कोणावर ही विश्वास नव्हता.इतर वेळी सगळ्यांना खुला असणारा देशमुखवाडा! पण आता मात्र वाड्याच्या बाहेर दोन सिक्युरिटी गार्ड आणि वाड्याच्या प्रवेशद्वाराशी दोन सिक्युरिटी गार्ड त्यांनी तयणात केले होते.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची चौकशी करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात होता. अज्ञांकला ही शाळेत सोडायला गार्ड होते आणि ते अज्ञांकला शाळेत त्याच्या वर्गा बाहेर थांबून घरी घेऊनच येत होते.झाल्या प्रकारची अहिल्याबाईंनी खूपच धास्ती घेतली होती.

 

      आज गोखले वकील अगम्यला भेटयला संध्याकाळी पाच वाजता आले आणि हे सगळं वातावरण पाहून ते चकित झाले.ते आत आले तर अहिल्याबाई सोफ्यावर कसल्या तरी फाईली पाहत बसल्या होत्या.त्यांनी गोखले वकिलांना पाहिले आणि त्या म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ अरे गोखले ये ये! सखु पाणी आण आणि चहा टाक दोन कप! आणि काय रे इतके दिवस कुठे गायब होतास? हॉस्पिटलमधून जो गेलास तो गायबच झालास की!” त्या बोलत होत्या.तो पर्यंत सखु पाणी घेऊन आली. पाणी पिवून गोखले बोलू लागले.

 

गोखले,“ अहो आऊसाहेब माझं जरा काम होत एका केस संदर्भात ते करायला मला अर्जंट जावं लागले. अगम्य सरांशी भेटणं ही झालं नाही म्हणून आज आवर्जून आलो आहे! तर वाड्याचा कायपालतच झालाय की! ” ते म्हणाले.

 

अहिल्याबाई,“ हुंम! तरीच आला नाहीस रे! अरे या दहा-बारा दिवसात काय काय झाले तुला तर माहीतच आहे की पहिल्यादा अभिज्ञावर हल्ला त्यात अगम्य जखमी झाला आणि ते कमी की काय म्हणून अगम्यवर पुन्हा हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलं बघ माझं पोर!म्हणून मीच सिक्युरिटी  ताईट केली आहे. मला कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं की माझ्या पोरांना मला असं सिक्युरिटीत ठेवावं लागेल. कोण माझ्या पोरांच्या जीवावर उठलय काय माहीत बाबा! 

 

गोखले,“हो तुमची कोणाशीच काहीच दुश्मनी नाही की मग अस कोण असेल जो जिवावर उठलाय सरांच्या आणि मॅडमच्या? बरं तब्बेत कशी आहे आता अगम्य सरांची?”  ते म्हणाले.

 

अहिल्याबाई,“ट्रीटमेंट सुरू आहे अगम्यची पण तब्बेत नरम-गरम आहे अजून! तो बोलत नाही पण चेहऱ्यावर दिसतात वेदना! अशक्तपणा आणि त्यात बी.पीचा त्रास आहेच की! डॉक्टर म्हणत आहेत त्याला पूर्ण आराम हवा रिकव्हर व्हायला अजून एक महिना लागेल.” त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या.

 

गोखले,“ हुंम असं ही गोळी लागण ही साधी गोष्ट नाही! काळजी घ्या त्यांची! कुठे आहेत ते! आराम करत असतील तर राहू दे मी भेटेन नंतर त्यांना!” ते म्हणाले. तो पर्यंत सखूने चहा आणि बिस्किटे आणून टीपॉयवर ठेवले. अहिल्याबाई त्याला चहा आणि बिस्किटाची डिश पुढे ठेवत म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“अरे  असं कसं तू  इतकं पुण्यावरून आलास भेटायला त्याला मग भेटूणच जा! सखु वर जाऊन अगम्यला आणि अभिज्ञाला गोखले आला आहे भेटायला. मी बोलवले आहे म्हणावं.” त्या म्हणाल्या आणि सखू वर गेली तिने दार वाजवले. दार तसे उघडेच होते. अभिज्ञा लॅपटॉपवर काम करत होती व अगम्य झोपला होता.तिने दार वाजवले आणि अभिज्ञा सखुला हळू आवाजात म्हणाली.

 

अभिज्ञा,“काय ग सखू?”

 

सखु,“ बाईसाब! गोखले वकील आले हाईत खाली तुमाला आणि धाकल्या धण्यासनी थोरल्या बाईसाबांनी त्यांना भेटायला बोलवले हाय!” ती हळू आवाजात  म्हणाली.

 

अभिज्ञा,“ ठीक आहे तू जा आम्ही आलोच म्हणून सांग!(ती म्हणाली आणि लॅपटॉप बंद केला. अगम्य जवळ जाऊन ती बेडवर बसत अगम्यला उठवत म्हणाली.) अमू उठ रे किती झोपणार अजून बघ सहा वाजले आहेत.” ती त्याचा हाताला हलवून बोलत होती.

 

अगम्य,“ वाजू देत! मला अजून थोडावेळ झोपू दे!”डोळे न उघडता तो तिचा हात त्याच्या हाताने उशाखाली घेत म्हणाला.

 

अभिज्ञा,“ अरे गोखले वकिल आले आहेत तुला भेटायला उठ बरं!” ती स्वतःचा हात काढून घेत म्हणाली.

 

अगम्य,“ तो आणि कशाला आला आहे ग! लोक झोपू पण देत नाहीत एक तर माझा हात खूप दुखतोय आज!” तो नाखुशीने उठत तोंड बारीक करून म्हणाला.  

 

अभिज्ञा,“लोक येणारच ना तुला भेटायला! बरं लगेच ये वर तू! तरी आऊने कोणालाच येऊ नका  तुला पूर्ण बेडरेस्ट सांगितला आहे  डॉक्टरने असं म्हणून लोकांना टाळले आहे! नाही तर रिघ लागली असती लोकांची! तुला आरामाची गरज आहे कळतं आम्हाला ही! पण आता गोखले अचानक आले आले आहेत त्यांना असं न भेटता पाठवणं बरं दिसत का? तू फ्रेश हो मी पुढे जाते!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ बरं मी येतो तू जा!” असं म्हणून तो बाथरूमकडे वळला.

 

      अभीज्ञा खाली आली आणि तिच्या पाठोपाठ अगम्य ही आला.

 

गोखले,“ कसे वाटतय सर आता तुम्ही बरे आहात ना?”त्यांनी विचारले.

 

अगम्य,“ मी ठीक आहे आता! बरं उद्या पासून तुम्ही ऑफिसला येताय ना?कारण अभिज्ञा आणि आऊ सगळंच सांभाळू नाही शकणार तुम्ही फॅक्टरी व्हिजिट केली तर बरं होईल! एक महिना तुम्हांला त्रास देतोय!” तो म्हणाला.

 

गोखले,“ अगम्य सर अहो मी ही या बिजनेस अँपायरचा एक छोटासा भाग आहेच की आपले संबंध माझ्या आणि तुमच्या वडिलांपासूनचे आहेत. तेंव्हा असं काय परक्या सारख बोलता आहात! मी घेईन सगळं सांभाळून तुम्ही काळजी करू नका! तुम्ही तुमची तब्बेत सांभाळा! बरं निघतो मी!” ते आपुलकीने बोलत होते.

 

अगम्य,“ हो! thanks गोखले तुम्ही असताना मला कसलीच काळजी नाही!” तो हसून म्हणाला.

 

 अहिल्याबाई,“ गोखले येत जा रे अधूनमधून!” त्या म्हणाल्या. आणि गोखले वकील निघून गेले.

 

 अगम्यचे तोंड पडलेले पाहून अहिल्याबाईनी अभिज्ञाला इशाऱ्याने विचारले काय झाले म्हणून अभिज्ञाने हात वारे करून अगम्यचा हात दुखतोय असे सांगितले. अगम्य सासुसूनेची खूनवाखूनवी पाहून काही बोलणार तर  अगम्यचा पडलेला चेहरा पाहून अहिल्याबाई म्हणाल्या. 

 

अहिल्याबाई,“ अमू जा अरामकर! आज जेवण ही वरच कर खाली यायची गरज नाही. अभी तू ही जा तुझं ही काम खोळंबले असेल ना!  या महिन्याचे सगळे रेकॉर्ड चेक कर म्हणजे दोन दिवसात कामगारांचे पेमेंट करता येतील उगीच उशीर नको व्हायला! मी चहा पाठवून देते दोघांचा!” त्या म्हणाल्या

 

अभिज्ञा,“ ठीक आहे आऊ!” असं म्हणून ती उठली आणि ती व अगम्यवर निघून गेले.


 

              अभिज्ञा लॅपटॉपवर  काम करत बसली आणि अगम्य बेडला टेकून बसला आणि अभिज्ञाला तो बोलू लागला.

 

अगम्य,“ अभी त्या शुगर फॅक्टरीचे इथेनॉल प्रोजेक्टचे काम व्यवस्थित सूरू आहे ना? आणि कामगारांचे पेमेंट वेळेवर होतील  याच बघ ग! नाही तर मी काही हेल्प करू का? आणि हो ते नवीन फूड प्रोडक्ट लॉन्ज करणार होतो आपण त्याची टेस्टिंग पण झाली आहे त्याच पुढचं काम सुरू आहे ना!” तो विचारत होता.


 

अभिज्ञा,“ किती प्रश्न विचारशील! हो सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि त्या नवीन फूड प्रोडक्टच म्हणशील तर ते काम आऊने तीन महिने पुढे ढकलले आहे. बाकी मी सांभाळून घेईन! तू ना अरामकर महिना भर त्या नंतर तुला कोण अडवणार नाही आणि तो पर्यंत त्या हल्लेखोराचा ही पत्ता लागेल आणि तुझ्या त्या स्वप्नांचा ही छडा लावता येईल! बरं आऊ मला विचारत होत्या की तू मला काही त्या स्वप्नांबद्दल सांगितले आहेस का मी म्हणाले की तो सगळ्यांना एकदम सांगेल! कधी सांगणार अमू तू ते?” तिने विचारले.

 

अगम्य,“ उद्या सांगेन मी सगळं असं ही तू माझा पिच्छा थोडीच सोडणार आहेस! ते जाणून घेतल्या शिवाय!” तो हसून म्हणाला.

 

त्यावर अभिज्ञा त्याला काही बोलणार तो पर्यंत  सखू चहा आणि नाष्टा घेऊन आली आणि तिच्या बरोबर अज्ञांक ही होता. अज्ञांक पळत येऊन बेडवर अगम्य जवळ बसला आणि सखू ट्रे ठेवून निघून गेली.अभिज्ञाने  अगम्यला चहा आणि नाष्टा देऊन बेडवर बसत अज्ञांकला विचारले.

 

अभिज्ञा,“ अदू नुसता खेळत होतास की होमवर्कपण केलास?आणि दूध पिलेस का स्कुल मधून आल्यावर”

 

अज्ञांक,“ हो ग आई! दूध पिले! होमवर्क ही केला आणि खेळलो ही!" तो अभिज्ञाला पाठीवरून गळ्यात हात घालून बोलत होता.

 

अभिज्ञा,“ मग माझा अदु आहेच good boy!” ती हसून म्हणाली.

 

अज्ञांक,“  पण आई हा बाबा ना लेझी झाला आहे खूप!” तो अगम्यकडे पाहत म्हणाला.

 

अगम्य,“ मी का लेझी रे आता!” त्याने हसून विचारले.

 

अज्ञांक,“ बघ तू नुसता झोपून असतोस आणि हॉस्पिटलमध्ये तर पाच दिवस झोपला होतास ना आणि ती आऊ आज्जी तर वेडीच आहे बघ..!” तो पुढे बोलणार तर अभिज्ञा त्याला रागवत म्हणाली.

 

अभिज्ञा,“ अज्ञांक मोठ्या माणसांबद्दल असं म्हणतात का?” तिचा चढलेला आवाज पाहून अज्ञांक अगम्य जवळ जावून बसला. अगम्यने अभिज्ञाला डोळ्यानेच गप्प राहा असे खुनावले आणि तो बोलू लागला.

 

अगम्य,“ अदू you are good boy and this is bad thing बच्चा मोठ्या माणसांना असं म्हणतात का? पण तुला का वाटत की आऊ वेडी आहे म्हणून?” त्याने समजावून सांगत त्याला विचारले.

 

अज्ञांक,“ sorry बाबा! मी नाही बोलणार परत असं!” तो खाली मान घालून म्हणाला.

 

अगम्य,“ that's like a good boy! पण आऊ वेडी आहे असं तुला का वाटलं रे?”त्याने पुन्हा विचारले आणि अभिज्ञाने अगम्यकडे रागाने पाहिले.ते पाहून तो म्हणाला“ अग  त्याला सांगू तरी दे त्याला असे का वाटते सांग आदू!” तो गोडीत म्हणाला.

 

अज्ञांक,“ अरे बाबा तू हॉस्पिटलमध्ये पाच दिवस झोपला होतास ना तेंव्हा आऊ आजीने बिचाऱ्या देव बाप्पाला पाण्यात ठेवले होते. पण देव बापाला पाण्यात ठेवण्या पेक्षा तिने तुझ्या अंगावर पाणी टाकले असते तर तू उठला नसतास का?” त्याने निरागसपणे विचारले.

 

      हे त्याचे बोलणे ऐकून दोघांना ही दोन मिनिटं काय बोलावे समजेना आणि नंतर ते दोघे एकदम हसायला लागले. हे पाहून अगम्य मात्र चिडला आणि तो बेडवरून उतरून जावू लागला. ते पाहून अभिज्ञाने त्याला उचलून घेतले आणि त्याला मांडीवर घेऊन बेडवर बसली. अज्ञांक तोंड फुगवून बसला होता आता अभिज्ञा त्याला मिठीत घेऊन बोलू लागली.

 

अभिज्ञा,“ माझं गोडुल ग ते! बच्चा अरे बाबा काय हॉस्पिटलमध्ये पाच दिवस झोपला नव्हता जर झोपायचे असते त्याला तर तो घरी झोपला नसता का? अरे त्याला लागलं होतं किनाय हाताला त्यामुळे तो पाच दिवस उठतच नव्हता रे म्हणूनच आऊ आज्जीला त्याची काळजी वाटत होती. तू कसा माझा छुटूला बच्चा आहे ना!असा तुझा बाबा पण आऊचा बच्चा आहे ना! म्हणून आणि बाबा काही लेझी नाही!बाबा किती काम करतो तुला स्कुलला सोडतो पण ना! त्याला आता बरं नाही ना म्हणून तो झोपतो! तू म्हणाला तर तो काम करेल करू दे त्याला काम पण त्याला त्रास होईल आणि त्याला अजून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल… ” ती असं त्याला समजावून सांगत होती तर अज्ञांक मध्येत म्हणाला.

 

अज्ञांक,“ नको नको हॉस्पिटलमध्ये नको अजून बाबाला त्याला झोपू दे मग तो बरा झाला की करेल की काम!sorry बाबा!” असं म्हणून त्याने अगम्यला मिठी मारली.

 

अगम्य,“ हुंम! माझा अदू शहाणा आहे! आई उगीच त्याला रागावते! बरं मग आऊ आज्जीला पण sorry म्हणणार ना अदू?” त्याने त्याचा पापा घेऊन विचारले.

 

अज्ञांक,“ हो मी आत्ता जातो आणि आजीला sorry म्हणतो” असं म्हणून तो निघाला ही.

 

अभिज्ञा,“ थांब मी सोडते पायऱ्या उतरवून!” ती म्हणाली.

 

अज्ञांक,“ मी लहान नाही आता! मोठा झालो ना मी जाईल माझा माझा!” तो तोंड फुगवून म्हणाला.

 

अगम्य,“ बरं जा!” तो हसून म्हणाला.

 

अभिज्ञा,“ काय हे अगम्य मी सोडते म्हणलं होत ना त्याला! जिन्याच्या पायऱ्या दगडी आणि जुन्या मोठ्या मोठ्या आहेत पडला म्हणजे तो!” ती काळजीने म्हणाली.

 

अगम्य,“ अग तो इथेच असेल अजून तू जा की त्याच्या मागे पण असं की त्याच त्याला वाटलं पाहिजे की तो स्वतःच उतरतो आहे.तू फक्त लक्ष ठेव! नाही तर  तोंड फुगवून बसेल तो!” तो म्हणाला आणि अभिज्ञा हळूच अज्ञांकच्या मागे गेली आणि त्याला शेवटची पायरी उतरू दिली आणि परत आली आणि म्हणाली.

 

अभिज्ञा,“ काय तर विचार करतो ना अदू आजी वेडी काय? तुला उठवायला पाणी टाकलं पाहिजे होत काय? तू  तू लेझी म्हणे!” असं म्हणून ती हसू लागली आणि अगम्य ही तिच्या हसण्यात सामील झाला.

 

अगम्य,“ पण काही म्हण पोरग हुशार आहे!” तो म्हणाला.

 

अभिज्ञा,“ माझ्यावर गेलाय तो!” ती नाटकीपणे म्हणाली.

 

अगम्य,“ अच्छा! असू दे!” असं म्हणून तो हसला.


 

           अभिज्ञाने कोणाला तरी फोन केला आणि ती अपसेट झाली होती. चेहरा ही उतरला होता तिचा अगम्यच्या हे नजरेतून सुटले नाही.अहिल्याबाई म्हणाल्या प्रमाणे रात्रीचे जेवण अगम्यने वरच केले.अभीज्ञा सगळ्यां बरोबर  जेवून आली.तिने अज्ञांकला अहिल्याबाईच्या रूममध्ये  झोपवले आणि ती रूममध्ये गेली.अगम्य तिचीच वाट पाहत होता. त्याला तिने मेडिसीन्स दिल्या आणि अगम्यने तिला विचारले.

 

अगम्य,“ काय झालंय अभी? तू खूप अपसेट दिसत आहेस?” त्याने विचारले.

 

अभीज्ञा,“ आपण कधीच सामान्य आयुष्य जगू शकणार नाही का रे अमू?” तिने बेडवर बसत भरल्या डोळ्याने त्याला विचारले.

 

अगम्य,“ म्हणजे? मला समजलं नाही?” तो  आश्चर्याने म्हणाला.

 

अभीज्ञा,“ म्हणजे अरे आपल्या लग्नाला अवघे एक वर्ष  पूर्ण झाले आणि प्रेग्नन्ट असताना तू त्या पेंटिंगमध्ये तीन वर्षे अडकला!  बाहेर आलास तो अत्यवस्थ होऊनच आणि आऊ आपल्या आयुष्यात आल्या. त्या नंतर त्या सूर्यकांतच्या आत्म्याशी  पुन्हा तुला लढावं लागलं. त्याला तू हरवलस पण पुन्हा तू जखमी झालास! त्यातून कसे बसे आपण सावरलो! आपण स्वप्नात ही विचार केला नव्हता इतके ऐश्वर्या आपल्याला मिळाले.पण मला दूर्बूध्दी सुचली आणि मी तुझ्याशी भांडून पुण्याला जाऊन राहिले पण माझा अपघात झाला आणि पुन्हा आपण एकत्र आलो!  पुन्हा तुझ्याकडून त्या सावटा बद्दल ऐकलं आणि पुन्हा मी घाबरले पुन्हा भांडण आणि तो गोळीबार झाला. तू पुन्हा जखमी झालास मला वाचवायला जावून! आणि हॉस्पिटलमध्ये पुन्हा तुझ्यावर हल्ला झाला!  श्रीमंती बरोबर त्याचे तोटे ही येतात.इन्स्पेक्टर मानेला फोन केला होता.अजून ही हल्लेखोर सापडले नाहीत.आणि अजून तुला पडणारी स्वप्ने  ते काय पुढे वाढून ठेवले आहे काय माहीत! असे किती दिवस अजून आपण  भीतीच्या सावटा खाली जगायचं अगम्य! हे दुष्टचक्र केंव्हा संपणार आपल्या मगच?” असं म्हणून ती अगम्यला मिठी  मारून रडू लागली.

 

अगम्य,“ अग भ्यायच कशाला ग इतकं! आपल्या आयुष्यात इतकं सगळं घडलं पण आहोत ना आपण एकमेकां बरोबर! यातच सगळं आलं अभी अग तो हल्लेखोर आज नाही तर उद्या पकडला जाईलच की आणि स्वप्नांचे म्हणशील तर माझ्या मनात भीती बसली त्या प्रसंगाची म्हणून कदाचित पडत असतील मला स्वप्नं! बरं खरंच पुढे काही अजून घडणार असेल तर मागे लढलो आणि जिंकलो असे आता ही जावू की सामोरे आपण त्या संकटाला! तू आहेस ना बरोबर माझ्या मग झालं तर! उगीच काही तरी विचार करून अपसेट होऊ नकोस आणि मी उद्या सांगणार आहे सगळं मग ठरवू काय करायचं ते!आणि हे रडणं आधी थांबवं!” तो तिचे डोळे पुसत तिची समजूत काढत होता.

 

अभीज्ञा,“ इतकं सोप आहे का हे सगळं अमू! अरे आपण दुहेरी संकटात आहोत एक तर मानवी आहे ज्याच्याशी दोन हात करायला पोलीस आहेत आपल्या बरोबर पण दुसरे अमानवी आहे अमू! ज्यातून तू दोनदा मरता मरता वाचला आहेस! मला खूप भीती वाटते या सगळ्यांची!” ती बोलत होती.

 

अगम्य,“ होईल सगळं ठीक अभी! आपण लढूया सगळ्यांशी तू आहेस ना मग झालं तर!पण ना आज माझा फायदाच झाला तुझ्या अपसेट होण्याचा!”तो  तिला पाहत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ हुंम! आपण लढू ही आणि जिंकू ही!पण माझ्या अपसेट होण्याचा तुला काय फायदा झाला रे?” तिने डोळे पुसून विचारले.

 

अगम्य,“ तू आज माझ्या तावडीत सापडली बघ! आता तुला नाही सोडणार!” असं म्हणून त्याने तिला अजून घट्ट मिठी मारली.

 

अभीज्ञा,“ अच्छा! इतक्या टेन्शनमध्ये ही तुला रोमान्स कसा सुचतो रे! आणि आज तर तुझा हात दुखत होता ना?” तिने स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत विचारले.

 

अगम्य,“ सुचतो आता! मला कसा माहीत नाही! आणि हात ना माझा दुखत होता आता थांबला आहे!” असं म्हणून त्याने तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि अभीज्ञा त्याच्या कुशीत शिरली.

 

                  अगम्यच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजून आणि त्याच्या आश्वाक शब्दांनी थोडी का होईना रिलॅक्स होऊन अभिज्ञा  अगम्यच्या कुशीत निश्चिन्त झोपली होती पण अगम्य मात्र जागाच होता कारण त्याने अभिज्ञाला आश्वासन तर दिले होते की सगळं ठीक होईन! तरी अगम्य आतून  खूपच जास्त अस्वस्थ आणि चिंतित होता. कारण त्याला ही हे माहीत होतं की हे सगळं इतकं सोपं नाही. एक तर आता प्रश्न त्याच्या एकट्याच्या जीवाचा नव्हता कारण हे संकट एक नव्हते तर दुहेरी होते. आणि दोन्ही संकटात त्याच्या बरोबर त्याच्या कुटूंबाला ही धोका होता. खास करून अभिज्ञाला एकदा त्याने अभिज्ञाला वाचवले होते पण त्या आधीचा अपघात तो विसरला नव्हता. त्यात अभिज्ञाला काही झाले असते किंवा तो बस स्टॉपवर वेळेवर पोहोचला नसता आणि वेळीच सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला नसता तर काय झाले असते हा विचार त्याला भेडसावत होता. या सगळ्या विचारानेच कदाचित त्याचा बी.पी. अजून ही कमी होत नव्हता.  हा सगळा विचार करत त्याला रात्री कधी तरी झोप लागली होती.


 

    अगम्य त्याला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल  काय सांगणार होता? जे त्याने इतके दिवस सगळ्यां पासून  लपवून ठेवले होते! आणि त्यांचा नवीन कोण हितशत्रू निर्माण झाला होता? जो अशे छुपे जीव घेणे हल्ले अगम्य आणि अभिज्ञा वर करत होता?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

 

(Sorry for late  guys)


 

 


 

 

 

          


 

 
 

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे