May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग ७)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग ७)

    हे सगळं अभीज्ञा आणि अभीज्ञाच्या आईकडून ऐकून अहिल्याबाई मटकन खुर्चीवर बसल्या. अभीज्ञाच्या आईने त्यांची चांगलीच कान उघाडनी केली होती.अहिल्याबाई इतक्या पोक्त आणि  विचारी असून त्या त्यांच्याच मुलाशी अविचारीपणे वागल्या होत्या.त्यांनी अगम्यला एकदा ही विचारले नव्हते की तू अभीज्ञाला जा का म्हणालास!एवढंच काय पण अगम्य चोवीस तासात रूम  मधून बाहेर आला नाही आणि त्याने काही खाल्ले-पिल्ले नाही. हे माहीत असून ही  त्यांनी रामुला पाठवले पण त्याची विचारपूस स्वतः जावून केली नाही.त्याला खाण्याचा आग्रह ही केला नाही कि त्याची समजूत ही घातली नाही.या सगळ्याचा विचार करून मनातून त्या स्वतःलाच दोष देत होत्या. अभीज्ञाने त्यांना असे शांत बसलेले पाहिले व ती त्यांच्या जवळ जात बोलू लागली.

 

अभीज्ञा,“ आऊ मला माफ करा माझीच चूक आहे !” ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ नाही ग अभी मी आई असून त्याला समजून घेतले नाही तर तुझा तर काय दोष देणार ग! मी आई म्हणून कुठे तरी कमी पडले. सुधाताई खरं बोलत आहेत.त्या काल ही मला म्हणाल्या होत्या की मी तुमच्या दोघांमध्ये काय झाले ते न विचारता त्याला दोष दिला.खरं तर गेल्या दोन वर्षात मला अगम्यला काही तरी त्रास होत आहे हे कळायला हवे होते.मी त्याच्या बरोबर राहून ही ते मला नाही कळले म्हणजेच मी आई म्हणून कमी पडले बघ!”त्या शांतपणे बोलत होत्या.

 

बाबा,“ ताई तुम्ही आणि सुधा घरी जा असं ही दोन व्यक्ती शिवाय इथे कोणाला ही थांबू देणार नाहीत मी आणि अभी आहोत इथे काही झालंच अगम्य शुध्दीवर आला की तुम्हाला कळवतो. आदु ही घरी साखुबईंकडे आहे.तो अजून झोपला असेल पण आपण कोणाचं दिसलो   नाही तर रडून रडून   हैराण होईल.मी सगळ्या लोकांना घालवतो मग तुम्ही ही निघा!” ते म्हणाले.

 

अहिल्याबाई,“ मी नाही जाणार कुठे अम्युला सोडून!” त्या म्हणाल्या. 

 

आई,“ ठीक आहे मग मी जाईन  ड्रायव्हर बरोबर कारण आदूला  एकट्याला सोडून चलानार नाही. अभी मला फोन करून कळव!”असं म्हणून त्या अभिज्ञाच्या बाबां बरोबर निघून गेल्या.

 

      एव्हाना पहाटेच्या सहा वाजल्या होत्या आणि अंधाराची चादर उलगडून सृष्टी प्रकाशाचे लेणे लेवून नटत होती. इकडे सगळी सृष्टी उजळून निघत होती पण  येणारा  दिवस अभिज्ञा आणि अहिल्याबाईंच्या आयुष्यात काय घेऊन येणार होता हे येणारा काळच ठरवणार होता.

★★★★

 

          आज  तीन दिवस होऊन गेले तरी अगम्य शुध्दीवर आलेला नव्हता. सगळ्यांचा धीर खचत  चालला होता. अहिल्याबाईनी तर देव पाण्यात ठेवले होते. त्यांच्या डोळ्याचे पाणी तुटत नव्हते. अगम्यच्या तब्बेतीत थोडीही सुधारणा नव्हती. अभिज्ञाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. ती दिवस रात्र अगम्य जवळ बसून होती. तिच्या बरोबर तिचे बाबा आणि गोखले वकील होते. आजचा दिवस तरी अगम्यला  शुध्द यावी  म्हणून  सगळे मनोमन प्रार्थना करत होते पण आजचा  ही  दिवस मावळतीकडे झुकत चालला होता पण अगम्यने मात्र आज ही डोळे उघडले नव्हते.इन्स्पेक्टर मानेनी  दोन कॉन्स्टेबल पाठवून दिले होते. ते अहो रात्र पहारा देत होते. अभिज्ञा खुर्चीत अगम्य जवळ बसून होती आणि तिचे बाबा आणि गोखले वकील बाहेर बसून होते. अभिज्ञा  वॉशरूमला जायचे म्हणून  I.C.U. च्या बाहेर पडली तर एक कॉन्स्टेबल तिच्या बरोबर गेला आणि दुसरा तिथेच थांबला. तो पर्यंत एक सफाई कामगार तोंडाला मास्क आणि हॅन्ड ग्लोज घालून सफाई करण्यासाठी म्हणून आत गेला. कॉन्स्टेबलने  त्याला विचारले ही की काय काम आहे तर त्याने सफाई करायची आहे असे सांगितले. कॉन्स्टेबलने त्याला  आत सोडले.  अभिज्ञा आली तेव्हा तो सफाई कर्मचारी ऑक्सिजन सिलेंड जवळ घुटमळताना  तिला दिसला तिने मागून त्याला आवाज दिला आणि विचारले

 

अभिज्ञा,“ तिथे कसली सफाई करताय किती वेळ झाले?”

   

    हे ऐकुन तो माणूस दचकला आणि म्हणाला.

 

माणूस,“ ही काय झालीच!” असं म्हणून तो समान घेवून गडबडीत निघून गेला.

    

         अभिज्ञाला त्याचे वागणे विचित्र वाटले. म्हणून ती  ऑक्सिजन सिलेंडर जवळ गेली तिला खाली ब्लेड पडलेला आणि ऑक्सीजन सिलेंडरची नळी कट झालेली दिसली. तो पर्यंत अगम्यला श्वास घायला त्रास होऊ लागला. अभिज्ञाने ते पाहिले आणि तिने  घाबरून बाहेर येवून डॉक्टरांना हाक मारली आणि कॉन्स्टेलला म्हणाली 

 

अभिज्ञा ,“ सफाई कामगार म्हणून आलेल्या त्या व्यक्तीने अगम्यला मारण्याचा प्रयत्न केला आहे पकडा त्याला!”ती ओरडली.

 

    तसे दोन्ही कॉन्स्टेबल बाहेर धावले आणि डॉक्टर आणि नर्स अगम्यकडे धावले अभिज्ञा आत होती आणि अभिज्ञाचे बाबा आणि गोखले वकील काचेतून काय चालले आहे ते पाहत होते.डॉक्टरांनी लगेच दुसरे ऑक्सीजन सिलेंडर मागवून अगम्यला लावले आणि अगम्य थोड्या वेळात स्टेबल झाला. कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला खूप शोधले पण नुसत्या कापड्यावरून त्या व्यक्तीला शोधणे खूप अवघड होते. कारण तोंडाला मास्क असल्याने त्याचा चेहरा कोणीच पाहिला नव्हता. कॉन्स्टेबलने इन्स्पेक्टर मानेला घटनेची माहिती दिली.ते तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि हॉस्पिटलधील cctv कॅमेराच्या मदतीने तपास सुरू केला. घडलेल्या प्रकाराने अभिज्ञा मात्र खूप घाबरली होती. अगम्यवर झालेल्या हल्ल्याची माहिती अहिल्याबाईना  देणे क्रमप्राप्तच होते. हे कळताच त्यांनी व अभिज्ञाच्या आईने हॉस्पिटलकडे धाव घेतली. पहिल्यादा अभिज्ञावर गोळी बार करण्याचा प्रयत्न त्यानंतर तिला वाचवताना  जखमी  झालेल्या अगम्यवर अशा  प्रकारे हल्ला यावरून हे स्पष्ट होते  की दोघांच्या ही जीवाला धोका आहे आणि अगम्य अशा अवस्थेत असल्याने त्याच्या जीवाला जास्तच! खरं तर अहिल्याबाई आणि त्यांच्या कुटूंबाला या सर्वाचा खूप मोठा धक्का बसला होता कारण  अहिल्याबाई स्वतः आणि मागच्या तीन-चार वर्षांपासून म्हणजेच अगम्य  गावात आल्या पासून ते कधीच कोणाच्या वाकड्यात शिरले नव्हते. केले तर लोकांचे भलेच केले होते. त्यामुळे संशय ही कोणावर घेता येत नव्हता. अभिज्ञा आता तर अगम्यला एक क्षण ही एकट सोडत नव्हती ती कुठे गेलीच तर तिच्या बाबांना अगम्य जवळ बसवून जात असे. या सगळ्याचे टेन्शन तर होतेच आणि दुसरे म्हणजे आज पाच दिवस झाले तरी अगम्य अजून शुद्धीवर आला नव्हता त्यामुळे त्याच्या तब्बेतीची चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. आता अभिज्ञा आणि अहिल्याबाईचा ही धीर सुटत चालला होता. 

 

                          अभिज्ञा तिथेच अगम्य जवळ बसून होती  रात्रीचे साधारण साडेबारा वाजले होते. अभिज्ञाची अशी ही दोन दिवसांपूर्वीच्या घटनेने झोप उडाली होती. ती  पुस्तक  वाचत बसली होती आणि तिला अचानक अगम्यची हालचाल झालेली दिसली. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला अगदी हळूच हाक मारली. अगम्यने डोळे उघडले आणि अभिज्ञाच्या डोळ्यातून आनंद अश्रू  वाहू लागले. तिने बेल दाबली आणि नर्सला बोलवून डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टरांनी अगम्यला तपासले आणि तो ठीक आहे असे सांगितले. अभिज्ञाचे बाबा त्याला भेटायला आत गेले आणि अभिज्ञाने बाहेर येऊन अहिल्याबाईना  फोन लावला. अहिल्याबाई जाग्याचं होत्या. फोनवर अभिज्ञाचे नाव पाहून त्या घाबरल्या कारण अभिज्ञाचा फोन येण्याची ही वेळ नव्हती तिने नऊ वाजताच फोन करून झाला होता. आता काय ऐकायला मिळणार या धास्तीनेच त्यांनी फोन उचलला आणि अभिज्ञा काही बोलायच्या आतच त्यांनी  विचारले

 

अहिल्याबाई, “ अभी अमू ठीक आहे ना त्याला काही…” पुढचे शब्द उरभरून आल्यामुळे घशातच राहिले.

 

अभिज्ञा,“ आऊ अगम्यने डोळे उघडले आहेत आणि तो ठीक आहे.” ती आनंदाने म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ काय? मी आत्ताच निघते मला त्याला पाहायचं आहे त्याच्याशी बोलायचं आहे अभी!” त्या बोलत होत्या.

 

अभिज्ञा,“आऊ आहो एक वाजला आहे तुम्ही आणि आई  आज्ञांकला घेऊन उद्या या आणि आईला ही सांगा! ती माझ्याशी बोलत नाही तसं ही बाबा सांगतील तिला फोन करून पण तुम्ही ही सांगा तिला बरं वाटेल!” ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ हो सांगते मी त्यांना आणि उद्या सकाळी सकाळी येतो आम्ही! अभी तो काही बोलला का ग तुझ्याशी!” त्यांनी न राहवून विचारले.

 

अभिज्ञा,“नाही वो आऊ म्हणजे वेळच नाही मिळाला. अजून तो शुद्धीवर आला आणि मी डॉक्टरांना बोलवून घेतले डॉक्टर तो ठीक आहे म्हणून सांगून गेले. बाबा त्याच्या बरोबर आहेत आणि मी तुम्हांला फोन केला आहे!”ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ ठीक आहे!पण अभी त्याला एकट सोडू नकोस त्या दिवशीच्या घटणेपासून  मला खूप भीती वाटते ग! तुम्ही दोघे  एकदा सुखरूप घरी आला की माझा जीव भांड्यात पडला बाई! असं ही मी जो पर्यंत हल्लेखोर पकडला जात नाही तो पर्यंत तुमच्या दोघांसाठी बॉडीगार्ड अपॉइंट करून ठेवले आहेत! देवच पावला बघ माझं पोर आलं शुद्धीवर!” त्या भावनिक होऊन बोलत होत्या.

 

अभिज्ञा,“ हो मी नाही सोडणार अगम्यला एकट्याला! आणि झोपा आता निवांत गेल्या पाच सहा दिवसात तुम्ही नीट झोपला नाहीत!” असं म्हणून तिने फोन ठेवला आणि आत गेली.

 

       अभीज्ञाच्या बाबांनी तिला पाहिलं आणि हाताने मी बाहेर आहे असा इशारा करून ते गेले.अभीज्ञा अगम्य जवळ जाऊन बसली. त्याने तिला  जवळ बसलेले पाहिले आणि तो बोलू लागला.

 

अगम्य,“  I am sorry अभी मी तुला जा म्हणून सांगायला नको होतं पण मी तुला ते रागाच्या भरात बोललो होतो!तुला ऐकायचं होत ना सगळं की मी काय लपवल होत ते…..” तो पुढे बोलणार तर अभीज्ञाने भरल्या डोळ्याने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आणि त्याला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ हे बघ तू फक्त आरामकर बाकी कसला ही विचार नको करूस प्लिज”

 

अगम्य,“ पण तूच म्हणालीस ना की तुला सत्य जाणून घ्यायचं आहे आणि तुझा जाण्याचा निर्णय बदलला नाहीस! तू तातपूर्ती थांबते आहेस अदुसाठी!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ तू शांत राहतोस का जरा..”तो पर्यंत एक वोर्डबॉय ज्यूसचा ग्लास घेऊन आला आणि म्हणाला.

 

वोर्डबॉय,“मॅडम  डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेच असेल की पेशन्टला ज्यूस द्या तुमच्या बाबांनी ऑर्डर दिली होती. तो घेऊन आलोय!” तो पर्यंत अभीज्ञाचे बाबा तिथे आले आणि त्यांनी या सगळ्या बोलण्याला दुजोरा दिला आणि वोर्डबॉय आणि ते निघून गेले.

 

        अभीज्ञाने ज्यूसचा ग्लास घेतला.त्यातला एका चमच्याने थोडा पिऊन पाहिला आणि अगम्यला उठवून बसवले आणि त्याच्या समोर ज्यूस धरला.अगम्य तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि त्याने विचारले.

 

अगम्य,“ तू ज्यूस टेस्ट का केलास? बाबा ही येऊन त्या वोर्डबॉयच्या बोलण्याला दुजोरा देऊन गेले.तो पर्यंत तू हा ग्लास हातात ही घेतला नाहीस! काय चालेले आहे तुमचे?” तो बोलला पण  त्याला विकनेसमुळे  दम लागल्या सारखे झाले.

 

अभीज्ञा,“ झालं तुझं! सांगितले होत ना जास्त बोलू नकोस म्हणून थोडं शांत राहा ना!  आत्ताच उठलास ना तुला सगळंच कसं जाणून घ्यायचे असते रे! तोंड बंद कर आणि ज्यूस पी आणि झोप आता!” ती चिडून म्हणाली.

 

अगम्य,“ तोंड बंद करून कसा पिणार ज्यूस मी?” तो तिला तिरकस पाहत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ very bad jock!हे खूप जुनं झालं आहे!” ती त्याला ज्यूस पाजत म्हणाली.अगम्यने ज्यूस पिला आणि तो म्हणाला

 

अगम्य,“ आऊ कुठे आहे ग? माझ्यावर खूप चिडली आहे ती? आणखीन एक अभी इन्स्पेक्टर म्हणत होते ते बरोबर आहे तुझा अपघात नव्हता तो घातपात होता. कारण तसं नसत तर तुझ्यावर हा हल्ला झाला नसता!”तो थांबून थांबून एक एक वाक्य बोलत होता.

 

अभीज्ञा,“ तुला एकदा सांगितलेले कळत नाही का अमू! एक तर किती दिवस झाले तुझ्या पोटात अन्न नाही….” ती काळजीने म्हणाली आणि मध्येच चुकीचं बोलल्या सारखी थांबली कारण अगम्यला तो किती दिवस बेशुद्ध होता हे माहीत नव्हते.

 

अगम्य,“ काय म्हणालीस ? पण मला खूप विकनेस जाणवत आहे!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ काही नाही. विकनेस जाणवते ना मग शांत राहा ना बाबा जरा!आणि आऊ आल्या ना की विचार हो की तुझ्यावर अजून राग आहे का ते? आता मात्र शांत बस! नाही तर तुझ्या तोंडाला चिकट पट्टी लावीन!” ती वैतागून म्हणाली.

 

अगम्य,“  आऊला मी विचारीन पण तुझा गेला का नाही राग? का जाणार आहेस औरंगाबादला?”तिरकस पाहत त्याने विचारले.

 

     हे ऐकून अभीज्ञा मात्र स्वतःला रोखू शकली नाही आणि तिने त्याला मिठी मारली आणि रडत बोलू लागली.

 

अभीज्ञा,“ मी नाही जाणार कोठे आणि तुला ही नाही जाऊ देणार!I am sorry अमू! I love you!” ती रडत हे सगळं बोलत होती.


 

         आणि अगम्यला मात्र आश्चर्य वाटत होते की इतक्या लवकर म्हणजे सात-आठ तासात अभीज्ञामध्ये इतका बदल कसा कारण त्याला अजून ही कल्पनाच नव्हती की तो पाच दिवस बेशुद्ध होता आणि त्या दरम्यान काय-काय झाले या सगळ्याची!

 

अगम्य,“ अभी सात-आठ तासात काय झालं असं?का मला गोळी लागली म्हणून घाबरलीस ग पण मला नाही काही झालं इतकं दंडाला गोळी लागून माणूस मारत नसतो हे तुला ही माहिती आहेच की!” त्याने विचारले.

 

अभीज्ञा,“ हे बघ तू आरामकर  आपण बोलू नंतर सगळं! आणि एकच लक्षात ठेव तू आता मला जा म्हणालास तरी मी जाणार नाही आणि तुला ही जाऊ देणार नाही समजलं!” ती डोळे पुसत खुर्चीवर बसत म्हणाली.

 

अगम्य,“ अच्छा! पण मी कुठेच जाणार नव्हतो.” तो म्हणाला आणि अभीज्ञाने त्याच्यावर एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकला तसा तो गप्प बसला आणि त्याने डोळे झाकून घेतले. हे पाहून अभीज्ञा गालातल्या गालात हसली.

 

        अगम्य थोड्याच वेळात झोपला आणि अभिज्ञा ही झोप लागली. ती उठली ती अहिल्याबाईंच्या तिला हवण्याने. अहिल्याबाई आणि अभिज्ञाची आई सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमध्ये हजर होत्या. अभिज्ञा उठली. अगम्य अजून गाढ झोपेत होता. अहिल्याबाई अगम्य जवळ गेल्या आणि त्यांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. थोडावेळ अगम्यला पाहिले आणि त्या व अभिज्ञा कसला ही आवाज न करता बाहेर निघून गेल्या. अहिल्याबाईनी अभिज्ञाला विचारले.

 

अहिल्याबाई,“ डॉक्टर काय म्हणाले ग अभिज्ञा? अगम्यची तब्बेत कशी आहे आता?” त्या काळजीने म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ नाही  वो आऊ अजून काहीच बोलणं झालं नाही डॉक्टरांशी कारण डॉक्टर काळे काल रात्री नव्हते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ज्युनिअरनी अगम्यला चेक केले आणि त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून अगम्यच्या तब्बेती विषयी चर्चा करून आम्हांला अगम्य फक्त ठीक आहे इतकच सांगितले आहे. आता डॉक्टर काळे जेंव्हा राउंडला येतील तेंव्हा आपल्याला सगळं कळेल. आणखीन एक अगम्यला अंदाजच नाही की तो किती दिवस बेशुद्ध होता. त्याला वाटत आहे की तो फक्त सात-आठ तास म्हणजे एक रात्र बेशुद्ध होता. जो पर्यंत डॉक्टर काळे त्याला तपासून आपल्याला  काही सांगत नाहीत तो पर्यंत त्याच्याशी या बाबत काही बोलू नका.मी आणि बाबा ही त्याला काहीच बोललो नाही आहोत किंवा तो इतके दिवस बेशुद्ध होता हे त्याला जाणवू दिल नाही!” ती म्हणाली.

 

 

अहिल्याबाई,“ठीक आहे.” त्या असं म्हणाल्या आणि तिघी ही आत गेल्या.

 

           तर अगम्य जागा झाला होता.त्यांना पाहून तो हसून म्हणाला.

 

अगम्य,“ झाली का तिघींची खिचडी शिजवून?”

 

      तिघी ही आश्चर्याने एकमेकींना पाहत होत्या. तरी अहिल्याबाई सावरून घेत म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ म्हणजे तू जागा झाला होतास तर! आणि आम्ही काय खिचडी शिजवणार रे! बरं अमू तुला कसं वाटतंय आता?” त्यांनी त्याच्या जवळ जाऊन  प्रेमाने गालावरून हात फिरवत विचारले.

 

अगम्य,“मी ठीक आहे आऊ! पण इकडे ही प्रेमाचा ओहर डॉस कसा काय? ज्या सासु-सुना काल माझ्यावर खार खाऊन होत्या त्या अचानक एका रात्रीत इतक्या बदलल्या काय जादू झाली की माझ्यावरचा राग एकदम निवळला! काय आई काही माहिती तुम्हांला असेल तर गरिबाला सांगा जरा!” तो म्हणाला.

 

आई,“ अरे तुला गोळी लागली अमू म्हणून दोघींचे हृदय परिवर्तन झाले असे समजायला काही हरकत नाही बेटा!शेवटी काही ही झालं तरी मी तुझ्याच टीम मधली हो!”  त्या हसून म्हणाल्या.


 

अहिल्याबाई,“ झालं अमू तुझं तिरकस बोलून! काही ही झालं तरी तुझी चिंता आहे ना आम्हांला! किती घाबरलंस आम्हाला!तुला काही झालं असत म्हणजे!” त्या काळजीने म्हणाल्या.

 

अगम्य,“ oh come on आऊ! दंडाला गोळी लागल्यावर कोणी मरत नाही! त्यात चिंता करण्या सारखे काय आहे! मी ठणठणीत आहे आणि मी म्हणाल्या प्रमाने तुझ्या सुनेला माघारी आणले आहे. आता तरी गेला ना राग माझ्यावरचा? पण तुमच्या दोघींना मी चांगलं ओळखतो काही तरी मोठं झाल्या शिवाय तुम्ही इतक्या सहजासहजी माघार घेणार नाही! तुम्ही काय लपवत आहात माझ्या पासून?” तो  दोघींकडे संशयाने पाहत म्हणाला.

 

अभिज्ञा,“ अगम्य तुला गोळी लागली आणि तू या हॉस्पिटलमध्ये I. C. U. मध्ये आहेस हे कारण तुला छोटं वाटत का रे? आणि तू चुकलास पण मी ही बरोबर नाही वागले मी खूप आततायीपणा केला. जो मी  करायला नको होता! बरं मी तुला आत्ता काय खायला द्यायचे ते विचारून आणि डॉक्टर काळे आले आहेत का ते ही पाहून येते.” ती आवंढा गिळत म्हणाली व  निघून गेली.

 

अगम्य,“ ते पण आहेच म्हणा!  तो शूटर मला भेटला ना तर त्याचे आभारच मानीन मी पहिल्यांदा त्याच्यामुळे  मी आज सासू-सुनेच्या तावडीतून सुटलो नाही तर काही खरं नव्हतं माझं!” तो हसून म्हणाला.


 

अहिल्याबाई,“ अमू उगीच काही तरी बोलू नकोस! तुला इतकं सोपं वाटत का रे हे सगळं? एक तर आमचा जीव रडकुंडीला आणलास! तुला गोळी लागण ही इतकी सोपी गोष्ट वाटते का?  स्वतःची अवस्था बघ जरा आणि शूटरचे आभार मानायला मी बरी जावू देईल तुला पुन्हा त्याच्या समोर! कोणत्याही गोष्टीची मस्करी करू नये माणसाने! या गोष्टी मस्करी करण्या सारख्या आहेत का?” त्या चिडून म्हणाल्या

 

अगम्य,“ हुंम!सॉरी आऊ! पण ते लोक  गोळी अभिज्ञावर झाडणार होते! म्हणजे अभिज्ञाच्या जीवाला धोका आहे!...” तो पुढे काही बोलणार तर डॉ. काळेला घेऊन अभिज्ञा आली.बाहेर इन्स्पेक्टर माने अगम्यचा जबाब घेण्यासाठी  डॉक्टरच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत होते.अभिज्ञा बाहेर पडली तेंव्हाच ते आले होते.डॉ.काळेंनी सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितले आणि ते अगम्यला तपासून थोड्याच वेळात  बाहेर आले आणि अभिज्ञाला म्हणाले.


 

डॉ.काळे,“ मिसेस देशमुख मिस्टर देशमुख आता ठीक आहेत तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना देवू शकता आणि हो इन्स्पेक्टर तुम्ही त्यांचा जबाब नोंदवू शकता!” ते म्हणाले आणि इन्स्पेक्टर आत गेले

 

अहिल्याबाई,“ डॉक्टर मला आता माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नाही ठेवायचे तुम्हांला तर माहीतच आहे की दोन दिवसां पूर्वी त्याच्यावर हल्ला झाला आहे. तो बेशुद्ध होता म्हणून मी शांत होते कारण मी त्याला तशा अवस्थेत घरी नेवू शकत नव्हते पण आता तो बरा आहे पुढची त्याची ट्रीटमेंट घरी सुरू करा कारण मला इथे तो सुरक्षित वाटत नाही. घरी तो जास्त सुरक्षित राहील. प्लिज आज त्याला डिशचार्ज दिलात तर बरं होईल.” त्या म्हणाल्या.

 

डॉ.काळे,“ ठीक आहे. मिस्टर देशमुख आता ठीक आहेत तरी ही त्यांची काळजी घ्यावी लागेल खूप! त्याचा बी.पी. अजून म्हणावा तसा कमी झालेला नाही आणि त्यांना बराच विकनेस आहे.मी आज त्यांना संध्याकाळी डिशचार्ज देईन आणि मिसेस देशमुखांना सगळ्या गोष्टी समजावून सांगेन! आणि हो तुम्हीं त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना देवू शकता.ते पाच दिवस बेशुद्ध होते आणि त्या दरम्यान काय-काय झाले वगैरे!” ते असं म्हणून निघून गेले.

 

      अभिज्ञाचे बाबा आज्ञांकला घेऊन खालीच थांबले होते. इकडे इन्स्पेक्टर माने अगम्यला प्रश्न विचारत होते.आणि एक कॉन्स्टेबल अगम्यची उत्तरे लिहून घेत होता व स्वतः माने त्यांचा संवाद रेकॉर्ड करत होते.

 

इन्स्पेक्टर माने,“how are you Mr. Deshmukh?” त्यांनी विचारलं.

 

अगम्य,“ I am fine!”

 

इन्स्पेक्टर माने,“ सगळा घटनाक्रम मला मिसेस देशमुखनी सांगितलं आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त मोजके प्रश्न विचारतो. तुम्हाला कसं कळलं की ते दुचाकीस्वार अभिज्ञा देशमुखवरच गोळ्या झाडायला आले आहेत?”त्यांनी विचारलं.

 

अगम्य,“ मी घरी जाण्यासाठी टॅक्सी पाहत होतो तेव्हा मला ते दोन दुचाकीस्वार दिसले दोघांनी ही हेल्मेट घातले होते.सहजच माझे लक्ष मागच्या व्यक्तीकडे गेले तर त्याच्या हातात कापडात गुंडाळलेली बंदूक दिसली म्हणून मी मागे वळून पाहिले तर ते अभिज्ञाच्या दिशेने जाताना मला दिसले. जी माझ्या पासून थोडी दूर उभी होती पण तिच्या आसपास कोणीच नव्हतं हे पाहून माझ्या लक्षात आलं की कदाचित ते अभिज्ञावरच हल्ला करायला आले असावेत म्हणून मग मी धावत तिच्या जवळ पोहोचलो पण मी पोहोचे पर्यंत त्या व्यक्तीने बंदूक अभिज्ञावर रोखली होती म्हणून मी तिला दोन्ही हात धरून  तिथून हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीने गोळी झाडली. अभिज्ञा आणि मी खाली पडलो आणि ते दोघे आले तसे वाऱ्याच्या वेगाने निघून गेले. या सगळत माझ्या दंडाला मात्र गोळी लागली.मग गर्दी जमा झाली आणि कोणी तरी ऍब्युलन्स बोलावली. मी हॉस्पिटलमध्ये येवू पर्यन्त शुद्धीवर होतो त्यानंतरचे मात्र मला काहीच माहीत नाही”त्याने सविस्तर माहिती दिली.


 

इन्स्पेक्टर माने,“ त्या हल्लेखोरांचे चेहरे किंवा त्या मोटरसायकलचा नंबर तुम्ही पाहिलात का?” त्यांनी विचारले.

 

अगम्य,“ त्याचे चेहरे मी नाही पाहिले कारण त्या दोघांनी ही हेल्मेट घातले होते पण त्याच्या मोटरसायकलचा नंबर मात्र मी पाहिला आहे RJ-01 0013 असाच काहीसा होता नंबर इतका नाही आठवत पण असाच होता” तो आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

 

इन्स्पेक्टर माने,“ ठीक आहे.तुमचा कोणावर संशय?” त्यांनी विचारले.

 

अगम्य,“ नाही कारण माझं किंवा माझ्या घरातील कोणाचेच कोणाशी ही असं वैर नाही कारण मी आणि माझी फॅमिली या चार-पाच वर्षात श्रीरंगपूरला आलो आहोत आणि आधी औरंगाबादमध्ये होतो तर तिथे ही आमचं कोणाशी शत्रुत्व असण्याचे कारण नव्हते कारण मी आणि माझी मिसेस पुरातत्व खात्यात ऑफिसर होतो आणि माझे सासू प्रोफेसर आणि सासरे बँकर होते आणि माझ्या आई बद्दल तर तुम्हांला माहीतच आहे त्यांनी कधीच कोणाशी शत्रुत्व घेतले नाही केली तर सामाजिक कार्य केली आणि माझ्या वडिलांचा बिझनेस मेहनतीने वाढवला आहे!” त्याने सांगितले.

 

इन्स्पेक्टर माने,“ ठीक आहे. Take care!आणि गरज लागलीच तर पुन्हा भेटूच आणि आम्ही हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू!” असं म्हणून ते निघून गेले.


 

            इन्स्पेक्टर माने निघून गेले. अभिज्ञाला अहिल्याबाई म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ अभी तूच सगळी कल्पना अगम्यला दे! तो पर्यंत आम्ही तपोनला जावून येतो.आणि हो त्याला नाष्टा खायला लाव आधी मी शिरा बनवून आणला आहे तू ही खा! तुला तर माहीतच आहे तो जर फुगला तर मग पाणी ही घेणार नाही. आमच्या सारख्या शांत माणसांच्या पोटी हे असलं हेकेखोर कार्ट कुठून आलंय काय माहीत! जीवाला नुसता घोर लागला आहे आणि फोन कर मग आम्हाला येतो आम्ही  मग सगळे घरी जावू!”त्या काळजीने बोलत होत्या.

 

अभिज्ञा,“ आऊ तो खूप चिडणार आहे मी तूम्हाला ते स्वप्न आणि तो काहीतरी लपवतो आहे ते सांगितलं म्हणून!तुम्ही थांबा ना!” ती थोडी घाबरत म्हणाली.

 

आई,“ त्याने हीचा आततायीपणा सहन केला ना मग आता हिला अगम्यचा राग सहन करावा लागेल!  गप्प जायचं आणि त्याला सगळं सांगायचं आणि तो जे काही बोलेल ते सगळं निमुटपणे ऐकून घ्यायच जर मला कळलं की हिने अमूशी वाद घेतला तर हीच काही खरं नाही सांगा तुमच्या सुनेला!”त्या अहिल्याबाईकडे पाहत म्हणाल्या

 

अभिज्ञा,“ कळलं हो सासूबाई मला आऊला सांगायला लावायची गरज नाही आणि किती दिवस मला घालून पाडून बोलणार ग?” ती वैतागून म्हणाली.

 

             अहिल्याबाई आणि अभिज्ञाची आई खाली गेल्या. अभिज्ञा अगम्य जवळ गेली. तिला एकटीलाच आलेलं पाहून अगम्यने तिला विचारले.

 

अगम्य,“ अरे तू एकटीच कशी आलीस? आणि बाकी सगळे कुठे गेले अभी? अदू कुठे आहे ग?”

 

अभीज्ञा,“ कुठे जाणार तुला सोडून आहेत इथेच! येतील थोड्या वेळात आणि अदु ही भेटेल आहे त्यांच्या बरोबर! तू आधी नाष्टा करून घे आऊने शिरा बनवुन आणला आहे तुझ्यासाठी तुला आवडतो म्हणून!” असं म्हणून तिने शिरा डब्यातून एका प्लेटमध्ये काढून त्याच्या समोर धरला.

 

अगम्य,“ अरे वा!अग पण ते सगळे इतक्या सकाळी सकाळी आले त्यांनी केला का नाष्टा? आणि तू पण घे की!” तो अगदी सहज म्हणाला.

 

   अभीज्ञाच्या डोळ्यात मात्र पाणी तरळले. हा माणूस अशा अवस्थेत ही सगळ्यांचा आणि आपला ही विचार करतो पण आपण त्या दिवशी  याचा जरा ही विचार केला नाही. आऊ म्हणाल्या तसं आपल्याला चांगलच माहीत होतं की हा फुगला किंवा चिडला तर पाणी ही घेत नाही तरी आपण याचा विचार केला नाही.आपण आईने जरा फोर्स केले आणि खाऊन बसलो पण अगम्यने चोवीस तास पाणी ही घेतले नाही आणि आपण त्याचा विचार ही केला नाही साधा!आपण स्वतःचा इगो किती मोठा केला. किती स्वार्थी आहे ना मी! ती हा सगळा विचार करत होती तर अगम्यने तिला हाक मारली आणि अभीज्ञा भानावर आली.

 

अगम्य,“ काय बोलतोय मी आता अजून डोळ्यात पाणी का? अवघड आहे.अग मी तुला काय विचारतो आहे?” तो वैतागून म्हणाला.

 

अभीज्ञा,“ किती प्रश्न विचारशील?अरे ते सगळे नाष्टा करून आलेत आणि तू स्वतःची काळजी कर दुसऱ्याची नको! खा लवकर मेडिसीन्स पण घ्यायचे आहेत अजून!” ती त्याला म्हणाली.

 

अगम्य,“ हुंम बरं!” असं म्हणून  तो शिरा खाऊ लागला. अभीज्ञा त्याच्याकडे पाहत म्हणाली.

 

अभीज्ञा,“ नाही म्हणजे तुला कसं जमत रे हे! याच कुठे स्पेशल ट्रेनिंग मिळत का?”

 

अगम्य,“ कशाच ग?” त्याला काहीच कळले नाही.

 

अभीज्ञा,“ कोणत्या ही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करायला!” ती म्हणाली.

 

     तसा अगम्य खळखळून हसला.

 

अगम्य,“ तुझं आपलं काय तरीच असत अभी!बरं मला पाणी देना!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ बरं तुझ्याशी मला खूप महत्त्वाचं बोलायचे आहे.त्या आधी तू चिडणार नाहीस हे प्रॉमिस कर मला!” ती त्याला पाणी देत म्हणाली.

 

अगम्य,“ मी प्रॉमिस वगैरे नाही करणार! म्हणजे चिडण्यासारखेच आहे तर बोला कोणता बॉम्ब टाकता अजून गरीबावर!” तो तिला पाहात म्हणाला.

 

     अभीज्ञा त्याच्या जवळ बेडवर बसली आणि त्याचा हात हातात घेऊन बोलू लागली.

 

अभीज्ञा,“ अगम्य तुला माहीत आहे का तू किती दिवस बेशुद्ध होतास? तू तब्बल पाच दिवस बेशुद्ध होतास आणि या पाच दिवसात खूप काही घडलं आहे!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ काय पाच दिवस मी बेशुद्ध होतो अग पण कसं शक्य आहे माझ्या दंडाला तर गोळी लागली होती त्यात इतकं काय बेशुद्ध राहण्यासारखं होत ग?” तो आश्चर्याने म्हणाला.

 

अभीज्ञा,“ किती सहज बोलतोस रे तू माझ्या दंडाला गोळी लागली जणू काही ही खूप छोटी गोष्ट आहे!मूर्खा ती गोळी आत पर्यंत तिरकी घुसली होती.ती काढायला डॉक्टरांना दोन तास लागले आणि तितका ब्लड लॉस झाला तुझा! दुसरी गोष्ट मी केलेल्या पराक्रमाचा मानसिक ताण आणि वाढलेले ब्लड प्रेशर आणि चोवीस तास पाणी ही घेतलं नाहीस तू या सगळ्याचा परिपाक म्हण हवं तर! डॉक्टर ही सांगू शकत नव्हते की कधी शुद्धीवर येशील तू! तरी आमचं नशीब चांगलं पाच दिवसानी आलास बाबा शुद्धीवर! आम्ही किती टेन्शनमध्ये होतो.आऊने तर देव पाण्यात ठेवले होते!” ती डोळे पुसत म्हणाली.

 

अगम्य,“ अच्छा म्हणून तुम्ही दोघी इतक्या शांत का? तरीच म्हणलं मी हा चमत्कार कसा झाला.मग या पाच दिवसात काय-काय झाले?” त्याने विचारले.

 

अभीज्ञा,“ तुला पडणाऱ्या स्वप्ना बद्दल आणि तू म्हणलेला ते सावट वगैरे मी सगळं सांगितलं तिघांना!” ती खाली मान घालून म्हणाली.

 

अगम्य,“ काय? का सांगितलेस तू हे सगळ्यांना अभीज्ञा! मी तयार होतो ना तुला सगळं सांगायला मी जितकं या गोष्टींपासून सगळ्यांना दूर ठेवू पाहत होतो तुझ्या अशा वागण्याने सगळे जवळ आले या गोष्टीच्या! आता सगळ्यांना टेन्शन!” तो चिडून बोलत होता.

 

अभीज्ञा,“ चिडू नकोस ना प्लिज! तू बेशुद्ध असताना आईने मला चांगलेच फैलावर घेतले आणि तुझ्यात आणि माझ्यात भांडण का झाले? हे विचारले मग काय सांगणार होते मी! मला सगळं सांगावं लागलं आणि कारण ऐकून अजूनच चिडली माझ्यावर ती म्हणाली की तू मला निघून जा म्हणाला इतकंच दिसलं मला पण त्याच्या मगच प्रेम आणि काळजी नाही दिसली का?आऊची ही आईने चांगलीच कान उघाडणी केली! आई म्हणाली ते खरं आहे मी या बाजूने विचारच नाही केला मी! तू जा म्हणालास ही गोष्ट माझ्या इगोवर घेऊन बसले.जर मी जाण्याचा हट्ट केला नसता आणि स्टॅंडवर गेले नसते तर तू माझ्या मागे तिथे आला नसतास आणि हे सगळे घडले नसते!I am sorry!” असं म्हणून ती त्याला मिठी मारून रडू लागली.

 

अगम्य,“ तू हे रडणं आधी थांबव!आणि बास झालं आता हे सगळं जे झालं ते झालं आणि बरं झालं मी तिथे आलो नाही तर काय झालं असत मला कल्पना ही करवत नाही!पण इतक्या सहज तुला नाही सोडणार पेनल्टी तर मी घेणार!” तो तिचे डोळे पुसत हसून डोळे मिचकावत म्हणाला.

 

अभीज्ञा,“तुला दुसरं काही सुचत नाही का रे? हॉस्पिटलमध्ये आहोत आपण आणि अजून एक तू ना हे उपोषणाला बसायचे सोडून दे नाय तर गाठ माझ्याशी आहे.चिडला की बसला उपोषणाला! काही झालं की बसला उपोषणाला! त्याचाच किती  परिणाम झाला तुझ्यावर! आऊ म्हणाल्या ते बरोबर आहे त्यांच्या सारख्या शांत बाईच्या पोटी हे असलं हेकेखोर कार्ट कसं काय आलंय काय माहीत? हे पाच दिवस कसे काढले आम्हाला माहिती! इथून पुढे मी आहेच म्हणा चांगली अद्दल घडली मला! अजून एक महत्वाचे सांगायचे राहिले!” ती म्हणाली.

 

अगम्य,“अच्छा मी कार्ट काय ते ही हेकेखोर!” असं म्हणून त्याने अभीज्ञाला जवळ ओढले.

 

अभीज्ञा,“ अगम्य आपण हॉस्पिटलमध्ये आहोत सोड!”ती लटक्या रागाने म्हणाली.

 

अगम्य,“बरं राहील! अजून काय सांगणार होतीस  तेही सांग?” तो तुला सोडत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ दोन-तीन दिवसा पूर्वी तुला  ही एका अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजनची पाईप कापून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी पाहिलं म्हणून बरं नाही तर काय झालं असत काय माहीत! त्याचा ही शोध पोलीस घेत आहेत!” ती त्याचा हात धरून बोलत होती.

 

अगम्य,“ म्हणजे हे जे कोणी आहे ते आपल्या कुटूंबाच्या जीवावर उठले आहे. उद्या आऊ, आई किंवा मग बाबा आणि अज्ञांकवर ही हल्ला होऊ शकतो!” तो काळजीने बोलत होता.

 

अभीज्ञा,“ अगदी असच घडेल असं नाही अमू कारण ते लोक जे कोणी आहेत त्यांनी माझ्यावर दोन वेळा आणि तुझ्यावर हल्ला केला.बाकी कोणावर ही त्यांनी हल्ला केला नाही. इन्स्पेक्टर माने करत आहेत तपास let's hope! हल्लेखोर लवकर पकडले जातील!तो पर्यंत आपल्याला जपून राहायला हवे! म्हणूनच आऊनी तुला आज हॉस्पिटलमधून घरी घेऊन जायचा निर्णय घेतला आहे. तुझी पुढची ट्रीटमेंट घरीच होईल! आणि हो हे समजू नको की मी विसरले आहे की तू मला त्या स्वप्ना विषयी आणि सावटा विषयी सांगणार आहेस! आत्ताच नाही पण थोड्या दिवसांनी तुला ते सांगावेच लागेल त्या शिवाय आपण त्याच्यावर तोडगा कसा काढणार आहोत आणि राहिला प्रश्न या मानवी हल्ल्याचा तर पोलीस त्याला शोधतीलच आणि तो जो कोणी असेल या हल्ल्यामागे तो लवकरच पकडला जाईल!” ती म्हणाली.

 

अगम्य,“हुंम तू बरोबर बोलते आहेस आणि सांगेन मी सगळं तुला आणि आता घरातल्या सगळ्यांना ही! अग पण हे तिघे अज्ञांकला घेऊन कुठे गेले आहेत बोलावं त्यांना फोन करून!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ हो बोलावते आऊ मुद्दामच गेल्या आहेत मी तुला सगळं सांगावं एकांतात असं त्यांना वाटत होतं!” ती सहज म्हणाली आणि फोन करायला उठली तर अगम्यने तिला जवळ ओढून घेतले आणि म्हणाला.

 

अगम्य,“ अच्छा! मग या एकांताचा फायदा करून घेतो की मी पण जरा!” असं म्हणून त्याने अभीज्ञाच्या मानेत हात घालून तिच्या ओठांवर ओठ ठेवले.अभीज्ञाने ही त्याला विरोध न करता प्रतिसाद दिला.

     

      थोड्या वेळाने अभीज्ञा त्याच्या पासून दूर होत लटक्या रागाने म्हणाली.

 

अभीज्ञा,“ तू सुधारणार नाहीसच ना! आता फोन करते मी!” तिने बेडवर बसूनच तिच्या बाबांना फोन लावला. अगम्य तिच्या गालावर रुळणाऱ्या केसांच्या बटा बोटाने काना मागे सरकवत होता.

 

          अगम्य आणि अभीज्ञावर हे जीव घेणे हल्ले कोण आणि का करत होते? अगम्यने ज्या सावटा विषयी सगळ्यां पासून लपवून ठेवले होते ते आणखीन एका संकटाची चाहूल तर नव्हती?  या दुहेरी संकटाचा सामना अगम्य आणि अभीज्ञा कसा करणार होते?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule
 

           

 

     


 

 

                        

 

           


 

 

            

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे