दि लूप होल पर्व २ (भाग ६)

This is a thriller and suspense story

      अभीज्ञा फ्लॅटमध्ये गेली तिने बॅग टाकली  आणि  हॉलमध्ये पडून रडत राहिली.आज अगम्यने तिचा स्वाभिमान दुखावला होता. तिने कधी विचारच केला नव्हता की अगम्य तिच्याशी असा वागेल.

   

      अहिल्याबाई आणि अभिज्ञाचे आई- बाबा  घरी आल्यावर त्यांना अभीज्ञा आणि अगम्य कुठेच दिसले नाहीत म्हणून अहिल्याबाईंनी सखुला विचारले.

अहिल्याबाई,“ सखू अग अभी आणि अमू कुठे आहेत आता बारा वाजत आल्या ते इतक्या रात्री कुठे गेले?”

सखू,“ बाईसाब आव वर धकल्या बाईसाब च्या घुवून गेल्या व्हत्या तीत काय झालं धाकल्या बाईसाबांचं आणि धान्यांच काय माहीत पण बाईसाब रडत बॅग घिऊन जायला निघाल्या हुत्या धान्यांनी लय अडवलं पर बाईसाब गाडी चालवत गेल्या मंग धनी बी फटफटी घिऊन गेलं त्यांच्या मागन!” तिने जितकं पाहिलं तितके सांगितले.

अहिल्याबाई,“ बरं बरं तू जा झोप जा!” त्या म्हणाल्या.

      अभीज्ञाच्या बाबांनी अज्ञांकला सोफ्यावर झोपवले.तिघे ही विचारात पडले की या दोघांमध्ये असं काय झालं की अभीज्ञा अशी तडकाफडकी पुण्याला निघून गेली.ते ही इतक्या रात्रीचे! तो पर्यंत अगम्य घरात आला. अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे आई-बाबा त्याचीच वाट पाहत होते. अगम्यला पाहून अहिल्याबाईनी विचारले.

अहिल्याबाई,“ काय झालं अगम्य अभीज्ञा अशी इतक्या रात्री पुण्याला का निघून गेली? का भांडलात दोघ तुम्ही?” असे म्हणतात अगम्यने अहिल्याबाईना मिठी मारली आणि तो रडत बोलू लागला.

अगम्य,“ आऊ सगळी चूक माझीच आहे मीच तिला नको ते बोललो आज! म्हणून ती निघून गेली परत कधीच न येण्यासाठी!” तो रडत बोलत होता. हे ऐकून अहिल्याबाईनी त्याला समोर उभे केले आणि त्या रागानेच अगम्यला म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ असं काय बोललास तू अभीज्ञाला अमू की ती परत कधीच येणार नाही या घरात?” त्यांनी रागानेच विचारले.

अगम्य,“ ती म्हणत होती की ती मला घटस्फोट देणार आणि अज्ञांकवरचा हक्क सोडते.त्याला तुला ठेवून घ्यायचं तर घे नाही तर पाठव माझ्याकडे!आई-बाबांना सकाळी पाठवून दे! ती सगळं सोडणार आहे आऊ! मला ही! तिला समजाव आऊ मी चुकलो! रागाच्या भरात बोललो मी पण….” तो अहिल्याबाईचे काहीच ऐकले नाही असे बडबडत होता.हे ऐकून अहिल्याबाईना आणि अभीज्ञाच्या आई-बाबांना धक्काच बसला. अहिल्याबाई अगम्यलाचे बोलणे मध्येच तोडत अगम्यला ओरडून म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ मी काय विचारतेय! तू काय बोललास असं अभीज्ञाला ते सांग आधी अगम्य?” 

अगम्य,“ मी तिला इथून पुण्याला निघून जा असं म्हणालो!” तो अपराधीपणे म्हणाला.

      हे ऐकून अहिल्याबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी अगम्यच्या कानाखाली एक लावून दिली.अगम्य खाली मान घालून तिथेच उभा होता. त्या आता रागाने थरथरत पुढे बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“नालायका घरच्या लक्ष्मीला घरा बाहेर काढलस तू! अरे तिने तुझ्याकडे हे सर्व वैभव नव्हते तेंव्हा तुला स्वीकारले! तुझ्यावर  जीवापाड प्रेम केले. तुझी आजारपणात सेवा केली. तुझ्यासाठी तिला जे-जे शक्य होते ते तिने केले आणि तू तिचे असे पांग फेडलेस होय! दोन वर्षे झाली तिच्या एका चुकीची शिक्षा तू तिला देत आहेस खरं तर ती चूक इतकी मोठी ही नव्हती. तिने तुझी खूप वेळा माफी मागितली पण तू बदला नाहीस. मला वाटले नवरा-बायको मध्ये आपन पडू नये म्हणून मी शांत होते. कारण मला माहित होतं आज ना उद्या माझी सून परत येईल. आता ती घरी परत आली तर तू तिला हाकलून दिलेस! मला तुझ्या सारखा कर्तृत्ववान मुलगा असल्याचा गर्व होता पण आज मला  लाज वाटते अगम्य तुझी आई म्हणूवून घेण्याची! दूर हो माझ्या नजरे समोरून!” त्या रागाने बोलत होत्या अगम्य एखाद्या अपराध्या सारखा सगळं ऐकत होता.अहिल्याबाई त्याला जा असं म्हणाल्या आणि तो वर त्याच्या रूममध्ये निघून गेला.

आई,“ ताई तुम्हीं हात उचलायला नको होता असा तरण्याताठ्या पोरावर! अभीज्ञा आणि त्याच्यात काय झालंय हे आपल्याला माहीत नाही मग एकट्या अगम्यला दोष कसा द्यायचा आणि अभी पण काही कमी नाही हो!”त्यांना अहिल्याबाईने अगम्यवर हात उचललेला आणि बोललेल अजिबात आवडलेलं नव्हतं.

अहिल्याबाई,“ ते काही ही असू दे चूक कोणाची ही असू दे पण अगम्यने अभीज्ञाला जा म्हणून सांगणे तिचा आणि माझा ही अपमान आहे.आज त्याने एका स्त्रीचा त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलाच्या आईचा अपमान केला आहे. जो मला कधीच सहन नाही होणार! त्याने आज अभीज्ञाचा स्वाभिमान दुखावला आहे. तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता पुण्याला निघा आणि हो अज्ञांकला ही घेऊन जा कारण अभीज्ञाचा तो दिसला नाही तर गैरसमज व्हायचा! तिची मनस्थिती चांगली नाही उगीच काही तरी चुकीचे पाऊल उचलेल पोर रागाच्या भरात!” त्या काळजीने  बोलत होत्या.

बाबा,“ ठीक आहे! पण अगम्यकडे लक्ष ठेवा ताई त्याची ही मनस्थिती चांगली दिसत नाही आम्ही निघतो. उद्या पाहू काय ते!” ते काळजीने म्हणाले आणि ड्रायव्हरला घेऊन त्यांनी पुणे गाठले.

            घरी गेल्यावर अभीज्ञाने दार उघडले. अभीज्ञाचे डोळे रडून रडून सुजलेले दिसत होते. तिने काही न बोलता झोपलेल्या  अज्ञांकला तिच्या बाबांच्या कडेवरून घेतले आणि ती सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली. तिच्या आई-बाबांनी ही तूर्त काही ही न बोललेले बरे असा विचार केला आणि ते दोघे ही त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन झोपले.सकाळी अभीज्ञाच्या आई-बाबांना जाग आली तीच अभीज्ञाच्या बोलण्याने. तिच्या आईने हॉलमध्ये येऊन पाहिले तर अभीज्ञा फोनवर आज दुपार पर्यंत डिव्होर्स पेपर तयार करा असं कोणाला तरी सांगत होती. तिच्या आईच्या पाठोपाठ तिचे बाबा ही हॉलमध्ये आले. ते दोघे अभीज्ञाचे फोनवरचे बोलणे ऐकून एकमेकांना चकित होऊन पाहत होते. अभीज्ञाने फोन ठेवला आणि त्या दोघांना पाहिले आणि ती बोलू लागली.

अभीज्ञा,“ मी  अगम्यला डिव्होर्स देण्याचा  निर्णय घेतला आहे त्याच बद्दल मी वकिलांशी बोलत होते. M. D. पदाचा राजीनामा ही रात्रीच तयार केला आहे मी! मी इथे राहणार नाही आहे आजच्या आज मी हे शहर सोडणार! तुम्ही सांगा तुम्ही काय करणार आहात म्हणजे तुमचं नात माझ्यामुळे अगम्यशी होत आणि तुम्ही दोघे माझी जबाबदारी आहात पण मी तुमच्यावर कोणतीच जबरदस्ती नाही करणार तुम्हाला रहायचं असेल इथे तर...” ती पुढे बोलणार तर तिचे बाबा रागात तिच्यावर ओरडले.

बाबा,“ mind your tongue अभी! आम्ही तुझे आई-वडील आहोत. तुझं आणि अगम्यचे काय झाले आम्हाला माहीत नाही पण आमच्याशी तरी असं परकेपणाने वागू नकोस! तुझ्यावर आम्ही कधीच कोणता निर्णय लादला नाही आणि लादनार ही नाही! तुला घ्यायचा आहे ना डिव्होर्स अगम्यशी तर घे! आम्ही तुला विरोध नाही करणार आणि तुझ्या शिवाय आमचे कोण आहे ग?  आमच्याशी अशी परकेपणाने बोलते आहेस!” 

      हे ऐकून अभीज्ञाने त्यांना मिठी मारली आणि ती रडूत म्हणाली.

अभीज्ञा,“ I am sorry बाबा! पण मला आता हे सगळं असह्य होत आहे मला नाही राहायचं इथे! ज्याच्यावर मी प्रेम केले तोच मला जा म्हणाला!” ती रडत बोलत होती. हे पाहून आई-बाबांच्या ही डोळ्यात पाणी होते.

आई,“ बरं अभी आपण जाऊया बेटा पण कुठे जायचे काही ठरवले आहेस का?” त्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या.

अभीज्ञा,“ हो ठरवले आहे आपण आधी औरंगाबादला जाऊ आपल्या घरी मग तिथून काय करायचे ते ठरवू! माझी सगळी कामे संध्याकाळ पर्यंत होतील आपण संध्याकाळी निघू बाबा तुम्ही ट्रॅव्हल्सचे सीट बुक करून या!” ती म्हणाली.

बाबा,“ ठीक आहे!”

       अभीज्ञाच्या आईने चहा नाष्टा तयार केला आणि अभीज्ञा नको म्हणत असताना तिला बळजबरीने खायला घातले. बारा नंतर  अभीज्ञाच्या ओळखीचा एक वकील घरी डिव्होर्स पेपर घेऊन आला अभीज्ञाने त्यावर सह्या केल्या आणि तू दुपारी पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेली आणि नंतर बँकेत. तिने पाच  वाजेपर्यंत सगळी कामे उरकली आणि एका प्युन करावी श्रीरंगपूरला गाडीच्या चव्या आणि सगळी कागद पत्रे व एक चिठ्ठी पाठवून दिली.तो पर्यंत अभीज्ञाच्या आईने सगळी पॅकिंग केली. 

     इकडे रात्री रूममध्ये गेलेला अगम्य अजून रूमच्या बाहेर आला नव्हता.अहिल्याबाईंना त्याची काळजी वाटत होती तरी त्यांनी दोन वेळा रामुला पाठवून त्याला चहा,नाष्टा आणि जेवण ही पाठवले होते त्यांना माहीत होतं की अगम्य काहीच खाणार नाही आणि घेणार ही नाही तरी तो ठीक आहे का बघ म्हणून त्यांनी रामुला तीन वेळा या निमित्ताने पाठवले होते. रामुने तो ठीक आहे पण त्याने काहीच घेतलं नाही. हे अहिल्याबाईंना सांगिल होत त्यामुळे अहिल्याबाईंना जरा हायस वाटलं होतं. त्यांनी अभीज्ञाची ही फोन करून अभीज्ञाच्या आईकडे चौकशी केली होती आणि त्यांना अभीज्ञा काय-काय करत आहे हे सगळं कळलं होतं. अभीज्ञाच्या आई आणि बाबांनी ही अगम्यची चौकशी केलीच होती.

     शेवटी तिघे ही आई-बाप होते.मुले किती ही मोठी झाली आणि त्यांना मुले जरी झाली तरी आई-वडिलांची काळजी मात्र तशीच असते.ते म्हणतात ना मुले मोठी होतात पण आई-बाप मोठे होत नाहीत.अभीज्ञा साडे पाचच्या सुमारास घरी आली आणि निघण्यासाठीची तयारी करू लागली.अभीज्ञाच्या आईने मात्र अगम्यला न राहवून फोन केला.त्या फोनवर बोलत होत्या.

आई,“ अमू!कसा आहेस बाळ?” त्यांनी काळजीने विचारले.

अगम्य,“ मी ठीक आहे आई अभीचा राग शांत झाला का?” त्याने विचारले.

आई,“ नाही रे! मी काय सांगते ते नीट ऐक! अभीज्ञा आणि आम्ही आज सात वाजता औरंगाबादसाठी निघणार आहोत! अभीज्ञा हट्टाला पेटली आहे ती कोणाचं ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही.आम्ही सहा वाजला स्वारगेटच्या खाजगी बस स्टॉपवर पोहोचू तू ताईंना घेऊन तिथे ये बाबा! कदाचित ती त्यांचं ऐकेल!” त्या बोलत होत्या.

अगम्य,“ अभीज्ञाची काहीच चूक नाही आई चूक माझी आहे पण कोणत्या ही परिस्थितीत मी तुम्हाला जाऊ देणार नाही! विश्वास ठेवा माझ्यावर! मी आत्ताच निघतो आहे” त्याने असं म्हणून फोन ठेवला आणि रामू अहिल्याबाईनी बोलवले आहे म्हणून निरोप घेऊन आला कारण अभीज्ञाने पाठवलेली कागद पत्रे घेवून प्युन आला होता.

     

       अगम्य खाली आला तर अहिल्याबाई गोखले वकीलाशी  M. D.च्या पोस्टसाठी उद्या बोर्ड मिटिंग घेण्याबाबत चर्चा करत होत्या.अहिल्याबाई सोफ्यावर बसल्या होत्या अगम्य त्यांच्या समोर येऊन उभा राहिला.त्या अगम्यला निहाळत होत्या  उतरलेला चेहरा! रडून लाल झालेले डोळे आणि काल पासून पाणी ही न घेतल्यामुळे रया गेलेली कांती त्याला असं पाहून अहिल्याबाईंना गहिवरून आलं पण स्वतःच्या भावनांना मनातच थोपवत त्या म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ अभीज्ञाने हे सगळं पाठवले आहे. त्यात सही केलेले डिव्होर्स पेपर ही आहेत. तिने तिच्या बँक अकाउंट मधले सगळे पैसे तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहेत आणि हा M. D. पदाचा राजीनामा आणि त्या बरोबर ही चिठ्ठी आहे.यात सगळा हिशोब आणि ठोक ताळे आहेत! आता या सगळ्याच काय करायचं तू सांग!” त्या कठोरपणे म्हणाल्या.

अगम्य,“ याच काय करायचं आऊ कारण या सगळ्याला काही अर्थ नाही अभीज्ञा कुठे ही जाणार नाही! तू चल ना प्लिज माझ्या बरोबर ती तुझं नक्की ऐकेल!”त्याने विनंती केली.

   

     त्याच्या या बोलण्याने मात्र अहिल्याबाई भडकल्या आणि बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“कोणत्या तोंडाने थांबवू रे मी तिला सांग ना! माझ्या मुलाने तिचा अपमान केला तिच्या स्वाभिमानाला ठेस  पोहोचवली!तिला जा म्हणून सांगितले आणि एक स्त्री असून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करू?का तर माझ्या मुलासाठी! ते मला जमणार नाही अगम्य! खरं तर मी सुद्धा तिच्या बरोबर गेले असते पण मी वचनबद्ध आहे रावसाहेबांना!” 

अगम्य,“ ठीक आहे मी जातो मग तिला थांबवतो!येईल ती परत मला माहित आहे तिला परत कसं आणायचे ते! आणि नवीन  M. D साठी मिटिंग घ्यायची काही गरज नाही!” तो असं म्हणून निघणार तर अहिल्याबाई त्याला म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ तू म्हणतोस तसं झाल तर बरच आहे पण तसं नाही झालं आणि अभीज्ञा निघून गेली तर याद राख अगम्य तू ही माझ्यासाठी मेलास मी तुझं तोंड आयुष्य भर पाहणार नाही!” त्या कठोरपणे म्हणाल्या.अगम्य मात्र त्यांचं बोलणं ऐकून तसाच पुढे निघून गेला.

       अगम्य अभीज्ञाला थांबवायला गेला खरं पण नियतीने या सगळ्यां समोर खूप मोठं संकट वाढून ठेवले होते.ज्याची यत्किंचितही कल्पना कोणाला ही नव्हती.अगम्य स्वारगेटमधील खाजगी बस स्टॉपवर पोहोचला.तो सगळीकडे अभीज्ञाला आणि सगळ्यांना शोधू लागला.तर  त्याला एका बेंचवर अभीज्ञा बसलेली दिसली अज्ञांकने अगम्यला पाहिले आणि तो बाबा हाक मारत अगम्य जवळ आला आणि बोलू लागला.

अज्ञांक,“ बाबा तू पण येणार आमच्या बरोबर? पण आई आजी म्हणत होती की मी आई आणि आजी-आजोबा आपण आधी जाणार औरंगाबादला आणि मग नंतर तू आणि आऊ आजी नेणार कारण तुला आणि आऊ आजीला खूप कामे आहेत इथे!” तो निरागसपणे बोलत होता.

अगम्य,“ तुम्ही कुठे ही जात नाही आहात बच्चा!”असं म्हणून अगम्यने अज्ञांकला उचलून घेतले व तो अभीज्ञा आणि आई-बाबांच्या जवळ गेला.अभीज्ञाने त्याला पाहिले आणि ती तिच्या आईकडे पाहत म्हणाली.

अभीज्ञा,“ आई याला सांग आदूला खोटं  आश्वासन देऊ नकोस आणि याला इथून जा म्हणावं मला इथे तमाशा नको आहे!” ती चिडून बोलत होती.

अगम्य,“ बाबा ही घ्या कारची चावी तुम्ही आईंना आणि अदुला आपल्या घरी घेऊन पुढे जा मी अभीज्ञाला घेऊन येतो!” तो अगदी शांतपणे म्हणाला.

अभीज्ञा,“ बाबा तुम्ही कुठेच जात नाही आहात कारण मी कुठे ही जाणार नाही!” ती चिडून म्हणाली.

अगम्य,“ मला तुझ्याशी बोलायचे आहे अभी!” तो म्हणाला.

अभीज्ञा,“काल जे बोललास तेच बास झाले! मला अजून काही ऐकायचे नाही!” ती त्याला न पाहताच म्हणाली.

      अगम्यने हे ऐकले आणि तिचा हात धरला आणि तिला जरा बाजूला घेऊन जात म्हणाला.

अगम्य,“तुला जर मी पुन्हा दिसावं असं वाटत असेल तर तुला माझं ऐकावच लागेल. आई-बाबांना आणि आदुला जावू दे घरी!” तो काही तरी विचार करून बोलत होता.

अभीज्ञा,“ धमकी देतो आहेस मला?की इमोशनल ब्लॅकमेल करतो आहेस?” ती चिडून हात सोडवून घेत म्हणाली.

अगम्य,“दोन्ही ही नाही! तुला माहीत आहे मी जे बोलतो ते करतो! तू ज्यासाठी मला भांडत होतीस ते सत्य मी तुला सांगायला तयार आहे.मी तू मला माफ कर असं नाही म्हणणार कारण मला माहित आहे मी चुकलो आहे आणि त्याची माफी नाही मिळणार मला! पण असं निघून जावून पुढे अज्ञांकला पुन्हा मी ज्या गोष्टींचा सामना केला आहे किंवा करत आहे त्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.म्हणून सांगतोय तुला अभी!” तो शांतपणे बोलत होता

      

     अगम्यचे हे बोलणे ऐकून अभीज्ञा विचारात पडली आणि तिला चांगलच माहीत होतं की जर ती आता निघून गेली तर खरच अगम्य काही ही करू शकतो. एकदा वेळ निघून गेली की पुन्हा पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही आणि दुसरी गोष्ट जे सत्य जाणून घेण्यासाठी तिने इतका तमाशा केला ते सत्य अगम्य सांगायला तयार आहे. जर आज हे सत्य नाही कळले आणि त्यातून मार्ग आत्ताच नाही काढला  तर पुढे जाऊन ते अज्ञांकच्या आयुष्यावर ही परिणाम  करू शकतं. हा सगळा विचार करून अभीज्ञा अगम्यला म्हणाली.

अभीज्ञा,“ ठीक आहे मी थांबायला तयार आहे अगम्य पण याचा अर्थ मी तुला माफ केले असा ही नाही आणि मी माझा जाण्याचा निर्णय बदलला असे ही नाही! जाणार तर मी आहेच पण मला ते सत्य जाणून घ्यायचे आहे अज्ञांकसाठी!” ती म्हणाली.

अगम्य,“ठीक आहे.मग बाबांना आणि आईंना जाऊदे घरी अज्ञांकला घेऊन आपण  फ्लॅटवर जाऊ बोलू मग पुढचे तुझे तू ठराव काय करायचे ते!” तो म्हणाला.

       अभीज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि अगम्य बाबांना म्हणाला

अगम्य,“ बाबा तुम्ही घरी जा! मी आणि अभीज्ञा नंतर येतो!” तो म्हणाला.

बाबा,“ अरे पण तुम्ही दोघे कसे येणार नंतर?” त्यांनी विचारले.

अगम्य,“ काळजी करू नका बाबा!इथे ऑफिस स्टाफ आहेच की कोणाची तरी गाडी घेऊन येईन मी!” तो म्हणाला.

     आणि अभीज्ञाचे आई-बाबा अज्ञांकला घेवून गेले. अगम्य आणि अभीज्ञा स्टॅंडच्या बाहेर आले.अगम्यने अभीज्ञाला रोडपासून  जरा कडेला उभे केले आणि तो फ्लॅटवर जाण्यासाठी टॅक्सी पाहू लागला. खरं तर तो आई-बाबां बरोबर कार मधून फ्लॅटवर जावू शकला असता पण फ्लॅट आणि श्रीरंगपूर  स्वारगेट पासून दोन्ही विरुद्ध दिशेला पडत होते आणि आधीच अंधार पडत होता म्हणून त्याने टॅक्सीने फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला. तो टॅक्सी पाहत होता तेव्हढ्यात बाईकवर बसलेली दोन  माणसे ज्यांनी हेल्मेट घातले होते. ती त्याच्या समोरून जाताना अगम्यने पाहिली. अगम्यचे लक्ष सहज मागच्या माणसाकडे गेले तर त्याला त्याच्या हातात कापडात गुंडाळलेली गन दिसली.अगम्यने पूर्ण मागे वळून पाहिले तर ते अभीज्ञाच्या दिशेने जाताना दिसली.तिथे अभीज्ञा एकटीच उभी होती.तिच्या आसपास कोणीच नव्हते म्हणजेच ते लोक अभीज्ञावर गोळी  झाडण्यासाठी आले होते.हे कळायला अगम्यला वेळ लागला आणि तो अभीज्ञाकडे धावतच केला अंतर थोडेच असल्याने तो अभीज्ञा जवळ पोहचला पण तो पर्यंत त्या माणसाने गन अभीज्ञावर धरली आणि गोळी झाडली पण अगम्यने अभीज्ञाला ओढले  अचानक झालेल्या या कृतीमुळे अभीज्ञाचा तोल गेला आणि खाली पडली आणि अगम्य ही तिच्या बरोबर पडला. या सगळ्यात अगम्यच्या दंडाला मात्र गोळी लागली. अभीज्ञा सावरली आणि अगम्यच्या दंडातून रक्त येताना पाहून घाबरली.अगम्य मात्र कळवत होता त्याला उठायचे ही कळत नव्हते. अभीज्ञानेच त्याला धरून उठवले. तो पर्यंत लोक गोळा झाले आणि कोणी तरी  ऍम्ब्युलन्स बोलावली. 

        हॉस्पिटलमध्ये पोहोचे पर्यंत अगम्य शुद्धीत होता. तो फक्त अभीज्ञाकडे एकटक पाहत होता.जणू तो तिला शेवटचं पाहत आहे पण या अर्ध्या तासाच्या प्रवासात तो एक ही शब्द बोलला नाही.अभीज्ञा मात्र घाबरली होती. ती रडत होती अगम्यचा हात धरून पण अगम्यच्या असं पाहण्याची तिला भीती वाटत होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला ओ.टी.मध्ये नेण्यात आले. अभीज्ञाने अहिल्याबाईंना फोन केला. तिचे नाव स्क्रीनवर फ्लॅश झालेले पाहून त्या  फोन घेऊन बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“ अभी अग किती वेळ झाला ग! कुठं आहेस तू आणि अमू घरी या बाई लवकर उगीच आमच्या म्हाताऱ्यांचा जीव टांगणीला नका लावू!” त्या काळजीने बोलत होत्या.

अभीज्ञा,“ आऊ आगम्यला…” तिला पुढे बोलवले नाही ती रडायला लागली.

अहिल्याबाई,“ काय झाले अगम्यला अभी अग बोलणा?” त्या घाबरून विचारत होत्या हे ऐकून अभीज्ञाचे आई -बाबा ही घाबरून उभे राहिले.

अभीज्ञा,“ आऊ अगम्यला गोळी लागली आहे. मी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे! प्लिज तुम्ही लवकर या!” ती घाबरून रडत बोलत होती.

अहिल्याबाई,“ काय बोलते आहेस अभी अग अमूवर गोळी कोण झाडावर ग उगीच काही तरी बोलू नकोस!” त्या अविश्वासाने बोलत होत्या.

अभीज्ञा,“ ते मला माहित नाही आऊ पण प्लिज तुम्ही लवकर या!” ती पुन्हा रडत म्हणाली

अहिल्याबाई,“ हो हो आम्ही तासा भरात पोहोचतो” असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.

        फोन ठेवून अभीज्ञाने हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्मेलीटी पूर्ण केल्या! तिचे मन मात्र थर्यावर नव्हते.तास होऊन गेला तरी अजून ओ.टीचे दार उघडले नव्हते. तो पर्यंत अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे आई-बाबा अज्ञांकला सखूबाईकडे सोडून हॉस्पिटलमध्ये पोहचले.त्याना  पाहून अभीज्ञाने अहिल्याबाईंना मिठी मारली आणि ती रडू लागली.अहिल्याबाई तिला शांत करत म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ काय झालं अमूला अभी आणि कुठं आहे तो? तो ठीक तर आहे ना?” ती काळजीने डोळयात पाणी आणून विचारत होत्या.

अभीज्ञा,“ आऊ अगम्यने आई-बाबांना आणि अदुला घरी पाठवले आणि मला रोड पासून जरा लांब उभे करून तो टॅक्सी पाहत होता. पण एका टू व्हीलरवर दोन माणसांना माझ्या दिशेने येताना पाहून तो धावतच माझ्याकडे आला आणि काही कळण्याच्या आताच त्यातल्या मागच्या व्यक्तीने गोळी झाडली आणि अगम्यने मला धरून बाजूला ओढले. माझा तोल गेला आणि मी आणि अगम्य खाली पडलो.जेव्हा मी जरा सावरले. तेंव्हा पाहिलं तर अगम्यच्या दंडाला गोळी लागली होती आऊ! मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तो ओ.टीमध्ये आहे! त्याला काही होणार तर नाही ना आऊ?” असं म्हणून ती रडू लागली.

          हे ऐकून  अहिल्याबाई आणि अभीज्ञाच्या आई-बाबांना धक्काच बसला. त्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता की त्यांच्या मुलांवर कोणी गोळी झाडू शकते.

अहिल्याबाई,“ म्हणजे गोळी तुझ्यावर झाडली गेली होती अभी याचा अर्थ हाच की तुला झालेला अपघात ही अपघात नसून घातपात होता! पण का कोणी तुझ्या जीवावर उठेल ग?” त्या विचार करत बोलत होत्या.

अभीज्ञा,“ ते काही मला माहित नाही आऊ पण जवळ जवळ दोन तास होत आले अजून ओ.टीचे दार बंद आहे मला खूप भीती वाटते आहे आऊ! माझच चुकलं ना मी स्टॅंडवर गेले असते! ना अगम्य तिथे आला असता! ना हे सगळे झाले असते!” रडत बोलत होती.

अहिल्याबाई,“ तुझा काही दोष नाही ग अभी! माझ्याच मेलीच्या बोलण्याला यश आले बघ मी त्याला निघताना म्हणाले होते की अभीज्ञा नाही आली तर तू माझ्यासाठी मेलास मी तुझ तोंड ही पाहणार नाही!बघ माझं पोर मरणाच्या दारात उभं आहे!” असं म्हणून त्या रडू लागल्या.

बाबा,“ ताई,अभी तुम्ही दोघी आधी रडणं आणि स्वतःला दोष देत बंद करा! काही नाही होणार अगम्यला!” त्या दोघींना शांत करत ते समजावत होते.

         तो पर्यंत इन्स्पेक्टर माने तिथे आले आणि ते अभीज्ञाला बोलू लागले.

इन्स्पेक्टर माने,“मिसेस देशमुख मिस्टर देशमुख  कुठे आहेत आणि कसे आहेत ते?” त्यांनी विचारलं

अभिज्ञा,“तो अजून  ओ. टी मध्ये आहे.” म्हणाली.

इन्स्पेक्टर माने,“ठीक आहे.तो पर्यंत तुमचा जाब आपण नोंदवून घेवू! मी तुम्हाला अपघात झाला तेव्हाच म्हणालो होतो की हा अपघात नसून घातपात आहे पण   माझा संशय मिस्टर देशमुखांवर  होता.त्याची चौकशी मी करत होतोच बाहेरून पण मला काहीच हाती लागले नाही. आज ही  मी घटना स्थळी जावून पंचनामा करून आलो तिथे  उपस्थित असलेल्या लोकांचा जबाब नोंदवला. तर असं कळले की तुमच्यावर झाडलेली गेलेली गोळी तुम्हाला वाचवताना  त्यांना लागली!तुमच्या कोणावर संशय आहे का?कोणी तुमचा हितशत्रू?” इन्स्पेक्टरने विचारले.

अभीज्ञा,“ हो इन्स्पेक्टर!मी ही तुम्ही म्हणालात तेंव्हाच या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहायला हवं होतं जर तेंव्हाच तुमच्यावर विश्वास ठेवला असता तर आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये नसता आणि तुम्हाला मी तेव्हाच सांगितले होते की अगम्य कधीच असं करणार नाही! आमचे कोणाशीच शत्रुत्व नाही खरच मला कळत नाही की कोणी का आमच्या वाईटावर आहे?आम्ही कोणाचं काहीच वाईट केलं नाही!” असं म्हणून ती रडू लागली.

इन्स्पेक्टर माने,“ कोणाचं काही न बिघडता सुध्दा तुमच्या सारख्या मोठ्या लोकांचे हितशत्रू असतात मॅडम!” ते गंभीर होत म्हणाले.

         इकडे अगम्यवर गोळी झाडल्याची वार्ता सगळ्या पंतचक्रोशित वाऱ्या सारखी  पसरली!  त्यामुळे गोखले वकीला सह कारखान्याचे डायरेक्टर्स  पोहोचले होते. त्यांना आभिज्ञाचे  बाबा थोडे लांब जावून बोलत होते.कारण ओ.टीच्या बाहेर इतकी गर्दी करणे अलावूड नव्हते.डॉक्टर ओ. टी च्या बाहेर आले आणि त्यांना पाहून आभिज्ञा आणि बाकी सगळे त्यांच्या जवळ गेले. अभिज्ञाने  डॉक्टरांना विचारले.

अभिज्ञा,“ डॉक्टर अगम्य कसा आहे?”काळजीने बोलत होती

डॉक्टर,“ मिस्टर देशमुखांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. ती तिरकी आत घुसली होते. त्या मुळे ती काढत असताना खुप रक्तस्त्राव झाला. आणखीन एक मिस्टर देशमुखांनी कोणत्या तरी गोष्टीचा धसका घेतला आहे  कारण त्यांच ब्लड प्रेशर खुप हाय झालं आहे.त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? त्यांना कोणत्या तरी गोष्टीचा खुप मानसिक ताण आहे. मी आधी म्हणल्या प्रमाणे त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचा धसका घेतला आहे.मागच्या चोवीस तासापासून त्यांनी खाणेच  पण पाणी ही पिलेले  दिसत नाही. या  सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्बेतिवर झालेला आहे. ते  बेशुध्द  आहेत आणि कधी शुध्दीवर येतील आम्ही नाही सांगू शकणार!” ते म्हणाले.

इन्स्पेक्टर,“ म्हणजे मिस्टर देशमुख कोमात तर गेले नाहीत ना डॉक्टर?” ते काळजीने म्हणाले

     

डॉक्टर,“ no no not like that! तसं नाही पण  एक दिवस  चार दिवस किंवा एक महिना ही लागू शकतो त्यांना शुध्दीवर यायला!पण जितका वेळ त्यांना शुध्दीवर यायला लागेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं नाही.म्हणजे त्यांची बॉडी तितकी खंगत जाईल आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. I  hope ते लवकर शुध्दीवर येतील.आम्ही त्यांना I.C.U.मध्ये शिफ्ट करत आहोत तुम्ही त्यांना पाहू शकता पण हॉस्पिटलमध्ये दोनच जन थांबा  आणि बाकी घरी जा!” ते बोलून निघून गेले.

इन्स्पेक्टर,“ ठीक आहे मग मी दोन कॉन्स्टेल पाठवून देतो सिक्युरीटीसाठी मिस्टर देशमुख शुध्दीवर आल्यावर मी त्यांचा जबाब नोंदवून घेईन तो पर्यंत मी तपास सुरू करतो!काळजी घ्या!” ते असं म्हणून निघून गेले.

          

                       हे ऐकुन अहिल्याबाई खुर्चीवर बसल्या सगळेच टेन्शनमध्ये आले.अहिल्याबाई  आणि अभिज्ञाचे आई- बाबा अगम्यला पाहून आले. अभिज्ञाने  मात्र त्याला काचेतुच पाहिले ती खूप जास्त अस्वस्थ वाटत होती. अभिज्ञाची आई तिच्या जवळ येवून उभा राहिल्या त्यांच्या बरोबर तिचे बाबा आणि अहिल्याबाई ही होत्या.अभिज्ञाच्या आईने बोलायला सुरुवात केली. त्या तिच्यावर खूप चिडल्या होत्या.

आई,“ झालं का अभी तुझ समाधान! अगम्यशी  भांडून! आता मला खरं खरं सांग तुझ्यात आणि अगम्य मध्ये भांडण का झालं?”  त्या चिडून बोलत होत्या.

अभिज्ञा,“माझ खरंच चुकल आई मी खूप अतताईपणा केला!आज जर मी पुणे सोडून जाण्याचा हट्ट केला नसता आणि स्टॅण्डवर आपण नसतो गेलो तर अगम्य ही स्टॅण्डवर  आला नसता आणि त्याची अवस्था अशी नसती झाली ग!माझीच चूक आहे कायमच मी चुकते!” ती रडत बोलत होती.

आई,“ हे सगळ मला ऐकायचं नाही आहे अभी!तुमच्यात भांडण का झाले? आणि अगम्य तुला निघून जा का म्हणाला ना ते सांग मला?”त्या जाब विचारण्याच्या सुरात बोलत होत्या.

 अभिज्ञा,“ आपण सगळे पेंटिंग जळाल्यावर पुढे निघून आलो आई पण अगम्य अजून तिथंच अडकला आहे काही तरी आहे जे अगम्यने आपल्यापासून दोन वर्षांपासून लपवून ठेवले आहे आणि म्हणूनच त्याने मला आणि आज्ञांकला स्वतः पासून दूर लोटले आहे!”  ती बोलत होती

हे ऐकुन अहिल्याबाई आश्चर्याने  म्हणाल्या.

अहिल्याबाई,” काय बोलतेस अभिज्ञा तू हे?अग पेंटिंग तर तेव्हाच नष्ट झाली की त्याच काय आता?”

अभिज्ञा,“ नाही आऊ आपण कुठे तरी चुकलो आहोत काही तरी नक्कीच राहून गेले आहे जे अगम्यला अजून हि त्रास देत आहे.जे  फक्त त्यालाच जाणवत. जे  त्रास देतं! तुम्हाला आठवते अगम्य पेंटिंग मधून आल्यापासून रात्री ओरडत उठायचा! तो आज ही रात्री घाबरून उठतो पण हे घाबरून उठणे वेगळे आहे असं वाटत की त्याचा कोणी तरी गळा आवळत.तो नीट श्वास ही घेऊ शकत नाही आऊ! मी गेल्या एक महिन्यपासून पाहते आहे त्याचा त्रास त्याला विचारल तर तो म्हणाला की आधी घाबरून उठत होतो तसाच उठतो! असं म्हणून त्याने मला गप्प गेलं पण  ज्या  दिवशी डायरेक्टर्स मीटिंगला आपल्या घरी आले त्या  दिवशी मीटिंग संपल्यावर तो रूम मध्ये आला आणि मी झोपले आहे असं समजून तो कसले तरी सावट आणि संकटा पासून मला आणि अज्ञांकला  दूर ठेवायचे आहे म्हणून आम्हाला त्याने स्वतः पासून दूर केले आहे असं काही तरी बोलला! तेंव्हा मला जाणवले की अगम्य काही तरी लपवत आहे म्हणून  मी ठरवले की त्याच्याकडून सगळे जाणून घ्यायचं म्हणूनच मी तुम्ही सगळे बाहेर गेलेले पाहून तो विषय काढला पण अगम्य मला दाद लागू  देत नव्हता म्हणून मग मी  त्या दिवशी झोपले  नव्हते आणि त्याच बोलणे ऐकलंय हे त्याला सांगितले त्यावर  तो चिडला मला  म्हणाला की तुझे याच्याशी काही देणे घेणे नाही तू पुण्याला निघून जा आणि मी चिडले आणि त्याच दिवशी रात्री पुणे गाठले आणि आज पुणे सोडून निघाले होते.  त्याने मला आज सगळ सांगण्याचे कबुल केले म्हणून मी त्याच्याबरोबर यायला तयार झाले पण तो काही सांगण्याच्या आधीच ….. मी असा अताताईपणा करायला नको होता. मी चुकले!” असं म्हणून ती रडू लागली.

आई,“ एवढं सगळ घडत होते अभी आणि तुला आम्हाला एकदा ही सांगावस वाटल नाही.आणि काय ग त्याने तुझ्या काळजीने तुला पुण्याला जा असं सांगितले ना! तर तू त्याला समजून घेण्या ऐवजी इतका तमाशा केलास! तू जर त्याला थोडे समजून घेतली असतीस तर आज अगम्य हॉस्पिटलमध्ये नसता अभी! जर त्याला काही झाले ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार अभी! (त्या अहिल्याबाईंकडे पाहत म्हणाल्या)  माझी मुलगी आहेच मूर्ख पण माफ करा ताई तुम्ही आई म्हणून चुकलात अगम्यला काय झाले हे सविस्तर विचारण्या  ऐवजी त्याला समजून घेवून अभीला समजावव्या ऐवजी तुम्ही त्यालाच दोष देवून रिकाम्या झालात. एवढच काय पण गेल्या चोवीस तासात तुम्ही स्वतः त्याची एकदा ही चौकशी करायला गेला नाहीत! तुमचा मुलगा कसा आहे हे तुम्हाला सांगायला हवं का? त्याने गेल्या चोवीस तासापासून साधं पाणी ही घेतल नाही आणि तुम्ही ही त्याचा विचार केला नाही.त्याने तुमच्या दोघींच्या याच वागण्याचा धसका घेतला आहे इतकं होऊन ही त्या पोराने या मूर्ख मुलीला वाचवायला जावून नसते संकट स्वतःवर ओढवून घेतले आहे.जर त्याला काही झालं तर मी तुमच्या दोघींना ही माफ नाही करू शकणार!” असं म्हणून त्या रडू लागल्या.

           प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक घटनेला ही असतात पण आपण मात्र आपल्याला हवी असलेली बाजू कायम पाहतो आणि त्या बाजूने रियाक्ट होतो अभीज्ञा आणि अहिल्याबाईनी तेच केले होते.

अभीज्ञाच्या जीवावर कोण उठले असेल?अगम्य अभीज्ञाला काय  सत्य सांगणार होता? अगम्य पुन्हा एकदा संकटात सापडला होता  त्यातून तो सुखरूप बाहेर पडेल की त्याच्या बरोबर ते सत्य ही कायमचे जाणार होते?



 

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule