Nov 23, 2020
थरारक

दि लूप होल पर्व २(भाग ४)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग ४)

   अगम्य थोडा शांत झाला आणि त्याचे लक्ष त्याला प्रश्नार्थी नजरेने पाहणाऱ्या अभीज्ञाकडे गेले.ते पाहून अगम्यने तिच्या पासून नजर चोरली. अभीज्ञाने पाहिले आणि ती काळजी मिश्रित रागाने त्याला बोलू लागली.

 

अभीज्ञा,“ काय आहे हे सगळं अमू? किती घाबरला होतास तू आणि अस वाटत होतं की तुझा कोणी तरी  गळा आवळत आहे! श्वास ही घेता येत नव्हता तुला! किती दिवस झाले हा त्रास होतो आहे तुला?आणि आऊना माहीत नसणारच हे कारण आऊनी मला सांगितले असते! तू किती दिवस आणि काय काय लपवणार आहेस आमच्या पासून सांग ना? आम्हाला सगळ्याला तुझी काळजी वाटते आणि तू मात्र काहीच सांगत नाहीस! हे अस माझ्या पासून नजर चोरून काही होणार नाही अमू! तू सांगितलंस तरच  आम्हाला कळणार आहे आणि त्यातून मार्ग निघणार आहे. सांग ना अमू कसला त्रास होतोय तुला?” ती बोलत होती.

 

अगम्य,“ काही नाही ग तुला तर माहीत आहेच की त्या पेंटिंग मधून आल्या पासून मला हा त्रास होतो. त्यात काय लपवायच आणि काय सांगायचं?” तो तिची समजूत काढत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ अच्छा? मी आज ओळखते का तुला आणि तुला काय त्रास होत होता हे मला माहित आहे.हा तो त्रास नाही काही तरी वेगळाच आहे! तू माझ्या पासून किती ही लपवलं तरी मी ते शोधून काढेतच पण तू सांगितले तर यातून काही तरी मार्ग लवकर निघेल अमू प्लिज सांग ना!” ती काळजीने विचारात होती.

 

अगम्य,“ मी म्हणालो ना काही नाही म्हणून!” तो चिडून असं म्हणाला आणि  गॅलरीत निघून गेला.

 

      अभीज्ञा मात्र विचारत पडली. हे जितकं मला साधं वाटत होतं तितकी साधं प्रकरण नाही अगम्य खूप काही लपवत आहे सगळ्या पासून जे खूप गंभीर आणि अर्थात त्याच्या  मघाशीचे बोलण्यावरून धोकादायक आहे. म्हणजेच नक्कीच तीन वर्षांपूर्वी काही तरी  चुकलं आहे. त्याच सावट अजून ही अगम्यवर आहे आणि ते सावट त्याला माझ्यावर व आदूवर पडू द्यायचं नाही म्हणून तो मला दूर लोटतो आहे. पण दोन वर्षापूर्वी तुला एकट सोडण्याची  जी चूक मी केली ती आता नाही करणार! कारण मी तुला नाही गमवू शकत अगम्य! मला माहित आहे तू सहजासहजी मला काहीच सांगणार नाहीस पण तुझ्या कडून सगळं कसं काढून घ्यायची मला माहित आहे.त्यासाठी आमच्यातला दुरावा कमी झाला पाहिजे. 

 

       ती हा विचार करत होती आणि बराच वेळ झाला तरी अगम्य गॅलरीतच होता म्हणून मग तीच कशी बशी बेड जवळ असलेल्या टेबलला धरून उठली आणि हळूहळू तू गॅलरीत गेली. अगम्य गॅलरीच्या रेलिंगला धरून समोर पाहत उभा राहिलेला तिला दिसला. तो पाठमोरा असल्याने त्याला अभीज्ञा तिथे आलेली माहीतच नव्हतं.अभीज्ञा हळूहळू चालत त्याच्या मागे येऊन उभी राहिली व तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या स्पर्शाने त्याने मागे वळून पाहिले आणि तो अभीज्ञाला तिथे खुर्चीवर बसवत  काळजीने म्हणाला.

 

अगम्य,“ हे काय अभी! तू कशाला आलीस इथे?  अग तुला चालू नकोस म्हणून सांगितले आहे ना डॉक्टरने! झोपली का नाहीस तू अजून?”

 

अभीज्ञा,“ तू इथे येऊन एकटाच उभा राहिलास मग मला झोप येईल का अमू! चल रात्र खूप झाली आहे झोप!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ चल तू  काय मला नेल्या शिवाय झोपणार नाहीस!” असं हसत म्हणून त्याने अभीज्ञाला हाताचा आधार दिला आणि बेडवर नेऊन झोपवले आणि तो ही झोपला.

 

         पूर्वेकडे सूर्यनारायण त्याची किरणे मुक्त हस्ताने उधळत होता आणि पृथ्वी जणू सूर्याचा टिळा भाळी लावून नटत होती.पाखरे आपली घरटी सोडून निघाली होती. नेहमी प्रमाणे सहा वाजता अगम्य उठला. अभीज्ञा अजून गाढ झोपेत होती. तो उठून बसला आणि त्याचे लक्ष अभीज्ञाकडे गेले ती शांत झोपली होती आणि तिच्या केसांच्या बटा जणू तिच्या गोऱ्या गलांचे चुंबण घेत होत्या. तिच्या ओठांवर मंद हसू  होते.अगम्यने तिचे केस गालावरून अलगद त्याच्या बोटांनी बाजूला सरकवले. तो तिला अशी झोपलेली दोन वर्षां नंतर पाहत होता. तिला असं झोपलेल पाहून तो भूतकाळातील आठवणीत रमाला. त्याची सकाळ रोज अभीज्ञाच्या नाजूक ओठांचे मधुरसपाण केल्यावरच होत असे. या विचाराने तो मोहरला आणि त्याचे लक्ष तिच्या नाजूक ओठांकडे गेले. त्याने त्याचे बोट न राहवून तिच्या ओठावरून फिरवले आणि अभीज्ञाची झोप चाळवली! अभीज्ञाने अगम्यला पाहिले आणि ती हसून त्याला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ गुड मॉर्निग अमू!”

 

अगम्य,“गुड मॉर्निंग मॅडम! बरं उठा आता मला तुमचं आवरून अदुला शाळेत सोडून ऑफिसला जायचं आहे. उठ लवकर मी आधी तुझं आवरतो मग मी तयार होतो अदुला काय आऊ किंवा आई  तयार करतील!” तो तिला उठवत म्हणाला.

 

अभीज्ञा,“ तुझं आवर आणि तू जा! मी आईला बोलावून घेईन आणि आवरेन माझं!” ती संकोचून म्हणाली.

 

अगम्य,“ अच्छा! म्हणजे मी असताना तू या वयात आईंना त्रास देणार का?” तो नाराजीने म्हणाला.

 

अभीज्ञा,“ नाही तसं नाही पण…”ती खाली मान घालून  संकोचून म्हणाली.

 

          अगम्यच्या लक्षात मात्र सगळा प्रकार आला आणि तो मोठ्याने हसून म्हणाला.

 

अगम्य,“ अभी तू पण ना अशी वागत आहेस जसं की तुला कधीच तसं पाहिलं नाही!” तो तिला डोळा मारून तिला म्हणाला.

 

      अभीज्ञा मात्र त्याच असं बोलणं ऐकून लाजली आणि अगम्यला तिने उशी फेकून मारली. अगम्यने अभीज्ञाला उठवून बाथरूममध्ये नेलं. तिला टूथ ब्रशला पेस्ट लावून देण्यापासून तिला अंघोळ घालून कपडे घालण्यापर्यंत सगळं केलं. तिला आणून ड्रेसिंग टेबल समोर बसवलं आणि तिचे केस विंचरू लागला. अभीज्ञा त्याचे प्रतिबिंब आरशातून निहाळत होती. अगम्यचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते. अभीज्ञा मात्र विचारात पडली हा तोच अगम्य आहे का ज्याने माझी एक चूक माफ केली नाही.का मुद्दाम असं वागला तो मला दूर करण्यासाठी? कारण याच्या वागण्यात काहीच फरक नाही.ती हा सगळा विचार करत होती. तर अगम्यचे तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला विचारलं.

 

अगम्य,“ कुठं लक्ष आहे अभी तुझं! झाले केस विंचरून!” तो हसून म्हणाला.

 

अभीज्ञा,“ काही नाही रे! बरं तुझं आवर आणि नाष्टा करून जा! आऊ ओरडत असतात की तू नाष्टा करत नाहीस म्हणून!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ हो! तुझा नाष्टा वर आणून द्यायला सांगतो.करून घे म्हणजे तुला औषधे द्यायला बरं! दुपारी ही मी जेवायला घरीच येईन!” तो हे बोलत होता तो पर्यंत अज्ञांक रूम मध्ये तयार होऊन आला आणि अभीज्ञाला म्हणाला.

 

अज्ञांक,“ आई मला ना आज स्कुलसाठी आऊ आजीने तयार केले. मी good boy! सारखा वागलो आजीला अजिबात तास(त्रास)दिला नाही.” तो अभीज्ञाच्या जवळ जात म्हणाला.

 

अभीज्ञा,“ हो माझा अदु आहेच good boy! बरं होम वर्क केलंस का नाही तू?” तिने त्याच्या गालाचा पापा घेऊन विचारले.

 

अज्ञांक,“ हो केला ग आई!  आई आजीने करून घेतला माझा! बाबा हे काय तू अजून नाही रेडी झालास जा ना रेडी हो मला लेट होईल स्कुलमध्ये जायला!” तो कमरेवर हात ठेवून अगम्यला पाहून बोलत होता.

 

अगम्य,“ हो साहेब आवरतो!” तो हसून म्हणाला आणि रेडी व्हायला निघून गेला.

 

अज्ञांक अभीज्ञाशी गप्पा मारत तिथेच बसला. तो पर्यंत रामू नाष्टा घेऊन आला.अभीज्ञाने स्वतः ही नाष्टा केला आणि अज्ञांकला ही भरवला. अगम्य तयार झाला त्याने अभीज्ञाला मेडिसीन्स दिले  आणि तो अज्ञांकला घेऊन खाली गेला तो ही नाष्टा करून अज्ञांकला घेऊन निघून गेला.तो म्हणाल्या प्रमाणे लंच ब्रेकमध्ये पुन्हा घरी आला.

        पुढचा महिना भर सगळ्यांचे हेच रुटीन सुरू होते. अभीज्ञा आता अपघातातून बरीच सावरली होती. आज तिची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती सगळं ठीक असेल तर आज तिच्या हाताचे प्लास्टर काढणार होते. म्हणूनच अगम्य ही आज ऑफिसला गेला नव्हता. त्याने स्वतःचे आणि अभीज्ञाचे आवरले आणि तो अभीज्ञाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरने तिला तपासले आणि तिच्या हाताचे प्लास्टर ही काढले.त्यामुळे अभीज्ञा मात्र खुश होती. पण अजून तिला आठ दिवस तरी ऑफिसला जाता येणार नव्हते. पण ती आता स्वतःची कामे स्वतः करू शकणार होती. अगम्यने तिला घरी सोडले आणि तो ऑफिसला निघून गेला.अभीज्ञा मात्र आता अगम्य काय आणि का लपवत आहे? हे शोधण्याचा प्रयत्न करायचा हा विचार करत होती.तिला अगम्य कडून हे सर्व कसे जाणून  घ्यायचे त्याला कसे बोलते करायचे हा विचार करत होती.कारण अगम्य कडून हे विचारून घेणे आणि त्याला बोलत करण इतकं सोपं नव्हतं हे ती जाणून होती.

 

अभीज्ञा अगम्य काय लपवत आहे ते जाणून घेऊ शकेल का? अगम्य अभीज्ञाला सगळं सांगेल का?अगम्यला कोणती गोष्ट इतकं त्रास देत होती? 

      

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule