Login

दि लूप होल पर्व २ (भाग २७)

This is a suspens story

     मागच्या भागात

              अमावस्येचा दिवस उगवला आणि लूप होल म्हणजेच अगम्यची त्या पुस्तकात जाण्याची ही वेळ जवळ आली होती.,नाशिकहुन बाबा ही आले होते. बाबांनी अगम्य कडून पूजाविधी करून  घेतले ज्यात अभिज्ञा ही सामील झाली.बरोबर तीन वाजता अगम्य पुस्तकात प्रवेशकर्ता झाला आणि अभिज्ञा ही त्याच्या मागे पुस्तकाचे गेली.

आता पुढे...  

  अगम्यने पुस्तकात प्रवेश केला आणि त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अभिज्ञाने पुस्तकात प्रवेश केला. तिला पाहून अगम्य रागाने लाल बुंध झाला.

अगम्य,“ तुला बजावले होते ना मी की तू माझ्या मागे यायचे नाही का आलीस?” तो रागाने म्हणाला.

अभिज्ञा,“ तुला  चांगलच माहीत आहे मी का आले ते?” ती ठामपणे म्हणाली.

अगम्य,“ तुला मी….” तो पुढे बोलणार तर एक मोठा आवाज झाला

  अस वाटत होतं एक व्यक्ती गडगडाटी हसत बोलत होती आकाशवाणी झाल्या सारखी.

        “आलास अगम्य ये स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या जगात तुझे! अरे वा यावेळी तर तुझी बायको पण आहे( मोठ्याने हसणे) मागच्या वेळी थोडक्यात वाचलास पण या वेळी नाही वाचणार तू ही आणि ही तुझी बायको ही हे माझे साम्राज्य आहे!”तो रागाने म्हणाला

तुम्हाला कळलेच असेल तो आवाज कोणाचा होता अर्थातच सूर्यकांतचा!

अगम्य,“ मी ही या वेळी तुला सोडणार नाही सूर्यकांत विसरलास गेल्या वेळी तुझ्या नाका खालुन पेंटींग नेली होती!” तो शांतपणे म्हणाला.

“ अरे हट या वेळी तुला फक्त माझा नाही तर माझ्या प्यादांचा  ही सामना करायचा आहे तू त्यांचा सामना कर मग माझ्या पर्यंत पोहोच!” तो म्हणाला आणि तो आवाज लुप्त झाला.

अगम्य,“ सांगितले होतो ना तुला अभिज्ञा माझ्या मागे येऊ नकोस म्हणून!” तो चिडून म्हणाला.

अभिज्ञा,“ आता माघारी जाऊ शकते का मी? चल ना वेळ खूप कमी आहे आपल्याकडे” ती म्हणाली आणि अगम्यने तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिचा हात धरून तो पुढे निघाला. 

ते जिथे होते तिथे सगळीकडे जंगल होते आणि खूप लांब राजवाडा आणि छोटेसे गाव होते. ते दोघे जंगलातून वाट काढत थोडे पुढे गेलेच होते की एकसारखे कपडे असलेल्या आणि हातात भाला घेतलेल्या काही लोकांनी त्यांना घेरले. अभिज्ञा थोडीशी घाबरली आणि अगम्यने तिला स्वतः च्या मागे लपवले ते लोक त्यांना आता बंदी बनवून घेऊन जाणार  तो पर्यंत त्या लोकांच्या दिशेने सपसप करत चार पाच बाण एकामागे एक आले.त्यातला एक बाण त्यांच्यातल्या एकाला लागला आणि सगळे पळून गेले. अगम्य आणि अभिज्ञा बाण आलेल्या दिशेने उत्सुकतेने पाहिले तर. एक सतरा-अठरा वर्षाचा गोरा गोमटा उंचा पुरा तरुण त्याच्याकडेच हातात धनुष्य घेऊन येत होता.त्याच्या पाठीला बाणांचा भाता होता. अगम्य आणि अभिज्ञा त्या तरुणाकडे आश्चर्य मिश्रित कुतूहलाने बघत होते. तो तरुण त्यांच्या जवळ आला आणि त्यांना घाईने म्हणाला.

तरुण,“ तुम्ही माझ्या बरोबर चला इथे तुम्ही सुरक्षित नाही आहात!” 

         अभिज्ञा आणि अगम्य त्या तरुणाच्या मागे होकारार्थी मान हलवून त्याच्या मागे यंत्रवत चालत राहिले.ते  गर्द जंगलातून वाट काढत एका मोठ्या गुहे जवळ पोहोचले पण ती गुहा एका भल्या मोठ्या दगडाने बंद केलेली होती. त्या तरुणाने तिथे असलेला कसला तरी दगड फिरवला आणि गुहेच्या दाराचा  दगड  आवाज करत बाजूला झाला.  ती गुहेत दार उघडण्याची कळ असावी बहुतेक!त्याने अगम्य आणि अभिज्ञाला डोळ्यानेच आत येण्यासाठी खुणावले आणि त्याने गुहेत जाऊन कसली तरी कळ पुन्हा दाबली आणि आवाज करत दार पुन्हा बंद झाले तो पुढे आणि अभिज्ञा-अगम्य त्याच्या मागे चालत होते. बाहेरून गुहा वाटत असली तरी गुहेचे थोडे अंतर चालल्यावर समोर छोटेसे मैदान होते तिथे डोंगरातून एक धबधबा वाहत होता थोडी हिरवळ होती आणि डोंगराच्या समोर एक प्रशस्त अशी गुहा! तिथे खाण्यासाठी फळे कंदमुळे होती. पाणी पिण्यासाठी मडकी होती. अगम्य आणि अभिज्ञा ते सगळं निहाळत होते. त्यांना असं पाहून तो तरुण त्यांना छोट्या मडक्यात पाणी देत म्हणाला.

तरुण,“ तुम्ही दोघे बसा आणि हे घ्या पाणी!” दोघांनी पाणी घेतले आणि ते तिघे ही खाली बसले.

 अगम्य,“ तुम्ही कोण आहात आणि ते लोक कोण होते? आणि तुम्ही आम्हाला का वाचवले?” त्याने एका दमात विचारले.

तरुण,“ मी राजवीर या देशाचा राजकुमार आणि ते लोक माझा भाऊ रणवीर जो सध्या या देशाचा नामधारी राजा आहे त्याचे होते.” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ अरे पण राज्याभिषेक तुझा झाला होता ना तू राजा होतास की आणि नामधारी राजा म्हणजे?”ती म्हणाली.

राजवीर,“ हो झाला होता पण तो आला आणि सगळे चित्र पालटले त्याने थोड्याच दिवसात माझे राज्य त्याच्या पिशाच्च शक्तीने हिसकावून घेतले आणि रणवीरला राज्यावर बसवले पण नावालाच बाकी या राज्याचा आणि सगळ्या कथाचा अनभिषिक्त राजा सूर्यकांत आहे. रणवीर त्याच्या हातचे बाहुले. मी तिथून पळून आलो आणि इथे राहिलो हे ठिकाण माझ्या वडिलांनी निर्माण केले होते. जर राज्यावर संकट आले तर इथे राहण्याची व्यवस्था आहे म्हणून! त्यांनीच मला हे ठिकाण दाखवले. आमचे राज्य ज्योतिषी  मधुसूदन यांनी भविष्य वाणी केली होती की भविष्यातून  स्त्री-पुरुष येतील आणि आपल्या सगळ्यांना सुर्यकांतच्या जाचातून सोडवतील! तुम्हाला पाहून मी लगेच ओळखले कारण तुमचा पोशाख!” तो सांगत होता.


 

अगम्य,“ काळजी नको करू राजवीर आम्ही त्या सुर्यकांतचा नायनाट करण्यासाठीच आलो आहोत लवकरच तुमचं पुस्तक अर्थात तुमचं जग पूर्ववत होईल” तो आश्वासन देत म्हणाला.


 

राजवीर,“ बर यात मी तुमची काय मदत करू शकतो?” त्याने विचारले.

अगम्य,“ तू फक्त आम्हांला या कथेतून पुढच्या कथेत जाण्यासाठी मार्ग दाखव कारण शेवटच्या कथेत जाऊन आम्हाला सुर्यकांतच्या पेंटींगचा तुकडा ज्यामुळे तो तुमच्या पुस्तकात साम्राज्य पसरवू शकला आणि ज्यामुळे तो अजून ही मुक्त नाही झाला तो तुकडा घेऊन आमच्या जगात जायचे आहे आणि आमच्याकडे वेळ खूप कमी आहे!” तो म्हणाला.

राजवीर,“ ठीक आहे मी तुम्हाला रस्ता दाखवतो पुढच्या कथेचा आणि हे घ्या ही तलवार तुमच्या जवळ ठेवा याची तुम्हाला गरज लागेल आणि ताई हा खंजीर तुमच्या जवळ असू द्या!” असं म्हणून त्याने त्याची हत्यारांची पेटी उघडून एक तलवार आणि एक खंजीर काढून दोघांच्या हातात दिला.

         तो त्यांना घेऊन गुहेच्या बाहेर पडला. ते जंगलाची वाट तुडवत एका चिंचोळ्या वाटे पर्यंत पोहोचले.

राजवीर,“ हा रस्ता पुढच्या कथेत जातो तुम्ही निघा! ते बघा घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येत आहे. ते आले तर तुम्हाला बंदी बनवतील घाई करा.” तो काळजीने आणि भीतीने बोलत होता.

अभिज्ञा,“ धन्यवाद राजकुमार राजवीर!” ती कृतज्ञपणे म्हणाली. अगम्य काही बोलणार तर राजवीर त्याला अडवत म्हणाला.

राजवीर,“ तुम्ही निघा वेळ खूप कमी आहे!” तो म्हणाला


 

 आणि अभिज्ञा-अगम्य त्या चिंचोळ्या वाटेवरून दुसऱ्या कथेत प्रवेशकर्ते झाले.

★★★★

 इकडे एकीकडे देशमुख वाड्यात  महामृत्यूजय यज्ञ सुरू होता दुसरीकडे राहूल आणि मीरा वेगळे विधी करत होते अहिल्याबाई आणि अभिज्ञाची आई सप्तचक्र साधनेतून अगम्य-अभिज्ञाला शक्ती प्रक्षेपित करत होत्या.


 

दुसऱ्या कथेत काय होणार होते आणि ती कथा कोणती होती? तसेच आता सूर्यकांत कोणते पाऊल उचलणार होता?

हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल सीझन दोन!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

क्रमशः