लूप होल पर्व २(भाग २५)

This is a suspense story

मागच्या भागात

     सोनिया,केदार आणि मोनिका देशमुख वाड्यात येतात. अभिज्ञा आणि सगळ्यांनाच त्यांना पाहून खूप आनंद होतो. केदार सांगतो की अघोरी बाबाच त्याचे ही गुरू आहेत.सोनिया केदारने बऱ्याच गोष्टी तिच्या पासून लपवल्या म्हणून ती केदारवर चिडलेली असते पण अभिज्ञा तिला समजावून सांगते आणि अगम्यला तिने समजून घेतले नाही ही तिच्या मनातील खंत बोलून दाखवते.

आता पुढे

         सोनिया आणि अभिज्ञा दोघी ही आप-आपल्या रूममध्ये गेल्या. अभिज्ञा रूम मध्ये गेली तर  अगम्य अजून लॅपटॉपवर काम करत बसला होता. अभिज्ञाने रुमचे दार लावले आणि अगम्यकडे रागाने पाहत म्हणाली.

अभिज्ञा,“ अगम्य तुला झोप म्हणून सांगितले होते ना!  घड्याळ पाहिले का किती वाजलेत बारा वाजून गेले आहेत?” ती बेडवर बसत लॅपटॉप त्याच्या हातातून काढून घेत म्हणाली.

अगम्य,“ अग थोडं राहिले आहे काम ते तरी पूर्ण करू दे!” तो  तिला समजावत म्हणाला.

अभिज्ञा,“ काही नाही करायचे आता! एक तर पहाटे उठावे लागते तुला साधनेसाठी! आणि दिवसभर ऑफिसमध्ये आणि रात्री जर इतका वेळ काम करत बसलास तर आराम कधी करणार आधीच तुझी तब्बेत तोळामासा झाली आहे. अमावस्या जवळ येत आहे तुझी तब्बेत बिघडली तर! कळत कसं नाही तुला! तुला ना…” ती पुढे बोलणार तर अगम्य तिच्या ओठांवर त्याचे बोट ठेवतो आणि तिला गप्प करतो.पण अभिज्ञा चिडते आणि त्याचा हात बाजूला करून बोलू लागते. 

अभिज्ञा,“ हे काय नवीन आता! नालायक कुठला? मी काय बोलते इतकं  कानीकपळी ओरडत आहे पण तुझं लक्ष असेल तर शप्पथ!” ती आता रडकुंडीला आली होती.

अगम्य,“ अग किती बोलशील?  तुझी बोलती अशी तर बंद होणार नाही. म्हणून म्हणले ही ट्रिक करून पाहावे पण कसले काय?” तो हसून तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.

अभिज्ञा,“ तुला हसायला येतंय का?” ती चिडून म्हणाली.

अगम्य,“ अग किती चिडचिड करशील अशाने तुझीच तब्बेत बिघडेल आणि नको करुस इतकी काळजी  माझी! मी ठीक आहे आणि अग अमावस्ये नंतर काय होणार आहे मी ऑफिसला जाऊ शकेल की नाही किंवा मग…!” तो पुढे बोलायचा थोडा वेळ थांबला.

अभिज्ञा,“ किंवा मग काय अगम्य बोल ना का थांबलास?” ती चिडून त्याला उठवून बसवत म्हणाली.

अगम्य,“ ते तुला ही चांगलच माहीत आहे अभिज्ञा तुला ऐकायचं आहे तर ऐक! किंवा मग मी या वेळी त्या लूप होल मधून नाहीच येऊ शकलो बाहेर किंवा बाहेर आलो आणि वाचलोच नाही तर! म्हणून मी सगळ्या तरतुदी करून ठेवत आहे. असं ही 60%शेअरची  म्हणजे सगळ्या बिझनेसची मालकीण तूच आहेस आणि बाकी 40℅शेअर्स मी अज्ञांकच्या नावावर करत आहे. राहुल अज्ञांकचा सल्लागार असेल! आणि आऊ 

,आई, बाबा यांची ही तरतूद केली आहे आणि तू आहेसच की सगळं सांभाळायला! माझा तुझ्यावर विश्वास आहे अभी! मी राहिलेली पेंडिंग कामे उरकत आहे उगीच तुझ्यावर लोड नको उगीच!” तो तिचा हात त्याच्या दोन्ही हातात धरून गंभीरपणे बोलत होता आणि हे सगळे त्याचे शब्द अभिज्ञाच्या कानात शिशाचा रस ओतावे तसे उतरत  होते आणि तिचे काळीज पिळवटत होते. ती त्याचे बोलणे ऐकून दोन मिनिटं स्तब्ध झाली आणि भानावर येऊन स्वतः चा हात त्याच्या हातातून काढून घेत रागाने त्याला म्हणाली.

अभिज्ञा,“ झालं तुझं सगळं ठरवून! नाही म्हणजे अजून काही बाकी आहे का? तू कायमच मला गृहीत धरतोस आणि तुझी मनमानी करतोस ना ठीक आहे पण या वेळी मला तू गृहीत धरू नकोस!कारण या वेळी मी तुझं ऐकेणच अस नाही. तुझ्या कोणत्याच प्लॅनमध्ये मला तू घेऊ नकोस! ” ती रागाने म्हणाली.

अगम्य,“ काय? म्हणजे काय म्हणायचे आहे तुला अभी अग कमीत कमी तू तरी हे सत्य स्वीकाराशील की लूप होलमध्ये काही ही होऊ शकत आणि मी परत नाही आलो तर किंवा बाहेर येऊन ही नाही वाचलो तर? असा प्रॅक्टिकल विचार करशील अशी अपेक्षा मी तुझ्याकडून केली होती. तर तू काही तरी वेगळच बोलत आहेस ज्याचा अर्थ मला नाही लागत आहे. जरा स्पष्ट बोलशील का?” तो गोंधळून म्हणाला.

अभिज्ञा,“ मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही अगम्य! मला झोप येतेय खूप!” ती नाराजीने म्हणाली.

अगम्य,“ अभी मी काय विचारतोय त्याचे उत्तर दे मला आधी मग झोप!” त्याच्या आवाजाला आता धार आली होती हे अभिज्ञाच्या लक्षात आले.


 

    अभिज्ञा जे बोलली होती ते ती ही लूप होल मध्ये जाणार होती म्हणून  भावनेच्या भरात बोलून गेली होती कारण अगम्यच्या एका-एका शब्दाने तिच्या काळजाला घरे पडले होते. ती अगम्यला गमावण्याचा आणि त्याच्या शिवाय जगण्याचा विचारच करू शकत नव्हती आणि आज अगम्यने मात्र तिच्या त्याच दुखऱ्या नासेवर न कळतपणे वार केला होता. 

    पण आता त्याला काय उत्तर द्यावे हे तिला कळत नव्हते कारण त्याला जर कळले की मी त्याच्या मागे लूप होलमध्ये जायचे ठरवले आहे तर तो आकांड तांडव करणार आणि मला  कसे ही करून त्याच्या मागे जाण्यापासून रोखणार पण आता तिच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्या शिवाय तो गप्प ही बसणार नाही हे तिला माहीत होते. या सगळ्याचा ती विचार करत होती आणि पुन्हा अगम्यने तिला हलवले आणि तो रागाने म्हणाला.

अगम्य,“ मी काय विचारतोय अभिज्ञा?” त्याच्या आवाजात जरब होती.

अभिज्ञा,“म्हणजे  तू प्रत्येक वेळी हेच करतोस! सगळे निर्णय घेऊन मोकळा होतोस! मला गृहीत धरतोस! मागे ही एकट राहण्याचा निर्णय घेतलास मला पुण्यात ठेवलंस ती गोष्ट मी माझ्या चुकीची शिक्षा म्हणून मान्य ही केली पण तुझ्या वागण्याचा उलगडा नंतर झाला. कायम तू हेच करतोस अगम्य माझ्या बरोबर!”असं म्हणून ती रडायला लागली.तिने रडण्याचे तिचे ठेवणीतले हत्त्यार काढले होते पण अगम्य त्याला बधेल का याची तिला शंका होती.

अगम्य,“खरं का की तुझ्या मनात माझ्या मागे लूप होल मध्ये येण्याचे खूळ आहे अजून! तसं असेल तर परिणाम खूप वाईट होतील अभी!मी आधी ही सांगितले आहे आणि आता ही….. ” तो संशयाने तिला पाहत बोलत होता तर अभिज्ञा त्याचे बोलणे मध्येच तोडत बोलू लागली.


 

अभिज्ञा,“ तुझा माझ्यावर विश्वास नाही! मग मी किती ही सांगितले तरी तुला पटणार नाहीच! आणि असलं अभद्र माझ्या समोर नाही बोलायचे परत!” ती अस म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली.

अगम्य,“ तसं नाही अभी अग माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे.” तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला.

अभिज्ञा,“हो ना हाच तो विश्वास!” ती तोंड फुगवून म्हणाली.

अगम्य,“sorry ना!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ असलं क्युट थोबाड करून sorry म्हणल्यावर मी बिचारी काय करणार ना!” ती नाटकीपणे म्हणाली.

अगम्य,“ अच्छा!मग अजून काय काय मिळणार या क्युट थोबाडाकड बघून!” तो तिला मिठीत घेत म्हणाला.

अभिज्ञा,“ काही नाही मिळणार! एक वाजून गेले आहेत झोप अजून पहाटे उठायचे आहे ना तुला? उद्या अजून त्या पुस्तकातल्या राहिलेल्या दोन गोष्टी सांगायच्या आहेत. उद्या ऑफिसला नको येऊस मी आणि राहुल पाहतो सगळं! आराम कर उद्या!दुपरून भरवू सभा!” ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.

अगम्य,“ जो हुकूम! Love you अभी!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ झोपा आता! बास झाला मस्का!” ती हसून म्हणाली.

★★★

        सकाळी नेहमी प्रमाणे अभिज्ञाला जाग आली तर अगम्य तिला झोपलेला दिसला. आज तो  साधनेला उठलाच नव्हता. अभिज्ञा उठून बसली.  ती अगम्यकडे पाहत होती. तो एका अंगावर गाढ झोपला होता.त्याच्या केसातून हळूवार हात फिरवत ती मनातच बोलत होती.

“ sorry अम्यु आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याशी मी खोटं बोलत आहे. तुझ्या पासून काही तरी लपवत आहे. पण मी तरी काय करू मी नाही तुला एकट्यालाच पुन्हा त्या सैतानाशी लढायला पाठवू शकत. गेल्यावेळी माझा ना इलाज होता पण आता तसं नाही. एक तर तू खूप जास्त कमजोर आहेस त्याच्या पुढे तुझा एकट्याचा निभाव नाही लागणार! मला माहित आहे तू खूप चिडणार आहेस आकांडतांडव ही करशील पण I will handle it! love you!” असा विचार करून तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्या स्पर्शाने तो जागा झाला. खडबडून उठत तो डोळे चोळत म्हणाला.

अगम्य,“ किती वाजले अभी! आज जागच नाही आली मला छाss आजची साधना बुडाली बघ!” तो नाराजीने म्हणाला.

अभिज्ञा,“ काही साधना बुडत बिडत नाही! आज असं ही तू ऑफिसला येणार नाहीस हे रात्रीच मला काबुल केलं आहे. अजून थोडावेळ झोप आणि मग उठून फ्रेश हो आणि साधना कर मग! असं ही सोनिया केदार आले आहेत आपल्या पैकी एक जण तर नको का घरात!झोप तू मी जाते.” असं म्हणून ती आवरून  खाली गेली आणि अगम्य पुन्हा झोपला.

          ती खाली गेली तर सोनिया, केदार, मोनिका नुकतेच आवरून आले होते.अभिज्ञा आणि त्या तिघांना पाहून अहिल्याबाई म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ या सगळे नाश्ता करा.अभी अमू कुठे आहे ग?” अभिज्ञा आणि ते तिघे डायनींग टेबलवर बसले आणि अभिज्ञा म्हणाली.

अभिज्ञा,“ झोपला आहे तो मीच म्हणाले झोप अजून रात्री उशिरा पर्यंत काम करत बसला होता. आज असं ही ऑफिसला येऊ नको म्हणाले मीच सोनिया आणि केदारला कंपनी दे! राहुल कुठे आहे आऊ?” तिने विचारले.

अहिल्याबाई,“ तो बघ आलाच राहुल! काय करावं या अगम्यला इतका वेळ कशाला जागरण करायचं माहीत आहे पहाटे उठायचे असते!” त्या काळजीने म्हणाल्या.

सोनिया,“ अभी आमच्या येण्याने तुमचे रुटीन फिसकटले बघ!पण आम्ही निघतोय आता!

” ती नाराजीने म्हणाली.

अभिज्ञा,“ काय? अग काल तर आलात आणि आज निघालात लगेच!ते काही नाही तुम्ही नाही जात आहात कुठे!” ती नाराजीने म्हणाली.

केदार,“ हो अभिज्ञा आम्ही ही रहायच्याच हिशोबाने आलो होतो पण रात्री मला बाबांनी स्वप्न लोकातून आदेश दिला आहे मुबंईला जायचा! मी तुम्हाला या कामात काही तरी मदत करणार आहे असे बाबांचे म्हणणे आहे पण ती कशी काय हे मात्र मला अजून कळले नाही. हा पण मला हवेलीत जाऊन मी ही हवेलीचा वारस आहे हे सिद्ध करावे लागणार आहे आणि तुमच्या मदती साठी तिथेच कसली तरी पूजा करावी लागणार आहे म्हणून आम्ही निघत आहोत आता!पुन्हा भेटूच की!” त्याने स्पष्टीकरण दिले.

अभिज्ञा,“ अरे देवा असे आहे तर सगळे! ठीक आहे निघा तुम्ही राहुल येईल सोडायला तुम्हाला!” ती म्हणाली आणि केदार,सोनिया आणि मोनिका निघाले.

    राहुल त्यांना श्रीरंगपूरच्या स्टॅंडवर सोडून आला आणि अभिज्ञा बरोबर ऑफिसला गेला.

★★★

      दुपारी अभिज्ञा आणि राहुल घरी आले. सगळे जेवले अगम्यने केदार आणि सोनिया बद्दल अभिज्ञाला विचारले तर केदारने सांगितलेले अभिज्ञाने त्याला सांगितले पण ते तिघे त्याला न भेटताच निघून गेले म्हणून तो थोडा खट्टू झाला. सगळे हॉलमध्ये जमले आणि त्या पुस्तकातील  पुढच्या स्टोरी सांगायला अभिज्ञाने सुरुवात केली.

अभिज्ञा,“ या आधी तीन स्टोरीज सांगून झाल्या आहेत माझ्या आता पुढच्या सांगते. चौथी कथा आहे एका शुभम नावाच्या मुलाची जो खूप खोडकर आहे त्याने त्याच्या खोड्याने गावात सगळ्यांना नाकीनऊ आणलेले असते. असेच सवयी प्रमाणे तो गावातून हिंडत असतो तेंव्हा त्याला काही वाटसरू गावात एका झाडाखाली थांबलेले दिसतात.तेंव्हा त्याच्या मनात त्यांची खोड काढण्याचा विचार येतो आणि त्या वाटसरूंचा डोळा चुकवून तो त्याचे समान लंपास करण्याचा प्रयत्न करतो आणि पकडला जातो. ते लोक त्याला चोर समजून राजाकडे न्यायला निघतात तर गावातील मोठे लोक तो आमच्या गावातील मुलगा असून तो चोर नाही तर चांगल्या घरातील मुलगा आहे. त्याला खोड्या काढण्याची सवय आहे म्हणून त्याने हे कृत्य केले असेल त्याला सोडा असे म्हणून शुभमला सोडवून घेतात आणि शुभमचे डोळे उघडतात त्या नंतर तो सुधारतो आणि लोकांना त्रास द्यायचे सोडून तो लोकांना मदत करायला सुरू करतो.” ती म्हणाली.

अगम्य,“ आणि शेवटची स्टोरी आहे एका चेटकीनीची बरोबर ना अभी?”त्याने विचारले.

अभिज्ञा,“ हो आणि त्याच शेवटच्या कथेत त्या पेंटींगचा तुकडा एका बरणीत आहे अगम्य! एक चेटकीन असते आणि तिने मधू नावाच्या एका मुलीला सांभाळलेले असते खरं तर तिने मधूला तिच्या घरातून पळवून आणलेले असते कारण तिला तिचे काम करण्यासाठी मुलगी हवी असते पण मधूला मात्र आपण अनाथ आहोत आणि या बाईने आपल्याला सांभाळले आहे असे समजून तिची सगळी सेवा करत असते. चेटकिन वेगवेगळे जादूचे प्रयोग करत असते आणि कधी कधी ते मधुवर ही  ते प्रयोग करत असते. त्यामुळे मधू तिला खूप घाबरत असते. पण एक दिवस एक राजकुमार मधूला पाहतो आणि तिला चेटकिनीच्या तावडीतून  सोडवून घेऊन जातो! या पाच कथा त्या पुस्तकात आहे!” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ पण या सगळ्यात केदार आपली मदत कशी करणार आहे ते मात्र कळत नाही! ते बाबा आल्यावर आपल्याला कळेल आता!”

राहुल,“ हो काकू आपल्याला बाबा आल्यावरच ते कळेल पण तो पर्यंत आपण बाकी तयारी करून ठेवुयात की; तुम्ही म्हणालात की मला आणि मिराला कोणता तो पालाश विधी करावा लागेल त्याची तयारी करू तो पर्यंत आणि अम्या तू आता ऑफिसला जायचे बंद  कर  स्वतःकडे तुझ्या सप्तचक्र साधने कडे लक्ष दे आणि हो तब्बेत सांभाळ बाबा तुझी! अमावास्येला आता खूप कमी दिवस राहिले आहेत!” तो काळजीने म्हणाला.

अगम्य,“ हो तूच राहिला होतास बघ माझी काळजी करायचा या लोकांनी तुला ही कामाला लावले.”तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ याला कोणत्या ही गोष्टीचे गांभीर्यच वाटत नाही आऊ!” ती चिडून म्हणाली.

अहिल्याबाई,“ अभी तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस आपण आपले काम करू आणि त्याला त्याचे काम करायला लावू! जा आता सगळे आराम करा जरा!” त्या म्हणाल्या.

   आणि सगळे निघून गेले

 केदार अगम्य आणि अभिज्ञाला काय आणि कशी मदत करणार होता?अगम्यला जेंव्हा  हे कळेल की अभिज्ञा ही त्याच्या मागे लूप होल मध्ये येणार आहे तेव्हा तो काय करणार होता?


 

हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल सीझन दोन!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

क्रमशः

 
  

🎭 Series Post

View all