दि लूप होल पर्व २ (भाग २१)

This is a suspens story

    अभिज्ञाला सकाळी जाग आली तर ती अगम्यच्या मिठीत आणि अज्ञांक तिच्या कुशीत होता.तिने अज्ञांकच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि अज्ञांकला व्यवस्थित झोपवून ती अगम्यकडे वळली आणि त्याच्या केसातून हात फिरवत हळूच त्याच्या कानात म्हणाली.

अभिज्ञा,“उठ अमू सहा वाजून गेले आहेत तुला ऑफिसला जायचं आहे ना!” ती हळूहळू कुजबुजत होती.

अगम्य,“ अजून थोडा वेळ झोपू दे! जा तू चहा घेऊन ये तो पर्यंत!” तो डोळे न उघडता म्हणाला.

अभिज्ञा,“ हो मी आणते चहा पण तू उठ तरी आधी!” ती त्याला उठवत म्हणाली. 

अगम्य,“ काय ग तुझी सकाळ सकाळ कुरकुर असते.” तो डोळे चोळत म्हणाला.

अभिज्ञा,“ अगम्य तू ना उद्या पासून ऑफिसला जाऊ नकोस तुझी खूप धावपळ आणि ओढाताण  होत आहे. साधना,ऑफिस, ते पुस्तक! मला ना तुझी काळजी वाटते.” ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून काळजीने बोलत होती.

अगम्य,“ अग काळजी काय करायची त्यात मी करेन सगळे मॅनेज! आणि ऑफिसकडे खूप दुर्लक्ष झाले आहे गेल्या काही महिन्यात आणि कारखाने, फूड फॅक्टरी या कडे ही लक्ष द्यावे लागणार आहेच की! मालक नाही लक्ष देत म्हणाल्यावर कामगार पण मग टाळाटाळ करतात कामाची!तू नको काळजी करू आणि पुन्हा चार दिवस सुट्टी घ्यावीच लागणार आहे!” तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला.

अभिज्ञा,“ बरोबर आहे तुझे पण तुझी तब्बेत नको बिघडायला. मी आले असते ऑफिसला तू बाकी पाहिलं असतस पण राहुल-मीरा आले आहेत मग आपण असे दोघे ही निघून जाणे नाही ना बरे दिसत! बरं तुझा बी.पी. चेक करून घेऊ आपण! आज मी फोन करते डॉक्टरला!” ती म्हणाली.

अगम्य,“ तो अजून कशाला चेक करायचा मी ठीक आहे!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ जास्तीची नाटकं नकोत मला कळलं! मी डॉक्टरला बोलत आहे संध्याकाळी!आणि त्या पुस्तकाच काय करायचं ते ही पाहायचं आहे की अजून तू लवकर ये घरी आज आणि उठ मी चहा घेऊन येते!” ती असं म्हणून उठली

          तर अज्ञांक डोळे चोळत उठला. अभिज्ञाने  त्याला डोळे चोळताना पाहिले आणि त्याला उठवून बसवले.त्याने आई म्हणून तिला मिठी मारली. अभिज्ञा त्याला प्रेमाने थोपटत म्हणाली.

अभिज्ञा,“ उठ अदू मी आलेच! तो पर्यंत बाबा जवळ बस!” असं म्हणून ती केस बांधत बाहेर गेली आणि अज्ञांक अगम्यला चिकटला.

★★★★


 

         अगम्य ऑफिसला निघून गेला. अज्ञांकला अभिज्ञाने शाळेत पाठवून दिले. ती आता जरा निवांत होती. सखुला दुपारचा स्वयंपाक काय करायचा याच्या सूचना देऊन ती अहिल्याबाईकडे हॉलमध्ये गेली. त्या राहुलच्या बाळाला मांडीवर घेऊन खेळवत होत्या. राहूल, मीरा आणि तिचे आई-बाबा ही तिथेच बसले होते. अभिज्ञा जाऊन बसली थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तिने विषयाला हात घातला.

अभिज्ञा,“आऊ पुस्तक तर मिळाले आता पुढे काय करायचे?” तिने विचारले.

अहिल्याबाई, “ अभी बाबांनी नाशिकमधील त्यांच्या अखाड्याचा लँडलाईन नंबर दिला आहे पण ते तिथे नसतात तरी त्यांनी काही तरी विचार करूनच नंबर दिला असेल ना! मी फोन करते आता!” असं म्हणून त्यांनी फोन लावला आणि एका व्यक्तीने  फोन उचलला.

अहिल्याबाई,“ मला हा नंबर त्या बाबांनी दिला होता.ते आहेत का?” ती व्यक्ती पुढे बोलणार तर तिथे बाबा हजर होते. त्या व्यक्तीने फोन स्पीकरवर टाकला आणि बाबा बोलू लागले.

बाबा,“ कुछ मत बता माई सब कुछ पता है मुझे! तुझ्या नातवाचे पुस्तक आहे ते त्यात त्या आत्म्याने घर केले आहे. तुम्हाला प्रश्न सतावत आहे की तो असा छोट्या मुलाच्या पुस्तकात का जाऊन बसला? पण त्यावेळी त्याला तेच पुस्तक दिसले आणि तो त्यात जाऊन बसला! ते पुस्तक आता एकदा उघडले गेले आहे पुन्हा उघडू नका ते पुस्तक अगम्यच्या रूममध्ये आहे तिथेच राहू दे आणि तुझ्या सुनेला म्हणजे  अभिज्ञाला त्यातील एक ना एक कथा पाठ आहे ती अगम्य आणि तुम्हाला त्या पुस्तकातील सगळ्या कथा सांगेल! तुमच्या साधना आणि महामृत्युंजय जप सुरूच ठेवा मी अमावस्येला तिथे हजर असेन! हा आणि एक ब्राम्हण ही पालाश विधी करायला बोलावून ठेवा!बंम बंम भोले!” असं म्हणून बाबा तिथून निघून गेले अहिल्याबाईनी ही फोन स्पीकरवर ठेवला होता त्यामुळे बाबाचे बोलणे सगळ्यांनी ऐकले होते.


 

अभिज्ञा,“ अमावस्येला अजून पंधारा दिवस आहेत आऊ आणि सुरवातीचे पंधरा दिवस निघून गेले आहेत त्यामुळे अगम्यला आता झोपू द्यायला काही हरकत नाही! ऑफिस, फेक्टरी  आणि सप्तचक्र साधना या सगळ्यात तो खूप थकून जातो आणि वरून तीन वाजे पर्यंत जागरण! मला त्याची काळजी वाटते आऊ! त्याची तब्बेत बिघडली तर एक तर त्याची तब्बेत त्या घटणे नंतर  तोळामासा असते. मी आज डॉक्टरांना बोलावले आहे आऊ!” ती काळजीने बोलत होती.

अहिल्याबाई,“ हो ग त्याची खूप दमछाक होत आहे या सगळ्यात आणि ते अज्ञांकचे पुस्तक सापडल्यावर तर त्याला घाम फुटला होता. मला खूप भीती वाटली अभिज्ञा एक तर डॉक्टरने त्याला हार्ट अट्याक येऊ शकतो म्हणून सांगितले आहे आणि टेन्शन तर कमी व्हायचे नावच घेत नाही! बरं झालं तू डॉक्टरला बोलावले एकदा तपासणी करून घेऊ आणि काही औषध दिले तर देऊ त्याला.”त्या काळजीने म्हणाल्या

राहुल,“ काय? अम्याला हार्ट अट्याक येऊ शकतो असे सांगितले आहे डॉक्टरने आणि अभी तू मला हे अजून सांगितले नाही!” त्याने काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ अरे लक्षात नाही राहिले माझ्या! पण हो आम्हाला सांगितले आहे  डॉक्टरांनी तसं! या दोन वर्षात त्याने स्वतःला खूप त्रास करून घेतला आहे राहुल आणि त्यातून माझे भांडणे! तो गोळी बार त्याच्या तब्बेतीची खूप हेळसांड झाली. त्याचा बी.पी तर कमीच होत नव्हता आणि एक झालं की एक टेन्शन संपायचे  नाव घेत नाही! तो आतून पोखरला गेला आहे राहुल आणि याला मी ही जबाबदार आहे कुठे तरी मी त्याला समजून घ्यायला कमी पडले कुठे तरी!” ती डोळे पुसत म्हणाली.

राहुल,“ आणि हे सगळं तू मला आत्ता सांगत आहेस.मी उद्या पासून त्याच्या बरोबर त्याची मदत करायला जात जाईन प्रोडक्शनच मला इतकं कळत नाही पण ऑफिसचे काम मी करू शकतो. त्याचा कामाचा भार हलका होईल!”  तो म्हणाला.

बाबा,“ मी किती वेळा म्हणालो की मी येतो ऑफिसमध्ये पण तो नाही ऐकत!बघ राहुल तुझी मदत घेतो का तो? आणि आपली त्याच्या तब्बेती बद्दल चर्चा झाली हे अजिबात कळू देऊ नको त्याला नाही आवडणार ते!” ते म्हणाले.

राहुल,“ मला माहित आहे त्याला कसं हँडल करायचं ते! लयच मानी आहे ते बेन माहीत आहे मला! त्याला कळणार ही नाही आणि त्याची मदत करत जाईन! उद्या पासून त्याच्या बरोबर जाईन  मी  मला घरात बोअर होत या कारणाने तुम्ही नका काळजी करू!” तो म्हणाला.

     आणि त्याच्या या बोलण्याने सगळ्यांनाच हायसे वाटले.संध्याकाळी अगम्य घरी आला.अज्ञांक त्याला पाहून लगेच पळतच त्याला चिटकला. अगम्य मात्र दमल्यासारखा वाटत होतं.अभिज्ञाने त्याला पाणी आणून दिले आणि अज्ञांकला गोड बोलून खेळायला पाठवून दिले आणि ती अगम्यला म्हणाली.

अभिज्ञा,“ जा अगम्य वर! फ्रेश हो आणि आराम कर मी चहा नाष्टा वरच घेऊन येते.डॉक्टर आले की त्यांना ही वरच घेऊन येते” ती म्हणाली.

अगम्य,“ काही तरीच काय अभी मी फ्रेश होऊन येतो खाली मस्त गप्पा मारू की काय रे राहुल्या!” तो तिथेच बसलेल्या राहुलला पाहून हसत म्हणाला.

राहुल,“ अम्या तू जा आराम कर किती थकला आहेस तू! अभिज्ञा बरोबर म्हणत आहे! तू जा गप्पा काय होत राहतील!” तो म्हणाला.

अगम्य,“बरं म्हणून अगम्य गेला!” 

          डॉक्टर आले आणि अभिज्ञा त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेली. बरोबर अहिल्याबाई ही होत्याच उगीच गर्दी नको म्हणून बाकी सगळे खालीच थांबले. डॉक्टरांनी अगम्यचा बी.पी. आणि बाकी चेकअप केल्या. अगम्य मात्र थकून आधीच झोपला होता. डॉक्टर आले म्हणून अभिज्ञाने त्याला उठवले होते. चेकअप करताना ही तो अर्धवट झोपेतच होता. डॉक्टर चेकअप करून तिथे काहीच न बोलता अहिल्याबाई बरोबर खाली निघून गेले. अभिज्ञा मात्र अगम्यला व्यवस्थित पांघरून घालून त्याला व्यवस्थित झोपवून त्यांच्या पाठोपाठ खाली आली. सगळ्यांच्या नजरेत काळजी आणि प्रश्न दिसत होते. ते पाहून डॉक्टर म्हणाले.

डॉक्टर,“ इतके काळजीत नका पडू तुम्ही सगळे अगम्य ठीक आहे. त्याचा बी.पी. ही  नॉर्मल आहे. बी.पीची गोळी मात्र कंटीनिव्ह राहू दे अजून! पण खूप धावपळ आणि स्ट्रेसमुळे त्याला अशक्तपणा आला आहे. मी काही सप्लिमेंट लिहून देतो पण इतकी दगदग त्याच्यासाठी बरी नाही. त्याची दगदग कमी होईल असे काही तरी करा अधीच अगम्यची प्रकृती खूप नाजूक झाली आहे आऊसाहेब काळजी करण्यासारखे काही नसले तरी काळजी घ्या त्याची!” त्यांनी  प्रिस्क्रिप्शन  अभिज्ञाच्या हातात दिले आणि ते निघून गेले.

अभिज्ञा,“ आऊ मी उद्या पासून ऑफिस जॉईन करेन! तो घरात तर बसणार नाही हे आपल्याला माहीत आहे पण मी गेले की त्याचा निम्मा भार कमी होईल!” ती काळजीने म्हणाली.

राहुल,“ निम्मा का? मीही येणार आहे की  उद्या पासून तुमच्या बरोबर निम्म्या पेक्षा जास्त भार कमी होईल त्याचा!” तो म्हणाला.

       अहिल्याबाई मात्र खूपच अपसेट दिसत होत्या त्या तसं काही बोलल्या नाहीत पण त्याच्या चेहऱ्यावर ते अभिज्ञा आणि तिच्या आई-बाबांना साफ दिसत होतं. अभिज्ञाला मात्र त्यांच्याशी एकांतात बोलायचं होत की त्या अपसेट का आहेत? कदाचित अगम्यच्या तब्बेतीमुळे असेल असा तिचा अंदाज होता आणि पंधरा दिवसांनी येणाऱ्या अमास्ये दिवशी पुन्हा एकदा अगम्यला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे म्हणून कदाचित त्या अपसेट असाव्यात तिने मनोमन कयास बांधला. तासा भराने अगम्य ही खाली जेवायला आला तो आधी पेक्षा आत्ता जरा फ्रेश दिसत होता. अभिज्ञाने लगेच नोकरा करवी  औषधे मागवून घेतली होती. अगम्यने जेवण करता करताच अभिज्ञा विचारले.

अगम्य,“झाले तुझे समाधान डॉक्टरांना बोलवून? काय म्हणाले ते?मी ठीक आहे म्हणून सांगितलं तर पटत नाही राहुल्या आज काल या सासू-सूनांना डॉक्टरने सर्टिफिकेट द्यावे लागते!” तो मस्करी करत म्हणाला आणि कधी ही न चिडणारा राहुल मात्र चिडला.

राहुल,“ तुला मस्करी सुचते काय अम्या! अरे त्या दोघी वेड्या आहेत म्हणून  काळजी करतात का? बघ जरा स्वतःकडे काय करून घेतलं आहेस तू स्वतःच! अरे वय आहे का तुझं बी.पीची गोळी घ्यायच अम्या!स्वतःकडे लक्ष दे जरा!” तो चिडून पण काळजी पोटी  म्हणाला आणि अगम्य मात्र त्याच्या चिडण्याने थोडा वरमला.

अभिज्ञा,“ पाहिलेस ना राहुल हे असं आहे एक तर त्या गोळी बारा बसून याची तब्बेत अजून खालावली आहे आणि हा मात्र मस्करी करत असतो. साहेब अशक्तपणा आला आहे तुम्हाला आणि डॉक्टरने सप्लिमेंट दिल्या आहेत असच सुरू राहील तर तू त्या सूर्यकांतचा सामना कसा करणार रे! मी उद्या पासून ऑफिसला येते आणि राहुल माझ्या मदतीला येत आहे!” ती तणतणत म्हणाली.

अगम्य,“ राहुल्या अजून कशाला? त्याच्या मागे तिकडे व्याप कमी आहेत का म्हणून इथे त्याला काम….” तो तापलेले वातावरण पाहून हळूच म्हणाला.

राहुल,“ मी तुझ्या मदतीसाठी नाही अभीच्या मदतीसाठी येणार आहे! हो ना काकू”तो त्याचे बोलणे मध्येच तोडत त्याला दम देत म्हणाला.

     अहिल्याबाईचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.त्यांना शेजारी बसलेल्या अगम्यने आऊ म्हणून स्पर्श केला आणि त्या दचकल्या! 

अगम्य,“ काय झालं ग आऊ इतकं दचकायला?” 

अहिल्याबाई,“ काही नाही रे! अमू तू स्वतःकडे लक्ष दे बाबा!” असं म्हणाल्या आणि त्या अर्धवट जेवून निघून गेल्या.

     अगम्य आणि अभिज्ञा मात्र अहिल्याबाईंच्या अशा वागण्याने बुचकळ्यात पडले अगम्यने अभिज्ञाकडे पाहिले अभिज्ञाने डोळ्यानेच त्याला नंतर बोलू असे सांगितले.अगम्य जेवण करून निघून गेला.आज ही अज्ञांक त्याच्याच जवळ झोपायला गेला. अभिज्ञाने खालची व्यवस्था लावली आणि रूममध्ये आली तर अज्ञांक अगम्य बरोबर खेळत बसला होता.


 

  पुढे काय घडणार होते? अगम्य त्याचे पोखरलेले शरीर आणि पोखरलेली आंतरिक शक्ती घेऊन सूर्यकांतशी लढू शकेल का? अहिल्याबाई अपसेट का होत्या? 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

     









 








 

🎭 Series Post

View all