दि लूप होल पर्व २(भाग १९

This is a suspense story

             अभिज्ञाने फोन ठेवला. ती खूपच काळजीत दिसत होती. सगळ्या बरोबर ती नाष्ट्याला बसली.तिने नीट नाष्टा केला नाही. ती अपसेट होती. हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते  पण तिला कोणी काही विचारले नाही. अगम्यला खरं तर अभिज्ञाला विचारायचे होते काय झाले कोणाचा फोन होता? पण आता त्याला ऑफिसला जाणे भाग होते म्हणून मग तो तिला काहीच न बोलता ऑफिसला निघून गेला राहुल ही त्याच्या बरोबर होता. तो लंच ही ऑफिसमध्येच करणार होता त्यामुळे आज त्याला संध्याकाळ शिवाय अभिज्ञाशी बोलता येणार नव्हते. अभिज्ञाला ही त्याला काही तरी सांगायचे होते म्हणून मग तिने संध्याकाळी बोलू असे ठरवले.


 

          दिवस कसा बसा गेला आणि अगम्य घरी आला तो फ्रेश व्हायला म्हणून वर गेला आणि जाता जाता अभिज्ञाला वर ये असं खुणवुन गेला. अभिज्ञा ही त्याच्या मागे काही तरी निमित्त काढून गेली. ती रूममध्ये गेली तर अगम्य वॉशरूम मध्ये होता. म्हणून मग ती त्याच्यासाठी कपडे काढावेत म्हणून वॉर्डरोफकडे  वळली आणि अगम्यने तिला मागून येऊन अचानक मिठी मारली.

अभिज्ञा,“ काय हे अमू सोड बरं! दार उघड आहे आणि काही काळ वेळ आहे का तुला? की सारख आपलं सुरूच!” ती चिडक्या स्वरात म्हणाली.ते ऐकून अगम्यने तिला सोडले आणि तिला स्वतःकडे वळवत म्हणाला.

अगम्य,“ बरं राहू दे! Sorry! आता सांग कोणाचा फोन होता सकाळी? काय झाले?”

अभिज्ञा,“ तुला ती मुंबईची सोनिया माझी मैत्रीण माहीत आहे ना?”तिने विचारले.

अगम्य,“ हो आठवते थोडी थोडी म्हणजे औरंगाबादला असताना आली होती. तुझी आणि तिची ओळख अशीच एका पुरातन  वस्तूंच्या exhibition मध्ये झाली आणि त्या ओळखीतून तुमची छान मैत्री झाली. I think ती पुण्याला तुझ्याकडे येऊन गेली होती.तिच्या क्युट पोरीला घेऊन! खरच तिचा हेवा वाटला होता मला तिची क्युट मुलगी पाहून! की आपल्याला अशी क्युट पोरगी का नाही म्हणून?” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ तिचा आज फोन आला होता. रडत होती फोनवर ती कसल्या तरी पुरातन  रहस्यमय हवेलीचे संशोधन करत आहे!” ती सांगता सांगता थांबली.

अगम्य,“ हो पण ती रडत का होती?” त्याने विचारले.

अभिज्ञा,“ कारण तिच्या त्याच क्युट पोरीला कोणी तरी किडनॅप केले आहे!” 

अगम्य,“ काय? पण का?”त्याने  आश्चर्याने विचारले.

अभिज्ञा,“ ते तिला ही नेमके माहीत नाही पण त्या हवेली संदर्भातच काही असेल म्हणून तिच्या मुलीला किडनॅप केले असावे जर त्या हवेलीचे रहस्य उलगडले तर तिच्या मुलीचा शोध लागेल आणि या कामात तिला माझी गरज आहे ती मला मुंबईला बोलवत आहे!” ती म्हणाला.

अगम्य,“ एवढंच ना मग जा की आणि सोनियाची मदत कर! तिची मुलगी तुझ्या मदतमुळे तिला मिळाली तर आनंदच आहे की!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ अरे पण इथे इतकं काही घडत आहे आणि मी कशी जाऊ! एक तर तुझी साधना सुरू आहे दुसरे मी आणि आऊ महामृत्युंजय जप करत आहोत.ते पुस्तक दोन दिवसात शोधायचे आहे. राहुल आणि मीरा आले आहे मग मी  कशी जाऊ!” ती  चिंतीत होत म्हणाली.

अगम्य,“ अच्छा म्हणून मॅडम अपसेट आहेत तर! अग सोनियाला तुझी गरज आहे आणि इथलं मी सांभाळून घेईल सगळं दोन दिवस! पुस्तक शोधायला तुझी गरज नाही! तू जा दोन दिवसांचा तर  प्रश्न आहे!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ आणि उद्या आणि परवा ही तुला झोपायचे नाही तीन वाजे पर्यंत त्याचे काय? एक तर मला माहित आहे तुला झोप किती प्रिय आहे ते! तू झोपशील आणि तो सूर्यकांत येईल मग स्वप्न लोकातून परत तूला भेटायला आणि मग सगळं मुसळ केरात!” ती काळजीने म्हणाली.

अगम्य,“ नाही झोपणार मी आणि तू पीड मला मोबाईल वरून रात्रीचे मग कसा झोपेण मी!” तो मिश्कीलपणे म्हणाला.

अभिज्ञा,“ म्हणजे मी तुला पिडते काय?” ती लटक्या रागाने कंबरेवर हात ठेवून त्याला रोखून पाहत म्हणाली.

अगम्य,“ बरं बाई नाही पिडत तू मला बरं चल आपण जाऊ खाली आणि तू दोन दिवस जाणार आहेस ते ही सांगू! अदूला मात्र तुझं तू समजवायचे कारण आज काल साहेब तुमच्या शिवाय झोपत नाहीत आणि आवरून ही घेत नाहीत कोणाकडून!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ मला माहित आहे त्याला काय द्यायचे लाच म्हणून आणि त्याला आऊची सवय आहे आणि आईची ही झोपेल तो पण तू झोपला नाहीस म्हणजे मिळवले लेकाला झोपायचे नसते आणि बापाला नुसते झोपायचे असते अवघड आहे रे देवा माझं!” ती नाटकीपणे म्हणाली.

अगम्य,“ बास झाली नौटंकि चला आता!” तो कुर्त्याच्या भाया फोल्ड करत हसून म्हणाला आणि दाराकडे निघाला तर अभिज्ञाने त्याचा हात धरला आणि त्याला जवळ ओढत म्हणाली.

अभिज्ञा,“sorry मी तुझ्यावर मघाशी उगीचच चिडले!” ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली.

अगम्य,“ हुंमss असं आहे तर! राहू दे इतकं काय त्यात चल आता!” तो तिच्या डोक्यावरून  हात फिरवत म्हणाला.

अभिज्ञा,“ तू ना इतका समजुतदार होऊ नकोस म्हणून सांगितलं आहे मी तुला!” ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

अगम्य,“ अच्छा! मग पेनल्टी तर द्यावी लागेल !” तो तिच्या कमरेत हात घालत म्हणाली.

अभिज्ञा,“मी कुठं नाही म्हणाले मग!” असं म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ ठेवले.

अगम्य,“ बास इतकीच पेनल्टी!”तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला.

अभिज्ञा,“ हो! थँक्स अमू!” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

अगम्य,“ ते कशासाठी?”त्याने विचारले.

अभिज्ञा,“ माझे सगळे कन्फ्युजन दूर केलेस आता मी बिनधास्त  जाईन मुंबईला” ती म्हणाली.

अगम्य,“ पण असलं कोरड thanks काय कामाच?” तो नाटकीपणे म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा म्हणजे साहेबांना विशेष काही तरी हवं आहे!” असं म्हणून ती टाचा उंच करून  त्याच्या ओठावर ओठ ठेवणार तो पर्यंत अज्ञांक बाबा बाबा  करत धावत आला आणि अभिज्ञा  लगेच अगम्य पासून दूर झाली.

 अगम्य,“ काय रे अदू तिला किती  वेळा  सांगितलं  बेटा तू जिन्यावरून एकटा येत जाऊ नकोस म्हणून!” तो त्याला कडेवर घेत म्हणाला.

अज्ञांक,“ बाबा मी ना आता मोठा जालो ना! पण राहुल काका! आलाच पायल्या चलून आणि गेला पण!” तो निरागसपणे म्हणाला.

अगम्य,“ मोठा झालास म्हणे! पहिल्यांदा नीट उच्चार करायला शिका अज्ञांकराव!” तो हसून म्हणाला आणि अज्ञांक तोंड फुगवून त्याच्या  कडेवरून उतरून अभिज्ञाकडे गेला आणि तिला म्हणाला.

अज्ञांक,“ सांग ना आई बाबा कशा बोलतोय!” तो तक्रारीच्या सुरात म्हणाला.

अभिज्ञा,“ काय ओ अदूचे बाबा असं का म्हणता माझ्या बच्चाला! परत असं म्हणालात तर बघाच!” ती नाटकिपणे म्हणाली.

अगम्य,“ बरं चुकलं माझं!”  तो हसून  बेडवर बसत म्हणाला आणि अज्ञांक परत त्याच्याकडे गेला.

अभिज्ञा,“अरे वा! आई फक्त बाबाला रागवायला आणि  रात्री झोपायला आणि बाकी बाप-लेक एक होता लगेच काय रे अदू चिटकलास बाबाला परत!” ती नाटकीपणे बेडवर बसत तोंड फुगवत म्हणाली.अज्ञांक तिच्या जवळ गेला आणि तिला एक पापा देत म्हणाला.

अज्ञांक,“ आई तू पण आवलते मला पण ना बाबा थोला जास्त आवडतो!” तो निरागसपणे म्हणाला आणि अभिज्ञाने त्याला मांडीवर बसवले आणि ती म्हणाली.

अभिज्ञा,“ हो का? मग आता बाबा जवळ राहा आणि हो झोपवायला ही त्यालाच सांग!” ती मुद्दाम म्हणाली.

अज्ञांक,“ नाही मला तूच हवी झोपायला!” तो तोंड फुगवून म्हणाला.

अगम्य,“ बच्चा आई ना दोन दिवस कामासाठी गावाला जाणार आहे मग मी तुला झोपवेन नाही तर आऊ आज्जी आहे आणि आजीपण आहेच की आपण मजा करू!आणि हो आता तर राहुल काका, मीरा काकू आणि छोटुस बाळ पण आहे ” तो त्याला समजावत म्हणाला.

अज्ञांक,“ नाही….. नाही मला आई हवी!” तो भोकाड पसरायच्या तयारीत म्हणाला.

अभिज्ञा,“बघ दोन दिवस तू बाबा जवळ राहिलास तर तुला फाईव्ह कॅटबरीज मिळतील वरून मुंबईवरून येताना एक रिमोटची गाडी गिफ्ट म्हणून!” ती त्याला लालच दाखवत म्हणाली.

अज्ञांक,“ नाही…… ” तो आता रडणार तर अभिज्ञा म्हणाली.

अभिज्ञा,“ ok ok मग टेन कॅटबरीज आणि गाडी!” ती पुन्हा म्हणाली.

अज्ञांक,“ बलं! पण ना टेन कॅटबरीज आणि लिमोटची ऍक्सिव्ही गाली हवी मी बाबा जवल राहीन आणि आऊ आज्जी जवल झोपेण!” तो गाल फुगवून म्हणाला आणि अगम्यच्या गळ्यात मागून हात घालून त्याच्या पाठीवर रेलूण खेळू लागला.

          आणि अभिज्ञा आणि अगम्यने सुटकेचा निःश्वास सोडला. अभिज्ञा हळूच अगम्यच्या कानात पुटपुटली.

अभिज्ञा,“ बाप से बेटा सवाई आहे. याला ही पेनल्टी द्यावी लागते!”ती हसून म्हणाली.

अगम्य,“ मग पोरग कोणाचं आहे!” तो म्हणाला आणि हसला.

  तो पर्यंत खालून राहुल ओरडला.

राहुल,“ आज खाली येन होईल का? की वर सगळं पाठवून देऊ!”

       त्याचा आवाज ऐकून अगम्यने डोक्याला हात लावला आणि अज्ञांकला घेऊन दोघे खाली आले. अगम्य राहुलला डायनींग टेबलच्या खुर्चीवर बसत म्हणाला.

अगम्य,“ काय रे राहुल्या अदूला वर रूम पर्यंत सोडलास आणि खाली आलास होय! रूम मध्ये यायला काय आमंत्रण पत्रिका हवी होती का?”

राहुल,“ नाय तसं नाय उगीच तुमच्या राजा-राणीचा रोमान्स चालू असेल मी कशाला कबाब मे हड्डा!” असं म्हणून तो मोठ्याने हसला.

अगम्य,“ राहुल्या तू कधीच सुधारत नसतो बघ!” तो चिडक्या सुरात म्हणाला.

अभिज्ञा,“ झालं का तुमच्या दोघांचं आता मी बोलते. आऊ,आई, मी उद्या मुंबईला जात आहे खूप अर्जंट काम आहे कुणाला तरी माझी तातडीची मदत हवी आहे.” ती गंभीर होत म्हणाली.

अहिल्याबाई,“ अग पण अभी तुझी इथे गरज आहे आणि तू महामृत्युंजय जप करतेस त्याच काय?पुढच्या दोन दिवसात आपल्याला पुस्तक ही शोधायचे आहे आणि अजून दोन दिवस अगम्यला झोपू द्यायचे नाही हा किती झोपाळू आहे  माहीत आहे ना तुला; तो जर झोपला तर सगळं मुसळ केरात!” त्या काळजीने बोलत होत्या.

अभिज्ञाची आई,“ ताई बरोबर बोलत आहेत अभी!”त्यांनी दुजोरा दिला.

अगम्य,“ काय ग आऊ सगळे मिळून माझ्या झोपेवर का घसरता ग! त्या सूर्यकांतने माझं झोपणं हराम केलं आहे!” तो वैतागून म्हणाला

अहिल्याबाई,“ अमू तुझी झोप म्हणजे कुंभरणाची आहे बाबा!” त्या म्हणाल्या

अभिज्ञा,“ हो तुमच्या दोघींचे बरोबर आहे पण मला जावं लागेल कारण कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे.नाही तर गेले नसते मी आणि महामृत्युंजय जप मी तिथे ही करेन आणि अगम्य झोपणार नाही याची जबाबदारी माझी! मी फोन कॉल करून त्याला नाही झोपू देणार!” ती म्हणाली.

बाबा,“ ते सगळं खरं आहे पण अदू शेठ त्याच्या आईला सोडणार आहेत का नाही म्हणजे इतर वेळी त्याच्या बाबांना गोचिडा सारखे चिकटलेले असतात पण रात्री आई हवी की झोपवायला महाराजांना!” ते खुर्चीवर पाय हलवत बसलेल्या अज्ञांककडे पाहत म्हणाले.

अभिज्ञा,“ बाबा सगळ्यात मोठा डील आत्ताच क्रँक झालंय दहा कॅटबरीज आणि काय ती रिमोटची ऍक्सिव्ही गाडी या वर सौदा डन झाला आहे!” ती असं म्हणाली आणि सगळेच हसले.

अहिल्याबाई,“ ठीक आहे सांभाळून जा आणि लवकर ये!” त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो आऊ!” ती म्हणाली.

      

       अभिज्ञा मुंबईला निघून गेली. इकडे अगम्य,अहिल्याबाई आणि अभिज्ञाची आई या तिघांच्या ही सप्तचक्र साधना सुरू होत्या. अहिल्याबाई महामृत्युंजय मंत्राचा जप करत होत्या. आज बाबांनी दिलेल्या कापुराच्या साहाय्याने  सूर्यकांत ज्या पुस्तकात जाऊन बसला आहे ते पुस्तक वाड्यात शोधायचे होते. पण ते पुस्तक तिन्ही सांजेच्या वेळी शुचिर्भूत होऊन बाबाने दिलेला तो विशेष  कापूर  हातात घेऊन वाडाभर  अगम्यला फिरावे लागणार होते. बरोबर सहा वाजता अगम्य शुचिर्भूत होऊन आला. अहिल्याबाई ही शुद्ध होऊन आल्या होत्या त्यांनी एक छोटी डबी काढली आणि त्यातील कापूरकाडून अगम्यच्या हातावर ठेवला आणि अगम्य पहिल्यांदा वर फिरला कारण वर पुस्तके जास्त होती. त्याच्या रुममध्ये, अहिल्याबाईच्या रूममध्ये त्याची गिफ्ट ज्या खोलीत होती तिथे पण कापूर  प्रज्वलित झालाच नाही. मग अगम्य खाली आला तो अभिज्ञाच्या आई बाबांच्या रुमध्ये गेला. नंतर गेस्ट रूम,अशा बऱ्याच खोल्या आणि एके ठिकाणी कापूर एका पुस्तकावर प्रज्वलित झाला. पण कापूस अशा ठिकाणी आणि अशा पुस्तवर प्रज्वलित झाला होता ज्याची कोणी कल्पना आणि अपेक्षा ही करू शकत नव्हते. अगम्य बरोबर सगळ्यांनाच त्याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.

अभिज्ञा मुंबईला का गेली होती? आणि ते पुस्तक कोणते होते? ती रूम कोणती होती? तिथे कापुर प्रज्वलित झाला होता जे सगळ्यांसाठी अनपेक्षित होते? 


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

नमस्कार वाचक हो! 

     तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सोनिया कोण आणि अभिज्ञा तिच्या मदतीला का गेली? तर  घेऊन येत आहोत तुमच्यासाठी  एक वाचनाची मेजवानी मी आणि प्रतीक्षा माजगावकर ! इथून पुढे तुम्हाला वाचायला मिळेल दि लूप होल सीझन 2 आणि रहस्यमय हवेलीचा सुरेख संगम! त्यातीलच सोनियाने अभिज्ञाला मदतीसाठी बोलावले आहे.म्हणून अभिज्ञा सोनियाची मदत करायला मुंबईला गेली आहे. अभिज्ञा सोनियाची हवेलीतील रहस्य उलगडायला मदत करू शकेल का? आणि कशी? सोनियाची मुलगी तिला मिळेल का?हवेलीत काय असं रहस्य आहे? आणि हो अगम्यला कोणत्या रूममध्ये कोणते पुस्तक सापडले आहे जे सगळ्यांनाच अनपेक्षित होते  ज्यात सूर्यकांत जाऊन बसला आहे? 

    तर वाचत राहा दि लूप होल सीझन 2 आणि रहस्यमय हवेली देखील!