दि लूप होल पर्व २ (भाग १६)

This is a thriller story

           अभिज्ञा आज लवकरच उठली होती. तिने स्वतःचे आवरले व  चहा घेऊन ती अगम्यला उठवायला आली. अगम्य अजून ही गाढ झोपेत होता. अभिज्ञा त्याला उठवत म्हणाली.


 

अभिज्ञा,“ उठा देशमुख साहेब आज पासून ऑफिसला जाणार होतात विसरलात की काय?” ती हसून त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली. अगम्य उठून बसत म्हणाला.

अगम्य,“ असा कसा विसरेन! चहा तर दे!” तो तिला दंडाला धरून जवळ ओढत म्हणाला.

अभिज्ञा,“ घे हा चहा!नाही तर आऊला सांगायचास की मी तुला चहा देत नाही!” ती त्याच्या हातात साईड टेबलावर ठेवलेला चहा त्याच्या हातात देत लटक्या रागाने  तोंड फुगवून  बेडवर बसत म्हणाली.

अगम्य,“मग घेऊन यायचा ना वेळेवर रोज!” तो तिला चहा पुन्हा टेबलवर ठेवत आणखीन जवळ ओढत म्हणाला.

अभिज्ञा,“ चहा तर नुसतं निमित्त असत तुला माझ्याकडून काय हवं ते मला माहित असतं!” ती पुन्हा तोंड फुगवून म्हणाली.

अगम्य,“ हुंम! मग जे हवं ते देऊन टाकायचं ना मला!” तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला.

अभिज्ञा,“तू ना  नेहमी असच करतोस! But you know I like you! तुझ्या मधाळ ओठांची अवीट गोडी चाखल्या शिवाय माझा दिवसच सुरू होत नाही अमू! तुला ना मला बिघडवल आहेस!” ती असं म्हणाली आणि तिचे ओठ अलगद त्याच्या ओठावर ठेवले आणि ती त्याच्या बरोबर सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिली बराच वेळ! त्यानंतर त्याच्या मिठीत विसावली.

अगम्य,“अभी! I love you! माझा ही दिवस नाही सुरू होत तुला मिठीत घेतल्या शिवाय! तू बरोबर म्हणालीस चहा तर फक्त निमित्त असत!” तो तिला मिठी  आणखीन  घट्ट करत म्हणाला.

अभिज्ञा,“हुंम! Love you! उठ मग आता झालं ना सगळं  ऑफीसला जायला उशीर होईल! लंच पर्यंत घरी यायचं आहे अमू!” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

अगम्य,“ हो माहीत आहे मला! तुला एक विचारू!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा तू आता मला विचारू का म्हणून विचारणार? नाही म्हणजे तुला माझ्या परवानगीची गरज लागते?” ती मिश्कीलपणे हसून म्हणाली.

अगम्य,“बऱ्याच गोष्टीसाठी नाही लागत! बरं तू आजकाल पहिल्या सारखी नटताना दिसत नाहीस. ना मेकअप ना साडी!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा असं आहे तर! मग सरळ म्हणायचं ना आज साडी नेस ती ही माझी फेवरेट आणि मस्त तयार हो मला तुला पाहायचं आहे इतके आढेवेढे कशाला!” ती हसून त्याच्या गालावर ओठ ठेवून म्हणाली.

अगम्य,“ बरं मग नेस ना साडी आज! बरेच दिवस झाले तुला पाहिलं नाही!” तो आर्जव करत म्हणाला.

अभिज्ञा,“ जो हुकुम मेरे आका! बरं सोड ना मग मला आणि जा आवर मी ही आवरते!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

अगम्य,“ अग थांब ना जरा अजून कुठे निघालीस लगेच! तुझं हे असं असत अभी सतत तुला घाई असते!” तो नाराजीच्या सुरात म्हणाला.

अभिज्ञा,“ बरं राहील!” असं म्हणून ती त्याला आणखीनच बिलगली. 

अगम्य,“ अभी न आढेवेढे घेता लगेच थांबलीस इतकं गोड वागतेस! अशाने डायबिटीस व्हायचा मला!”  तो तिला हसून म्हणाला

अभिज्ञा,“ नको रे बाबा डायटीबीस वगैरे तुझ्या बी.पी. ने छळले आहे तेच पुरे झाले! आणि मी आता ठरवले आहे की तुझ्याशी भांडायचे नाही तू म्हणशील तसं वागायचं!” ती म्हणाली.

अगम्य,“ बाप रे हे आणि कधी ठरवलेस! तू नाही भांडलीस तर आयुष्य आळणी होऊन जाईल ना! तू तिखट मिरची सारखी आहेस  तिच छान आहेस! उगीच गोड बनवायचा हट्टाहास नको करूस तू आहेस तशीच राहा अभी!” तो तिला हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ मी मिरची आहे का? बरं मग बघच तू तुला कसा ठसका  येईल ते! बास झाल आता लाड उठ आणि आवर लवकर मी ही आवरते. चहा तर गार होऊन गेला किती वेळ झालं तुझ्या आपल्या वेगळ्याच मागण्या असतात!” ती स्वतःला सोडवून घेत लटक्या रागाने म्हणाली.

अगम्य,“ अच्छा पण ठसका लागला तरी पाणी तर तुलाच द्यावं लागणार ना! बरं मी आवरतो आता आणि तुही आवर!” तो मिश्किलपणे म्हणाला.असं म्हणून तो वॉशरूम मध्ये निघून गेला.


 

             अभिज्ञा त्याच्या बोलण्यावर बराच वेळ हसत राहिली आणि तिने ही अगम्यला आवडणारी बेबी पिंक कलरची साडी नेसली. त्यावर साजेशा हलका मेकअप आणि नाजूक हिऱ्याचे मंगळसूत्र आणि टॉप्स जे अगम्यने तिला पहिल्या मॅरेंज एनिवर्सरीला  दिले होते. अभिज्ञा आवरून खाली निघून गेली. अहिल्याबाई आणि अभिज्ञाची आई तिला असे पाहून एकमेकींना इशारे करून हसत होत्या पण त्या तिला काहीच बोलल्या नाहीत. अभिज्ञाचे ही त्यांच्याकडे लक्ष नव्हते. आज्ञांकला नाष्टा भरवण्यात ती गुंग होती. आज्ञांक तिला बोलत बोलत नाष्टा करत होता. त्याचा नाष्टा झाला आणि तिने त्याचा टिफिन आणून त्याच्या स्कुल बॅगमध्ये ठेवला. तो पर्यंत वरून अगम्यने तिला हाक मारली. ती थोडी वैतागुणच म्हणाली.

अभिज्ञा,“आता  काय राहील अजून मी सगळं तर ठेवून आले बेडवर!”

अहिल्याबाई,“ मी पाठवते अदूला तू जा अमू काय म्हणतोय बघ आणि लवकर ये त्याला घेऊन आम्ही नाश्ता करायचे थांबत आहोत नाही तर सकाळ सारख जाशील आणि तिथेच बसशील!” त्या अभिज्ञाच्या आईकडे पाहत मिश्किलपणे हसून म्हणाल्या.

अभिज्ञा,“ काय आऊ! बरं मी आलेच!” ती लाजून गोरिमोरी होत म्हणाली आणि मान खाली घालून निघून गेली.

            ती बेडरूममध्ये गेली तर अगम्य आरशासमोर उभा राहून टायशी झटत होता. अभिज्ञा त्याच्या समोर गेली आणि त्याला टाय बांधत म्हणाली.

अभिज्ञा,“ तुला टाय बांधता कधी येणार रे? तुझ्यामुळे खाली आज माझी फिरकी घेतली आऊने मला तर ना धरणी माई पोटात घे असं झालं!” ती तोंड फुगवून बोलत होती.

अगम्य,“पण मी काय केलं आता मी तर तुला टाय बांधायला बोलावलं आणि घेतली फिरकी आऊने तर त्यात काय इतकं!” तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून निहाळत म्हणाला.

अभिज्ञा,“ झालं तुझं परत सुरू! झाला टाय बांधून चल आता लवकर सगळे नाष्ट्यावर आपली वाट पाहत आहेत!” ती त्याला रागाने म्हणाली.

अगम्य,“ you are looking beautiful! पिंक कलर तुझ्यावर खुलून दिसतो अभी ”तो तिच्या कानात हळूच म्हणाला आणि अभिज्ञा लाजली. 

अभिज्ञा,“तूच म्हणाला होतास ना आज म्हणून…!बरं चल ना आता" ती त्याच्या पासून लाजून  नजर चोरत म्हणाली.

अगम्य,“ हाय आज तो  कातिल लग रही हो! आज ऑफिस नसत ना तर…. बरं चल उशीर होतोय! अभी love you!” तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला आणि तिचा हात धरून निघाला.पण अभिज्ञाने त्याचा हात धरून थांबले आणि ती म्हणाली

अभिज्ञा,“ you are also looking killer! बरं चला आता.”असं म्हणून दोघे ही निघाले.पायऱ्या उतरताना दोघांना ही पाहून अहिल्याबाई, अभिज्ञाचे आई-बाबा दोन मिनिटं स्तिमित झाले होते. आधीच हँडसम असणारा गोरागोमटा अगम्य ब्लेजर मध्ये अजूनच कातिल दिसत होता तर अभिज्ञा पिंक कलरच्या साडीत अजूनच सुंदर दिसत होती. अहिल्याबाई भानावर येत सखुला म्हणाल्या.

अहिल्याबाई,“सखु मीठ मोहरी घेऊन ये ग बाई!माझ्या पोरांना दृष्ट नको लागायला कुठे तरी माझीच मेलीची दृष्ट लागायची!” त्या थोड्या भावनिक होत म्हणाल्या. कारण बऱ्याच संकटानंतर किंवा संकटांच्या शृंखलेनंतर आज अगम्य आणि अभिज्ञा एकत्र असे बाहेर निघाले होते.सखु मीठ मोहरी घेऊन आली आणि अहिल्याबाईनी दोघांची एकत्रित दृष्ट काढली आणि बोटे कडकडा मोडली.

अगम्य,“ काय हे आऊ! तुझं तरी काय तरीच असत बघ आईची कधी दृष्ट लागत असते का मुलांना!” तो हसून म्हणाला.

आई,“बरं केलं ताई दोघांची दृष्ट काढलीत ती! चला नाष्टा करा आणि निघा आणि दुपारी लंचला वेळेवर या दोघे लक्षात  आहे ना ताई आज पुढचं काय ते सांगणार आहेत!” सगळे डायनिंग टेबलावर बसले आणि अभिज्ञाच्या आई नाष्टा वाढत म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो आई आहे लक्षात आम्ही येऊ वेळेवर!”ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ आणि हो अगम्य जास्त धावपळ नको करुस आज दोनच फॅक्टरीत जा आणि ऑफिसमध्ये अभी ऑफिसचे सगळे पेंडिंग काम घरी घेऊन ये आपण करू ते!” त्या सूचना देत म्हणाल्या.

अगम्य,“ हो आऊ झाल्या का सगळ्या सूचना देऊन आता निघू का आम्ही!” तो म्हणाला.

आई,“ जातो नाही येतो म्हणावं अगम्य!”

अभिज्ञा,“ बरं येतो आम्ही!” ती असं म्हणाली आणि दोघे ही निघाले.


 

                   एक शुगर फॅक्टरी आणि फूड फॅक्टरीमध्ये जाऊन अगम्यने सगळी व्यवस्था पाहिली फॅक्टरी फिरून कामगारांची विचारपूस केली सगळे रेकॉर्ड चेक केले. अभिज्ञाने  तो पर्यंत केबिनमध्ये बसून पगाराचे डिटेल्स चेक केले त्यात दोघांचा ही बराच वेळ गेला. त्या नंतर दोघे पुण्यात ऑफिसमध्ये गेले तिथे ही रेकॉर्ड चेक करणे, पेमेंट डिटेल्स पाहणे बँकेचे व्यवहार पाहणे,स्टाप बरोबर सुरू असलेल्या प्रोजेक्ट बद्दल मिटिंग घेणे. लीगल डिपार्टमेंटसाठी नवीन हेड  अपॉईंट करण्यासाठी जाहिरात देणे अशी बरीच कामे दोघांनी ही हाता वेगळी केली. राहिलेले काम घरी घेऊन जाण्याचा विचार अगम्य करत होता तोच अहिल्याबाईंनी फोन केला की दोन वाजता आले आहेत लवकर घरी या! तसा अगम्य आणि अभिज्ञा दोघे ही घरी निघाले. असं ही दोन-तीन दिवसात दोघे ही रेग्युलर ऑफिस जॉईन करणार होते. घरी पोहचल्यावर दोघे ही फ्रेश होऊन चेंज करून आले. सगळ्यांनी जेवण केली आणि तीनच्या आसपास सगळे हॉलमध्ये जमा झाले. अभिज्ञाने न राहवून अहिल्याबाईना प्रश्न विचारला.

अभिज्ञा,“ पण आऊ गेल्यावेळी आपल्याकडून अशी काय चूक झाली त्यामुळे सूर्यकांतने पुन्हा डोके वर काढले आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याचे अस्तित्व टिकून आहे कारण पेंटिंग तर आपण नष्ट केली आहे की!” 

अहिल्याबाई,“अभी पेंटिंग नष्ट करत असताना आपल्याकडून चूक झाली आहे आणि त्यामुळेच सूर्यकांतचा आत्मा अजून ही मुक्त झाला नाही तुला आठवते का अगम्य पेंटींग घेऊन  बाहेर आला आणि मी जळत्या होमामध्ये पेंटिंग टाकली तशी भिंतीवरची पेंटिंग ही जाळायला लागली पण तितक्यात अगम्य जागीच कोसळला आणि आपण सगळ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. पुढे त्याला बेडरूममध्ये नेले आणि मग आपण अगम्यच्या टेन्शनमध्ये होमाकडे फिरकलोच नाही त्याच दरम्यान पेंटींकचा एक तुकडा जाळातून उडून बाजूना पडला आणि उडत उडत एका पुस्तकात जाऊन चिटकला आणि त्याच पुस्तकात सुर्यकांतने गेल्या तीन वर्षांत स्वतःचे साम्राज्य पुन्हा निर्माण केले आहे. त्याच्याकडे स्वतःची क्षीण झालेली शक्ती वाढवायचा एकच मार्ग  होता तो म्हणजे स्वप्न लोकांतून अगम्यला त्रास देणे आणि त्याची शक्ती शोषून स्वतःची शक्ती वाढवणे आणि त्याने ते अव्याहतपणे केले आहे. आपल्या अगम्य विषयीच्या बेफिकिरीचा आणि अगम्यच्या दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतः त्रास निमूटपणे सहन करण्याच्या वृत्तीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आहे. सूर्यकांत आता आपल्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज आहे आणि अगम्य मात्र आता पूर्ण क्षीण झाला आहे! हे सगळं बाबांनी ध्यान लावून झाल्यावर आम्हाला सांगितले!” त्या गंभीर होत म्हणाल्या.

अगम्य,“ पण आता पुढे काय करायचे आऊ आणि तू कोणता तो पालाश विधी म्हणालीस तो काय आहे नेमका आणि त्याने काय होणार आहे?” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ पुढे काय करायचे म्हणून विचारतोस?आता काय निस्तरायचे सगळे तू एक मूर्ख तर आम्ही दहा मूर्ख जर तुझ्याकडे दुर्लक्ष केले नसते तर आज हि वेळच आली नसती. कारण शक्तीहीन सूर्यकांत काहीच करू शकला नसता असाच पडून राहिला आता त्याच पुस्तकात अनंत काळासाठी! आता चुका झाल्याचं आहेत तर त्याची शिक्षा भोगणे क्रमप्राप्त आहे अगम्य!” त्या नाराजीने बोलत होत्या.

अभिज्ञा,“ खरं आहे तुमचं आऊ!” ती ही हताशपणे म्हणाली.

अगम्य,“ बास करा ना तुम्ही दोघी आता तोच तोच विषय! बरं आऊ आता पुढे काय करायचे त्याचा विचार करूयात आपण आणि पालाश विधी म्हणजे काय? हे ही सांग ना!” तो विषय बदलत म्हणाला.

अहिल्याबाई,“ अरे पालाश विधी म्हणजे जेंव्हा एखाद्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या आप्तेष्टांना अंतिम संस्कारासाठी उपलब्ध होत नाही तेंव्हा त्या व्यक्तीची सातूच्या पिठा पासून प्रतिकृती तयार केली जाते आणि  पळसाच्या पानात   प्रतिकृती ठेवून मृतदेहा प्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात त्या नंतर दहावे तेरावे आणि नारायण नाग बळी हे विधी करून मृत व्यक्तीच्या आत्म्यास मुक्त होण्यास भाग पाडले जाते.त्यालाच पालाश विधी म्हणतात.”त्या म्हणाल्या.

अगम्य,“ मग हा विधी राहुल आणि मीरा करू शकतात पण आऊ  नुसता हा विधी करून सूर्यकांतचे अस्तित्व जे त्याने कोणत्या तरी पुस्तकात निर्माण केले आहे ते कसे नष्ट होणार?”त्याने शंका विचाली.

अहिल्याबाई,“ तुझी शंका बरोबर आहे अमू आणि राहुल आणि मीराच हा विधी करू शकतात हे ही बरोबर आहे.हा विधी करण्या आधी आपल्याला ते पुस्तक शोधून त्या पुस्तकात जाऊन त्या पेंटींगचा तुकडा आणावा लागेल ज्यामुळे सूर्यकांतचे अस्तित्व टिकवून आहे आणि त्या तुकड्यासह हा पालाश विधी करावा लागणार आहे” त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“ पण आऊ ते पुस्तक शोधायचे कुठे आणि कसे?” तिने विचारले.

अहिल्याबाई,“ ही शंका मी ही विचारली बाबांना तर त्यांनी मला एक विशिष्ट प्रकारचा कापूर दिला आहे तो कापूर घेऊन आपण वाडा भर फिरायचे कारण ते पुस्तक वाड्यातच आहे ज्या ठिकाणी कापूर  प्रज्वलित होईल त्या ठिकाणी आपल्याला पुस्तक सापडेल.” त्यांनी सांगितले.

अगम्य,“ मग आऊ आपण वाट कसली पाहत आहोत. त्या पुस्तकाचा शोध घेऊन लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे" तो अगदी सहज म्हणाला.

अहिल्याबाई,“ इतकं सोपं आहे का अगम्य ते?ते पुस्तक शोधून त्यात जाऊन पुन्हा तुला सूर्यकांतचा सामना करावा लागणार आहे तो पेंटिंगचा तुकडा सूर्यकांत तुला सहजासहजी मिळू देईल का? गेल्या वेळी त्याने काय केलं हे विसरलास का तू? अरे जीवघेणा वार केला होता त्याने त्याच्यातून तू मरता मरता वाचला आहेस अगम्य? आणि आता तर त्याने तुला क्षीण केले आहे त्यामुळे कमीत कमी महिनाभर तरी आपण काहीच करू शकणार नाही!” त्या काळजीने आणि थोड्याशा रागाने म्हणाल्या.

अभिज्ञा,“ अरे देवा आता आणखीन एक परीक्षा आऊ कधी संपणार आपल्या मागचे हे सर्व? अगम्य तुला किती सहज सोपं वाटत ना हे सगळं तरी बरं मी यावेळी याच्या बरोबर जाऊ शकेल याच्या बरोबर! याला एकट्याच नाही त्या राक्षसाचा सामना करावा लागणार!” ती म्हणाली.

अगम्य,“ तू कुठे ही येणार नाहीस कळलं का अभिज्ञा तुला? मागच्या वेळी ही मी एकट्याने केला ना सामना त्याचा मग या वेळी ही करेन मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही समजलं?” तो तिला दटावत म्हणाला.

अभिज्ञा,“  तुझं हे अस असत अगम्य एक तर तुझ्या या अशाच वागण्यामुळे तो सूर्यकांत अजून आला माघारी!” ती चिडून म्हणाली.

अगम्य,“ ते मला काही माहीत नाही पण जे होईल ते माझं होईल तू यात पडायचं नाही! मी ज्या दिवशी आपलं भांडण झाले त्या दिवशी ही हेच सांगितले होते आणि आता ही तेच सांगत आहे कळले तुला!” तो रागाने म्हणाला आणि तिथून निघून गेला.

अहिल्याबाई,“अभी अग काय करायचं या पोराचं! जा बाई त्याची समजूत घाल आणि हो तुझ्या शिवाय यावेळी तो एकटा सूर्यकांतशी नाही लडू शकणार! पण हे मी सांगेन समजावून त्याला तू नको बोलुस काही आणि हो या सगळ्याला अजून एक महिना लागणार आहे तेंव्हा तूच जरा सबुरीने घे अगम्य कसा आहे तुला मी सांगायला नको स्वतःलाच त्रास करून घेणार तो!जा आता त्याची समजूत घालून घेऊन ये त्याला पाच वाजले आहेत चहाची वेळ झाली अदू ही येईल आता!” त्या काळजीने म्हणाल्या.


 

अभिज्ञा,“ हो आऊ मी घेऊन येते त्याला!” ती असं म्हणून वर गेली.


 

अगम्य पुन्हा सूर्यकांतचा सामना करू शकेल का?तो अभिज्ञाला स्वतः बरोबर येऊ देईल का? अहिल्याबाई अजून पुढे काय सांगणार होत्या जे अगम्य आणि अभिज्ञाच्या भांडणामुळे अर्धवट राहील होत?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule

 

         

 

🎭 Series Post

View all