Jan 20, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग१३)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग१३)

 

            अभिज्ञाची नेहमीचेच कामे सुरू होती. आज ही आज्ञांकला शाळेत न पाठवल्यामुळे तो घरात बसून वैतागला होता आणि सारखी कुरकुर करत होता. अगम्य मात्र आज वेगळ्यात टेन्शनमध्ये होता.त्याने ना नाष्टा व्यवस्थित केला ना जा जेवण हे मात्र अभिज्ञाच्या आईच्या नजरेतून सुटले नाही. पण अगम्यला विचारून उपयोग नव्हता तो त्यांना काहीच सांगणार नव्हता म्हणून अभिज्ञाच्या आईने अभिज्ञालाच विचारले.

 

आई,“ काय ग अभी भांडण झाले का तुमच्या दोघात अगम्य अपसेट दिसतो आहे?”त्या काळजीने म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ नाही ग आई! तस काही नाही कदाचित त्याचा हात दुखत असेल!” ती म्हणाली पण खरं तर तिला माहीत होतं की अगम्य का अपसेट आहे तरी ती तिच्या आईला खरं कारण  सांगू शकत नव्हती म्हणून तिने थाप मारली.

 

आई,“ अग मग जा आणि बघ ना काय दुखतंय अभी नाही तर डॉक्टरला बोलवूयात का?” त्या काळजीने म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ हो आई मी जाते आणि अदू कडे लक्ष दे तो रामू बरोबर खेळत आहे ग!” असं म्हणून ती रूममध्ये गेली.


 

      ती रूममध्ये गेली तर अगम्य तिला गॅलरीत उभा असलेला दिसला. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या शेजारी उभी राहत म्हणाली.

 

अभिज्ञा,“ देशमुख साहेब काय झालंय तुमचं तोंड का पडलं आहे असं आई ही विचारात होती?” ती मिश्कीलपणे म्हणाली.

 

अगम्य,“ अरे बापरे! आज काय हवं आहे  मॅडमला डायरेक्ट देशमुख साहेब?”  तो तिला पाहत साहेब शब्दावर जोर देत म्हणाला.

 

अभिज्ञा,“ हो हवं आहे ना! तुझ्या चेहऱ्यावर किलर स्माईल जी हरवली आहे” ती त्याच्या जवळ जाऊन त्याचा  हात धरत म्हणाली.

 

अगम्य,“ हुंम!असं आहे तर!” अस म्हणून तो हसला.

 

अभिज्ञा,“ आता कसं! बरं काय झालंय अगम्य कशाचं टेन्शन आलेय  तुला इतकं?” तिने खुर्चीवर बसत आणि त्याला बसायची खूण करत  विचारले.

 

अगम्य,“ अभी इन्स्पेक्टर माने काल जे बोलले त्याचा मी विचार करत होतो. त्यांच म्हणणं बरोबर असलं तरी यात खूप मोठी रिस्क आहे. माझा एकट्याचा प्रश्न असता तर मी इतका विचार केला नसता अभी! पण इथे प्रश्न तुझ्या जीवाचा ही आहे समज आपण माने म्हणतात तसा सापळा रचला आणि त्या हल्लेखोराला संधी दिली आपल्यावर हल्ला करण्याची पण जर थोडी जरी गडबड झाली ना टायमिंगची आणि त्यातून विपरीत काही घडले आणि तुला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार!” तो गांभीर्याने बोलत होता.

 

अभिज्ञा,“ हो का? आणि तुला काही झाले तर  याचा विचार येत नाही अमू तुला अरे माझ्याच नाही तर तुझ्या ही जीवाची रिस्क आहेच की आणि आपण असे किती दिवस घाबरून बसणार आहोत घरात सांग ना?” ती म्हणाली.

 

अगम्य,“ पण अभी आऊ आपल्याला हे नसते धाडस करू देणार नाही! हो माझी आई माझ्या ही जीवाचा प्रश्न आहे आणि तू म्हणते तसे आपण किती दिवस असे घाबरून जगणार आहेत मग काय करावे घ्यावी का रिस्क?” त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहून विचारले.


 

अभिज्ञा,“ आऊ परवा येणार आहेत त्याच्या आत काय ते करावे लागेल आणि तू मानेंशी आजच बोलून घे आऊ यायचा आत आपल्याला काय ते करावे लागेल! मला आई म्हणायचे नाही मी फक्त अज्ञांकची आई आहे!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ ठीक आहे. मी आजच फोन करतो मानेंना मग पाहू काय ते!  आणि तू ना फक्त अदूची आई आहेस! माझी तर बायको आहेस!” तो हसून म्हणाला

 

अभिज्ञा,“  बरं आता खाली चल अदू आणि आई खाली एकटेच आहेत आणि ना टेन्शन घेणं बंद कर अगम्य आधीच  तुझी तब्बेत ठीक नसते आजकाल!”  ती काळजीने म्हणाली. 


 

अगम्य,“ हो नाही घेत मी टेन्शन बरं चल! अदू घरात बसून वैतागला आहे.” तो म्हणाला.

 

अभिज्ञा,“आऊचा फोन आला होता. विचारात होत्या तुझी तब्बेत ठीक आहे ना सगळं ठीक आहे ना?” दोघे जिना उतरत होते आणि अभिज्ञा म्हणाली.

 

अगम्य,“ आऊ पण ना तिला लेका पेक्षा सुनेवर जास्त विश्वास आहे. मला ही फोन केला होता मी सगळं  ठीक आहे म्हणून सांगितले तरी तिने तुला विचारले!” तो हसून म्हणाल.

 

              अभिज्ञा त्याला काही बोलणार तर  तिकडून अज्ञांक अगम्यला पाहून पळत आला आणि त्याला हात धरून म्हणाला.

 

अज्ञांक,“ बाबा चल ना माझ्या बरोबर मला तुला काही तरी दाखवायचे आहे!” तो हात धरून ओढत म्हणाला.

 

अगम्य,“ बरं चल!” 

 

अभिज्ञा,“ आदू तुला किती वेळा सांगितले बच्चा बाबाचा असा हात ओढू नकोस म्हणून बाबाच्या हाताला लागलंय ना! येतोय ना तो तुझ्या बरोबरच!” ती अज्ञांकला समजावत म्हणाली.

 

अज्ञांक,“ सॉरी बाबा! पण चल ना लवकर!” तो त्याचा हात सोडून म्हणाला आणि अगम्य त्याच्या बरोबर गेला.

★★★★


 

 एक दिवस असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता अगम्य आणि अभिज्ञा वरून तयार होऊन पळतच खाली आले. अगम्य कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तो आणि अभिज्ञा  खूप जास्त गंभीर वाटत होते. अगम्यने अभिज्ञाला खुणावले आणि तो बाहेर गेला. अभिज्ञाच्या आईला त्या दोघांचे काय चालले आहे हेच कळत नव्हते आणि ते दोघे कुठे निघाले आहेत हे कळत नव्हते. एक तर दोघांना ही अहिल्याबाईनी घरातून बाहेर पडायचे नाही अशी सक्त ताकीत दिली होती. त्यांनी  अभिज्ञाला विचारले.

 

आई,“  अभी कुठे निघालात तुम्हीं दोघे घरा बाहेर जायचं नाही असे बजावले आहे ना ताईंनी तुम्हाला!” त्या काळजीने विचारत होत्या.

 

अभिज्ञा,“ आई  अग आपल्या शुगर फॅक्टरीला आग लागली आहे त्यामुळे जावेच लागेल आणि मी अगम्यला एकटे कसे जाऊ देऊ आम्ही निघतो अगम्य बाहेर उभा आहे. तो गाडी चालवू शकत नाही ना! आम्ही निघतो तू अदूला आणि स्वतःला ही सांभाळ टेन्शन नको घेऊन आम्ही येतो दोन तीन तासांत!” ती म्हणाली.

 

आई,“ अग पण अभी नका जाऊ तुम्ही! कधी काय होईल सांगू शकत नाही तो हल्लेखोर पकडला गेला नाही अजून! फॅक्टरीला लागली आग तर लागू दे गोखले वकिलांना सांगा की ते पाहतील!” त्या काळजीने बोलत होत्या.अभिज्ञाची वाट पाहून अगम्य पुन्हा घरात आला. त्याने अभिज्ञाच्या आईचे सगळे बोलणे ऐकले व तो म्हणाला.

 

अगम्य,“ आई फॅक्टरी आपली आहे. तीन शिफ्टमध्ये काम सुरू असत तिथे अहो  बरेच कामगार काम करतात तिथे त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे ती झटकून कशी चालेल आम्हाला जावंच लागेल. तुम्ही नका काळजी करू आम्ही येऊ सुखरूप घरी!” तो त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला आणि ते दोघे निघाले.

 

      अभिज्ञाच्या आई यावर काहीच बोलू शकल्या नाहीत. दोघे गेल्या पासून त्यांचा जीव मात्र थाऱ्यावर नव्हता. आता अभीज्ञा आणि अगम्य  जाऊन तास होत आला होता आणि अचानक अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे बाबा नाशिकवरून वाड्यात हजर! अहिल्याबाईना आणि बाबांना अभीज्ञाच्या आईने पाणी आणून दिले अज्ञांक tv पाहत बसला होता.आहिल्याबाईनी इकडे-तिकडे पाहिले आणि अभीज्ञाच्या आईला विचारले

 

आहिल्याबाई,“  ताई अभी आणि अमू कुठे आहेत?”

 

आई,“ अहो ताई शुगर फॅक्टरीला आग लागली आहे ते दोघे तिकडेच गेले आहेत मी खुप अडवलं पण नाही ऐकले माझे काही!” त्या म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ काय करावे या  दोघांना किती सांगितले तरी…” त्या पुढे बोलणार तर रामू सर्व्हन्ट कॉर्टर मधून धावत आला आणि धापा टाकत बोलू लागला.

 

रामू,“ बाईसाब आव धाकल धनी आणि धाकल्या बाईसाबसनी…..!” तो बोलता बोलता थांबला अहिल्याबाईने त्याला मोठ्याने विचारले.

 

अहिल्याबाई,“ काय झालं रामू  माझ्या अमुला आणि अभिला बोलतो का आता?” त्या ओरडल्या.

 

रामू,“ टिव्ही वर त्यांचा एकसिडेंट झालाय श्रीरंगपूर आणि पुण्याच्या रेल्वे फाटका जवळ असं काय बाय दावयल्याती!” तो आवंढा गिळत म्हणाला आणि अभीज्ञाच्या बाबांनी न्यूज चैनल लावले अहिल्याबाई आणि अभीज्ञाची आई हे ऐकून सुन्न होत्या.

    न्यूजवर दाखवत होते की श्रीरंगपूरचे प्रसिद्ध  उद्योगपती श्री. अगम्य अप्पासो देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ.अभीज्ञा अगम्य देशमुख यांचा श्रीरंगपूर-पुणे हायवेवरील रेल्वे फाटका जवळ भीषण अपघात झाला आहे.यात त्याच्या वाचण्याची शक्यता नाही.हे सगळं ऐकून आणि  अगम्य आणि अभीज्ञाची अपघात ग्रस्त गाडी टीव्हीवर पाहून अहिल्याबाई मटकन खाली बसल्या.त्यांना काहीच सुचत आणि समजत ही नव्हते. तो पर्यंत अहिल्याबाईंचा फोन वाजला.तिकडून कोणी तरी बोलत होते आणि अहिल्याबाई फक्त हुंम आणि बरं इतकच बोलत होत्या. त्यांनी फोन ठेवला भानावर येत  डोळे पुसले   आणि त्या  अभीज्ञाच्या आई-बाबांना म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ चला आपल्याला जावं लागेल!अदु बेटा चल राजा!”त्या शांतपणे म्हणाल्या हे ऐकून अभीज्ञाचे आई-बाबा भानावर आले आणि यंत्रवत ते अहिल्याबाईंच्या मागे निघाले.

 

          अभीज्ञाचे बाबा विमनस्क  अवस्थेत गाडी चालवत होते.आई नुसती रडत होती. अज्ञांक गाडीच्या खिडकीतून  बाहेर पाहण्यात गुंगला होता.आता अहिल्याबाई बोलू लागल्या.

 

अहिल्याबाई,“ ताई, भाऊ घाबरू नका अगम्य आणि अभीज्ञा ठीक आहेत मला आलेला फोन अमुचाच होता.त्याने मला त्याच नाव ही घेऊ नकोस आणि फक्त हो आणि बरं म्हण तिथे घरात तुम्हा दोघांना काहीच सांगू नको असे सांगितले होते.गाडीत बसल्यावर सगळं सांग आणि पोलीस मुख्यालयात अज्ञांकला ही घेऊन या असे सांगितले कारण तिथे असं कोणी तरी आहे जे आपली माहिती त्या शत्रूला देत!” त्या असं म्हणाल्या आणि हे ऐकून दोघांचा ही जीव भांड्यात पडला. 

 

      हे सगळं होई पर्यंत रात्रीच्या आठ वाजून गेले होते. अहिल्याबाई आणि अभीज्ञाचे आई-बाबा पोलीस मुख्यालयात पोहोचले. एक  हवालदार त्यांची वाटच पाहत उभा होता.तो चौघांना एका ऑफिसमध्ये घेऊन गेला.तिथे अभीज्ञा आणि अगम्य दिसले आणि अहिल्याबाईनी अगम्यला आणि अभीज्ञाच्या आई-बाबांनी अभीज्ञाला मिठी मारली.अज्ञांक बिचारा त्यांना नुसता पाहत होता. तिथे इन्स्पेक्टर माने ही होते.अभीज्ञाचे बाबा आता बोलू लागले.

 

बाबा,“ अमू काय आहे सगळं?अरे तुमचा अपघात झाला असे सगळे न्यूज चैनल दाखवत आहेत.तुमची अपघात ग्रस्त गाडी देखील टीव्हीवर दाखवत आहेत हे पाहून आमच्या तर पाया खालची जमीन सरकली!” ते काळजीने विचारत होते.

 

अगम्य,“ आधी तुम्ही तिघे बसा! पाणी घ्या शांत व्हा! आम्ही दोघे ही सुखरूप आहोत अपघात आमचा नाही आमच्या कारचा झाला आहे.अभी अदुला उचल तो किती बावरला आहे बघ!”तो शांतपणे बोलत होता.

 

अभीज्ञा,“ हुंम,अदु इकडे ये बच्चा!” असं म्हणून तिने अज्ञांकला उचलून घेतले.अज्ञांक तिला बिलगला.ती त्याला घेऊन खुर्चीवर बसली. 

 

      आता सगळेच रिलॅक्स झाले आणि अहिल्याबाईनी विचारले.

 

अहिल्याबाई,“ हे सगळं काय आहे अगम्य आम्हाला कळेल का?” त्यांनी अगम्यवर एक जळजळीत कटाक्ष टाकत विचारले.

 

अगम्य,“ हो सांगतो आऊ!पण तुम्ही दोघे काल येणार होतात ना नाशिकहुन? मग आज कसे आलात?” त्याने विचारले.

 

अहिल्याबाई,“ ते महत्त्वाचे नाही आणि एक मिनिट तुला कसे कळले की आम्ही आलो आहोत ते? म्हणजे मला फोन केलास तू?” त्या म्हणाल्या.

 

अगम्य,“ खरं तर आईंना फोन करणार होतो मी आणि पोलीस गाडी ही तयार होतीच आईंना आणि अदुला घेऊन यायला आपल्या घरावर पाळत आहे पोलिसांची पण  पाळत  ठेवणाऱ्या हवालदाराने इथे फोन करून सांगितले की तू आणि बाबा आला आहात म्हणून मग तुला फोन केला मी!” त्याने स्पष्टीकरण दिले.

 

आई,“ ते सगळं जाऊदे हा सगळा काय प्रकार आहे ते सांगा दोघे ही आधी! हे सगळं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर आमचा फक्त जीव जायचा बाकी होता?” त्या रागाने म्हणाल्या.

 

     अभीज्ञा मात्र शांत होती आज्ञांकला मांडीवर घेऊन बसली होती.अगम्यला तिने एकदा पाहून खुणावले आणि अगम्यने तिला डोळ्यानेच धीर दिला आणि तो बोलू लागला.

 

अगम्य,“ हो सांगतो सगळं! आऊ आणि बाबा नाशिकला गेले आणि एक दिवस मला इन्स्पेक्टर मानेचा फोन आला ते स्वतः मला न्यायला वाड्यावर आले होते. त्यांनी मला एका मंदिरात नेले आणि आपल्या  केसची इंपृमेंट सांगितली.आऊ अभिज्ञाचा  झालेला  अपघात नव्हता तो घातपात होता हे तर आपल्याला माहीत आहे त्या नंतर अभिज्ञावर झालेला गोळीबार! हे सगळं एक व्यक्ती सुपारी देऊन  करून घेत होती. कारण त्या व्यक्तीला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते.”तो शांतपणे सांगत होता.

 

अहिल्याबाई,“ काय अभिज्ञाच्या नावाची सुपारी आणि एका दगडात दोन पक्षी जरा समजेल असं बोल अगम्य!” त्या वैतागून म्हणाल्या.

 

माने“ mr .देशमुख मी सांगतो सगळं! अभिज्ञा देशमुखाला मारून नाव मात्र अगम्य देशमुखचे येणार की यांनीच अभिज्ञा देशमुखांचा खून करवला! म्हणजे दोघांनाच ही पत्ता कट मग तीन म्हातारे आणि एक छोटा मुलगा काय करणार? अगम्य आणि अभिज्ञाचे पटत नाही ते दोघे वेगळे राहतात हे तर सर्व श्रुत होते त्यातून अभिज्ञाच्या नावावर जास्त शेअर्स तुम्ही केले म्हणजे बिझनेसचा अंतिम निर्णय यांचा! त्यातून बोर्ड मिटिंगमध्ये सगळ्या समोर दोघांच भांडण झाले आणि त्याच रात्री अपघात झाला अभिज्ञा देशमुखचा! माझा ही सुरवातीला  संशय अगम्यवर होता पण त्यांच्या विरुद्ध पुरावे मिळाले नाहीत मला! अगम्य  अभिज्ञाला अपघाता नंतर वाड्यावर घेऊन गेले. पण तिथे पुन्हा दोघांचे भांडण झाले आणि पुन्हा अभिज्ञा देशमुखवर हल्ला झाला पण यावेळी मात्र अगम्यला त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात गोळी लागली. त्यामुळे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण प्लॅन धुळीस मिळाला.” ते सांगत होते.

 

अहिल्याबाई,“ मग हॉस्पिटलमध्ये अगम्य वर हल्ला का झाला?” त्यांनी न राहवून विचारले.

 

माने,“ कारण एकूण परिस्थिती पाहता अगम्य देशमुख जर मारले गेले असते तर अभिज्ञा आणि तुम्ही सगळे कोलमडून पडला असता आणि हल्ला कारवणाऱ्या व्यक्तीचा फायदा झाला असता.” ते म्हणाले.

 

अहिल्याबाई,“ असला फायदा इन्स्पेक्टर?” 


 

माने,“ तुमचा सगळा बिझनेस त्या व्यक्तीला हस्तगत करता आला असता आणि या सगळ्या मागे त्या व्यक्तीचा हाच हेतू होता!” त्यांनी स्पष्टीकरण दिले.

 

बाबा,“ पण आजचा अपघात वगैरे काय होते आणि ती व्यक्ती कोण आहे?”त्यांनी विचारले

 

अगम्य,“बाबा हा मी,अभिज्ञा आणि इन्स्पेक्टर माने यांनी रचलेला सापळा होता आणि त्या सापळ्यात आरोपी अलगद सापडला आहे! एव्हढे सगळे घडल्या नंतर मी सांगितलेल्या गाडीच्या नंबरवरून सुपारी घेणाऱ्या किलरचा पत्ता लागला पण या सगळ्याचा करता करावीत धनी म्हणजेच मास्टर माईंड वेगळाच आहे हे ही लक्षात आले मग त्या सुपारी किलरला पकडून उपयोग नव्हता तो तर फक्त एक प्यादे होता आणि मास्टर माईंड काही केल्या समोर येत नव्हता. म्हणून मग त्या सुपारी किलर आणि त्या व्यक्तीचे फोन वरील बोलणे पोलिसांनी टॅब करायला सुरुवात केली. ती व्यक्ती इतकी चलाख आहे की वेगवेगळ्या टेलिफोन बूथ वरून किलरला फोन करत होती. ऍडव्हान्स पैसे ही तिसऱ्याच बाईच्या अकाऊंट मधून  किलरला पोहोचले होते. त्या व्यक्तीने आता नवीन प्लॅन केला आणि त्याने अभिज्ञा आणि मला मारण्याची सुपारी दिली. हे फोनच्या संभाषणातून कळले.ती व्यक्ती किलरला काम झाल्यावर म्हणजेच आम्हा दोघांना मारल्यावर त्या किलरला हार्ड कॅश देणार होती स्वतः कारण दोघांमध्ये तस ठरलं होतं. म्हणून मग आम्ही सापळा रचला मानेनी आपल्या शुगर फॅक्टरीमध्ये आग लावण्याचे नाटक केले त्या निमित्ताने मी आणि अभिज्ञा ठरल्या प्रमाणे बाहेर पडलो. बरोबर सहा  वाजता श्रीरंगपूर आणि पुणे हायवेच्या रेल्वे फाटका वरून ट्रेन जाते आणि फाटक बंद करतात. ट्रेन क्रॉस व्हायला दोन मिनिटांचा कालावधी जातो. आमच्या पुढे आणि मागे दोन गाड्यांमध्ये पोलीस होते. ट्रेन क्रॉस होऊ पर्यंत आम्ही मागच्या गाडीत जाऊन बसलो आणि यांच्यातील एका पोलिसाने गाडी स्टार्ट केली आणि आमच्या गाडीतून उडी मारली. अंधार पडत होता त्यामुळे गाडीतले कोणाला काही दिसणे शक्य नव्हते. गाडी सुसाट वेगाने धावत होती आणि सोमोरून येणाऱ्या  ट्रकने गाडीला धडक दिली. त्यानंतर  ही बातमी मुद्दामहून व्हायरल करण्यात आली. मी आणि  अभिज्ञा मृत झालो  असं समजून  ती व्यक्ती त्या किलरला पैसे द्यायला एका हॉटेलमध्ये आली आणि पोलिसांनी तिला रंगे हात पकडले आहे.


 

अहिल्याबाई,“ कोण आहे ती व्यक्ती?” त्यांनी रागाने विचारले.

 

        इन्स्पेक्टर मानेंनी एका कॉन्स्टेबलला खुणावले आणि कॉन्स्टेबलने दोन व्यक्तींना सगळ्या समोर आणून उभे केले. त्यातली एक व्यक्ती मौन्टि जो सुपारी किलर होता आणि दुसरी व्यक्ती म्हणजे गोखलेवकिल होती. ते पाहून अहिल्याबाईना तर धक्काच बसला त्याचा तोल जाणार पण अगम्यने त्यांना सावरले खुर्चीवर बसवून पाणी दिले. अभिज्ञाच्या आई-बाबांना ही हा धक्काच होता. अहिल्याबाई सावरल्या आणि बोलू लागल्या.

 

अहिल्याबाई,“ का केलस रे तू गोखले असं अरे तुझे बाबा रावसाहेबांचे जीवश्यकंटश्च  मी मित्र त्यांनी आणि जाधवांनी  रावसाहेब गेल्यावर मला खूप साथ दिली. पण गोखले भाऊंचा मुलगा तू आणि माझ्या मुलांच्या जीवावर उठलास? अरे काय कमी केलं आम्ही तुला घरदार गाडी बंगला, तुच्या मुलांचं शिक्षण अरे  तुला मुलगा आणि तुझ्या बायकोला सून मानून मी खूप काही केलं तुमच्यासाठी  आणि तू माझ्या लेकरांच्या जीवावर उठलास?” त्या जाब विचारण्याच्या सुरात मोठ्याने बोलत होत्या. 


 

गोखले,“ हो दिल ना तुम्ही बरच काही दिल पण ते फक्त समुद्रातील ओंजळभर पाणी होत.तुम्ही करोडोमध्ये खेळता आणि मला किती दिल अहिल्याबाई तुम्ही! मला वाटायचं माझा रात्रंदिवस तुमच्या मदतीसाठी तत्पर असे! त्याने आणि जाधवांनी तुम्हाला खूप मदत केली हा बिझनेस हा डोलारा सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी! तुम्हाला तर वारस नाही म्हणूनच माझा बाप तुम्हाला इतकी मदत करतो पुढे मागे हे सगळं आपलं आपल्या मुलाच होईल म्हणून तो हे सगळं करत असेल पण तो एक नंबर मूर्ख होता त्याला आणि जाधवांना माहीत होतं की तुमचा मुलगा म्हणजेच हा अगम्य जिवंत आहे. पण हे मला मात्र माहीत नव्हतं.पण एक दिवस तुम्ही आलात की नुसता मुलगा नाही तर त्याच सगळं कुटुंब घेऊन. आधी बराच बिझनेस मी पाहत होतो अगम्य आणि अभिज्ञा आले आणि तुम्ही सगळा बिझनेस अभिज्ञाच्या सुपूर्द करून मोकळ्या झालात.कालच्या आलेल्या पोरीच्या हुकुमाचे ताबेदार झालो मी! जाधव काय गेले निघून त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला! जेंव्हा मी अगम्य तुमचाच  मुलगा आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला माझ्या बापाच्या जुन्या कागद पत्रात तुमचे मुत्युपत्र मिळाले मला आणि सगळं याच्याच नावावर आहे हे ही कळले आणि माझा बाप किती मूर्ख होता हे ही! म्हणून मग मी अगम्य आणि अभिज्ञाला स्वतः न अडकता मारण्याची संधी शोधत होतो. ती संधी मला अगम्य आणि अभिज्ञाच्या भांडणाने दिली बोर्ड मिटिंगमध्ये दोघांच भांडण झाले मग जर अभिज्ञाला मारले तर अगम्यवर संशय येणार आणि मी होतच त्याला जेलमध्ये पाठवायला. मग तीन म्हातारा-म्हातारी एका छोट्या मुला बरोबर काय करणार होते. अपचुकच सगळा बिझनेस माझ्या स्वाधीन झाला असता आणि मी तो कधी ही स्वतःच्या नावाने करून घेतला असता. पण ही अभिज्ञा वाचली आणि हा अगम्य परत तिला वाड्यावर घेऊन गेला. आता मात्र पुढे काय करावं याचा मी विचार करत होतो पण पुन्हा दोघांचे खूप मोठे भांडण झाले हे मला कळले आणि दुसरी संधी मला  मिळाली.”तो पुढे बोलणार तर अभिज्ञाने त्याला मध्येच थांबवत विचारले.


 

अभिज्ञा,“ पण आमच्या दोघांच्या मध्ये भांडण झाले हे तुम्हाला कसे कळले?” तिने आश्चर्याने विचारले.

 

इन्स्पेक्टर माने,“ याचे उत्तर मी देतो मिसेस देशमुख (एका कॉन्स्टेबलकडे पाहत म्हणाले) घेऊन या रे त्याला! हा तुमचा नोकर  रामू या गोखलेला पैशाच्या बदल्यात तुमच्या घरातील बातम्या पोहोचवत होता. यानेच सांगितले गोखलेला की तुमच्या दोघांमध्ये खूप मोठे भांडण झाले आहे!” रामुच्या मुसक्या आवळून त्याला ही पोलिसांनी पकडून आणले होते.

 

अहिल्याबाई,“ अरे देवा! रामू तू पण का?( त्या तिरस्काराने पाहत म्हणाल्या. तो मात्र खाली मान घालून उभा होता.) गोखले तुला अभिज्ञाला मारायचे होते मग अगम्यला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न का करवलास?” त्यांनी जळजळीत कटाक्ष टाकत विचारले.

 

गोखले,“ हो हो अगम्यला मारण्याचा  मीच मारायला लावले होते कारण याच्या मध्ये येण्याने माझा सगळा प्लॅन धुळीस मिळाला होता. याला गोळी लागली मला वाटलं हा मरेल पण हा कसला मारतो म्हणून मग अभिज्ञाला पुन्हा पाहू आधी याला मारू असा विचार केला मी कारण आता अगम्यनेच तर स्वतःचा जीव धोक्यात घालून अभिज्ञाला वाचवले मग याच्यावर अभिज्ञाच्या खुनाचा गुन्हा दाखल करणे शक्य नव्हते आणि शुद्धीवर असणाऱ्या अभिज्ञा पेक्षा बेशुद्ध असणाऱ्या अगम्यला मारणे खूप सोपे होते. पण ही अभिज्ञा हिने वाचवले की याला. या सगळ्या मुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हे दोघे एकमेकांशी किती जरी भांडले तरी ते एकमेकांसाठी ढाल आहेत. एकमेकांवर जीव आहे यांचा म्हणून मग मी mk बरोबर मिळून या दोघांना ही मारण्याचा प्लॅन केला पण यांचे मरणे जरी खून असले तरी ते अपघात वाटले पाहिजे म्हणून मग दोघे घरातून बाहेर निघण्याची संधी मी शोधत होतो आणि रामुने मला खबर दिली की हे आज बरोबर घरा बाहेर पडत आहेत आणि मग पुढचं सगळं घडवून आणले पण मला काय माहीत होतं की हा एक सापळा आहे!” तो खाली मान घालून म्हणाला.

 

अगम्य,“ गोखले तुम्हांला काय वाटले की प्लॅंनिंग प्लॉटिंग तुम्हालाच करायला येते का? ते आम्हाला ही येते गोखले! मांजराने किती ही डोळे मिटून दूध पिले तरी जग त्याला बघत असते पण माझ्या आऊचा विश्वासघात करून तुम्ही चांगले नाही केले तुमच्यावर खूप विश्वास होता तिचा!” तो तिरस्काराणे पाहत म्हणाला.

 

अहिल्याबाई,“ माझ्या  इस्टेटीवर डोळा ठेवून तू माझ्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केलास? अरे माझी इस्टेट ही कोणाची लुबाडलेली नाही. ती काही पिढीजात होती. ती रावसाहेबांनी कष्टाने वाढवली आणि त्यांच्या नंतर मी त्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्यावर फक्त आणि फक्त माझ्या अमुचा  हक्क आहे त्याच्या बायकोचा आणि मुलाचा हक्क आहे समजलं तुला!” त्या रागाने बोलत होत्या.

 

अभिज्ञा,“ गोखले आम्हाला इस्टेटीची आणि पैशाची कधीच हाव नव्हती.अगम्यला हाव होती ती मायेची ममतेची आईच्या वात्सल्याची म्हणूनच आम्ही आलो इथे कारण आऊची इच्छा होती की आम्ही यावं आणि हे सगळं स्वीकारावे पण तुम्ही तर इस्टेट मिळवण्यासाठी आमच्या जीवावर उठलात! माझा नवरा मरता मरता वाचला या सगळ्यात! मी आणि आऊ अगम्य वरून असल्या हजार इस्टेटी ओवाळून टाकू शकतो पण हे सगळं त्याच्या आई-बाबांनी स्वतःच्या काष्टाने उभे केले आहे फक्त आणि फक्त अगम्यसाठी आणि या सगळ्या वैभवर त्याचंच हक्क आहे! ” ती ही रागाने बोलत होती.

 

अगम्य,“ तुम्ही याच्याशी बोलून स्वतःचे रक्त का आठवता आहात? गोखलेला जर हे सगळं समजलं असते तर ते असं वागले नसते.इन्स्पेक्टर घेऊन जायला लावा या तिघांना ही! आता हे तिघे बाहेर येणार नाहीत याची खबरदारी मी घेईन!” तो म्हणाला आणि तीन  कॉन्स्टेबल त्या तिघांना घेऊन गेले.

 

अहिल्याबाई,“ इंस्पेक्टर माने खरच तुमचे खूप आभार! तुमच्यामुळे आज हे गुन्हेगार पकडले गेले.thanks a lot” त्या हात जोडून बोलत होत्या.

 

माने,“ अहो मिसेस देशमुख आभार कसले मानताय माझे it's my duty! ती मी केली आणि यांना पकडून देण्यात तुमच्या मुलाचा आणि सुनेचा खूप मोठा वाटा आहे. खूप धाडसी आहेत हे दोघे! मला द्यायचेच असेल तर आशीर्वाद द्या तुमच्या सारख्या साध्वी कडून मिळालेले आशीर्वाद नक्कीच फळतील!” असं म्हणून त्यांनी अहिल्याबाईंना वाकून नमस्कार केला आणि अहिल्याबाईंनी भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ बरं माने निघतो आम्ही भाऊ, ताई चला!” असं म्हणून त्यांनी अभिज्ञा आणि अगम्यवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि त्या दोघांना न घेताच अज्ञांकला ही त्यांच्या जवळ सोडून त्या निघून गेल्या.

 

माने,“ मिस्टर देशमुख तुमच्या आई खूपच चिडलेत तुमच्या दोघांवर!जा समजावा त्यांना मी गाडी घेऊन कोस्टबलला पाठवतो तुम्हाला सोडायला!” ते हसून म्हणाले आणि अगम्य त्यांचे आभार मानून अभिज्ञा आणि अज्ञांक बरोबर  घरी पोहचला.अहिल्याबाई अजून हॉलमध्येच होत्या त्यांना पाहून अगम्य त्यांच्या जवळ गेला तर त्याला न पाहताच अहिल्याबाई पायऱ्या चढत अभिज्ञाच्या आईला म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ ताई या दोघांना सांगा मला यांच्याशी काही ही बोलायचे नाही! मी सखुला स्वयंपाक करायला सांगितला आहे तुम्ही जेवा मला जेवायचे नाही!” असं म्हणून त्या गेल्या आणि रूमचा दरवाजा लावून घेतला.

 

अभिज्ञा,“ आता तुम्ही दोघे ही नाराज आहेत का आमच्यावर?” तिने तिच्या आई-बाबांना विचारले.

 

बाबा,“ नाराज नाही पण तुम्ही हे बरं नाही केलं अभी! जर प्लॅन नुसार सगळं झालं नसत तर! तुमचा प्लॅन गोखलेला कळला असता तर? रेल्वे फाटका जवळ पोहोचायच्या आधीच काही झाले असते तर? हा सगळा विचार करून डोकं सुन्न होत!” ते म्हणाले.

 

आई,“ but we can understand! तुम्ही दोघांनी हे का केलं? पण ताईंनी खूप दुःख सहन केलं आहे. अगम्य मरता-मरता वाचून अजून महिना ही झाला नाही. अगम्य हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्यांची अवस्था मी पाहिली आहे. त्या खूप over protective झाल्या आहेत तुमच्या बाबत आणि आज असं वागून तुम्ही दोघांनी त्यांना दुखावले आहे. आता त्याची मनधरणी ही तुम्हालाच करावी लागणार खास करून तुला अमू जा!” त्या अज्ञांकला जवळ घेत म्हणाल्या.

 

       हे सगळं होऊ पर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते. अगम्य आणि अभिज्ञा अहिल्याबाईंच्या रूम जवळ गेले आणि अगम्य बंद दारावर थाप मारत म्हणाला

 

अगम्य,“  आऊ दार उघड बरं अग एखादा आमचं म्हणणे तर ऐकून घे! प्लिज आऊ!” तो रडकुंडीला येऊन बोलत होता.

 

   आत मात्र अहिल्याबाई आराम खुर्चीवर डोळे झाकून बसल्या होत्या. डोळ्यातून मात्र कढ वाहत होते.त्यांनी अगम्यला कोणताच प्रतिसाद दिला नाही.

 

अभिज्ञा,“ प्लिज आऊ एकदा ऐका ना आमचं! आम्हाला मान्य आम्ही चुकलो पण एकदा आमची बाजू तरी ऐकून घ्या.” ती विनवत म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ हे बघ अभिज्ञा तुमच्या दोघांचे ही मला काही ऐकायचे नाही! झाली ना तुमची मनमानी करून मग आता काय? तुम्ही जा  बरं इथून!” त्या रागानेच म्हणाल्या.

 

अगम्य,“ ठीक आहे तू नकोच उघडू दार मी पण मग तुझ्यासारख कोंडून घेतो स्वतःला!” तो ही जरा रागाने म्हणाला आणि त्याच्या रूमकडे निघाला.

 

      हे ऐकून अहिल्याबाईंनी दार उघडले कारण त्यांना माहीत होतं की अगम्य एक नंबर हट्टी आणि हेकेखोर आहे त्याने जर स्वतःला कोंडून घेतलं तर तो पाणी ही घेणार नाही  कोणालाच ऐकणार नाही. मागे ही त्याने अभिज्ञा बरोबर भांडण झाल्यावर तेच केलं होतं आणि त्याचे परिणाम त्याच्या बरोबर सगळ्यांना त्याची काळजी करून भोगावे लागले होते. तो अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी अगम्यच्या काळजीने दार उघडले आणि त्या काहीच न बोलता पुन्हा आराम खुर्चीवर जाऊन बसल्या. अगम्य आणि अभिज्ञा त्यांच्या जवळ खाली जाऊन बसले आणि अगम्य त्यांचा हात धरून बोलू लागला.


 

अगम्य,“  आऊ ऐक ना अशी नाराज नको होऊस ग! प्लिज चीड रागव वाटलं तर मागच्या वेळी सारख कानाखाली दे पण बोल ना! तुझा अबोला नाही सहन होत मला!” तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

 

अहिल्याबाई,“ मला नाही बोलायचे तुमच्या दोघांशी ही तुम्हाला करायचं होतं ते केलत ना मग आता ही मनधरणीची नाटक कशाला करताय!” त्या हात काढून घेत म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ प्लिज आऊ असं बोलू नका ना! आपण किती दिवस असं घाबरून जगणार होतो? काही नाही झालं आम्हांला आम्ही सुखरूप  आहोत दोघे!” ती आता रडत म्हणाली.

 

अहिल्याबाई,“हो ना आहात सुखरूप दोघे पण तुमचा प्लॅन थोडा जरी चुकला असता तर आम्ही तीन म्हाताऱ्यानी त्या अव्हढूशा  पोराला घेऊन काय करायचं होतं सांग ना! आमचा नाही कमीत कमी त्या पोराचा तरी विचार करायचा होता की जरा असले नसते धाडस करण्या आधी!” त्या रागाने बोलत होत्या पण त्याच्या डोळ्यातून काळजीचे अश्रू वाहत होते.

 

अगम्य,“ सॉरी ना आऊ!प्लिज सोड ना राग आता! असं काही पुन्हा आम्ही नाही करणार!” तो गुडघ्यावर बसून त्यांचे डोळे पुसत म्हणाला.

 

अहिल्याबाई,“ तू तर बोलूच नकोस नालायका!  असं वाटत होतं एक कानाखाली द्यावी पण भीती वाटली मागच्या वेळी कानाखाली दिली तर मला तब्बल सहा दिवस रडवलेस! म्हणून नाही उचलला हात!”त्या रडत म्हणाल्या.

 

अगम्य,“मग आता देतच कानाखाली मी नाही रडवणार तुला पण असा अबोला धरून मला  नको ना रडवूस आऊ प्लिज!” तो उठून त्यांना मिठी मारून रडत म्हणाला आणि शेवटी आईचे काळीज ते त्याच्या अशा रडण्याला आणि मिठी मारण्याला पाघळले.

 

अहिल्याबाई,“  अमू तुला चांगलंच माहीत आहे आपण खूप काही सहन केले आहे. आत्ता ही किती दिवस झाले मला सांग तुला गोळी लागून अजून जखम ही नाही  भरली  तुझी! तुझी तब्बेत ठीक झाली नाही अजून आणि तो पर्यंत हे असले नसते धाडस केलेत तुम्ही! अरे ती बातमी ऐकून पायाखालची जमीन सरकली माझ्या! तुला अजून काही झालेले मला आता नाही सहन होणार!(त्या अगम्यला मिठी मारून बोलत होत्या. हे पाहून अभिज्ञा उठली आणि  डोळे पुसून हसून जाऊ लागली तर अहिल्याबाईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या) ये ठमाबाई कुठे निघालीस बरी सटकायलीस की माझ्या कचाट्यातुन हा तर आहेच बेअक्कल पण तुला तर मी शहाणी समजत होते तर तू ही याच्या नादाला लागून बिघडलीस की!” त्या तिला जवळ घेत म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ सॉरी ना आऊ! परत नाही करणार असं!” ती तोंड पाडून म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ ऐकलत ना तो गोखले काय म्हणाला तुम्ही दोघे एकमेकांची ढाल आहात त्याने तुमच्या भांडणाचा फायदा घेतला. इथून पुढे तरी भांडू  नका!” त्या दोघांचे कान ओढत म्हणाल्या.

 

अगम्य,“ पण नाशिकमध्ये काय झाले आऊ? आणि तुम्ही आजच कसे आलात उद्या येणार होतात ना?” त्याने विचारले.

 

अहिल्याबाई,“ झालं काम मग आलो आणि बाकी उद्या बोलू!" त्या म्हणाल्या आणि तेव्हढ्यात हे सगळं दारात उभ राहून पाहणाऱ्या अभिज्ञाच्या आई रूममध्ये येत म्हणाल्या.

 

आई,“ झाली ना समेट आईची मुलाची आणि सासू-सुनेची मग चला आता जेवण करू! माझा बिचारा अदू तिकडे आई म्हणून भोकाड पसरून  रडतोय!” त्या नाटकीपणे म्हणल्या आणि सगळे जेवायला गेले. 


 

        अगम्य जेवला आणि रूममध्ये गेला. अभिज्ञा अज्ञांकला पाहायला अहिल्याबाईंच्या रूममध्ये आली तर अज्ञांक अजून खेळत बसला होता. अहिल्याबाई त्यांच्या रूममध्ये असलेल्या अगम्यच्या फोटोंवर प्रेमाने हात फिरवत होत्या. ते पाहून अभिज्ञा त्यांना म्हणाली.

 

अभिज्ञा,“ काय आऊ किती तो जीव लेकावर!  त्याच्या फोटो वरून हात फिरवत बसलाय तुम्ही! मी बोलावू का तुला?” तिने हसून विचारले.

 

अहिल्याबाई,“ नको ग बाई झोपू दे त्याला आणि काही नाही ग! आणि त्याचे खूप लाड झालेत हो म्हणून खूप शेफरला आहे तो! एक नंबर हेकेखोर आणि हट्टी झालाय! आधी असाच होता का ग अमू?” त्यांनी त्याचा टेबलवरचा फोटो हातात घेऊन आराम खुर्चीवर बसत फोटो पाहत  विचारले.

 

अभिज्ञा,“ म्हणजे होता हेकेखोर  पण  हट्टी नव्हता आऊ तो इथे आल्या पासून खूप हट्टी झाला आहे तो आता हेच बघा मागचे दोन तीन वाढदिवस झाले त्याने  तुमच्या कडून हट्टाने स्पोर्ट बाईक घेतल्या आहेत. इथे आल्या पासून तो जरा बेफिकीर वागतो नाही म्हणजे तितकाच जबाबदार आहे तो पण बऱ्याच वेळा तुमच्या जीवावर बेफिकीर असतो तो!” ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ हुंम! अनाथा सारख जगण्याने माझं पोर अकाली प्रौढ झालं ग अभी आता त्याला माहित आहे त्याची आई आहे म्हणून हट्टी झालंय ते! करुदे ना हट्ट मी आहे पुरवायला! बरं जा झोप आता अमू पण झोपला नसेल ग अजून!” त्या म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ अज्ञांक चल तू आज माझ्या बरोबर तुला झोप कशी आली नाही रे अजून? मी घेऊन जाते आऊ त्याला तुम्ही झोपा प्रवासाने थकला असाल!” ती म्हणाली.

 

अज्ञांक,“ आई मला आऊ आजी जवळ झोपायचे आहे तू जा बल!” तो म्हणाला.

 

अभिज्ञा,“ चल ना अदू आऊ आजी थकली आहे बच्चा!” ती त्याला बेडवरून उठवत म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ राहू दे मी झोपवते त्याला तू जा झोप! अमूचे बाल हट्ट नाही पुरवता आले मला कमीत कमी अदुचे तरी पुरवू दे!” त्या अदुला जवळ घेत म्हणाल्या.

 

अभीज्ञा,“ बरं मी जाते पण तुम्ही ही झोपा आता अदु झोप बरं!आणि आऊ लेकाचे फोटो नका पाहत बसू झोपा आता!” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.

 

      आज खूप मोठे कोडे सुटले होते आणि अगम्य आणि अभीज्ञाला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न करणारा गोखले वकील पकडला गेला होता.त्यामुळे एका संकटातून अगम्य आणि अभीज्ञाची सुखरूप सुटका झाली होती पण समोर एक खूप मोठे संकट  आ वासून त्यांच्या पुढे उभे होते.

 

 अहिल्याबाई नाशिक वरून काय माहिती घेऊन आल्या होत्या? पुढे सूर्यकांत कोणत्या रुपात समोर येणार होता? अहिल्याबाई अगम्यला जपायला हवं असं का म्हणाल्या असतील?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule