May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग ११)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग ११)

     अहिल्याबाई मात्र अजून एकदा सूर्यकांत  अगम्यच्या आयुष्यात डोकावत आहे. तो आता कोणत्या नवीन रुपात येणार आहे. याचा विचार करून त्या रात्र भर झोपल्या नाहीत. पण त्यांनी आता यावर उपाय शोधण्यासाठी पुन्हा नाशिक गाठायचे ठरावे होते. आता फक्त सूर्यकांतच त्यांचा शत्रू नव्हता तर अजून एक छुपा शत्रू होता. जाणे अभिज्ञा आणि मग अगम्यवर हल्ला केला होता.ज्यातून अगम्य खूप मुस्किलीने वाचला होता आणि तो हल्लेखोर अजून ही सापडला नव्हता. जर आपण पुढे नाशिकला गेलो आणि मागे काही अघटित घडले तर या सगळ्या विचारात पहाट कधी झाली त्यांना ही कळले नाही. या सगळ्या विचाराने त्यांचे मन सैरभैर झाले होते. म्हणून त्या आज लवकरच उठल्या आणि आवरून पूजा करायला बसल्या. त्यांनी मनशांती आणि योग्य मार्ग मिळाव म्हणून देवा पुढेच गाराने मांडले होते. 

 

                  इकडे अगम्यला जाग आली पण अभिज्ञा अजून उठली नव्हती. ती ही रात्री झोपू  शकली नव्हती. अगम्य ही तिला न उठवताच आवरायला निघून गेला. अभिज्ञाला जाग आली. तिने घड्याळ पाहिलं तर आठ वाजून गेल्या होत्या. तिला आज उठायला खूप उशीर झाला होता तिला स्वतःचे आवरायचे आणि अज्ञांकला आवरून शाळेत पाठवायचे होते. या विचारात ती  उठली.पण अगम्य तिला दिसत नव्हता म्हणून तिने अगम्यला हाक मारली तर अगम्य समोर तयार झालेल्या अज्ञांकला सह हातात चहा घेऊन हजर होता. अगम्यने तिला चहा दिला आणि तो घेत ती म्हणाला.

 

अभिज्ञा,“ तू कधी उठलास?जर लवकर उठलाच होतास तर मला पण उठवायचे होते ना आणि चहा तू कशाला घेऊन आलास?” अगम्य तिला काही उत्तर देणार तर अज्ञांक तिच्या जवळ जाऊन बोलू लागला.

 

अज्ञांक,“ आई आज ना बाबाने तयार केले मला आणि सगळ्यांसाठी चहा पण बाबाने बनवला  आहे!”  तो म्हणाला.

 

अगम्य,“  पिऊन सांग अभी पहिल्या सारखा फक्कड झाला आहे का चहा? बरीच वर्षे झालं नाही केला मी!” तो प्रसन्न चेहऱ्याने हसत म्हणाला. त्याला असे पाहून अभिज्ञाला  बरे वाटत होते.

 

अभिज्ञा,“ हो हो पिते की(चहाचा एक घोट घेऊन) अमू किती वर्षातून तुझ्या हातचा चहा पित आहे. मस्त तीच चव!” ती कौतुक करत म्हणाली.

 

अगम्य,“ हुंम! म्हणजे चांगला झाला आहे तर बरं अदू जा बच्चा तुला स्कुलला उशीर होईल” तो म्हणाला.

 

अज्ञांक,“ हो बाबा बाय आई बाय !” असं म्हणून तो निघाला तर अभिज्ञाने त्याला मांडीवर बसवून घेतले आणि ती म्हणाली. 

 

अभिज्ञा,“  आदू असाच निघालास? आईला एक स्वीट कीस्सी तर देऊन जा!” असं म्हणून तिने गाल पुढे गेला आणि अज्ञांकने तिच्या गालावर आणि जाता जाता अगम्यच्या गालावर पापा दिला आणि तो निघाला. अगम्य त्याच्या मागे मागे शेवटच्या पायरी पर्यंत गेला आणि पुन्हा रूममध्ये आला त्याला पाहून अभिज्ञा पुन्हा  उठून केस बांधत  बोलू लागली.

 

अभिज्ञा,“अगम्य काय गरज होती का एवढे सगळे करण्याची? डॉक्टरने तुला आरामकर म्हणून सांगितले आहे ना!” ती काळजीने बोलत होती. तिला जाऊन त्याने मागून अलगद मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत तिचे प्रतिबिंब आरशात पाहत ती बोलू लागला.

 

अगम्य,“ अग कंटाळा आला आता मला या आरामाचा आणि रोज तूच करतेस ना मी एकदिवस केलं तर काय झालं. बरं एक विचारायचं होत तुला!” तो म्हणाला.

 

अभिज्ञा,“ विचार की मग!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ काल काय झालं होतं अचानक तुला? म्हणजे मला जाग आली तर जागीच होतीस आणि इतकी मेहरबानी कशी काय?” तो तिला रोखून पाहत खट्याळपणे म्हणाला.

 

अभिज्ञा,“ सोड मला बास झाला फाजीलपणा आधीच खूप उशीर झाला आहे आज!” ती लाजून त्याचा प्रश्न टाळत स्वतःला सोडवून घेत म्हणाली.

 

अगम्य,“ अरे लाजतेस तू! अग मी सहज विचारलं कारण तू सहसा माझ्यावर अशी मेहेरबान होत नाहीस!” तो हसून म्हणाला.

 

अभिज्ञा,“ अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचे आहे का की मी तुझ्यावर प्रेम नाही करत?आणि तुला हवं तेंव्हा हवं ते देत नाही. काल वाटले मला स्वतःहून तुझ्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजवे काही चुकलं का माझं त्यात?” ती लटक्या रागाने तोंड फुगवून म्हणाली.

 

अगम्य,“ तू तर चिडलीस की अभी मला तू सगळं सुख दिलस  अगदी हवं तेंव्हा आणि हवं ते! You are my life and I love you!  And I know that you love me! मी तर तुला मुद्दाम छेडण्यासाठी विचारात होत तर तू चिडलीस की!”  तो तिचा हात धरून म्हणाला.

 

अभिज्ञा,“ हुंम! म्हणजे आता देशमुख साहेब पूर्ण बरे झाले आहेत असं समजायला हरकत नाही! आणि अमू  you also love me! तू  ही खुप काही दिलंस मला उलट मीच कुठे तरी कमी पडले!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

 

अगम्य,“ बास झालं आता हे जा आवर लवकर ऑफिसला जायचं नाही का तुला? आणि मी बराच आहे आता मी विचार करतोय पुढच्या आठवड्यापासून ऑफिस जॉईन करावं!” तो म्हणाला.

 

अभिज्ञा,“ अजिबात नाही डॉक्टर म्हणत नाहीत तो पर्यंत तू असं काही करणार नाही.” ती बोलत होती तो पर्यंत रामूने दारावर थाप मारली आणि म्हणाला.

 

रामू,“ थोरल्या बाईसाईबानी बोलावलं हाय तुम्हाला आणि धाकल्या बाईसाईबसनी बी!" तो म्हणाला.

 

अगम्य,“ हो आलोच आम्ही! अभी जा आवर लवकर आऊने बोलवले आहे म्हणजे नक्कीच महत्वाचे काही तरी असणार!” तो म्हणाला आणि अभिज्ञा बाथरूममध्ये निघुन गेली.

★★★★

         

 

      दोघे ही आवरून खाली आले तर अहिल्याबाई त्यांचीच वाट पाहत होत्या. अभिज्ञाचे आई-बाबा ही तिथेच होते. त्या खूप काळजीत दिसत होत्या आणि त्यांचा मलूल झालेला चेहरा त्या रात्रभर झोपल्या नसाव्यात ते स्पष्ट सांगत होता.त्यांना असं पाहून अगम्य त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या कपाळाला हात लावून तो काळजीने म्हणाला.

 

अगम्य,“ आऊ तुला बरं वाटत नाही का? आपण डॉक्टरला बोलवूयात का?”

 

अहिल्याबाई,“ नाही रे अमू मी ठीक आहे बरं मी खूप महत्त्वाचं बोलण्यासाठी तुम्हा दोघांना बोलवले आहे.” त्या म्हणाल्या.

 

अभिज्ञा,“ आऊ काय झालंय तुम्ही  खूप काळजीत दिसत आहात?” तिने विचारले.

 

अहिल्याबाई,“ अग अभी ज्या सूर्यकांतमुळे अमुने  आणि मी इतकं काही भोगल! ज्याच्यामुळे माझं पोरग इतकी वर्षे अनाथ म्हणून जगलं आणि त्याचा सामना केला आणि  जाता जाता ही तो नीच माझ्या पोराला जीवघेणा वार देऊन गेला.  तो पुन्हा त्याच्या आणि पर्यायाने आपल्या आयुष्यात डोकावू पाहत आहे नवीन रुपात! याच तर टेन्शन आहेच आणि दुसरं म्हणजे तुमच्या दोघांवर झालेला जीव घेणा हल्ला तो हल्लेखोर अजून मोकाट आहे तो अजून कधी काय करेल सांगू शकत नाही. माझी मुलं अशा दुहेरी संकटात असताना मला झोप तरी लागेल का?” त्या काळजीने बोलत होत्या.

 

अगम्य,“ आऊ अग सापडतील की हल्लेखोर आज ना उद्या! पोलिस त्यांचा शोध घेत आहेतच की आणि सूर्यकांतच म्हणशील तर येऊ दे त्याला कोणत्या रुपात यायचे ते आधी आपण त्याचा सामना केलाच होता ना मग आता ही करू पण अशी काळजी करून आणि टेन्शन घेऊन स्वतःच्या तब्बेतीवर  परिणाम नको करून घेवुस! होईल सगळं नीट!” तो त्यांचा हात धरून त्यांना समजावत होता.

 

           अहिल्याबाईंचा मात्र आता धीर खचला होता त्यांना अगम्यची प्रचंड काळजी वाटत होती. त्या म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ अमू मला नाही सहन होत आहे आता हे सगळं तुला गोळी लागली.तुला काही झालं असत म्हणजे ते कमी की काय परत हॉस्पिटलमध्ये ही हल्ला झाला तुझ्यावर आणि अभिज्ञाचा अपघात झाला तिच्यावरच तर गोळी झाडली गेली होती ना आणि आता हे सूर्यकांतचे नवीन संकट तुम्हा दोघांना काही झालं तर मी काय करणार आहे! मला खूप भीती वाटते आहे!” त्या रडत बोलत होत्या हे ऐकून अगम्यने त्यांचे डोळे पुसले आणि त्यांना सोफ्यावर बसवले. तो पर्यंत अभिज्ञाने अगम्यच्या हातात ग्लास दिला. अगम्यने त्यांना पाणी पाजले आणि तो त्यांच्या जवळ बसून बोलू लागला.


 

अगम्य,“ काही होणार नाही आऊ मला आणि  अभिला ही यातून काही तरी मार्ग काढू आपण! तू नको इतकी काळजी करू!” तो समजावत होता.

 

अभिज्ञा,“ हो आऊ अहो हल्ल्याच म्हणाल तर पोलीस लवकरच पकडतील हल्लेखोरांना आणि सूर्यकांत जो अगम्यच्या स्वप्नात येऊन त्याला त्रास देतोय सध्या पण तो प्रत्यक्ष कोणत्या रुपात आणि कधी येणार आहे हे कुठे माहीत आहे आपल्याला? कदाचित या त्याच्या पोकळ धमक्या ही असू शकतात त्याच्या आत्म्याच्या ज्या हातबलतेतून तो देत असावा!” ती म्हणाली.

 

अहिल्याबाई,“ नाही  अभी आपल्याला  गाफील राहून चालणार नाही सूर्यकांत म्हणतोय तो येणार म्हणजे तो येणारच! त्यासाठी या सगळ्याची सुरवात जिथून झाली तिथे म्हणजेच नाशिकला मला जावं लागेल पुन्हा अघोरी बाबाला भेटावं लागेल ते ही लवकरात लवकर पण माझा पाय घरातून निघत नाही ग! कारण तुमच्या वर झालेले हल्ले मी पुढे गेले आणि तुम्हा दोघांना काही झाले तर! मी नाही सहन करू शकणार तुम्हाला काही झालेलं!” त्या अश्रू ढाळत बोलत होत्या.

 

अगम्य,“ आऊ तुला वाटतय ना की सूर्यकांतवरचा उपाय आपल्याला नाशिकमध्ये सापडेल तर तू जा नाशिकला मी सांभाळेन सगळं इथे आम्हाला नाही होणार काही तू निश्चिन्तपणे जा!” तो त्यांना समजावत म्हणाला.

 

बाबा,“ हो ताई अगम्य बरोबरच बोलतोय वाटले तर आपण दोघे जावू नाशिकला आणि इथे सिक्युरिटीची सगळी व्यवस्था आहेच की इतक्या सिक्युरिटीत कोणी काही करू शकणार नाही! बोला कधी निघुयात नाशिकला?” ते धीर देत म्हणाले.

 

          सगळ्यांच्या समजावण्याने अहिल्याबाईना धीर आला आणि त्या म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ ठीक आहे. मी आणि भाऊ उद्याच निघतो आम्हाला दोन दिवस लागतील पण या दोन दिवसात तुम्ही दोघांनी ही कुठेच बाहेर जायचं नाही. अभी ऑफिसचे काम घरूनच कर आणि अदूचे ही स्कुल दोन दिवस बुडाले तरी चालेल. ताई घराची आणि या तिघांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहे मी! आणि अमू आराम केलास तर बरं होईल जरा! मी गोखलेला सगळं सांगून जाईन तो ऑफिस,फॅक्टरी दोन दिवस सांभाळेल!”त्या म्हणाल्या.

 

अभिज्ञाच्या आई,“ हो ताई मी सांभाळेण सगळं तुम्ही जा आणि उपाय घेऊनच या!” त्या म्हणाल्या.

 

                   अहिल्याबाई खरं तर खूप घाबरल्या होत्या. या सगळ्या घटनांमुळे त्या खूपच चिंतित होत्या. त्यांचं चिंतित होणं सहजीकत होत तसं कारण त्या खूप साऱ्या संकटांना आज पर्यंत तोंड देत आल्या होत्या पण आता त्यांना त्यांच्या मुलांवर कोणताच संकट येवू नये असं वाटत होतं. अभिज्ञावर  झालेला गोळीबार आणि त्यात अगम्य जखमी झाला त्यातच त्याच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला झाला त्यामुळे त्या अधीकच खचल्या होत्या. त्यातून सूर्यकांत पुन्हा त्याच्या आयुष्यात डोकावू पाहत होता. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या व आता त्यांना पहिल्यांदा सूर्यकांतवर उपाय शोधायचा होता त्यासाठी त्या नाशिकला निघाला होता.


 

अहिल्याबाईंना नाशिकला जावून सूर्यकांतवर उपाय मिळणार होता का? अभिज्ञा आणि अगम्यवर हल्ला करणारे हल्लेखोर पकडले केव्हा पकडले जाणार होते?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule
 

                  

 

             

 

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे