May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग १0)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग १0)

       अभिज्ञाला ऑफिस मधून फोन आल्यामुळे ती पुन्हा ऑफिसला गेली. पण तीच लक्ष  ऑफिसमध्ये लागत नव्हतं. सारखे सारखे तिच्या मनात  अगम्यचे  विचार पिंगा  घालत होते. कारण आज पुन्हा अगम्य आणि त्याच्या भांडणाचा विषय निघाला होता ज्यामुळे ती आणि अगम्य दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. खरं तर तिच्या  एका गैरसमाजातून  तिच्या आणि अगम्यमध्ये भांडण झाले होते. पण तिला त्याची माफी मागून ही त्याने ताठर भूमिका घेतली आणि अभिज्ञाला खरं तर त्याचाच राग आला होता. अगम्यने दुसऱ्या रूममध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि अभिज्ञाला तो पटला नाही म्हणून ती पुण्यात शिफ्ट झाली पण ती विचारत पडायची की ज्या अगम्यने आपल्यावर इतके प्रेम केले तो आपली ही चूक माफ नाही करू शकत का? आणि या महिन्यात अगम्य कडून सत्य तिच्या समोर आले होते. अगम्यने तिला तिच्याच सुरक्षेसाठी दूर केले आणि तो एकटाच दोन वर्षांपासून इतका त्रास सहन करत होता. आपण खरंच कमी पडलो त्याला समजून घेण्यात याची तिला खंत वाटत होती आणि त्या बद्दल त्याची कधी माफी मागतो असे तिला झाले होते. ऑफिस मधून ती पाच वाजता ऑफिसमधून घरी आली. लगबगीने रूममध्ये गेली तर अगम्य झोपला होता. म्हणून मग ती त्याला न उठवता फ्रेश होऊन खाली आली पण तिच्या मनाची चलबिचल काही थांबत नव्हती आणि ती अगम्यची माफी मागितल्या शिवाय थांबणार ही नव्हती.

 

             ती अहिल्याबाईंशी कामा विषयी बोलत होती पण तिचे लक्ष घड्याळाकडे होते. शेवटी तीच म्हणाली. 

 

अभिज्ञा,“ आऊ मी अगम्यसाठी चहा घेऊन जाते. त्याला नाही उठवलं ना तर तो असाच झोपून राहील” ती असं म्हणत होती तो पर्यंत अगम्यची तिला जिना उतरून खाली आलेल्या अहिल्याबाईना दिसला आणि त्या अभिज्ञाला म्हणाल्या.

 

अहिल्याबाई,“ तो बघ तोच आला खाली!” अभिज्ञाने त्याच्याकडे पाहिले आणि मनातच म्हणाली.

 

         अजून थोडावेळ याला झोपायला काय झालते काय माहीत चहाच्या निमित्ताने मला याच्याशी बोलता आले असते. ती मनातल्या मनातच चरफडत होती. तो पर्यंत अज्ञांक खेळून आला आणि अगम्यला चिकटला. बऱ्याच दिवसांनी अगम्य थोडा रिलॅक्स वाटत होतं. ते पाहून अहिल्याबाई आणि अभिज्ञाच्या आई बाबांना ही बरे वाटले. अगम्य खाली आला तो सगळे जेवण झाल्यावरच आपापल्या रूममध्ये गेले. अभिज्ञा मात्र अहिल्याबाईच्या रूम मध्ये आज्ञांकला झोपण्यासाठी थांबली कारण अज्ञांकला दिवसभर नाही तरी रात्री झोपताना मात्र आई लागतच असे. म्हणून अभिज्ञा रोज त्याला झोपवून मग झोपायला जात असे. अभिज्ञा मात्र अज्ञांकला झोपवत विचार करत होती की अगम्य आता औषध घेऊन झोपु नये म्हणजे झालं कारण तिला त्याच्याशी बोलायचे होते आणि आज नेमका तिला अगम्यशी बोलायला वेळ मिळाला नव्हता. अज्ञांक झोपला आणि ती झोपायला रूममध्ये गेली तर अगम्य पुस्तक वाचत बसलेला तिला दिसला. तिला हायसे वाटले. आता ती त्याच्याशी बोलण्यासाठी शब्दांची मनात जुळवाजुळव करत त्याला म्हणाली.

 

अभिज्ञा,“ औषध घेतलीस का तू?” तिने विचारले.

 

अगम्य,“ हो घेतली”

 

 तो पुस्तकातून तोंड न काढताच म्हणाला.अभिज्ञा  त्याच्या जवळ बेडवर बसत म्हणाली. 

 

अभिज्ञा,“ अमू मला तुझ्याशी बोलायचं आहे!”

 

अगम्य,“ हुंम बोल ना!” तो अगदी सहज म्हणाला.

 

अभिज्ञा,“ ते पुस्तक ठेव आधी!” ती त्याच्या हातातून पुस्तक घेत म्हणाली.

 

अगम्य,“ बाप रे! आज क्या इरादा है मॅडम!” तो हसून तिला जवळ ओढत म्हणाला.

 

अभिज्ञा,“  अमू तुला दुसरं काही सुचत नाही का? ऐक ना मला तुझ्याशी महत्वाच बोलायचे आहे!” ती त्याचा हात धरत म्हणाली.

 

अगम्य,“ हुंम बोला मॅडम!” तो सावरून बसत म्हणाला.

 

अभिज्ञा,“  मला तुला सॉरी म्हणायचे आहे!” डोळ्यात पाणी आणून बोलत होती.

 

अगम्य,“ ते आणि कशासाठी?” तो आश्चर्याने म्हणाला.

 

अभिज्ञा,“ मी तुझ्याशी भांडायला नको होते! चूक माझीच होती! मी तुझ्यावर संशय घेतला आणि वरून तुला एकट्याला सोडून पुण्याला गेले. तू दोन वर्षे काय-काय सहन करत होतास आणि मी तिकडे खुशाल होते. I am sorry!” असं म्हणून ती रडू लागली. 

 

अगम्य,“तुझी काहीच चूक नाही अभी! त्यात ही तुझं प्रेमच लपले होते की!” तो तिचे डोळे पुसत तिला समजावत होता.

 

अभिज्ञा,“ नाही मी चुकले रे! खरंच मी तुला असे सोडून जायला नको होते!” ती हुंदके देत बोलत होती.

 

अगम्य,“तू रडायचे थांबव आधी अभी! झालं गेलं आता कशाला तेच तेच उकरून काढायचे ग!” तिला तो जवळ बसवून समजावत होता.

 

अभिज्ञा,“ हुंम! But I love you!”ती डोळे पुसत म्हणाली.

 

अगम्य,“I know that and also love you dear!” असं म्हणून त्याने तिला मिठी मारली.

 

                      अभिज्ञा त्याच्या मिठीत विसावली. अगम्य थोड्याच वेळात झोपी गेला पण अभिज्ञा मात्र जागीच होती. ती तिच्या ही नकळत दोन वर्षे मागे गेली. अगम्य आणि तीच सगळं आलबेल चालले होते. अभिज्ञा आणि अहिल्याबाई बिझनेस सांभाळत होत्या तर अगम्यने त्याची नोकरी कंन्टीन्यूव्ह केली होती पण तो त्याला जमेल तशी आणि वेळ मिळेल तसा त्यांना मदत करतच होता.त्याच ऑफिसच ही काम सुरळीत सुरू होत पण  जेंव्हा पासून त्याच्या ऑफिसमध्ये मिस. वैदेही सुपेकर आली होती तेव्हा पासून अभिज्ञा मात्र अस्वस्थ होती कारण वैदेही अगम्यच्या सतत पुढे-मागे करत असे. अभिज्ञा अगम्यला भेटायला किंवा बिझनेसच्या कामानिमित्त  ऑफिसमध्ये  जायची तेव्हा तिने वैदेहीला  पाहिले होते. दिसायला अत्यंत सुंदरशी वैदेही हँडसम  अगम्यवर लट्टू होती. तिला माहीत होते की अभिज्ञा त्याची बायको आणि त्यांना एक मुलगा आहे तरी ती अगमयच्या जवळ येण्याचा एक ही चान्स सोडत नसे. अगम्य  मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत असे. पण अभिज्ञाच्या मनात मात्र एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.त्यातूनच ती अगम्यला सतत तिच्या पासून लांब राहा असे सांगत असे. अगम्यने तिला अनेकदा समजून सांगितले.


 

अगम्य,“ माझ्यावर तुझा विश्वास नाही का अभी? अग वैदेही माझी फक्त कलीग आहे त्या व्यतिरिक्त काही नाही”

 

अभिज्ञा,“ हो मला माहित आहे पण ती ज्या प्रकारे तुला पहाते तुझ्या सतत मागेपुढे करत असते ते मला आवडत नाही”ती त्याला म्हणाली. 

 

         आणि यावर अगम्य खळखळून हसला होता.कारण त्याला अभिज्ञा त्याच्या बाबतीत इतकी पजेसिव्ह झाली असेल याची कल्पनाच नव्हती.म्हणून त्याने ती गोष्ट हसण्यावारी नेली होती.पण अभिज्ञा या गोष्टी इतक्या सिरिअसली  घेईल असे नव्हते वाटले त्याला! कधी कधी माणूस आपल्या जवळच्या माणसाच्या मनातील भावना ओळ्खायला चुकत असतो.

 

     जसे की एखादी वस्तू डोळ्यांच्या खूप जवळ आणली तर ती आपल्याला दिसत नाही पण तीच वस्तू जर डोळ्यापासून ठराविक अंतरावर धरली तर व्यवस्थित दिसते. अगम्यचे ही काहीसे तसेच झाले होते. त्याने अभिज्ञाच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना घालवायची तिला समजून घ्यायचे सोडून ती गोष्ट हसण्यावारी नेली आणि त्याचा व्हायचा तो परिणाम त्यांच्या नात्यावर होत गेला. एक दिवस अभिज्ञा अगम्यच्या ऑफिसमध्ये तिला काही चेक वरती अर्जंट त्याच्या सह्या हव्यात म्हणून गेली.ती त्याच्या केबिनमध्ये नॉक न करताच घुसली आणि समोरचे दृश्य पाहून तिथेच थांबली .

 

    अगम्य खुर्चीवर बसला होता आणि  वैदेही अगम्यच्या अगदी  जवळ जाऊन काही तरी करत होती. अगम्यने अभिज्ञा पाहिले आणि तो वैदेहीला दूर करून लगेच उभा राहिला. पण ते दृश्य पाहून अभिज्ञा मात्र रडतच रागाने ऑफिसच्या बाहेर पडली. अगम्य तिच्या मागे  ऑफिसच्या गेट पर्यंत गेला पण अभिज्ञा त्याच काहीच ऐकून न घेता निघून गेली आणि ऑफिस सुटायला अजून वेळ असल्याने तो तिच्या बरोबर जावू शकला नाही. ऑफिस सुटले आणि तो घरी आला. अहिल्याबाईना त्याने विचारले.

 

अगम्य,“ आऊ अभी कुठे आहे?”

 

अहिल्याबाई,“ तुमच्या रूम मध्ये आहे ती आल्यापासून नुसती रडत आहे काय झालंय अगम्य नेमकं?” त्यांनी काळजीने विचारले.

 

अगम्य,“ आऊ मी सांगेन नंतर पण आता मला अभीची समजूत काढावी लागेल!” तो म्हणाला आणि अहिल्याबाईनी होकारार्थी मान हलवली ते पाहून अगम्य वर निघून गेला.

 

      त्याने पाहिले तर अभिज्ञा एकटीच गॅलरीत रडत उभी होती. अगम्य बॅग ठेवून तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला  तिने त्याचा हात पाल झटकावी तसा झटकला आणि अगम्यला ती रागाने बोलू लागली.

 

अभिज्ञा,“ don't touch me! मला तुझ्याशी बोलायचे नाही. वाटलं नव्हतं अगम्य मला की तू मला असं फसवशील!” ती रागाने बोलत होती.

 

अगम्य,“ अग माझं ऐकून तरी घे तुझा गैरसमज होतोय अभी!” तो तिला समजावत म्हणाला.

 

अभिज्ञा,“ गैरसमज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं अगम्य तू आणि ती वैदेही शी!” ती तिरस्काराने म्हणाली.

 

अगम्य,“ ठीक आहे तुला काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर मी ही सांगणार नाही! आणि इथून पुढे स्पष्टीकरण ही देणार नाही! तुझा माझ्यावर इतक्या वर्षानंतर ही विश्वास नसेल तर काय उपयोग अभिज्ञा माझ्या स्पष्टीकरण देण्याला ही!” असं म्हणून तो रागाने रूम मधून निघून गेला. त्याने बाईक काढली आणि तो घरा बाहेर पडला.

 

       अभिज्ञा तिथेच रडत राहिली. अहिल्याबाई आणि अभिज्ञाच्या आई-बाबांना मात्र त्या दोघांमध्ये काय झाले याची काहीच कल्पना नव्हती. अहिल्याबाईने अगम्यला ऑफिसचे कपडे ही न बदलता घरा बाहेर पडलेले पाहिले होते आणि काही तरी गंभीर आहे हे त्यांना कळले होते. म्हणून त्या वर गेल्या आणि त्यांनी अभिज्ञा विचारले तेंव्हा अभिज्ञाने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. अहिल्याबाई तिला काहीच बोलल्या नाहीत पण त्यांनी या प्रकरणाचा छडा लावायचे ठरवले.अगम्य मात्र रात्री नऊ वाजता घरी आला आणि न जेवताच रूममध्ये जाऊन झोपला. अभिज्ञा ही त्याला एका शब्दाने बोलली नाही.दुसऱ्या दिवशी अगम्य ऑफिसला उपाशीच निघून गेला.अहिल्याबाईनी मात्र त्याच दिवशी वैदेहीला गाठले आणि  वैदेही घाबरली आणि तिने काल काय घडले आणि आपणच अगम्यच्या मागे लागलो होतो  हे कबूल केले. तसेच अहिल्याबाईंनी तिला गाडीत बसवले आणि अभिज्ञा समोर आणून उभे केले अगम्य ही तिथेच होता आणि अभिज्ञाचे आई-बाबा ही!

 

अहिल्याबाई,“ वैदेही सांग अभिज्ञा समोर काल काय झाले ते?” त्या तिला दरडावत म्हणाल्या.

 

वैदेही,“ मी ऑफिसमध्ये जॉईन झाले आणि अगम्य सरांचे व्यक्तिमत्व पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाले. मी सतत त्यांच्या मागे-पुढे करत असे पण ते मला भाव देत नव्हते! काल ही त्यांनी कॉफी मागवली आणि प्युवून कडून मी कॉफी घेऊन गेले सरांसाठी! मी सरांच्या जवळ जाण्याचा कायम प्रयत्न करत असे काल ही त्यांना कॉफी देण्याच्या निमित्ताने त्यांच्या जवळ गेले आणि मीच मुद्दाम त्यांच्या शर्टवर कॉफी सांडली आणि ती साफ करण्याच्या निमित्ताने त्यांच्या जवळ गेले. पण सर माझ्यावर चिडले होते आणि नेमकं त्याच वेळी अभिज्ञा मॅडम आल्या आणि त्यांनी पाहिले. I am sorry mam! मी इथून पुढे नाही वागणार असं!” असं म्हणून ती निघून गेली. 


 

         अगम्य ही तिथून निघून गेला. अभिज्ञाला मात्र तिची चूक लक्षात आली होती आता अहिल्याबाई अभिज्ञाकडे पाहून बोलू लागल्या.

 

अहिल्याबाई,“ काय ग अभिज्ञा! अगम्यला किती वर्षांपासून ओळखतेस! मी ही त्याच्या आयुष्यात नव्हते तेंव्हा पासून त्याच आणि तुझं नात आहे ना! मग एवढा ही विश्वास नाही का तुझा त्याच्यावर!जो असा संशय घेतलास!त्याच्या बरोबर तू आज मला दुखवलेस बघ!” त्या खडसावून बोलत होत्या.

 

बाबा,“ खरं आहे ताई तुमचं अभी तू चुकलीस आज! तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आम्हाला.”

 

      असं म्हणून तिघे ही  निघून गेले. अभिज्ञा मात्र तिथेच रडत बसून राहिली. तिला आपण काल जे काही वागलो त्याचा पश्चात्ताप होत होता. ती उठली आणि रूममध्ये गेली. अगम्य लॅपटॉपमध्ये काही तरी करत होता. त्याला पाहून अभिज्ञा त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरून त्याला म्हणाली.

 

अभिज्ञा,“ I am sorry! माझं खरंच चुकलं अमू!” ती रडत बोलत होती.

 

          अगम्यने स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि तो तिला काही ही न बोलता उठून बेडवर त्याच्या जागेवर जावून झोपला. मग अभिज्ञा ही नाईलाजाने  रडतच झोपून गेली. सकाळी तिला जाग आली ती कसल्याशा आवाजाने ती उठून बसली तर अगम्य त्याचे कपडे बॅग मध्ये भरत होता. अभिज्ञाने ते पाहिले आणि ती त्याच्या समोर उभी राहत म्हणाली.

 

अभिज्ञा,“ कुठे निघालास  अगम्य?” 

       तो तिचे बोलणे ऐकून ही न ऐकल्या सारखे बॅग भरत राहिला. अभिज्ञाने मात्र त्याच्या हातातून कपडे काढून घेत चिडून पुन्हा त्याला विचारले.

 

अभिज्ञा,“ कुठे निघालास अगम्य ऐकू येत नाही का तुला? मी म्हणतेय ना मला माफ कर! चुकलं माझं!”ती रडकुंडीला येऊन बोलत होती.

 

अगम्य,“ अभीज्ञा मी आता तुझ्या बरोबर एकाच बेडरूममध्ये राहू शकत नाही म्हणून मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होत आहे” तो कठोरपणे म्हणाला.

 

     हे ऐकून अभीज्ञा मात्र स्तब्ध झाली. ती विचार पडली की खरच आपण इतकी मोठी चूक केली का?की ज्यामुळे आता अगम्यला माझ्या बरोबर एका रूममध्ये ही राहायचं नाही. ती मनात काही तरी ठरवून डोळे पुसत त्याला म्हणाली.

 

अभीज्ञा,“ हे बघ अगम्य आज इथेच राहा. तुला तुझी रूम सोडून कुठेच जावं लागणार नाही!मीच जाईन!आज मला सहन कर!”ती आवंढा गिळत म्हणाली.


 

     हे ऐकून अगम्यने बॅग ठेवली आणि तो ऑफिसला निघून गेला.अभीज्ञा ही तिचे आवरून ऑफिसला निघून गेली.संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर तिने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावले आणि ती बोलू लागली.

 

अभीज्ञा,“  मी एक निर्णय घेतला आहे तो सांगण्यासाठी मी तुम्हां सगळ्यांना बोलावले आहे”ती म्हणाली.

 

आई,“ कसला निर्णय घेतलास अभी दोन दिवस अमूला त्रास दिलास तेव्हढा पुरे नाही का? एक तर तू असा अगम्य वर संशय घेऊ शकतेस हेच पटत नाही मनाला. तू खूप मोठी चूक केली आहेस!” त्या रागानेच बोलत होत्या.

 

अभीज्ञा,“ त्याच चुकीची शिक्षा भोगावी लागणार आहे मला!अगम्यला माझ्या बरोबर एका रूममध्ये राहायचे नाही! म्हणूनच मी….” ती पुढे बोलणार तर अहिल्याबाईनी मध्येच अगम्यला विचारले.

 

अहिल्याबाई,“हे काय ऐकते आहे मी अगम्य? मान्य की अभीज्ञाने चूक केली पण त्याची अशी शिक्षा!” त्या म्हणाल्या.

 

अगम्य,“ आऊ मला काही दिवस एकट्याला राहायचं आहे आणि मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होत आहे. ती रूम कोणाला सोडायला सांगत नाही!” तो कडवतपणे म्हणाला.

 

अभीज्ञा,“ म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की एकाच छताखाली वेगवेगळे राहण्यापेक्षा मी पुण्याला निघून जाईल तिथून मला ऑफिस ही सांभाळायला बरं पडेल आणि अदुची शाळा तिथेच आहे!म्हणून मी पुण्याला जाऊन राहीन!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ ठीक आहे मी आजच तशी सोय करतो असे ही आपले बरेच फ्लॅट आहेत तिथे या आठवडा भरात सगळी सोय होईल!” तो अगदी  सहज म्हणाला.

 

अहिल्याबाई,“ काय लावले आहे तुम्ही दोघांनी? अमू तुला वेड लागलाय काय? अरे अभीज्ञा आणि अदु दोघेच कसे राहतील? आणि तू राहू शकशील का त्यांच्या शिवाय?अभी अग अगम्य तुझ्यावर रागावला आहे पण त्याला मनवाचे तर त्याला सोडून जायची भाषा काय करतेस?” त्या चिडून बोलत होत्या.

 

अभीज्ञा,“ आऊ मी चुकले आहे! मग त्याची शिक्षा मला भोगावीच लागेल ना!” ती आवंढा गिळत म्हणाली.खरं तर तिला मनातून वाटत होतं की अगम्यने तिला थांबवावं पण अगम्यने तसे काहीच केले नाही.

 

बाबा,“ ठीक आहे तुमच्या दोघांना वेगळेच राहायचे आहे ना तर मी आणि अभीज्ञाची आई अभीज्ञा बरोबर राहू जाऊन तिला सोबत ही होईल आणि ती ऑफिसला गेल्यावर अज्ञांकला कोण पाहणार!” ते म्हणाले.

 

     आणि एका आठवड्यातच अभीज्ञा आणि तिचे आई-बाबा अज्ञांक सह पुण्यात शिफ्ट झाले.सगळी व्यवस्था अगम्यनेच केली होती.अभीज्ञा सारख वाटत होत की अगम्यने तिला थांबवावं पण त्याने तसं काहीच केलं नाही.त्या नंतर मात्र गेल्या दोन वर्षात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. अभीज्ञा पुण्याला निघून गेली आणि अहिल्याबाईना घर खायला उठू लागल. त्यातच त्यांची तब्बेत ही त्यांना साथ देईन आणि अभीज्ञा वर कामाचा ओव्हर लोड होऊ लागला. तिची कसरत पाहून अगम्यने नोकरीचा राजीनामा दिला आणि त्याने सगळ्या फॅक्टऱ्यांची आणि प्रोडक्शनची जबाबदारी स्वतःवर घेतली. अभीज्ञा सगळा ऑफिस स्टाप आणि बिझनेसचा होशोब-किताब पाहू लागली. त्या नंतर अभीज्ञाने वाड्यात पाऊल ठेवले ते तिचा अपघात झाल्यावरच!

 

       तेंव्हा ही मी चुकले. तो म्हणाला आणि मी निघून गेले.खरं तर तेंव्हाच अगम्यला खडसावायला हवं होतं मी की मी ही कुठे नाही जाणार आणि तुला ही कुठे जाऊ देणार नाही पण मी तेव्हा ही चुकीचा निर्णय घेतला आणि पंधरा-वीस दिवसा खाली ही तेच केले. तो जा म्हणाला आणि मी किती आताताईपणा केला.कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय अगम्यला मी कायमची गमावून बसले असते. त्या दिवशी मी स्टॉपवर गेले नसते तर इतकं सगळं झालच नसत.ती हा सगळा विचार करत होती आणि तिचे लक्ष अगम्यकडे गेले. तो  तिला मिठीत घेऊन अगदी लहान मुलासारखा झोपला होता.तिने त्याला पाहिले आणि तिला त्याच्या गालावरून हात फिरवायचा मोह आवरला नाही आणि अगम्यची झोप चाळवली! अगम्यने डोळे उघडले आणि तिला अजूनच जवळ घेत तो म्हणाला.

 

अगम्य,“ झोप येत नाही का अभी?”

 

अभीज्ञा,“ हुंम!” ती म्हणाली.

 

अगम्य,“ अच्छा! मग इरादा काय आहे!” तो हसून सुचकपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 

अभीज्ञा,“अमू जास्त लाडात येऊ नकोस! झोप आता मी ही झोपते! असं ही मला उद्या ऑफिसमध्ये खूप काम आहे!” ती लटक्या रागानेच म्हणाली.

 

अगम्य,“ हो का? पण जागी तू होतीस की मी ग आणि माझ्या गालावर हात फिरवून कोण उठवले मला?” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 

अभीज्ञा,“love you!” असं म्हणून तिने तिचे ओठ त्याच्या ओठावर ठेवले. थोड्या वेळाने अगम्य तिला खट्याळपणे पाहत म्हणाला.

 

अगम्य,“ बघ आता सुरवात मी केली का तू? आता मात्र मी तुला सोडणार नाही!” तो म्हणाला.

 

अभीज्ञा,“ मी तुला सोड म्हणाले का?” ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली .

              

     माणसाने केलेल्या भूतकाळातील चुका समोरील माणसाने माफ केल्या तरी चुका करणारा माणूस मात्र तो विसरू शकत नाही आणि आपण असं वागायला नको होतो याचा विचार करून बऱ्याचदा तळमळत राहतो आणि त्या चुकांची भरपाई वेगवेगळ्या मार्गाने करू पाहतो.अभीज्ञा आता तेच करू पाहत होती.

 

अहिल्याबाई अगम्यकडून सूर्यकांत बद्दल हे सगळं ऐकून पुढचे पाऊल काय उचकणार होत्या? सूर्यकांत कोणत्या नव्या रुपात त्याच्या समोर येणार होता?

              

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule
 

   


 

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे