दि लूप होल (भाग ३७) अंतिम

This is suspense and thriller story

    आज ती घटना घडून सहा महिने उलटून गेले होते. अभीज्ञा श्रीरंगपूरच्या वाड्यात  कसल्याशा कार्यक्रमाची तयारी करण्यात मग्न होती. आज सकाळपासूनच तिची धावपळ सुरू होती.तिचा नुसता नोकर-चकरांना सूचना देण्याचा सपाटा सुरू होता आणि फोनवर सगळ्यांना निमंत्रणे पोहोचली का?तसेच केटरर्सची आणि बरेच काही चौकशी करण्यात  वेळ चालला होता.अहिल्याबाई अज्ञांकला कडेवर घेऊन चौकात आल्या तर अभीज्ञा सजावट करणाऱ्या लोकांना सूचना देत होती. अहिल्याबाई तिला पाहून म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ अभी काय हे दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली.किती वेळा बोलवून झालं तुला जेवायला?लहान आहेस का तू आता जेवण करण्यासाठी मागे लागायला?” त्या काहीशा नाराजीने आणि काळजीने बोलत होत्या.


     तो पर्यंत तिथे अभीज्ञाच्या आई आल्या आणि म्हणाल्या.


आई,“ ताई तिचं आज संध्याकाळी असच पोट भरणार आहे कोणाला तरी पाहून! आज नाही जेवले तरी चालेल तिला!” त्या अभीज्ञाला चिडवत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ काय ग आई! मीच भेटते का तुला खेचायला?मी आले जेवते आऊ दहा मिनिटं!” ती लाजत लटक्या रागाने तिच्या आईला म्हणाली.


       तो पर्यंत राहुल, मीरा आणि अभीज्ञाचे बाबा कसलीशी खरेदी करून  बॅगा घेऊन तिथे पोहोचले. त्यांना पाहून अहिल्याबाईने एका बाईला पाणी घेऊन ये असे सांगितले आणि त्या म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ बाईक आली आहे ना रे राहुल ऑर्डर प्रमाणे?नाही म्हणजे ऐन वेळी घोळ नको!” 


राहुल,“ हो आऊ आली आहे बाईक तुमच्या ऑर्डर प्रमाणे! संध्याकाळी डिलिव्हरी होईल वेळेत!” तो पाणी घेत म्हणाला. 


          पुन्हा सगळे कामाला लागले. या सगळ्या धामधुमीत पाच वाजले. आता अभीज्ञा मात्र अधिरपणे अगम्यची वाट पाहत होती.गेल्या एक महिन्यापासून ते दोघे एकमेकांना भेटलेच नव्हते. 


     इकडे अगम्य कारमध्ये बसला. त्याची ही अवस्था वेगळी नव्हती. त्याला ही कधी एकदा सगळ्यांना आणि अभीज्ञाला भेटतोय असं झालं होतं. अगम्य अभीज्ञाचा मनात  विचार येताच गालातल्या गालात हसला आणि सहा महिने मागचे त्याला सगळे आठवू लागले.


         अगम्य आता बरा झाला होता आणि अहिल्याबाई गावी जाऊन एक महिना होत आला होता.अगम्य आणि अभीज्ञा ही आता ऑफिसला जाऊ लागले होते.पण अगम्य मात्र आतून अस्वस्थ होता. त्याला सतत अहिल्याबाईची काळजी लागून राहिली होती. आता अहिल्याबाईंनी त्यांचे कुटुंब असता एकटे राहावे हे त्याला पटत नव्हते. म्हणूनच त्याने काही तरी निर्णय घेतला होता.अभीज्ञाला अगम्यची घालमेल दिसत होती आणि तिला ही अहिल्याबाईची काळजी वाटतंच होती म्हणूनच तिने ही एक निर्णय घेतला होता.


     दोघे ही ऑफिसमधून आले.ऑफिसमधून आल्यापासून अज्ञांक अगदी जेवताना ही अगम्य जवळच होता.अभीज्ञाने त्याला अगम्य जवळून कसे बसे घेतले होते आणि त्याला आईच्या रूममध्ये झोपून आली होती. तिला पाहून अगम्यने विचारले.


अगम्य,“झोपला का अदु?”


अभीज्ञा,“ हो झोपला एकदाचा! आज काल तू ऑफिसमधून आला की तो सोडत नाही तुला एकदा चिकटून बसला की!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ मग तुझं काय गेलं ग? आम्ही दोघे बापलेक चिटकलो  तर!” तो तिला चिडवत म्हणाला.


अभीज्ञा,“ माझं काय चालले आहे अजून घेऊन बस त्याला!पण तो जर तुझ्या अति लाडाने बिघडला ना तर मी जबाबदार नाही!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ मग तू तर पहिल्यांदा बिघडायला हवीस की!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ अच्छा म्हणजे माझे लाड तू करतोस का? याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ हो का? बरं ऐक ना मला तुझ्याशी बोलायचे आहे!” तो गंभीर होत म्हणाला.


अभीज्ञा,“ आऊला फोन केला होतास का? ते सांग आधी! आणि असे काय बोलायचे आहे तुला खरं तर मला पण बोलायचे होते तुझ्याशी. ती बेडवर बसत म्हणाली.


अगम्य,“ हो केला होता फोन ठीक आहे आऊ! बरं बोल काय बोलायचे?”त्याने  विचारले.


अभीज्ञा,“ आऊ गावाकडे एकट्याच असतात. त्यांची काळजी सतत वाटत असते. बरं त्या इथे ही राहायला तयार नाहीत. आता या वयात त्यांना इतका मोठा बिझनेस आणि शेतीचा डोलारा सांभाळणं ही जड जात आहे त्यातून त्या एकट्याच मी काय म्हणते की आपणच…..” ती पुढे बोलणार तर तिला थांबवत अगम्य बोलू लागला.


अगम्य,“ आपणच गावी जाऊ राहायला हेच ना! ते सगळं शेवटी मनात असलं आणि नसलं तरी आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे म्हणूनच मी नोकरीचा राजीनामा देतो. तू पुण्याला बदली करून घे म्हणजे तुला आणि मला सोयीस्कर पडेल.” तो म्हणाला.


अभीज्ञा,“ तू माझ्या परस्पर सगळं ठरवून रिकामा झालास?” ती रागानेच म्हणाली.


अगम्य,“ अग रागवायला काय झालं इतकं? मग काय करावे तू सांग?” तो म्हणाला.


     ती उठली आणि तिच्या ऑफिसच्या बॅगेतून दोन फॉर्म काढून त्याला दाखवत म्हणाली.


अभीज्ञा,“ हे बघ मी माझा राजीनामा लिहला आहे आणि हा तुझा रिक्वेस्ट ट्रान्स्फरचा फॉर्म  मी भरला आहे तू फक्त सही कर यावर! पुण्याला बदली तुझी करायची माझी नाही. मी सगळं पाहीन!” ती  म्हणाली.


अगम्य,“काय? उगीच वेडेपणा करू नकोस अभीज्ञा! इतक्या मेहतीने डॉक्टरेड मिळवलीस! नोकरी मिळवलीस ती अशी सोडण्यासाठी का? आऊ आणि देशमुखांचा पसारा माझी जबाबदारी आहे तुझी नाही!” तो चिडून म्हणाला.


अभीज्ञा,“ झालं का तुझं माझं करून आता! आऊ तुझी जबाबदारी झाल्या काय? आणि माझ्या कोणी नाहीत का? मग असच आहे तर माझ्या आई-बाबांच काय ते मी पाहीन इथून पुढे समजलं!” ती  शांतपणे म्हणाली.


अगम्य,“ अच्छा म्हणजे मला आई-बाबांच नाव घेऊन ब्लॅकमेल करणार का तू आता?” त्याने पुन्हा रागाने विचारले.


अभीज्ञा,“ब्लॅकमेल नाही पण आऊ फक्त तुझी जबाबदारी आहे तर माझे आई-बाबा फक्त माझी जबाबदारी आहे!” ती शांतपणे म्हणाली.


अगम्य,“ काय वेडेपणा आहे हा अभी? तू मुद्दमहुन म्हणतेस का असं?तुला चांगलंच माहीत आहे आई आणि बाबावर माझा जीव आहे ते! आऊ पेक्षा ही कुठे तरी जास्तच आईवर! ” तो रागातच म्हणाला.


अभीज्ञा,“ आता मी काय केलं मुद्दाम? आणि माहीत आहे मला तुझा जीव आहे त्या दोघांवर ही आणि जास्त आईवर आणि तिचा तुझ्यावर!  म्हणून तर ती माझी आई कमी आणि सासूच जास्त असते! पण माझा ही जीव आहेच की आऊवर हे विसरू नकोस की त्यांचा तुझ्या आधी मी तुझी आई म्हणून  स्वीकार केला आणि त्यांचा तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे! आणि काय ठेवलंय असं त्या नोकरीत आणि मी नोकरी सोडली तरी माझ्या नावापुढे लागलेल डॉ. सौ. अभीज्ञा अगम्य देशमुख हे नाव बदलणार आहे का?” ती पुन्हा शांतपणे म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे आपण दोघे ही नोकरी सोडू आणि पुण्याला जाऊ आई-बाबांना घेऊन! सगळं झंझटच मिटेल! तू हाऊस वाईफ हो आणि घरात बस मी पाहीन सगळा बिझनेस,शेती वगैरे!” तो नाराजीने म्हणाला.


अभीज्ञा,“ ये मी काय हाऊस वाईफ वगैरे होणार नाही गैरसमज दूर कर तुझा! मी तर आता बिजनेस वुमन होणार माझ्या सासू सारखी! तू बघ तुझी ती नोकरी असं पण मी कंटाळले आहे ते ऐतिहासिक अवशेष वगैरे पाहून पाहून!” ती नाटकीपणे म्हणाली.


      तीच असलं नाटकी बोलणं ऐकून अगम्यला मात्र हसू आले व तो म्हणाला.


अगम्य,“ म्हणजे तू ऐकणार  नाही तर माझे? असं ही तू माझं कधी काय ऐकतेस म्हणा! मलाच कायम माघार घ्यावी लागते!” तो नाराजीने म्हणाला.


अभीज्ञा,“असं! म्हणजे तुझं मी काहीच ऐकत नाही तर? नाराज का होतो आहेस? हे बघ तू या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी माझ्या पेक्षा खूप जास्त मेहनत आणि कष्ट घेतले आहेस! तुला आठवतं का अमू तू न जेवता येत होतास माहिती गोळा करायला मंदिरांची माझ्या बरोबर! आणि एकदा बेशुद्ध पडलास आणि नंतर तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्ये होतास! तू ही पी.एच.डी. आणि नोकरी मिळवण्यासाठी या हुद्द्यावर पोहचण्यासाठी खूप कष्ट केले आहेत.माझ्यापेक्षा खूप जास्त!  मी काय आई-बाबा उच्च शिक्षित आहेत म्हणून मी ही उच्च शिक्षित झाले. माझं कोणतं ही अस ध्येय नव्हतं पुढे तुझ्यामुळे नोकरी करायला लागले. पण तुझी मेहनत आणि कष्ट मी कोणत्या ही कारणासाठी नाही वाया जाऊ देऊ शकत कळलं तुला!” ती त्याचा हात हातात घेऊन त्याला समजावत होती.


अगम्य,“ तू का करतेस हे सगळं? का तू मेहनत नाही घेतलीस का शिक्षणासाठी? प्रत्येक वेळी तू असं काही तरी करतेस की मला तुझा हेवा वाटतो!” तो तिला जवळ घेत म्हणाला.


अभीज्ञा,“माझा हेवा वाटतो तो आणि का?” तिने आश्चर्याने विचारले.


अगम्य,“ तू जितकं माझ्यावर प्रेम करतेस तितकी मी तुझ्यावर करत नाही म्हणून!” तो तिला म्हणाला.


अभीज्ञा,“ वेडा आहेस का? असं काही नाही अमू तू माझ्यावर किती प्रेम मारतो हे तू नाही मी ठरवणार! आणि हो तू ही माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून तर माझं सगळं ऐकतो ना!” ती डोळे मिचकावत म्हणाली.


अगम्य,“ म्हणजे तू पण कबुल केलसच शेवटी की मी तुझं ऐकतो! हो ना?”हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ हो कबूल तुझ्या बरोबर बोलण्यात कोणी जिंकू शकत नाही! मग झोपुयात का? उद्या पासून मला खूप काम आहे?” ती म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे.कर तुला काय करायचं ते माझं तू थोडीच ऐकणार आहेस!” तो हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ म्हणजे तू तयार आहेस तर!अमू love you!” ती खुश होत म्हणाली.


अगम्य,“ बाल हट्ट आणि स्त्री हट्टा पुढे कोणाच काही चालले आहे का कधी? आता उद्या पासून तयारीला लागले पाहिजे!” तो म्हणाला.


अभीज्ञा,“ तू नको काळजी करू मी सगळं ठरवल आहे! सगळा प्लॅन तयार आहे माझ्याकडे!” ती  म्हणाली.


अगम्य,“ अरे देवा तू सगळं ठरवलस ही? बरं मग होऊ द्या तुमच्या मना सारखं” तो हसून म्हणाला.


             दोघे ही झोपले.रात्री दोनच्या दरम्यान अगम्य ओरडत उठला. तो घामाने डबडबला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याच्या आवाजाने अभीज्ञा  ही उठली आणि तिने लाईट लावली. अगम्य खूप घाबरलेला दिसत होता. अभीज्ञाने त्याला पाणी पाजले.त्याचा घाम पुसला. अगम्य थोड्या वेळाने अभीज्ञाच्या मांडीवर झोपला. पण अभीज्ञा मात्र जागीच होती. तिला अगम्यची काळजी झोपू देत नव्हती. गेल्या एक महिन्यात अगम्य रात्री दोन-तीन दिवसातून एकदा तरी असा रात्री दोन वाजता घाबरून ओरडत उठत होता. डॉ. पाटलांच असं म्हणणं होतं की त्याने जे त्या पेंटींगमध्ये  भोगले त्याच्या परिणाम आहे हा! त्याच्या मनात त्या प्रसंगाची भीती बसली आहे. त्यावर एकच उपाय होता तो म्हणजे त्याला रात्री एकट न सोडणे.डॉक्टरांचे असे म्हणणे होते की त्याच्या मनातील ही भीती कालांतराने कमी होत जाईल पण एक महिना उलटून गेला तरी अगम्य अजून ही तसाच घाबरून उठत होता.


        अभीज्ञाने  नोकरी सोडून अगम्य आणि तिच्या आई-बाबांना औरंगाबाद मध्येच ठेवले आणि ती अज्ञांकला घेऊन गावी अहिल्याबाईकडे गेली. तिथे तिने सगळा बिझनेस अहिल्याबाईच्या मदतीने टेक ओहर केला. इकडे अभीज्ञाच्या बाबांनी त्यांच्या ओळखीने अगम्यची पुण्यात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तरी या सगळ्या प्रोसेसला सहा महिने लागले.या सगळ्यात गेल्या सहा महिन्यात अभीज्ञाची मात्र धावपळ झाली होती. 


             पण दोन दिवसा पूर्वीच आगम्यची बदली पुण्यात झाली होती आणि आज सकाळी त्याने ड्युटीचा चार्ज घेतला होता. आणि योगायोगाने आजच त्याचा वाढदिवस होता आणि तो सगळ्यांसाठीच खास होता कारण अगम्य गेल्या तीन वर्ष बरोबर नव्हता आणि गेल्या एक वर्षात तो दोन वेळा मरणाच्या दारातून सुखरूप बाहेर पडला होता. अगम्यला ही चांगलं माहीत होतं की त्याच्यासाठी आज सगळ्यांनी मिळून मोठं सरप्राईज प्लान केले असणार! 


     या सगळ्या विचारात अगम्यची गाडी  वाड्यासमोर येऊन पोहोचली.अगम्य गाडीतून उतरून चौकात गेला. तर त्याला पाहून राहुलच्या कडेवर बसलेला अज्ञांक उतरून बाबा बाबा म्हणत अगम्यकडे  धावत जाऊन तो अगम्यला चिटकला. हे पाहून सगळे हसायला लागले. पार्टी सात वाजता सुरू होणार होती. त्यामुळे अजून दोन तास होते. रिल्याक्स व्हायला. अगम्य जरा वेळ अज्ञांक बरोबर खेळला. मग वर फ्रेश व्हायला रूममध्ये गेला आणि अहिल्याबाई तो पर्यंत चहा आणि नाष्टा करवून घेत होत्या. तो पर्यंत अगम्यने अभीज्ञाला वरूनच हाक मारली. तशी अभीज्ञा वर पळतच गेली.


अभीज्ञा,“ काय झालं अमू?” तिने काळजीने विचारलं.


     तो पर्यंत अगम्यने हळूच जाऊन दार बंद केले आणि अभीज्ञा बेसावध असताना तिला मागून मिठी मारली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला.


अगम्य,“love you!”


अभीज्ञा,“ हे सांगण्यासाठी मला इतक्या मोठ्याने हाक मारलीस? घाबरले ना मी!”ती चिडून त्याच्या मिठीतुन सोटण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! पण घाबरायला काय झालं इतकं! इतक्या दिवसाने भेटते आहेस तर अशी चिडणार का?” त्याने तिला स्वतःकडे वळवत विचारले.


अभीज्ञा,“ तुझा फाजीलपणा करून झाला असेल तर का बोलावलं होतं मला सांगशील? मला बरीच काम आहेत अजून आणि हो नाष्टा कर आणि तयार हो सूट आणून ठेवला आहे तुझ्यासाठी!” ती त्याला पाहत म्हणाली.


अगम्य,“ काय आहे हे सर्व आज खूप दिवसांनी निवांत बोलायला मिळेल म्हणलं तर तुला काम आहे! इतका मोठा वाढदिवस साजरा करायला मी लहान आहे का आता?” तो कुरकुरत म्हणाला.


अभीज्ञा,“ ते सगळं तुझ्या आऊला विचार मला नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला दीर्घ आयुष्य लाभो!love you!” ती त्याच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली.


अगम्य,“ इतक्या कोरड्या शुभेच्छा वाढदिवसाच्या?” तो तिला आणखीन जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ सगळे खाली आहेत अगम्य! सोड मला!काय म्हणतील सगळे!” ती त्याला समजावत म्हणाली.


अगम्य,“ काही नाही म्हणत कोण! मला हवं ते दे मग जा!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


अभीज्ञा,“ सगळं रात्री! आता सोड आणि लवकर फ्रेश होऊन खाली ये! भूक नाही लागली का तुला?प्लिज!” ती त्याला लाडीगोडी लावत म्हणाली.


अगम्य,“ठीक आहे जा!” तो तिला रागाने सोडून देत म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळला.


अभीज्ञा,“ अच्छा! लगेच फुगा फुगला तर!” ती त्याला आडवल त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.


अगम्य,“ जाणा काम आहेत ना….” तो चिडून बोलत होता तर अभीज्ञाने तिचे ओठ त्याच्या ओठावर ठेवले


     . दोघे ही बराच वेळ एकमेकांना गुंतत होते.दहा मिनिटाने अभीज्ञा त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.


अभीज्ञा,“ तुझ्या शिवाय हे सहा महिने खूप जड गेलेत अमू मला ही! पण आता निवांत वेळ आहे आपल्याकडे आजची पार्टी झाली की!”ती म्हणाली.


अगम्य,“ मला ही खूप जड गेलाय हा काळ अभी!” तो तिला आणखीनच घट्ट मिठी मारत म्हणाला.


      अभीज्ञाच्या ही त्याच्या मिठीतुन सुटणे जीवावर आले होते पण ती कशी-बशी त्याच्या मिठीतुन सुटली आणि त्याला फ्रेश व्हायला पाठवून ती खाली निघून गेली. अगम्य फ्रेश होऊन खाली आला सगळे त्याचीच वाट पाहत होते. सगळ्यांनाच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. तो पहिल्यांदा  अहिल्याबाईच्या पाया पडला.अहिल्याबाईने त्याला मिठी मारली आणि त्या गहिवरून म्हणाला.


अहिल्याबाई,“ औक्षवंत हो लेकरा! कायम सुखी राहा!तुझा हा माझ्या बरोबर आपल्या या वाड्यात देशमुखांचा वारस म्हणून पहिलाच वाढदिवस आहे.मग तो आठवणीत राहायला नको!” त्या पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या.


     अगम्य अभीज्ञाच्या आई-वडिलांच्या ही पाया पडला.त्यांनी ही दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. राहुलने आणि मिराने ही शुभेच्छा दिला. अहिल्याबाईनी अभीज्ञाला अगम्यचे औक्षंण करायला लावले. सगळ्यांनी मिळून नाष्टा केला आणि सगळे पार्टीसाठी तयार व्हायला गेले. अभीज्ञा आणि अहिल्याबाई पटापट आवरून खाली चौकात आल्या. आता हळूहळू लोक येई लागले होते. पुण्यातील पंचक्रोशीतील प्रतिष्ठित लोक तसेच देशमुख उद्योग समूहाचे असोसिएट आणि बरीच मंडळी. पण सगळ्या लोकांना एकच उत्सुकता आणि घाई लागून राहिली होती. ती म्हणजे देशमुखाच्या वारसाला पाहण्याची आणि भेटण्याची! म्हणजे अभीज्ञाला डॉ. सौ. अभीज्ञा अगम्य देशमुख म्हणून या सहा महिन्यात लोक चांगले ओळखू लागले होते पण अगम्य देशमुखला अजून तरी ठरावीक लोक सोडता कोणी अजून पाहिले किंवा भेटले ही नव्हते. त्यामुळे आज पार्टीचा केंद्र बिंदू आणि आकर्षण अगम्यच होता 


                 सगळे आमंत्रित लोक आता जवळ-जवळ आले होते. सगळ्यांचे आदर आतिथ्य अहिल्याबाई आणि अभीज्ञा जातीने पाहत होत्या. सगळीकडे स्टार्टर, ज्यूस, ड्रिंक यांची रेलचेल होती. पण प्रत्येकाची एकच चर्चा सुरू होती. ती म्हणजे अगम्य देशमुख कोण आहे? तो कसा दिसतो? आणि तो काय करतो? कारण सगळा बिझनेस तर अभीज्ञा देशमुखने टेक ओव्हर केला होता.अहिल्याबाईनी अभीज्ञाला हाक मारली आणि तिला कानात काही तरी सांगितले. तशी ती चौकातून म्हणजेच पार्टिच्या ठिकाणावरून वाड्यात गेली. ती तिच्या रूममध्ये गेली तर अगम्य अजून टाय बांधण्याचा प्रयत्न करत असलेला तिला दिसला. त्याच्या जवळ जात त्याला पाहून  टाय बांधत ती म्हणाला.


अभीज्ञा,“ क्या बात हैं। आज खूपच हँडसम दिसतोय माझा नवरा! अरे पण सगळे तयार होऊन आले आणि तू अजून इथेच? आऊनी वाट पाहून मला पाठवले बोलवायला तुला का आज उत्सव मूर्ती म्हणून भाव खातो आहेस?” ती मिस्कीलपणे हसून म्हणाली.


अगम्य,“ तुला भेटल नाही का कोण सकाळ पासून? माझी खेचत आहेस उगीच! भाव कसला खाऊ आता? एका चार वर्षात मुलाचा बाप झाल्यावर! आणि हँडसम म्हणशील तर मी आहेच की पण फक्त तुझ्यासाठी!  हा टाय कोणत्या जन्मीचा शत्रू आहे माझा काय माहीत मला बांधतात येत नाही. राहुल्या आणि बाबा दोघांच्या ही रूममध्ये जाऊन आलो पण सगळे गायब आहे आणि तू पण! मग काय करू पाहत होतो स्वतःच प्रयत्न करून” तो तिच्या कमरेत दोन्ही हात घालून तिला जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ मग कोणाला तरी पाठवायचे ना मला बोलवायला! किती तरी नोकर-चकार आहेत की घरात! आणि टाय बांधून झालाय तर हा फाजीलपणा बंद कर आणि चल लवकर सगळे वाट पाहतायत तुझी! लोक आतुर आहेत देशमुखांचा वारस पाहायला आणि भेटायला!” ती स्वतःला त्याच्या पासून सोडवून घेत म्हणाली.


     अभीज्ञा अगम्यला घेऊन खाली चौकात आली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अहिल्याबाईनी अगम्य आणि अभीज्ञाला अज्ञांकला घेऊन त्याच्या जवळ  बोलावले व त्या माईकमध्ये बोलू लागल्या.


अहिल्याबाई,“ प्रथम तर सगळ्यांचे देशमुख वाड्यात स्वागत! आणि धन्यवाद सुध्दा  तुम्ही सगळे माझ्या आनंदात सामील झालात! आज ही पार्टी आयोजित करण्याची दोन कारणे आहेत एक तर माझा मुलगा अगम्य देशमुख याचा वाढदिवस आणि दुसरे म्हणजे देशमुख उद्योग समूहाबद्दल एक महत्वाची घोषणा करायची आहे. त्या आधी तुमच्या सगळ्यांशी माझ्या मुलाशी आणि सुनेशी जिला तुम्ही गेल्या सहा महिन्यांनपासून ओळखता तरी तिची ही नव्याने ओळख करून देते. हा माझा मुलगा डॉ. अगम्य आप्पासाहेब देशमुख जो पुरातत्व विभाग,पुणे येथे क्लास टू ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. आज त्याचा वाढदिवस हा वाढदिवस मी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप खास आहे आणि हो ही त्याची धर्मपत्नी डॉ. सौ.अभीज्ञा अगम्य देशमुख आणि हा माझा नातू अज्ञांक आणि हो ते( अभीज्ञाच्या आई-वडिलांकडे बोट करून) माझे व्याही श्री व सौ.मधुकर जाधव आणि तो राहुल आणि त्याची पत्नी मीरा माझ्या मुलाचा मित्र! तर ही झाली माझ्या कुटुंबाची ओळख! 

     

        आणि दुसरी महत्त्वाची घोषणा ती म्हणजे देशमुख उद्योग समूहाबद्दल तर इथून पुढे देशमुख उद्योग समूहाचे सर्व निर्णय माझी सून  म्हणजेच देशमुख उद्योग समूहाची M. D. डॉ.सौ.अभीज्ञा अगम्य देशमुख घेईल. तिच्या नावावर या समूहाचे एक्कावन्न टक्के शेअर्स मी केले आहेत तर माझा मुलगा अगम्य हा एक्कोणपन्नास टक्के शेअर्सचा मालक असेल. म्हणजेच उद्योगा विषयी  अंतिम निर्णय सर्वस्वी माझी सून अभीज्ञा देशमुख घेईल. (हे ऐकून अभीज्ञाने चमकून अहिल्याबाईकडे पाहिले तर अहिल्याबाईनी तिला नजरेनेच आश्वस्त केले आणि त्या पुढे बोलू लागल्या)तर आता महत्त्वाच्या गोष्टीकडे वळू ज्यासाठी आपण जमलो आहोत. अगम्य चल केक कापू! ” हे ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.


       पार्टी चांगलीच रंगली.अभीज्ञा आणि अहिल्याबाई अगम्यला बऱ्याच लोकांची ओळख करून देत होत्या.सगळे पाहुणे जेवून खाऊन हळूहळू गेले.पार्टी संपू पर्यंत रात्री अकरा वाचल्या.  सगळे आता रिल्याक्स झाले.माज घरात आता फक्त घरातील लोक होते. अहिल्याबाईना आता अभीज्ञा न राहवून बोलू लागली.


अभीज्ञा,“ हे काय आऊ तुम्ही मला M. D.केलेत आणि माझ्या नावावर एक्कावन्न टक्के शेअर्स कशाला? मी इतकी मोठी जबाबदारी नाही पेलू शकणार!” ती संकोचून बोलत होती.


अहिल्याबाई,“ मी आहे ना तुला सगळं शिकवायला! नको काळजी करू तू आणि ही जबाबदारी घेण्याच्या योग्यतेची आहेस. या अमू पेक्षा ही जास्त विश्वास मला तुझ्यावर आहे अभी! याला करू दे की याची नोकरी पुढे मागे करेलच की हा तुला मदत! काय रे अमू?” त्यांनी विचारले.


अगम्य,“ हो आऊ!” तो म्हणाला.


           अभीज्ञाचा आता नाईलाज झाला आणि ती गप्प बसली.


अहिल्याबाई,“ आता मला म्हातारीला या सगळ्यातून संन्यास घ्यायला आणि अदु बरोबर वेळ घालवायला बरं! ” त्या अज्ञांकला जवळ घेत हसून  म्हणाल्या आणि काही तरी आठवून पुन्हा म्हणाल्या


अहिल्याबाई,“ या सगळ्या गडबडीत तुला गिफ्ट द्यायचं राहील की रे अमू आणि अभीला पण मला काही तरी द्यायचं आहे.( त्यांनी राहुलला इशारा केला तसा राहुल चौकात स्पोर्ट बाईक घेऊन आला सगळे चौकात आले.) हे बघ तुझे वाढदिवसाचे गिफ्ट स्पोर्ट बाईक हीच बाईक तुला बरेच वर्ष हवी होती ना!” त्याला बाईक दाखवत त्या म्हणाल्या. 


      अगम्य बाईक पाहून त्या बाईकच्या जवळ जाऊन हात लावून पहात होता.त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर चमक आणि आनंद ओसंडून पाहत होता. ते पाहून अहिल्याबाई मात्र समाधानाने हसत होत्या. अगम्यने मात्र बाईक पाहतच अहिल्याबाईना विचारले.


अगम्य,“पण आऊ तुला कोणी सांगितले की ही बाईक मला हवी होती म्हणून?”


राहुल,“ अम्या तुला कशाला रे चौकशा कोणी सांगितले वगैरे! मिळाली ना बाईक मग गप वापर की!” तो हसून म्हणाला.


अगम्य,“ म्हणजे तूच सांगितलं ना राहुल्या आऊला?” 


अहिल्याबाई,“ अरे कोणी का सांगेना  तुला बाईक आवडली ना? मग झाले तर!” त्या हसून म्हणाल्या.


अगम्य,“ हो आऊ!” असं म्हणून त्याने अहिल्याबाईना मिठी मारली.


             अहिल्याबाई सगळ्यांना तिथेच थांबवून वर त्यांच्या रूम मध्ये गेल्या आणि कसली तरी दागिन्यांची पेटी घेऊन आल्या आणि ती पेटी उघडून अभीज्ञा आणि अगम्यला  दाखवत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“  हा बघा हा चंद्रहार आपला खानदानी दागिना आहे.  जो एका सुनेकडून दुसऱ्या सुनेला दिला जातो. तो आज मी आभिला देते.देऊ ना रे अमू तुझ्या बायकोला आता?  नाही म्हणजे तुला विचारलेलं बरं!” त्या हसून मिस्कीलपणे म्हणाल्या.


अगम्य,“ हे बरं आहे तुमचं! सगळं सासू-सुना मला न विचारता करता आणि वरून मला विचारायचा आव पण आणता! तू आणि तुझी सून पाहून घ्या काय ते मी मध्ये नाही” तो तक्रारीच्या सुरात म्हणाला.


अभीज्ञाची आई,“जाऊ दे अमू तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे त्या दोघीनी  तुला त्रास दिला तर मी आहे की तुझ्या बरोबर!” त्या हसून म्हणाल्या.


      हे ऐकून सगळे हसले आणि अगम्यने अभीज्ञाच्या आईच्या हातावर टाळी दिली! सगळे झोपायला निघून गेले.अभीज्ञा फ्रेश होऊन कपडे बदलून आली तर अगम्य तिची वाटच पाहत बसला होता. ती आली आणि तीला जवळ ओढत तो म्हणाला.


अगम्य,“ सगळ्यांनी मला गिफ्ट दिले. आऊने बाईक, आई-बाबांनी तर सोन्याच पेन बनवून घेतला माझ्यासाठी आणि राहुल आणि मीराने तुझी, माझी आणि अदुची फोटो फ्रेम दिली ती ही चांदीची पण तू काहीच दिलं नाहीस कुठाय माझं गिफ्ट?” 


अभीज्ञा,“ किती लोभी रे तू इतक्या सगळ्यांनी दिलीत ना गिफ्ट मग माझ्याकडून कशाला आणखीन!” ती मिस्कीलपणे म्हणाली.


अगम्य,“ म्हणजे तू मला गिफ्ट नाही देणार तर!” असं म्हणून त्याने अभीज्ञाला सोडले आणि तो बेडवर जाऊन बसला.


अभीज्ञा,“ झाला का फुगा तोंडाचा? मी  तुला तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट देणार नाही असं होईल का कधी?” असं म्हणून तिने त्याच्या हातात ओमची डिझाइन  असलेले सोन्याचे ब्रेसलेट घातले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली.


अभीज्ञा,“ मी तुझ्या गळ्यात घातलेले ओमचे लॉकेट तू पेंटींग मधून बाहेर आल्या पासून दिसत नव्हते म्हणून दुसरे लॉकेट तर तेव्हाच घातले मी तुझ्या गळ्यात! तरी ही तुझ्या सुरक्षिततेसाठी हे ब्रेसलेट बनवून घेतले!” ती गंभीर होत म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! मग आढेवेढे घेऊन तुला अजून गिफ्ट कशाला हवं असं म्हणून मला कशाला सतवायच!” त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारले.


अभीज्ञा,“ तू  फुगलास ना की अदु पेक्षा पण क्युट दिसतोस म्हणून!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ हो का? आता तुला दाखवतो मी किती क्युट आहे ते!” असं म्हणून त्याने तिला जवळ ओढले.


          जशी रात्र चढत होती तसे दोघांच्या ही प्रेमाला बहर येत होता. दोघे ही एकमेकांमध्ये विरघळत होते. रात्री कधी तरी दोघे ही झोपले पण रात्री दोन ते तीनच्या दरम्यान अगम्य मोठ्याने ओरडत उठला पण हे ओरडणे नेहमीचे नव्हते. तो नेहमी पेक्षा जास्त घाबरलेला दिसत होता. अभीज्ञा उठली तिने लाईट लावली आणि अगम्यला पाणी पाजले.त्याचा घाम पुसला. त्याचा चेहरा खूपच घाबरलेला दिसत होता. त्याच्या आवाजाने सगळेच उठले आणि आपापल्या रूमच्या बाहेर येऊन व अगम्यच्या रूमच्या बाहेर जमा झाले  प्रत्येकाला प्रश्न पडला की दार वाजवावे कसे? तरी अभीज्ञाच्या आईने दार वाजवले आणि दार उघडण्या आधीच म्हणाल्या.


आई,“ काय झाले अभी अमू ठीक आहे ना!तो  अजून घाबरून उठला का? पण आज तो नेहमी पेक्षा जोरात ओरडला ग!” त्या काळजीने म्हणाल्या.


     अभीज्ञाने दार उघडले आणि ती म्हणाली.


अभीज्ञा,“ हो आज पुन्हा तो घाबरून उठला आहे पण तो ठीक आहे तुम्ही जाऊन झोपा मी आहे ना! काळजी करण्या सारखे काही नाही!” 


    हे ऐकून सगळे गेले. अगम्य अभीज्ञाच्या मांडीवर डोके ठेऊन पडला होता पण दोघांची ही झोप उडाली होती. अभीज्ञा त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.


अभीज्ञा,“ काय झालं अमू? आज खूप मोठ्याने ओरडलास?”


अगम्य,“काही नाही ग! नेहमीचेच!” तो तिचा प्रश्न टाळत म्हणाला.


अभीज्ञा,“ खोटं बोलू नकोस अगम्य आज काही तरी वेगळेच झाले आहे( तिने समोर कॅलेंडरमध्ये पाहिले आणि म्हणाली) अरे देवा!आज तर अमावस्या आहे की! काय झाले अमू सांगतो का आता?” तिने काळजीने विचारले.


अगम्य,“ आता पोलिसां सारखी चौकशी करत बसणार का माझी? काही नाही नेहमीचेच म्हणालो ना मी!अभी I love you! And now I need you!” असं म्हणून त्याने उठून तिला मिठीत घेतले.


     अभीज्ञा त्याला काहीच बोलली नाही. त्याच्या मिठीत शिरली पण तिला ही चांगलंच माहीत होतं की अगम्य काही तरी तिच्या पासून लपवत आहे. अगम्यने असं ही त्या  अमावस्येच्या रात्री पेंटींगमध्ये काय झाले ते अजून कोणाला ही सांगितले नव्हते आणि डॉक्टरांनी त्याला विचारू नका असे सांगितल्यामुळे त्याला कोणी त्या बाबत काही विचारले ही नव्हते.


      नवीन सुरवात करू पाहणाऱ्या अगम्य आणि अभीज्ञाच्या आयुष्यात ही नवीन वादळाची नांदी तर नव्हती? सगळं ठीक झालं. असं सगळ्यांना वाटत असताना कुठे काही चुकून राहील तर नव्हत?


समाप्त 


      या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन लवकरच भेटू


    दि लूप होल पर्व २ मध्ये



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule






 




          


 


 


      




    

        

 






        

🎭 Series Post

View all