दि लूप होल (भाग ३५)

This is thriller and suspense story

   अभीज्ञा अजून झोपली होती. अगम्य मात्र लवकर उठून तयार होत होता.तोपर्यंत अभीज्ञा जागी झाली.अभीज्ञा त्याला पाहून उठत म्हणाली.


अभीज्ञा,“ आज लवकर उठलास?” 


अगम्य,“ अग! ते  यज्ञाला बसायचे आहे ना म्हणून उठलो बरं तू आवर मी जातो.  गुरुजी आले असतील!” असं म्हणून तो निघून गेला.


     अभीज्ञा मात्र  जरा वेळ तशीच बसली.आजचा दिवस आणि रात्र म्हणजे तिच्यासाठी एक परीक्षाच  होते.खरं दिव्य अगम्यच असल तरी परीक्षा मात्र तिचीच तर होती. ती आज मनातून खूप जास्त घाबरली होती पण तसं न दाखवता ती तयार होऊन बाहेर आली. तर अहिल्याबाई आलेल्या  गुरुजींना सगळं समान बरोबर आहे का? ते विचारात होत्या. सप्तचक्र शिकवणारे गुरुजी ब्रम्हांनंद महाराज दुपारी येणार होते. अहिल्याबाई तर रात्र भर झोपलेल्या दिसत नव्हत्या.खरं तर सगळ्यांचीच अवस्था तशीच होती.घरातले वातावरण खूपच गंभीर आणि तंग वाटत होते.प्रत्येकजण तणावाखाली वावरत होता. तो पर्यंत राहूल आणि मीरा ही आले.

                   अभीज्ञाच्या आईनी  सगळ्यांना चहा दिला.आज अनुष्ठान आणि यज्ञ करायचा असल्याने नाष्टा आणि जेवणा ऐवजी अगम्यला आणि अहिल्याबाईना फलाहार करावा लागणार होता. बाकीच्यांसाठी अभीज्ञा आणि तिच्या आईने स्वयंपाक आणि नाष्टा तयार केला.इकडे यज्ञ सुरू झाला होता.पूजापाठ आणि यज्ञ करण्यात अख्खा दिवस निघून गेला.


      आता संध्याकाळचे सात वाजले होते. ब्रम्हानंद महाराज आणि डॉ.पाटील ही आले होते. अमावस्या दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत होती.त्यामुळे तीन तासांच्या हिशेबाने अगम्यला त्या पेंटींगमध्ये रात्री  दहा वाजता जावे लागणार होते आणि रात्री अमावस्या संपायच्या आत म्हणजे रात्री दोनच्या आत त्या पेंटींगच्या प्रतिकृतीची आहुती त्या प्रज्वलित केलेल्या यज्ञात द्यावी लागणार होती.  


                   रात्री आठ वाचता ब्राम्हांनंद महाराज, अहिल्याबाई, अगम्य आणि अभीज्ञाची आई सप्तचक्र साधनेला बसले.एका तासानंतर नऊच्या सुमारास ते चौघे साधना करून उठले. त्यानंतर अहिल्याबाई आणि अगम्यमध्ये जुजबी चर्चा झाली. रात्रीचे जेवण करायला मात्र कोणीच तयार नव्हते.त्यामुळे कोणीच जेवले नाही आणि बरोबर दहाच्या सुमारास अगम्य अहिल्याबाई, त्याचे गुरू, अभीज्ञाचे आई-बाबा यांच्या पाया पडून  अभीज्ञाकडे न पाहता अगम्यने स्टुडिओची चावी, रेतीचे घड्याळ घेऊन पेंटिंगमध्ये प्रवेश केला. जसा त्याने पेंटींगमध्ये प्रवेश केला तसा ध्यान लावून अहिल्याबाई, ब्रम्हांनंद महाराज आणि अभीज्ञाची आई यांनी सप्तचक्र साधनाने द्वारे अगम्यला शक्ती प्रक्षेपित करायला सुरुवात केली. मीरा तिथून आज्ञांकला घेऊन अभीज्ञाच्या आई-बाबांच्या रूममध्ये गेली कारण इथे साधना सुरू असताना कोणत्या ही प्रकारचा आवाज केलेला चालणार नव्हता. गुरुजींनी मंत्र पुटपुटत पुन्हा यज्ञात आहुती द्यायला सुरुवात केली. राहुल आणि अभीज्ञा हात सोडून मनोमन देवाचा धावा करत होते.डॉ. पाटील मात्र डोळे विस्फारून अगम्य पेंटींगमध्ये गेला त्या दिशेला पाहत होते.त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.


       तिकडे अगम्यने क्षितिजामधून  पेंटींगमध्ये प्रवेश केला.तो पेंटिंगमधील शेतात  पोहोचला.तिथे असलेले लोक अगम्यला पुन्हा पेंटींगमध्ये पाहून चकित होते.सूर्यकांतला अगम्य पेंटींगमध्ये आला आहे हे कळले आणि तो त्याच्या समोर जाऊन उभा राहत हसून  म्हणाला.


सुर्यकांत,“ मला माहित होतं तुला माझे हे साम्राज्य पुन्हा खेचून घेणार!” 


अगम्य,“ या वेळी तुझ्या या पेंटिंगने मला खेचून घेतले नाही तर मी स्वतः हुन आलो आहे सुर्यकांत!” तो त्याला तिरस्काराने पाहत म्हणाला.


सुर्यकांत,“ अरे वा! म्हणजे तुला माझ नाव कळले तर मग माझ्याबद्दल सगळेच कळले असणार तुला! तू स्वतः नाही आलास इथे तुझे मरण घेऊन आले आहे तुला आज! त्या आप्पाला म्हणजेच तुझ्या बापाला जसा संपवला ना!तुला ही तसाच संपवणार मी!” तो असे म्हणून हसला.


अगम्य,“ पाहू आज कोण कोणाला संपवतो ते!”


     असं म्हणून अगम्य सरळ त्या बंगलीकडे चालू लागला. सुर्यकांत अगम्य त्या बंगलीच्या कंपाऊंडपर्यंत पोहोचायच्या  आत त्या बंगलीच्या कंपाऊंडच्या आत हजर होता. सूर्यकांत अगम्यवर हल्ला करू शकत नव्हता कारण त्याच्या गळ्यात असलेले लॉकेट! म्हणूनच सूर्यकांतने अगम्यला त्याच्या मागे जाऊन जोरात धक्का दिला. अगम्य बेसावध असल्याने तो कंपाऊंडवर पडला आणि त्याचे लॉकेट कंपाऊंडला असलेल्या लाकडात अडकले आणि तो उठताना ते तुटले! अगम्यच्या मात्र ते लक्षात आले नाही तो सरळ त्या बंगलीमध्ये घुसला पण त्याच्या समोर सुर्यकांत हजर होता.आता तर लॉकेटचा ही अडथळा राहिला नव्हता त्यामुळे सुर्यकांतने अगम्यवर हल्ला केला.अगम्यने ही त्याचा प्रतिकार केला आणि त्याला ढकलून दिले त्याच्या धक्क्याने सुर्यकांत पडला. आणि अगम्य स्टुडिओ रूमकडे पळत सुटला.


     सुर्यकांत मात्र विचार करू लागला की तो एक आत्मा आणि अगम्य एक सामान्य माणूस मग त्याच्याच साम्राज्यात येऊन अगम्य त्याला इतका तीव्र प्रतिकार कसा करू शकतो. नक्कीच याला बाहेरून कोणी तरी शक्ती प्रक्षेपित करत असणार! पण सुर्यकांतला माहीत होते की आज  अमावस्या आहे आणि अमावस्याची रात्र जशी जशी चढत जाईल त्याची शक्ती ही वाढत जाणार आहे. तो हा विचार करून पुन्हा अगम्यकडे वळला अगम्य मात्र त्या बंगलीत स्टोडिओची रूम शोधत होता. त्याला थोड्या वेळातच ती कुलूपबंद खोली दिसली. पण तो पर्यंत सुर्यकांत त्याच्या जवळ पोहचला आणि पुन्हा दोघांना मध्ये झटापट सुरू झाली.या झटापटीत सुर्यकांतने अगम्यचे डोके तिथे असलेल्या टेबलवर आपटले आणि अगम्य दोन मिनिटं सुन्न झाला.  त्याच्या कपाळाला जखम झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. तरी लगेच अगम्य सावरला आणि त्याने सुर्यकांतला पुन्हा ढकलून दिले. त्याने त्याच्या खिशातली चावी काढली व ती त्या कुलुपाला लावली आणि त्या खोलीचे दार उघडले. पण पुन्हा सुर्यकांत त्याच्यावर चवताळून धावून आला पुन्हा त्या दोघांमध्ये झटापट सुरू झाली. आगम्य मात्र आता थकू लागला होता आणि सुर्यकांतची ताकद वाढत चालली होती.तरी अगम्यने सुर्यकांतला त्या खोलीच्या बाहेर ढकलले आणि  त्याने खोलीला आतून कडी लावून घेतली. त्या स्टुडिओ रूममधील ती पेंटींग उचलली आणि तो त्या खोलीच्या मागच्या दारातून बंगलीच्या बाहेर पडला. सुर्यकांत ही बंगलीच्या समोरील दारातून बाहेर पडून अगम्यच्या मागे धावू लागला पण जसजशी ती पेंटींग बंगलीपासून अगम्य लांब घेऊन जात होता तसतशी सुर्यकांतची ताकद कमी-कमी होत चालली होती.


      सुर्यकांत आता चांगलाच चवताळला आणि त्याने त्याचे ते विशिष्ट हत्यार काढले. ते हत्यार म्हणजे एक प्रकारची कुऱ्हाड होती पण त्या कुऱ्हाडीच्या पात्याच्या मधोमध एक धारदार खुक होते.अगम्य ती पेंटिंग उराशी धरून  जिवाच्या आकांताने क्षितिजाकडे पळत होता. पुन्हा सूर्यकांत त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने त्या हत्त्याराने अगम्यवर वार केला पण तो वार चुकवायला जाऊन तो वार अगम्यच्या खांद्यावर बसला.अगम्य मोठ्याने ओरडला. ही सगळी झटापट तिथे असलेले लोक पाहत होते.अगम्य जागेवरच कोसळला.  त्याला अभीज्ञाला दिलेले वचन आठवले आणि तो होते नव्हते तेवढे बळ एकवटून पुन्हा उभा राहू लागला. आता क्षितिज जवळच होते. अगम्यने सुर्यकांतला जोरात लाथ मारली त्याने सुर्यकांत खाली पडला पण त्याने पडल्या जागेवरून अगम्यचा पाय खेचला आणि अगम्य पुन्हा खाली पडला तो पडल्यामुळे त्याच्या खिशात असलेले रेतीचे घड्याळ ही त्याच्या खिशातून बाहेर पडले अगम्यने ते रेतीचे घड्याळ पाहिले तर अगदी  थोडी रेती त्या घडाळ्याच्या वरच्या भागात राहिली होती म्हणजेच तीन तास पूर्ण होण्यासाठी काही मिनिटं राहिली होती म्हणजेच अगम्यकडे काही मिनिटेच शिल्लक होती! अगम्य उठण्याचा प्रयत्न करत होता. पण सुर्यकांत त्याचा पाय धरून ओढत होता. ही सगळी झटापट पाहणारे पेंटींगमध्ये अडकलेले ते लोक आता सूर्यकांत जवळ आले आणि त्या सगळ्यांनी सुर्यकांतला धरले. अगम्यचा पाय सुटला त्याने मागे वळून पाहिले आणि उठून तो क्षितिजाकडे गेला आणि पेंटींगमधून बाहेर पडला. त्याच्या येण्याने अहिल्याबाई, अभीज्ञाची आई आणि ब्रम्हांनंद महाराजांचे ध्यान भंग झाले.ते सगळे अगम्यला पाहून उठून उभे राहिले. त्याच्या रक्तबंबाळ खांदा आणि कपाळाला लागलेले पाहून अभीज्ञा त्याच्या जवळ आली.अगम्यने त्या पेंटिंगची प्रतिकृती पेंटींग अहिल्याबाईच्या हातात दिली आणि अभीज्ञाला म्हणाला.


अगम्य,“ मी ठीक आहे” असं म्हणत तो यज्ञाच्या समोर बसला.

    गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरवात केली आणि अहिल्याबाईनी ती पेंटींगची प्रतिकृती पेंटींग त्या यज्ञात घातली.जस जशी पेंटींगची प्रतिकृती जळत होती तसतशी भिंतीवरची पेंटींग ही जळू लागली. हे अगम्यने पाहिले आणि तो बसल्या ठिकाणीच कोसळला. अगम्यला कोसळलेले पाहून सगळे घाबरून त्याच्या जवळ गेले.अगम्य मात्र बेशुद्ध झाला होता.


    अगम्यने सुर्यकांतशी निकराचा लढा देऊन ती पेंटींगची प्रतिकृती आणली. ती प्रतिकृती नष्ट झाल्यामुळे ती पेंटींग व त्यातील सुर्यकांतचा आत्मा नष्ट झाला होता. पण या सगळ्यामध्ये अगम्य मात्र गंभीर जखमी झाला होता.


 अगम्य वाचू शकेल का? की आप्पासाहेबां प्रमाणे म्हणजेच त्याच्या वडिलांप्रमाणे तो ही मरणार होता? आता नियती कोणता नवा रंग दाखवणार होती?

क्रमशः



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule




  


              

🎭 Series Post

View all