अभीज्ञा रूममध्ये गेली तर अगम्य झोपला होता. ती ही मग रात्री झोप न झाल्यामुळे आणि जेट लॅकमुळे पडल्या-पडल्या झोपली. तिला जाग आली ती कोणी तरी दारावर थाप मारल्यामुळे! तिने जरा नाखुषीनेच उठून दार उघडलं तर एक नोकर होता.तो म्हणाला.
नोकर,“बाईसाब तुम्हांसनी आणि धन्याससनी मोठ्या बाईसाबांनी त्या कोपऱ्यातल्या खोलीत बोलावलय”
अभीज्ञा,“ बरं आलोच म्हणून सांग!( ती म्हणाली आणि अगम्य जवळ जात त्याला म्हणाली) उठ रे सहा वाचले आहेत. आऊनी बोलावलं आहे आपल्याला!” ती अगम्यला हलवत म्हणाली.
अगम्य,“ अजून पाच मिनिटं!”असं म्हणून तो कुस बदलून पुन्हा झोपला.
अभीज्ञा,“ उठतो का आता?” त्याला हात धरून उठवून बसवत म्हणाली.
अगम्य थोडी कुरबुर करत उठला आणि दोघे फ्रेश होऊन नोकराने दाखवलेल्या रूममध्ये गेले.तर अहिल्याबाई त्यांचीच वाट पाहत होत्या.त्यांना पाहून अहिल्याबाई म्हणाल्या.
अहिल्याबाई,“ अमू मी तुला दुपारी म्हणाले होते ना की तुला काही तरी दाखवायचे आहे. तर ते इथे आहे” त्या समोर बोट दाखवत म्हणाल्या.
दोघांनी समोर पाहिले तर तीन कपाटे होती. दोघांना ही विचार पडला आता या कपाटांमध्ये काय आहे? याचा विचार ते करत होते. तो पर्यंत एक बाई चहा नाष्टा घेऊन आली.
अभीज्ञा,“या कपाटांमध्ये काय आहे आऊ? आणि आई-बाबा आणि अदु कुठे आहेत?”
अहिल्याबाई,“ अग ते अदु बरोबर खाली चौकात बसले आहेत!या कापाटात ना गेल्या सत्तावीस वर्षांपासूनचे प्रत्येक वाढदिवसाला अगम्यसाठी घेतलेले गिफ्टस् आहेत फक्त या तीन वर्षांतील गिफ्ट माझ्यावर उधार आहेत याचे! मला वाटलं नव्हतं की मी अमुला स्वतः च्या डोळ्यासमोर हे गिफ्ट्स खोलताना पाहू शकेन पण आज ते भाग्य मला लाभणार आहे! जा अमू तिकडून पहिल्या कपाटापासून सुरू कर!” त्या हसून त्याच्या कडे पाहत म्हणाल्या.
अगम्यला खरं तर हा दुसरा आश्चर्याचा धक्का होता.त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्याच्या आयुष्यात असं काही घडेल.त्याला त्याच्या पहिल्या वाढदिवसापासूनचे गिफ्ट्स असे एकदम मिळतील ते ही त्याच्या आईकडून! तो कपाटा जवळ गेला आणि थरथरत्या हाताने पाहिले कपाट उघडले तर त्यात खूप सारे छोटे-मोठे गिफ्ट बॉक्स व्यवस्थित ठेवलेले होते.प्रत्येकावर वाढदिवसाचे वर्ष आणि साल होते आणि happy birthday dear amu! God bless you my child! असं लिहीलेल होत.त्याने पहिल्या वाढदिवसाचा गिफ्ट बॉक्स खोलला तर त्यात एक छानसा खुळखुळा होता. ते पाहून तो हसला आणि म्हणाला.
आगम्य,“ माझा अदु ही आता हा खुळखुळा खेळण्या इतका लहान नाही राहिला!”
अगम्य एक एक गिफ्ट बॉक्स खोलत गेला आणि त्याचा चेहरा खुलत गेला.कशात गाडी तर कशात व्हिडीओ गेम, कशात रिमोटवर चालणारे विमान तर कशात ट्रेन! कशात नाजूक हिरेजडित अंगठी तर कशात ब्रेसलेट तर वयानुसार वापरात आणि उपयोगात येणाऱ्या वस्तू होत्या! कशात मोबाई, ट्याब तर सगळ्यात शेवटच्या गिफ्टमध्ये म्हणजेच सत्तावीसव्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणजे लॅपटॉप होता! हे सगळं पाहताना अगम्यच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान विलसत होते. अहिल्याबाई मात्र फक्त त्याच्याकडे डोळे भरून पाहत होत्या आणि त्याच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य आणि डोळ्यातील चमक समाधानाने टिपत होत्या.
अभीज्ञा आज अगम्य मधील एका लहान मुलाला पाहत होती. जे लहान मूल कुठे तरी हरवले होते.अकाली आलेल्या प्रौढत्वांपुढे ते कोठे तरी झाकोळले होते. अगम्य उठला आणि अहिल्याबाई खुर्चीवर बसल्या होत्या तेथे जाऊन खाली बसून त्याच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.
अगम्य,“ thanks!”
अहिल्याबाई,“ अरे बाळा thanks म्हणत का आईला कोणी? तुझच आहे हे सगळं आणि मागच्या तीन वर्षांचे राहिले आहे की गिफ्ट्स काय पाहिजे तुला?” त्या त्याच्या केसातून प्रमाणे हात फिरवत म्हणाल्या.
अगम्य,“ काही नको मला!” तो म्हणाला.
अभीज्ञा त्या दोघांना कौतुकाने पाहत होती. रात्रीची जेवण झाली आणि सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी पासून गावातल्या आणि तालुक्यातल्या तसेच व्यवसायाशी संबंधित लोकांची रीघ अगम्यला भेटायला लागलेली होती.अहिल्याबाईना तिथे किती मान होता.हे त्या लोकांच्या वागण्याबोलण्यातून कळत होते. अगम्यला पाहून प्रत्येक जण चकित होत होता कारण तो सेम अप्पासाहेबांसारखा दिसत होता त्यामुळे अहिल्याबाईना हा माझा वारस आहे हे कोणाला ही पटवून देण्याची तसदी घ्यावी लागली नाही. तिसऱ्या दिवशीचा सगळा दिवस फॅक्टऱ्या आणि शेत पाहण्यात गेला.अगम्यने येतानाच जतानाचे ही फ्लाईटची तिकिटे बुक करून ठेवली होती. ते पुण्याहून दुपारी दोन वाजता निघाले.या दोन-तीन दिवसात सगळेच जणू पेंटींग आणि अमावस्येबाबत विसरून गेले होते. आता परत औरंगाबादला सगळे आले.अमावस्येला तीन दिवस बाकी होते आता मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण दिसू लागला होता.अगम्य, अहिल्याबाई आणि अभीज्ञाची आई यांनी सप्तचक्र साधना सुरू केली. अहिल्याबाईनी त्यांच्या गुरूला बोलावून घेतले व सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये अभीज्ञा दिसत होती कारण मनात असून ही अगम्यला प्रत्यक्ष अशी कोणतीच मदत ती करू शकत नव्हती.
अगम्यने डॉ.पाटलांना फोन करू बोलावून घेतले कारण त्याने त्यांना चॅलेंज दिले होते की तो खरं बोलतोय हे तो त्यांच्या समोर सिद्ध करून दाखवेल आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी कोणी तरी डॉक्टर तयारी सह त्यांच्या सोबत असणे त्याला गरजेचे वाटत होते.अगम्यने डॉक्टर पाटलांना सविस्तर सगळं सांगितले.अभीज्ञानी ही त्याला दुजोरा दिला.डॉ पाटीलांचा खरं तर विश्वास बसत नव्हता पण इतके लोक सांगत आहेत म्हणल्यावर त्यांना विश्वास ठेवणे भाग पाडले. अगम्य डॉ.पाटलांना म्हणाला.
अगम्य,“ डॉक्टर तुमची आणखीन एक हेल्प हवी आहे मला!”
डॉ.पाटील,“ बोल अगम्य काय हेल्प हवी तुला? मी तयार आहे करायला!” ते म्हणाले.
अगम्य,“ तुम्ही त्या रात्री येताना जरा तयारी सह या म्हणजे जखमांवरची औषधे वगैरे आणि एक बेड तुमच्या हॉस्पिटलमध्ये तयार ठेवा!” तो म्हणाला.
डॉ. पाटील,“ एवढंच ना! ठीक आहे” ते म्हणाले.
हे अगम्यचे बोलणे ऐकून अभीज्ञा मात्र इथून निघून गेली.डॉ.पाटलांच्या ती का गेली हे लक्षात आलं नसलं तरी अगम्यच्या ते लक्षात आलं. पण अगम्य असाच उठून जाऊ शकत नव्हता म्हणून तो डॉ.पाटील यांच्या बरोबर गप्पा मारत तिथेच बसला. डॉ.पाटील निघून गेले आणि अगम्य अभीज्ञाकडे वळला. अभीज्ञा बेडरूमच्या गॅलरीत एकटीच बसली होती. अगम्य तिला शोधत गॅलरीत गेला तर तिथे अभीज्ञा त्याला बसलेली दिसली. तो तिच्या समोर खुर्चीवर जाऊन बसला. अभीज्ञा शांतच होती.शेवटी त्यानेच बोलायला सुरुवात केली.
अगम्य,“ काय झालंय अभी अशी निघून का आलीस?” तो म्हणाली.
अभीज्ञा,“ खरच तुला माहीत नाही का?” ती जरा चिडून म्हणाली.
अगम्य,“ पण इतकं चिडायला काय झालं तुला?” तो म्हणाला.
अभीज्ञा,“ तू काय म्हणालास डॉक्टरला की तयारी ठेवा म्हणून म्हणजे तुला चांगलंच माहीत आहे की तुला…..” ती बोलायची थांबून रडायला लागली.
अगम्य,“ अग काही नाही होणार अभी! मी सांगितलं कारण आपण तयारीत असलेलं बरं!” तो तिचा हात धरून तिला समजावत म्हणाला.
पण अगम्यला ही कुठं तरी माहीत होतं की त्या पेंटींगमधून सही सलामत बाहेर येणे खूप अवघड आहे.तरी तो अभीज्ञाची समजूत काढत होता कारण दुसरा पर्याय नव्हता.पाहता पाहता दोन दिवस गेले. आता आज रात्र फक्त हातात होती. दुसऱ्या दिवशी तर सकाळ पासूनच अहिल्याबाईनी अनुष्ठान ठेवले होते. त्या मुळे अगम्यला वेळ मिळणार नव्हता. सगळे रात्रीचे जेवण करून हॉल मध्ये बसले.अगम्यला एक प्रश्न दोन दिवसा पासून सतावत होता म्हणून त्याने त्यांना विचारले.
अगम्य,“ मिसेस देशमुख पण त्या पेंटींगमध्ये अडकलेल्या त्या लोकांचं काय होणार? म्हणजे मी तीन वर्षांनी बाहेर आलो तर माझी अवस्था किती बिकट झाली होती मग ते तर किती तरी वर्षांपासून त्या पेंटींगमध्ये अडकले आहेत त्यांचे काय होणार?” त्याने विचारले.
अहिल्याबाई,“ तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे अमू! पण तू त्या पेंटिंगच्या वातावरणातून अचानक आपल्या वातावरणात आला होतास त्यामुळे तुझी अवस्था बिकट झाली.पण जेंव्हा ती पेंटींग नष्ट होईल तेंव्हा त्यातील लोक ते जिथून गायब झाले तेथे पोहचतील पण पेंटींगचे वातावरणच राहणार नाही त्यामुळे त्यांच्यावर तुझ्यावर झाला तसा कोणताच वाईट परिणाम त्यांच्यावर होणार नाही तरी त्यांचे वय मात्र ते जितकी वर्षे पेंटींगमध्ये राहिले असतील तितक्या वर्षांनी वाढणार आहे.” त्यांनी स्पष्टीकरण दिले.
अभीज्ञा,“ आऊ पण अगम्यवर त्या पेंटींगच्या वातावरणातून बाहेर आपल्या जगात आल्यावर परिणाम होणारच की कारण तो पेंटींग अस्तित्वात असताना पेंटींगची प्रतिकृती घेऊन येणार आहे!” तिने काळजीने विचारले.
अहिल्याबाई,“ हो अभीज्ञा तू म्हणते ते खरे आहे!पण अगम्य त्या पेंटींगमध्ये तीनच तास तर राहणार आहे त्यामुळे झाला तरी थोडा फार परिणाम होईल त्याच्यावर!” त्या म्हणाल्या.
अगम्य,“ पण मला तीन तास झाले आहेत पेंटींगमध्ये कसे कळणार? कारण घड्याळ जरी मी नेले तरी ते तिथला संध्याकाळचा वेळ दाखवणार आणि ते पुढे सरकणारच नाही! मग मला वेळ कसा कळणार?” तो म्हणाला.
अहिल्याबाई,“ त्याचा विचार मी केला आहे हे बघ हे रेतीचे घड्याळ आहे या घड्याळातील रेती वरून खाली सरकायला बरोबर तीन तास लागतात. तू हे घेऊन जायचे!” त्या रेतीचे घड्याळ दाखवत म्हणाल्या.
अगम्य,“ ठीक आहे.” तो म्हणाला.
अहिल्याबाई,“ जा आता सगळेच झोपा वेळ खूप झाला आहे.”त्या म्हणाल्या.
खरं तर आज रात्री कोणालाच झोप लागणार नव्हती घरातील प्रत्येक जण तणावा खाली वावरत होता कारण उद्याचा दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन येणार होता ते कोणालाच माहीत नव्हतं. नियतीच्या गूढ गर्भात उद्या अगम्यसाठी काय वाढून ठेवले होते ते फक्त नियतीलाच माहीत होते.
सगळे आपापल्या रूममध्ये गेले.अगम्य आणि अभीज्ञा ही त्यांच्या रूममध्ये गेले. खरं तर अभीज्ञाला माहीत होते की अगम्यशी आत्ताच निवांत बोलता येणार आहे. उद्या तर त्याला तिला बोलायला ही वेळ मिळणार नाही आणि उद्या रात्री काय होणार आहे याचा विचार करून ती आधीच घाबरली होती. तिने न राहवून अगम्यला मिठी मारली आणि ती रडत बोलू लागली.
अभीज्ञा,“ अमू तुला उद्या त्या पेंटींगमध्ये जावेच लागेल का?दुसरा पर्याय नाही का काही? मला खूप भीती वाटते आहे. तुला काही झालं तर मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय!” ती रडत म्हणाली.
अगम्य,“ इतकं घाबरून कसं चालेल अभी! अग आज ना उद्या आपल्याला सामना करावाच लागणार आहे त्या सुर्यकांतचा! आणि विश्वास ठेवा माझ्यावर काही नाही होणार मला!” तो तिचे डोळे पुसत तिला समजावत म्हणाला.
अभीज्ञा,“ तू खोटं बोलू नकोस मला तुला ही चांगलाच माहीत आहे की त्या सूर्यकांतच्या आत्म्याशी त्याच्याच साम्राज्यात जाऊन लढणे आणि ती प्रतिकृती घेऊन येन इतकं सोपं नाही! तो आत्मा सुडाने पेटलेला आहे ज्याला तुझ्यावर सूड उगवायचा आहे आणि तू एक सामान्य माणूस कसा लढणार आहेस तू त्याच्याशी? तू नको जाऊस अमू!” ती त्याला विनवत म्हणाली.
अगम्य,“ वेडी आहेस का तू अभी आता आपण माघार नाही घेऊ शकत आणि भीतीच्या सावटा खाली जगण्यापेक्षा एकदाचा सोक्षमोक्ष लावलेला बरा ना! आणि तो सुर्यकांत किती ही शक्तीशाली असला तरी ती एक वाईट शक्ती आहे आणि वाईट शक्तीचे आयुष्य जास्त नसते. मी त्याच्याशी लढेण ही जिंकेण ही!” तो म्हणाला.
अभीज्ञा,“ मग मला एक प्रॉमिस कर की तिथे काही ही झाले तरी तू हार न मानता माघारी येणार ते ही सुखरूप!” ती त्याच्यापुढे हात करून म्हणाली.
अगम्य,“ ठीक आहे प्रॉमिस मी हार नाही मानणार आणि त्या पेंटींगची प्रतिकृती घेऊन येणार पण सुखरूप येईनच हे मात्र मी नाही सांगू शकत अभी!” तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला.
अगम्य असं म्हणताच अभीज्ञा त्याला मिठी मारून रडू लागली.अगम्य तिला रडू दिले. ती शांत झाल्यावर त्याने तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि तिच्या कानात म्हणाला.
अगम्य,“ I love you!”
अभीज्ञा मात्र त्याला काहीच बोलली नाही.तिने स्वतःला तिच्या स्वाधीन केले.
अगम्य पेंटिंगमधून त्या पेंटींगची प्रतिकृती घेऊन सुखरूप बाहेर येऊ शकेल का?तो सुर्यकांतच्या आत्म्याशी लढू शकेल का? आणि सुर्यकांत त्याला जिवंत सोडेल का?
क्रमशः
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.
©swamini chougule
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा