दि लूप होल (भाग 33)

This a thriller and suspense story

      अभीज्ञा तिरिमिरी मध्ये स्वयंपाक करत होती पण तिचे लक्ष मात्र कशातच लागत नव्हते कारण अगम्य आज तिझ्याशी जसा वागला होता तसा तो इतक्या वर्षात वागला नव्हता.तिला वाटले होते की तासाभरात तो माघारी येईल पण दोन तास होत आले तरी अगम्य घरी आला नव्हता.

          आता बाकिच्या प्रमाणे तिला ही अगम्यची काळजी वाटू लागली होती.अहिल्याबाईंचा चेहरा तर पूर्ण उतरला होता.त्यांना राहून-राहून आपल्यामुळेच त्या दोघांमध्ये भांडण झाले असे वाटून अहिल्याबाईंना अपराधी वाटत होते आणि अगम्यने घरातून जाऊन त्यांचा जीव टांगणीला लावला होता. अभीज्ञाच्या आईने त्याला मोबाईलवर फोन केला पण त्याचा मोबाईल ही घरातच होता. आता सगळ्यांची नजर अभीज्ञावर स्थिरावली होती. अभीज्ञा ही आता जरा मनातून घाबरली होती तरी ती कोणाला ही तसे न दाखवता तयार होऊन आली आणि म्हणाली.


अभीज्ञा,“ मी घेऊन येते अगम्यला! तो कुठे असेल हे माहीत आहे मला स्वयंपाक झाला आहे तुम्ही जेवून घ्या! अदू झोपला आहे!” ती असं म्हणून निघाली.


बाबा,“ आम्ही थांबतो आहोत ग जेवायचे! तू घेऊन ये बाई लवकर अमुला ! तुम्ही पोर ना जीव नुसता टांगणीला लावता आमच्या म्हाताऱ्यांचा!” ते काळजीने  बोलत होते.


      अभीज्ञा काहीच बोलली नाही. ती स्कुटीवरून अगम्य नेहमीच्या मंदिरात जाऊन बसला असावा असे तिला वाटत होते. कारण अगम्यला तशी सवय होती. ती मंदिरात पोहोचली. तिचा अंदाज खरा ठरला तिला अगम्य लांबूनच मंदिराच्या आवारात एका बेंचवर एकटाच बसलेला दिसला आणि तिला हायसे वाटले. ती त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याला म्हणाली.


अभीज्ञा,“ घरी चल अगम्य! सगळे तुझी वाट पाहत थांबले आहेत जेवायला! झाला तेव्हढा तमाशा पुरे झाला!” ती त्याला न पाहताच बोलत होती.तिच्या बोलण्यात नाराजी साफ जाणवत होती.


       अगम्यने तिला पाहिले आणि तो काहीच न बोलता निघाला.अभीज्ञा ही त्याच्या मागोमाग गेली.अभीज्ञाने स्कुटी चालू केली आणि अगम्य गुपचूप तिच्या मागे बसला.दोघे  घरी आले अगम्यला पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. त्याला कोणीच काही विचारले नाही सगळे जेवले. दिवसभर सगळे शांतच होते.रात्रीची जेवणं झाली. अभीज्ञा मुद्दामच बेडरूममध्ये जायला वेळ करत होती.कारण तिला अगम्य झोपल्यावर बेडरूममध्ये जायचे होते. तिला त्याच्याशी बोलायचे नव्हते खरं तर कारण आज जे तो वागला होता त्यामुळे ती नाराज होती.  त्याच्यावर म्हणूनच त्याला टाळण्यासाठी ती हॉलमध्ये टी. व्ही.पाहत बसली होती. तिला एकटीला पाहून अहिल्याबाई तिच्या जवळ येऊन बसल्या आणि तिला म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ अभीज्ञा सकाळी माझ्यामुळेच तुमच्या दोघांत भांडण झाले ना! खरं तर मी तुला  अगम्यला गावी येण्या बाबत बोल असे सांगायलाच नव्हते पाहिजे ग! माफ कर मला तुमच्या दोघांत माझ्यामुळे…..” त्या रडत पुढे बोलणार तर अभीज्ञाने त्यांना थांबवले आणि ती बोलू लागली.


अभीज्ञा,“माफी कसली मागताय आऊ! आई कधी मुलांची माफी मागते का? खरं तर तुमच्यामुळे काहीच झालेले नाही. त्याची कानउघाडणी कोणाला तरी करावीच लागणार होती. तो फक्त स्वतःचे दुःख कुरवाळत बसला आहे पण तुमच्या दुःखाच काय? तुम्ही नका घेऊ टेन्शन त्याला कसं ताळ्यावर आणायचे मला माहित आहे.तुम्ही निवांत जाऊन झोपा!” ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली.


अहिल्याबाई,“माझी सगळी भिस्त तुझ्यावरच आहे अभी अगम्य काय मला माफ करेल अस दिसत नाही” त्या म्हणाल्या.


अभीज्ञा,“ पुन्हा तेच! तो तुमचा मुलगा आहे आऊ! तोच तुमची माफी मागणार पहा तुम्हीं!” तिने असं म्हणून त्यांना जबरदस्तीने झोपायला पाठवले.

   

     आता खरं तर तिला ही झोप येत होती.घडाळ्याचा काटा बाराकडे झुकत होता.तीच लक्ष सहजच हॉल मधल्या  त्या पेंटिंगकडे गेले. तर सुर्यकांत तिच्याकडे पाहून हसत असलेल्याच तिला भास झाला.ती घाबरली आणि बेडरूममध्ये गेली.कसला ही आवाज न करता ती तिच्या जागेवर जाऊन झोपली. ते पाहून झोपेचं सोंग घेतलेला अगम्य उठला व तिच्या जवळ जात म्हणाला.


अगम्य,“ अभी ऐक ना!sorry मी आज जरा जास्तच चिडलो!” 


अभीज्ञा,“ बरं” इतकंच म्हणाली.


अगम्य,“ मी तयार आहे श्रीरंगपूरला यायला उद्याच निघुयात आपण तू सांग मिसेस देशमुखना!” तो तिला म्हणाला.


अभीज्ञा,“ माझं ऐकायची तुला काहीच गरज नाही अगम्य! आणि माफ कर मला मी तुला सांगितली आऊची इच्छा पण इथून पुढे मी तुला काहीच करायला सांगणार नाही.तू तुझे निर्णय घ्यायला मोकळा आहेस” ती म्हणाली.


अगम्य,“सॉरी ना अभी! मी तुला जरा जास्तच बोललो आज!  तू बोलत होती ते खरे आहे.मी रागाने मंदिरात जाऊन बसलो खरा पण जेंव्हा शांत डोक्याने विचार केला तेंव्हा पटले मला तुझे बोलणे! मिसेस देशमुखची मी इतकी छोटी पण इच्छा पूर्ण करू शकत नसेल तर काय उपयोग माझा! Thanks अभी माझी कानउघाडणी करून मला माझी चूक दाखवल्या बद्दल! And sorry!” तो मनापासून बोलत होता.


अभीज्ञा,“ठीक आहे मी उद्या सांगते आऊना आणि पॅकिंग पण करते” ती इतकच बोलून परत झोपली.


      अगम्यला मात्र कळून चुकले की अभीज्ञा त्याच्यावर चिडली आहे. तो मुद्दाम ओरडायला लागला.


अगम्य,“ आ माझे डोके खूप दुखत आहे अभी!आणि गरगरतय पण मला! ” 


        अभीज्ञा काळजीने उठली आणि लाईट लावून त्याच्या जवळ जात म्हणाली.


अभीज्ञा,“ पाहू ताप तर नाही आला ना तुला? अरे देवा तुझा बी.पी.वाढला की काय अगम्य! तुला ना नसत्या गोष्टीचे टेन्शन घ्यायचे असते आणि चिडचिड करायची असते.खूप त्रास होतोय का तुला?आपण जाऊ  का हॉस्पिटलमध्ये की बी.पी.गोळी घेतोस आहे डॉक्टरांनी दिलेली?” ती त्याच्या डोक्याला हात लावून काळजीने बोलत होती.

           अगम्यने मात्र तिला जवळ ओढले आणि तो तिच्या कानात म्हणाला.


अगम्य,“ सॉरी ना!”


      हे ऐकून अभीज्ञाला दोन मिनिटं काही कळले नाही.पण नंतर लक्षात आले की अगम्य नाटक करतोय.अभीज्ञा आता अजूनच चिडली आणि बोलू लागली.


अभीज्ञा,“ मूर्खा!  असली नाटकं करत का कोणी?मी घाबरले की! एक तर सकाळी काही न बोलता गेलास निघून मला वाटलं येशील तासभर पण दोन तास झाले तरी तुझा पत्ता नाही. वैरी  न चिंती ते मन चिंती! काय काय विचार येऊन गेले माझ्या मनात मग पडले बाहेर नेहमीच्या मंदिरात तुला पाहून जीवात जीव आला माझ्या! असं इतका वेळ कोणी जातं का ते ही मोबाईल घरात ठेऊन! तुला बोलले नसले तरी माझं सगळं लक्ष तुझ्याकडेच होत! गेल्या वेळीचा अनुभव होताच की आता तुझा टेन्शन मुळे आजून बी.पी.वाढतो की काय अशी भीती वाटत होती आणि तुला असली नाटकं सुचतात होय?  एक तर तुमच्या माय-लेकाच्या भांडणात माझा सॅनव्हिज झाला आहे. तू आऊला बोलत नाहीस आणि त्या माझ्याकडून आशा करतात की मी तुला समजवावे! आज तर तू हद्दच केलीस अगम्य! म्हणून मी ठरवलं आहे इथून पुढे मी तुला काही सांगणार नाही! तुझी प्रमाणापेक्षा जास्त आम्ही सगळे काळजी करतो ना म्हणून तुला कोणाचीच किंमत नाही राहिली!” असं म्हणून ती रडू लागली.


अगम्य,“ असं काही नाही अभी! मला माझी चूक मान्य आहे.मी सॉरी पण म्हणतोय ना! आता उठाबशा काढू का?नाहीतर तूच दे शिक्षा मला मी तयार आहे शिक्षा भोगायला!” तो तिचे डोळे पुसत म्हणाला.


अभीज्ञा,“ त्याची काही गरज नाही. पण परत असं वागलास ना तर!”ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ तर तू जी शिक्षा देशील ती मंजूर! मला कळतं अभी तुला मिसेस देशमुख बद्दल सहानुभूती वाटते. मला ही कळून चुकलय की त्यांनी हे सगळं माझ्याचसाठी केलं पण तू मला चांगलं ओळखते अभी मी इतक्या लवकर कोणतं ही नातं नाही स्वीकारू शकत तुझ्या सारखं! मला वेळ हवा आहे त्यांना आई म्हणून मना पासून स्वीकारायला! आपण उद्या जाऊया गावी सांग त्यांना उद्या दुपारी निघुया!” तो तिला समजावत म्हणाला.


अभीज्ञा,“ ठीक आहे. तुझा वेळ तू घे पण इतका ही वेळ घेऊ नकोस की वेळच निघून जाईल आणि तुला आयुष्य भर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.तुला समजतंय ना मला काय म्हणायचे आहे ते?” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“हो कळतंय मला तुला काय म्हणायचं आहे ते! Don't worry! मी नाही लावणार तितका वेळ! मग….” तो हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ मग नाही आणि काही ना! झोप आता मला उद्या खूप कामं आहेत आणि दुपारी निघायचं आहे ना पॅकिंग पासून सगळं आवरावे लागणार आहे.” ती त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगूण हसून त्याला दम देत म्हणाली.


      अभीज्ञा आणि अगम्य मधले भांडण पेल्यातील वदळा प्रमाणे विरले होते.

●●●●


       दुसऱ्या दिवशी अभीज्ञा नेहमी पेक्षा जरा जास्तच लवकरच उठली आणि आवरून ती सरळ अहिल्याबाईंच्या रूममध्ये गेली. अहिल्याबाई लवकरच उठत असत. तशा त्या उठून माळ जपत बसल्या होत्या. इतक्या सकाळी अभीज्ञाला पाहून त्या जरा विचारात पडल्या पण अभीज्ञाचा आनंदी चेहरा पाहून त्या म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ काय ग अभी आज सकाळी सकाळी माझ्या कडे भांडण मिटलेले दिसते?” त्या तिचा आनंदी चेहरा पाहून म्हणाल्या.


अभीज्ञा,“ आऊ भांडण तर मिटले ते तर मिटणारच होते!पण त्यासाठी मी इतकी खुश नाही तर अगम्य गावी यायला तयार आहे आजच निघू म्हणतोय तो दोन दिवसांनी माघारी यावं लागेल कारण अमावस्या आहे ना पुढे! आणि हो अजून एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी!” ती आनंदाने सांगत होती.


अहिल्याबाई,“ काय?अमू तयार झाला! चल मग मला तयारीला लागले पाहिजे. अग तुम्ही येणार आपल्या घरी  म्हणल्यावर मला फोन करून सगळी तयारी करण्याच्या सूचना द्याव्या लागतील ग! आणि अजून काय आनंदाची बातमी ग हेच ऐकून की अमू आपल्या गावी यायला तयार आहे माझा आनंद गगनात मावत नाही! आणि अजून कोणती आनंदाची बातमी देतेस ग या म्हातारीला सांग बाई लवकर!” त्या आनंद अश्रू पुसत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ आऊ अगम्यला पटलंय की तुम्हाला कोणत्या परिस्थिती त्याला आश्रमात सोडावे लागले आणि त्याच्या बरोबर तुम्हांला ही या सगळ्या दुःखातून जावं लागलं आहे. तो तुम्हाला आई म्हणून स्वीकारायची मनाची तयारी करत आहे. त्याला थोडा वेळ लागेल इतकच! त्याला कोणते ही नाते स्वीकारायला वेळ लागतो! आमचं ही नात स्वीकारायला त्याला खूप वेळ लागला होता आणि तुम्हीं तर अचानक अनपेक्षितपणे त्याच्या आयुष्यात आलात त्यामुळे तो जरा गोंधळला आहे!”ती म्हणाली.


अहिल्याबाई,“ काय? अभी मी तर अमू कधी मला आई म्हणून स्वीकारेल ही आशाच सोडून दिली होती पण तुझ्या मुळे हे शक्य झाले पोरी!माझे डोळे मिटण्याआधी त्याने मला एकदा जरी आऊ म्हणून हाक मारली तरी मी भरून पावेन ग!” त्या रडत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ पुन्हा तेच आऊ!  एकदा काय तुम्ही तुमच्या लेकाच्या तोंडून हजारदा ऐकाल तुम्हाला आऊ म्हणून हाक मारलेलं! बरं मी पण काय बोलत बसले.आवरायचं आहे मी उठून सरळ तुमच्याकडेच आले.अजून आई-बाबांना ही नाही सांगितलं मी त्यांना ही सांगायचं आहे.पॅकिंग करायचं आहे आणि प्रवासाची बाकीची तयारी आणि नाष्टा,जेवण! हो आणि तुमच्या त्या आळशी लेकाला उठवाव लागेल त्या बाबाच एक काही तरी जागा वेगळच असतं!” ती बडबडत होती.


अहिल्याबाई,“ जा मग मी ही आलेच जरा मला घरात सगळ्या नोकरांना सूचना घ्याव्या लागतील की सगळी तयारी करण्यासाठी!” त्या आनंदाने म्हणाल्या.


       अभीज्ञा नुसती होकारार्थी मान हलवून पळाली.तिने तिच्या आई-बाबांना सांगितले गावी जाण्याचा बद्दल तेंव्हा ते नाही-होय असे आढेवेढे घेत तयार झाले. अभीज्ञाने त्यांना तयार केले. अगम्यने तेव्हढ्यात अभीज्ञा हाक मारली आणि अभीज्ञा त्याच्या जवळ बेडरूममध्ये जाऊन म्हणाली.


अभीज्ञा,“काय रे?मिळाले का फ्लाईटचे बुकिंग आजचे?”तिने विचारले.


अगम्य,“ तेच सांगण्यासाठी बोलवले आहे तुला! हे बघ आज दुपारी दोनची फ्लाईट फुल्ल आहे तर मग रात्री दोनची फ्लाईट आहे त्यात करू का बुक्कीग?  म्हणजे तुला ही वेळ मिळेल पॅकिंग करायला!” त्याने लॅपटॉपमध्ये दाखवत अभीज्ञाला विचारले.


अभीज्ञा,“ अ ठीक आहे आता पर्याय पण नाही आणि लगेच आपल्याला यायचे पण आहे! मग कर रात्री दोनच्या फ्लाईटचे बुक्कीग मी  आऊला पुण्यातून पुढे जाण्याची सोय करायला सांगते. फ्लाईटने गेले तरी सहा तास लागतील म्हणजे सकाळी अकराला आपण पुण्यात असू!” ती असं म्हणून विचारांच्या तंद्रीत जायला निघाली.


अगम्य,“ आज चहा तर मिळेल का गरिबाला का सगळं त्या श्रीरंगपूरला गेल्यावरच?” अगम्यने तिला थांबवून खोडसळपणे विचारले.


अभीज्ञा,“ अरे देवा! मी तर विसरलेच की! आत्ता घेऊन येते बरं तू आवर तो पर्यंत ” ती असं म्हणाली.


अगम्य,“ मला विसरली नाही म्हणजे मिळवलं!” तो तिला पाहत हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ टोमणा मारण्याची गरज नाही! घेऊन येते!  हे सगळं होऊ दे तुला दाखवते! तू जरा जास्तच लाडावला आहेस आज-काल! आधी मलाच बेड टी मिळत होता!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ काय दाखवणार आहेस?आताच दाखव की मग!” तो तिच्या जवळ जात तिचा दंड पकडून जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ सोड बरं अगम्य उगीच टाईम पास नको! मला काम आहेत!” ती स्वतःला सोडवून घेत चिडून म्हणाली.


अगम्य,“ अच्छा म्हणजे मी टाईम  पास करतो ठीक आहे जा! पण ही गोष्ट लक्षात ठेवेन मी!” तो नाटकीपणे म्हणाला.


अभीज्ञा,“ ,ठेव हो!” असं म्हणून हसत ती निघून गेली.


         अभीज्ञा आणि सगळ्यांचाच दिवस आवराअवरी करण्यात कसा निघून गेला कोणालाच कळले नाही. सगळे रात्री दोनच्या फ्लाईटने पुण्यात अकरा वाजता पोहोचले. पुण्यातील विमानतळावर अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून जोशी वकील गाड्या घेऊन हजर होते. सगळे श्रीरंगपूरमध्ये दुपारी बाराच्या सुमारास पोहोचले.अगम्य त्याचेच गाव आज पहिल्यांदा पाहत होता. श्रीरंगपूर निसर्गाच्या कुशीत वसलेले टुमदार आणि संमृद्ध गाव! जिकडे पाहावे तिकडे हिरवळ आणि गावच्या संमृद्धीची साक्ष देणारी छोटी-छोटी पण टुमदार घरे! पाहता पाहता गाड्या एका मोठ्या वाड्या समोर येऊन थांबल्या. सगळे  गाडीतून उतरले आणि वाडा पाहू लागले. साधारण चाळीस वर्षांची एक बाई सामोरी आली. तिने अगम्य, अभीज्ञा आणि अज्ञांक वरून पाणी आणि तुकडा ओवाळून टाकला.पायावर पाणी घातले. तिघांना ओवाळले आणि वाड्याच्या उबऱ्यात धान्यांने भरलेले माप ठेवले. अभीज्ञाला अहिल्याबाईनी खुणेनेच माप ढकलून घरात प्रवेश कर असे सांगितले आणि अभीज्ञाने अगम्यकडे पाहिले. त्याने डोळ्याने होकार दिला आणि अभीज्ञाने माप ढकलून वाड्यात प्रवेश केला. 

                    इतका भव्य वाडा अगम्य त्याच्या आयुष्यात आज पहिल्यांदा पाहत होता.मोठ्या दारातून प्रवेश केल्यावर एक प्रशस्त आणि मोठा चौक त्याच्या मधोमध तुळशी वृंदावन, तिन्ही बाजूस  भारतीय पध्दतीची बैठक व्यवस्था, नक्षीदार शिसवी आणि सागवानी खांबानी तोलून धरलेले बांधकाम! हे सगळं अगम्य पाहत होता.समोर चार पायऱ्या चढून गेलं की प्रशस्त माज घर! तिथे आधुनिक आणि जुन्याचा सुरेख संगम साधलेल्या सगळ्या आधुनिक सुविधांबरोबर  परंपरा जपलेली दिसत होती. एका भिंतीवर मोठ्या तस्विरी लावलेल्या होत्या त्यांना चंदनाचे हार घातले होते. त्या पूर्वजांच्या तस्विरी असाव्यात! त्या पाहताना अगम्य एका तस्विरी जवळ थबकला. त्या तस्विर त्याच्याच सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची होती.फक्त मिशांचा फरक! ती अगम्यकचे वडील अप्पासाहेब असावेत असे वाटत होते.अगम्यने त्या तस्विरी वरून हात फिरवत भरल्या डोळ्याने अहिल्याबाईकडे पाहून नजरेनेच विचारले.अहिल्याबाईनी नुसती होकारार्थी मान हलवली.अगम्य भारवल्या सारखा सगळा वाडा फिरून पाहत होता.त्याच्या मनाची अवस्था त्याच्या डोळ्यातून पाझरत होती.



  मी उपरा होतो की अनाथ

 हेच मला  कळत नाही.


मी पहिल्यांदा पाहतोय हे घर

असे मला वाटत नाही.


जिकडे पाहावे तिकडे माझ्याच खुणा

दुसरे काहीच मला दिसत नाही


अनोळखी हे घर मला पण 

 पाहावे तिकडे मीच मी दुसरे कोणी दिसत नाही.


घराच्या प्रत्येक भिंतीत मायेची ओल जाणवते

म्हणूनच कदाचित मनात असून ही घर  मला सोडवत नाही.


मी उपरा होतो की अनाथ

हेच मला कळत नाही!


           अहिल्याबाईनी अगम्य आणि अभीज्ञाला देवघरात नेऊन देवाला नमस्कार करायला लावला. घरातील नोकर माणसांनी अहिल्याबाईनी सांगितला तसा स्वयंपाक तयार ठेवला होता. जेवण झाल्यावर सगळ्यांना अहिल्याबाईनी आराम करा असे सांगितले. सगळ्यांचे समान वरती खोल्यांमध्ये पोहोच झाले होते. एक गडी सगळ्यांना त्यांच्या-त्यांच्या रूम दाखवत होता.अहिल्याबाई अजून खालीच होत्या.गड्याबरोबर जाताना अगम्य एका खोली जवळ थबकला एक बाई तिथे स्वच्छता करत होती. तो त्या खोलीत गेला तर त्याचे डोळे  विस्फारले! कारण तो जे पाहत होता त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.त्या खोलीत समोर असणाऱ्या एका भिंतीवर त्याचेच फोटो होते सगळे अगदी लहानपणापासून ते अगदी सत्तावीस वर्षांपर्यंतचे! अगदी अभीज्ञा आणि त्याच्या लग्नाचे ही! तो हे सगळं आश्चर्याने पाहत होता ते पाहून ती साफसफाई करणारी बाई अदबीने त्याला म्हणाली.


बाई,“धाकल धनी ही खोली बाईसाहेबांची हाय! बाईसाब कोणाला बी या खोलीत येऊ देत न्हवत्या! सगळी साफसफाई बी त्या स्वता करायच्या हितली कालच त्यांनी सांगितलं की खोली उघडून साफकर म्हणून! आज कळलं अमास्नी की बाईसाब का आमाला इथं येऊ देत नव्हत्या आणि काल का सफाई करायला सांगितलं मला ते!” तिने सांगितले आणि पुन्हा ती तिच्या कामात मग्न झाली.


        अगम्य मात्र काहीच बोलला नाही. तो फक्त स्वतःचाच एक-एक फोटो न्याहाळत होता भारावल्या सारखा डोळ्यात पाणी आणून! अभीज्ञा त्याच्या मागे त्या रूममध्ये आली तर तिची अवस्था ही त्याच्या पेक्षा वेगळी नव्हती.अगम्य अभीज्ञाला म्हणाला.


अगम्य,“ मला तर स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं अभी की माझे फोटो असे माझ्या ही नकळत काढून कोणी असे स्वतःच्या खोलीत सजवू शकत. मी हे पाहून खरंच आता वेडा व्हायाचा बाकी आहे! इतकं प्रेम आपल्या पासून दूर राहून ही आपल्यावर कोणी करू शकते?” त्याने अभीज्ञाला विचारले.


अभीज्ञा,“ हो  फक्त आई! त्या तुझ्या आई आहेत अगम्य!” ती म्हणाली.


     अहिल्याबाई त्या दोघांचे संभाषण दारात थांबून ऐकत होत्या.त्या आत आल्या आणि त्या सफाई करणाऱ्या बाईला खुणेनेच जायला सांगितले.अभीज्ञा आणि अगम्यचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते ते दोघे फोटो पाहण्यात गुंग होते. त्या अगम्यला म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ अमू तू नव्हता माझ्या जवळ तेंव्हा मी रात्रीच्या रात्री रडूत जागून काढल्या आहेत पण या तुझ्या  फोटोंनी मला सावरले! यात या तीन वर्षातले फोटो नाहीत आणि हो आपल्या अदुचे ही अजून नाहीत आता यात भर घालावी लागेल अजून!” त्या डोळे पुसत हसून म्हणाल्या.


अभीज्ञा,“ आता काही गराज नाही आऊ असे फोटो गोळा करण्याची आम्ही प्रत्यक्ष तुमच्या बरोबर असणार आहे या पुढे!” ती म्हणाली.


अहिल्याबाई,“जा आराम करा अजून खूप काही दाखवायचे आहे तुम्हांला! संध्याकाळी दाखवेन!” त्या म्हणाल्या.


      अगम्य मात्र काहीच बोलला नाही पण त्याने अहिल्याबाईंना घट्ट मिठी मारली आणि त्या दोघींना ही काही कळायच्या आताच तिथून डोळे पुसत निघून गेला. अहिल्याबाई आणि अभीज्ञा त्याच्या या कृतीने दोन मिनिटं स्तब्ध होत्या. अभीज्ञा हसून अहिल्याबाईंचा हात  धरून म्हणाली.


अभीज्ञा,“ आऊ दगडाला पाझर फुटत आहे हो!”


अहिल्याबाई,“ काय ग माझ्या लेकाला दगड म्हणतेय होय पण आज मी खूप खुश आहे. आज अगम्यने न बोलताच मला  खूप काही सांगितले!” त्या आराम खुर्चीवर बसत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ हो तसाच आहे तो! मला ही त्याने सांगितले नाही आणि….” बोलता बोलता थांबली आणि जीभ चावली आणि  अहिल्याबाई काही बोलायच्या आत पळून गेली.


                   अगम्य आता हळूहळू अहिल्याबाईला स्वीकारत होता.


      अहिल्याबाई अजून अगम्य आणि अभीज्ञाला काय दाखवणार होत्या? येणाऱ्या अमावस्येला अजून या सगळ्यांच्या पुढे काय वाढून ठेवले होते हे तर येणारा काळच ठरवणार होता?

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule







          

      



         





      


               









  

🎭 Series Post

View all