दि लूप होल (भाग २९)

This is thriller and suspense story

       दुपारची जेवणे झाली आणि पुन्हा सगळे हॉलमध्ये जमले. अभिज्ञाच्या आईने अहिल्याबाईंना विचारले.

आई,“ पण ताई  सूर्यकांत पाटलांना अशा कोवळ्या जीवांना मारून  त्यांच्या रक्ताने पेंटींग बनवून नेमकं त्यांना काय मिळवायचे होते आणि पुढे त्यांचे काय झाले?” 

अहिल्याबाई,“ सूर्यकांत भाऊंना रावसाहेबांसारखे यश मिळवायचे होते चित्रकलेत म्हणून त्यांनी हे सगळं केलं. दुसऱ्या दिवशी  श्रीरंगपूरमध्येच काय पण अख्या पुणे जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.पोलिसांनी सूर्यकांत भाऊंना कोर्टात हजर केलं व त्याची  पोलीस कोठडी मागितली त्यांची पंधरा दिवसांची! कोर्टाने ही ती दिली! जामीनाचा तर प्रश्नच नव्हता रंगे हात पकडलं होत त्यांना पोलिसांनी आणि त्यांचा जामीन तर कोण करणार होत म्हणा! पोलिसांनी रिमांडमध्ये घेतला तेंव्हा मागील एक वर्षात त्यांनी अजून सात मुलांना मारून त्यांच्या परसदारात पुरल्याच कबूल केलं.  पोलिस त्यांना त्यांच्या परसदारात घेऊन गेले. रावसाहेबांना ही बोलवून घेण्यात आले कारण तेच पहिले साक्षीदार होते या गुन्ह्याचे! सूर्यकांत भाऊं जिथे जिथे सांगतील तिथे खोदण्यात आले तर दगडाला ही पाझर फुटेल असे दृश्य समोर आले.त्या सात खट्टयांमध्ये कोवळ्या किरळ्या पोरांचे सात मृतदेह होते.कुठला मृतदेह अर्धवट सडलेला, कुठला नुकताच सडू लागलेला   तर कुठला नुसता सापळाच राहिलेला. सगळ्यात एक गोष्टी कॉमन होती. सगळे मृतदेह पाच वर्षाच्या वरच्या व दहा वर्षाच्या आतील मुलांचे होते. ते दृश्य पाहून रावसाहेबांनाच काय पण पोलिसांना ही गलबलून येत होते. रावसाहेबांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी सूर्यकांत भाऊंना कानाखाली लगावली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर कळले की सूर्यकांत भाऊंनी ही सगळी मुले विविध शहरातून रस्त्यावर फिरणारी आणली होती.जी अनाथ होती त्यांना कोणी ही वाली नव्हता त्यामुळे मुले गायब झालेली कोणाच्याच लक्षात आले नाही.सूर्यकांत भाऊनी या मुलांना मी तुम्हाला सांभाळेण चांगले आयुष्य देईल अस गोड बोलून आणली होती.निरागस जीव ते भुलले त्यांच्या बोलण्याला.

        सुनिधीची तर अवस्था खुपच वाईट होती. ज्या माणसा बरोबर आपण गेली चार-पाच वर्षे संसार केला तो माणूस राक्षस निघाला. त्याने आठ कोवळ्या मुलांची हत्या केली फक्त पेंटिंग बनवण्यासाठी हे पाहून ती पूर्णपणे खचली होती. या हत्याकांडा बद्दल रोज वर्तमानपत्रात छापून येऊ लागले. लोकांनी सूर्यकांत भाऊंकडून  विकत घेतलेल्या सगळ्या पेंटींग नष्ट केल्या. लोक आता सुनिधीला ही त्रास देऊ लागले. रावसाहेबांनी आणि मी तिला खूपदा आमच्या बरोबर राहायला ये म्हणून बोलवले पण तिने आमचे ऐकले नाही आणि एक दिवस ती अचानक कोणाला ही न सांगता कुठे तरी निघून गेली पुढे तिचे काय झाले हे मात्र आम्हांला समजले नाही.

         रावसाहेब मात्र आतून खूप बेचैन होते. त्यांना हेच कळत नव्हतं की सूर्यकांत भाऊनी हे सगळं का केलं?का इतक्या कोवळ्या मुलांचा जीव घेतला म्हणून मग त्यांनी सूर्यकांत भाऊंना भेटायचं ठरवलं आणि त्याच्या पोलिसांमधील वजनाचा वापर करून ते सूर्यकांत भाऊंना एकांतात भेटायला गेले. सूर्यकांत भाऊंना पोलीस बेड्या घालून एका  खोलीत घेऊन गेले.तिथे रावसाहेब आधीच हजर होते. सूर्यकांत भाऊ तिरस्कारने रावसाहेबांना पाहत म्हणाले.

सूर्यकांत-“ तू का आला आहेस इथे अप्पा?”

अप्पासाहेब-“ मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत तुझ्याकडून म्हणून आलो आहे मी!” ते म्हणाले.

सूर्यकांत-“ कोणते प्रश्न?” 

अप्पासाहेब-“ हे सगळं तू का केलंस सुर्या? इतक्या निष्पाप जीवांचा बळी घेऊन तुला काय मिळवायच होत?”

सूर्यकांत-“ का केलं? अरे तुझ्यामुळेच केलं मी हे सगळं?”

अप्पासाहेब-“तुझ्या पापांच खापर माझ्या माथी नको फोडूस? तू हे सगळं का केलंस ते सांग?

सूर्यकांत-“ हो! हो! तुझ्यामुळेच केलं मी किती ही चांगले चित्र काढले तर कौतुक मात्र तुझेच कायम! एकाच गुरू कडून शिकलो ना आपण ही कला पण कायम तुझ्या कलेच कौतुक आणि माझ्या कलेला दुय्यम दर्जा! तू चित्रकार म्हणून प्रसिध्द झालास पण मी होतो तिथेच होतो!” 


 

अप्पासाहेब-“ अरे किती विष भरलंय तुझ्या मनात आणि कशा मुळे रे! मी कधीच असा विचार केला नाही की तुझी कला दुय्यम आहे किंवा  माझी कला श्रेष्ठ आहे.आपल्या दोघात ही तुलना आणि ही स्पर्धा कधी आली रे? मी फक्त माझ्या कलेची आराधना केली. सरस्वतीची आराधना केली. यश मला अपचुकच मिळत गेले. तू एकदा एकदाच म्हणायचे होतेस मी पेंटिंग करणे सोडून दिले असते! पण त्या कोवळ्या पोरांना का मारलंस तू या सगळ्यात त्यांचा काय संबंध रे? तुझा राग तर माझ्यावर होता ना?”

सूर्यकांत,“झाला तुझ्या मधला जहागीरदार जागा? भीक द्यायला! पण मला भीक नको होती तुझी! आणि इथून पुढे ही नको आहे. मला माझ्या जीवावर नाव कमवायचे  होते.आत्ता कुठे माझे नाव होतं होते पण ते तुला कसे बघवेल म्हणूनच तू मला पकडून दिलस ना! तुला ऐकायचेच आहे ना त्या पोरांना मी का मारले आणि त्यांचे रक्त रंगात मिसळून पेंटींग का काढल्या तर ऐक!

         तुला आठवतेय नाशिकला आपण गेलो तेंव्हा मंदिराच्या प्रांगणात आपल्याला एक अघोरी बाबा भेटले होते. तू त्यांच्याकडे लक्ष नाही दिलेस पण ते जे माझ्या बद्दल बोलले ते खरेच होते म्हणून आपण रात्री नाशिकमध्ये मुक्काम केला त्या रात्री  त्यांचा शोध मी घेतला तर मला कळले ते स्मशानात राहतात. रात्री बारा वाजून गेले होते त्यांना शोधू पर्यंत!त्यांची चौकशी करताना मला कळले की ते सिद्ध अघोरी आहेत.म्हणूनच मी पण मग हिम्मत करून गेलो.भीती वाटत होती मला; तरी गेलोच! ते अघोरी बाबा पेटत्या चितांच्या मधोमध ध्यान लावून बसले होते.सगळीकडे अंधार आणि पेटत्या चितांचाच  काय तो उजेड! कुत्र्यांच्या रडण्याचा आणि कोल्हे कुईचा आवाज आणि मधूनच चितेतून येणार हाडांच्या चटकण्याचा काय तो आवाज! ‘अघोरी बाबा डोळे न उघडताच मला म्हणाले मुझे पता था तू जरूर आएगा!तेरी बेचैनी तेरी हार तुझे मेरे पास खिंच लाई हैं!’असं म्हणून ते उठले आणि माझ्या अजून जवळ आले ते संम्पूर्ण चिता भस्माने माखलेले होते.डोळे लाल भडक आणि इतक्या थंडीत ही अंगावर फक्त लंगोट!एक क्षण त्यांना पाहून मी घाबरलो! वाटले जावे पळून पण धीर करून तसाच उभा राहिलो.मी त-त-प-प करत काही बोलणार तर तेच पुढे बोलू लागले.

‛मुझे कुछ बताने की जरूरत नहीं हैं! मैं सब जनता हूँ! लेकिन तेरी कला में वो बात नहीं जो उसकी कला में हैं!वो दिल से चित्र बनाता हैं उसकी साफ दिली और मासुमियत उसकी कला में रूह भर देती हैं!लेकिन तू दिमाग से चित्र बनाता हैं! हर वक्त उससे जलता रहता हैं! तेरा दिल मैंला हैं! तो वो मासुमियत! वो साफ  दिली! वो रूह! तेरी कला में कहाँ से आएगी बता मुझे? तू कभी भी उसकी बराबरी नहीं कर पायेगा! निकल यहाँ से!’ 

     असं म्हणून त्यांनी मला हकलवुन दिलं.पण मी त्यांचे पाय नाही सोडले.त्यांना मिनतवाऱ्या केल्या तेंव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवून मला उपाय सांगितला.तो म्हणजे पाच ते दहा वर्षांच्या मुलांना एका विशिष्ठ पध्द्तीने मारून त्याच्या रक्त रंगात मिसळायचे आणि त्या रक्त मिश्रीत रंगाने पेंटींग बनवायच्या त्यामुळे माझ्या चित्रात ती रुह येईल जी तुझ्या चित्रात दिसते.माझ्या पेंटींगकडे लोक आकर्षित होतील आणि मला चित्रकार म्हणून यश मिळेल. आणि घडत ही तसेच होते पण तुला माझे यश बघवले नाही!शेवटी दिलास मला पकडवून माझ्या बार्बादीला आणि त्या मुलांच्या हत्येला तूच जबाबदार आहेस आप्पा!” ते त्वेषाने ओरडले.

अप्पासाहेब,“ फक्त स्वतः यश मिळवण्यासाठी आणि माझ्या पेक्षा श्रेष्ठ स्वतःला सिध्द करण्यासाठी तू त्या आठ कोवळ्या किरळ्या निष्पाप मुलांचा जीव घेतलास? किती नीच आहेस रे तू? राक्षसा कुठे फेडशील ही पाप? आता मी तुला फासावर लटकवल्या शिवाय गप्प बसणार नाही लक्षात ठेव सुर्या!” ते रागाने म्हणून निघून आले.

   

       हा सगळा वृत्तांत मला रावसाहेबांना घरी आल्यावर सांगितला तेंव्हा मी आतून हादरुन गेले.एखादा माणूस फक्त आकसा पोटी आणि यश मिळवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ही  कल्पनाच करून सूर्यकांत भाऊंचा राग येत होता.” त्यांनी हे सर्व सांगून थरथरत्या हाताने डोळे पुसले.

अगम्य,“  बापरे!म्हणजे या सूर्यकांत पाटलाने फक्त माझ्या बाबां पेक्षा चित्रकलेत जास्त यश मिळवण्यासाठी आठ पोरांचा बळी घेतला! किती  क्रूरपणा आहे हा!” अगम्य म्हणाला.

      हे सगळं अहिल्याबाईच्या तोंडून ऐकून सगळे सुन्न झाले होते.प्रत्येकाच्या मनात सूर्यकांत पटला विषयी चीड निर्माण झाली होती.अहिल्याबाई आता थोड्यावेळ थांबून आणि पाणी पिऊन पुढे म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ हे तर अर्ध सत्यच सूर्यकांत भाऊंनी रावसाहेबांना सांगितले होते.पूर्ण सत्य तर याहुन ही भयंकर होते!” त्या म्हणाल्या पण त्यांना सतत बडबड केल्यामुळे सारखा ठसका  येऊ लागला. ते पाहून अभीज्ञा म्हणाली.

         

अभीज्ञा,“ आजसाठी इतकंच बास आऊ तुम्हांला त्रास होत आहे!आज आपण इथेच थांबू बाकी उद्या सांगा! आराम करा आता! मी चहा करते. राहुल चहा पी आणि दोघे ही इथेच थांबा! आता रात्रीचे जेवण करूनच जा!” ती म्हणाली अहिल्याबाईनी नुसती होकारार्थी मान हलवली. हे ऐकून राहुल म्हणाला.

राहुल,“ हा अभी फक्कड चहा कर जरा मी घेईन पण मी रात्रीच्या जेवणासाठी नाही थांबू शकणार ग! मला बरीच कामे आहेत आणि माझ्या स्वयंपाकीन मावशी आत्ता पर्यंत पोहोचल्या असतील त्या करत असतील जेवण तयार! आणि हो  मीराला ही आश्रमात सोडावे लागेल ना मला! तिथे ही सगळ्यांना भेटण्यात थोडा वेळ जाईल!”तो म्हणाला.

अगम्य,“ काय रे राहुल्या लैच भाव खायला लागला की तू आज काल! तू किती कामाचा आहे माहीत आहे मला! ते काही नाही जेवूनच जा रे!” तो राहुलला पाहत म्हणाला कारण  आज जे काही मीरा बाबत समजले त्या नंतर राहुल घरी जाऊन जेवेल की नाही अशी अगम्यला शंका होती.

राहुल,“ अम्या तसं काय नाही रे! आज नाही पण उद्या नक्की जेवेण संध्याकाळी पण फक्कड बेतकर!” तो  हसून म्हणाला. 

अगम्य,“बरं ठीक आहे उद्या नक्की!”तो म्हणाला

      राहुलच्या  बोलण्यामुळे अगम्य आणि अभीज्ञाचा नाइलाज झाला.अभीज्ञाने चहा करून आणला.सगळ्यांनी चहा घेतला. राहुल आणि मीरा जाण्यासाठी निघाले अगम्य आणि अभीज्ञा त्यांना सोडवायला मुद्दामच दारा पर्यंत गेले.राहुल आणि मीरा जाताना अगम्यने मुद्दामहून विषय छेडला त्याला अंदाज बांधायचा होता की राहुलच्या मनात नेमकं काय चालू आहे.म्हणूनच तो म्हणाला.

अगम्य,“काय राहुल्या किती दिवस मीराला असं आश्रमात सोडत राहणार? आता घरी घेऊन जायचं  बघ की जरा नाय म्हणजे आम्हाला तुमच्या लग्नाच्या तयारीला लागायला बरं काय मीरा!” तो मीराला आणि राहुलला पाहत म्हणाला. मीरा फक्त खाली मान घालून उभी होती.पण राहुल म्हणाला.

राहुल,“ अम्या अरे घाई काय आहे! अजून कोणा-कोणा बद्दल काय-काय समजेल ते बघू की आज काल लोक लय खोटं बोलत्यात रे!” तो  नाराजीच्या सुरात मीराकडे पाहत खोचकपणे म्हणाला. हे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी भरले पण तिने कसे बसे ते थांबवले आणि आवंढा गिळला.

      

      राहुल मात्र अगम्य काय म्हणतो याची वाट न पाहतच निघून गेला आणि मीरा त्याच्या मागे खाली मान घालून.अगम्यला जी भीती वाटत होती ती खरी ठरली. आता त्याला आणि अभीज्ञालाच मध्यस्थी करून हा पेच सोडवावा लागणार होता.अहिल्याबाई थकून त्यांच्या रूम मध्ये आराम करायला निघून गेल्या होत्या.जाधव काही काम आहे म्हणून बाहेर गेले.अभीज्ञाचे बाबा अज्ञांकला खेळवत हॉलमध्ये बसले होते आणि आई किचन मध्ये होत्या.अभीज्ञाने अगम्यला नंतर बोलू म्हणून डोळ्यानेच खुणावले आणि ती ही किचनमध्ये निघून गेली.अगम्यने हॉलमध्ये जाऊन अज्ञांकला घेऊन अभीज्ञाच्या बाबांना आराम करायला पाठवून दिले.

            रात्रीची जेवणे झाली पण खरं तर प्रत्येक जण आज अहिल्याबाईने सूर्यकांत पटला विषयी जे सांगितले त्याचाच विचार करत होते.हे सगळे ऐकून प्रत्येकाचे मन सुन्न झाले होते.अभीज्ञा सगळं आवरून बेडरूममध्ये आली तेंव्हा अगम्य शुन्यात नजर लावून काही तरी विचार करत बसला होता.त्याला अभीज्ञा रूममध्ये  आल्याचे ही जाणवले नव्हते. अभीज्ञाने त्याच्या समोर जाऊन चुटकी वाजवली तेंव्हा तो भानावर आला.अभीज्ञा ते पाहून त्याच्या जवळ बसत म्हणाली.

अभीज्ञा,“ काय देशमुख साहेब कसला विचार करताय एवढा?” 

     हे ऐकून दुपारचा किस्सा आठवून दोघे ही हसले. अगम्य अभीज्ञाला म्हणला.

अगम्य,“ काही नाही ग ते आज मिसेस देशमुखने आज जे काय सांगितले त्याच विचार करत होतो!एखादा माणूस इतका क्रूर कसा असू शकतो याचा विचार करून डोकं आणि मन दोन्ही सुन्न होत!” तो गंभीर होत म्हणाला.

अभीज्ञा,“ ते तर आहेच पण जे घडून गेले ते तर आपण नाही बदलू शकत अमू पण जे सध्या चालले आहे ते मात्र नक्कीच रोखू शकतो!”ती त्याचा हात हातात घेत म्हणाला.

अगम्य,“ तू मीरा आणि राहुल बद्दल बोलत आहेस ना?” त्याने विचारले.

अभीज्ञा,“हो आज जे काही मीराने तिच्या बद्दल सांगितले.त्यामुळे राहुल खूपच अपसेट आहे तुला चांगलाच माहीत आहे राहुल जितका फ्रँक दिसतो आणि वागतो तितका तो फ्रँक नाही.खूप एककल्ली आहे तो आणि खोट्याची त्याला तिडीक आहे  नेमकं मीराने मात्र त्याला जे आवडत नाही तेच केले.आज जाताना कसं बोलून गेला पाहिलेस तू!मीरा मात्र बिचारी या सगळ्यात भरडली जायला नको! आता आपल्यालाच हा पेच सोडवावा लागणार आहे मध्यस्थी करून!” ती म्हणाली.

अगम्य,“बरोबर आहे तुझं अभी! जे काही झालं त्यात मीराचा काहीच दोष नाही आणि तिने सत्य लपवले यात ही तिचे काही चुकले नाही हे मात्र राहुलला समजावून सांगावं लागेल.एका चुकीची इतकी मोठी शिक्षा मीराला मिळायला नको!मी बोलेन राहूनशी समजावून सांगेन त्याला!” तो म्हणाला.

अभीज्ञा,“ करू काही तरी आपण झोपा आता मग बघ किती वाजले ते!”

         असं म्हणून अभीज्ञाने अगम्यला घड्याळ दाखवले आणि लाईटी बंद केल्या.

या पेक्षा ही कोणते भयंकर सत्य सूर्यकांत पाटलाने आप्पासाहेबांपासून लपवले होते?आता  अगम्यच्या घरात असलेल्या पेंटिंगचा उलगडा होईल का? मीरा आणि राहुलच्या नात्याचे पुढे काय होणार होते? राहुल अगम्यचे ऐकेल का?

क्रमशः



 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


 

     

🎭 Series Post

View all