दि लूप होल (भाग २८)

This is thriller and suspense story

        आता सगळेच मीराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. पण अहिल्याबाईंनी ती कोण आहे ते ओळखले आहे असे त्यांच्या नजरेत दिसत होते. अहिल्याबाईनी मीराकडे पाहिले आणि तिला त्यांनी विचारले.


अहिल्याबाई,“ तू सूर्यकांत भाऊंची मुलगी ना?” त्या असं म्हणतात मीरा त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायावर डोकं ठेऊन रडत म्हणाली.


मीरा,“हो मीच त्या नालायक राक्षस माणसाची मुलगी आहे.तो माझा बाप असल्याची मला लाज वाटते काकू!”


अहिल्याबाई,“ उठ पोरी! तू त्यांची मुलगी आहे त्यात तुझा काय दोष?" त्या तिला उठवत म्हणाल्या.


     राहुलने हे सगळं  ऐकले आणि मीराला तो म्हणाला.


 राहुल,“ तुझं नाव तर मीरा रामजी कसबे ना?मग तू सूर्यकांत पाटलांची मुलगी कशी?” 


मीरा,“ मी तुमच्या सगळ्या पासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे. माझी खरी ओळख मीरा सूर्यकांत पाटील जी माझ्या आईनेच पुसून टाकली आणि माझ्या नावा मागे माझ्या  मामाचे नाव लावले.कारण तिला भीती होती की माझ्या बापाचे नाव जर माझ्या मागे असेल तर हा समाज मला स्वीकारणार नाही आणि त्या विकृत माणसाची मुलगी म्हणून मला ही समाज त्याच दृष्टीने बघेल!” ती म्हणाली.


राहुल,“म्हणजे तू माझ्याशी आणि सगळ्यांशी  खोटं बोललीस की तुझे आई-बाप अपघातात गेले!” त्याच्या आवाजात आता राग जाणवत होता.


मीरा,“ हो मी खोटं बोलले कारण माझी आई तर मला जन्म देऊन बापाचा कृत्याचा  धक्क्या बसल्याने गेली आणि बाप तर सैतान होता? मग काय सांगणार होते मी?की मी एका नीच खुनी माणसाची मुलगी आहे!” ती पुन्हा  तिचे तोंड दोन्ही हाताने झाकून घेऊन रडू लागली.


अहिल्याबाई,“रडू नको पोरी! तुझा यात काहीच दोष नाही!शांत हो!” त्या तिला समजावत म्हणाल्या.


अगम्य,“तुम्ही काय बोलताय दोघी आम्हाला तरी कळू द्या जरा! त्या सूर्यकांत पाटलांनी असं काय केलं आहे की त्यांची स्वतःची मुलगी त्यांचा एवढा तिरस्कार करते की त्यांचं नाव ही स्वतःच्या नावा पुढे लावत नाही?” अगम्यने विचारले.


मीरा,“ माझ्याच बापाची पाप मी माझ्याच तोंडानी काय सांगू! काकू सॉरी मी तुम्हांला बोलता बोलता मध्येच थांबवलं. काय आणि कसं घडलं आणि माझ्या बापाची कलुषित कृत्य ही  काकूच तुम्हांला सांगतील सविस्तर!” ती एक निःश्वास सोडत म्हणाली.


अभिज्ञा,“ बरं आऊ नाशिकमध्ये काय झालं मग?” तिने विचारले.


अहिल्याबाई,“त्या नंतर आम्ही रात्री तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा गावी आलो!वरकरणी काहीच घडलं नाही असं दिसत असलं तरी त्या नाशिकच्या मुक्कामाच्या रात्री बरंच काही घडलं होत. जे आम्हांला माहीत नव्हतं पण त्या मुळे आमच्या चौघांची ही आयुष्य बदलणार होती. याची पुसटशी ही कल्पना मला आणि रावसाहेबांना नव्हती.  


               नियतीच्या क्रूर गर्भात आमच्या दुःखाच बीज केव्हांच पेरलं गेलं होतं आणि ते रोज क्षणाक्षणाने वाढत होत.आम्ही मात्र आमच्या आयुष्याबद्दलची सुख स्वप्ने रंगवण्यात गढून गेलो होतो. पण आपल्या आयुष्यात  रंग भरणे आपल्या कुठं हातात असत ते तर नियतीनावाच्या चित्रकाराच्या हातात असत पण अज्ञानातच माणूस खूप सुखी असतो हेच खरे!


              नियती पण एक चित्रकारच आहे की ती तिच्या कुंचल्याने आपल्या आयुष्यात सुख-दुःखाचे रंग भरत असते.कधी सुखाचा गुलाबी-हिरवा रंग तर कधी दुःखाचा काळा-करडा रंग आपण फक्त त्या रंगांबरोबर कधी हसत तर कधी रडत जगत राहतो आणि आपल्या आयुष्याचे चित्र पूर्ण झाले की इह लोकाची यात्रा संपवून परलोकी निघून जातो.शेवटी आपलं आयुष्य म्हणजे तर काय एक चित्रच तर आहे त्या विधत्याच्या हुकुमावरून नियतीने तिच्या कुंचल्याने काढलेले!

           पण  एक गोष्ट मात्र खटकण्यासारखी घडत होती.ती म्हणजे अचानकच चित्र प्रदर्शनामध्ये रावसाहेबांच्या पेंटिंगची मागणी घटली होती आणि लोक सूर्यकांत भाऊंच्या पेंटींगची मागणी वाढली होती.त्यांच्या पेंटींगकडे लोक खूप आकर्षित होत होते.सूर्यकांत भाऊ खुश होते आणि रावसाहेब ही  त्यांना पाहून खुश होते.ते पाहून सूर्यकांत भाऊंचे ही मन परिवर्तन होत होते. रावसाहेबांबद्दलचा त्यांच्या मनातील द्वेष आणि जळकुटेपणा कुठे तरी कमी झाला होता. 

        दिवस मात्र पाखराचे पंख लावून उडत होते. आम्ही नाशिक वरून येऊन आता वर्ष झाले होते आणि सूर्यकांत भाऊ आता एक प्रथितयश  चित्रकार म्हणून नावा रूपाला आले होते.तसं पाहायला गेलं तर रावसाहेब देखील आधीपासूनच प्रसिद्ध चित्रकार होतेच. आता ते मित्राच्या यशामध्ये खुश होते.


        आणि या सगळ्या घडामोडी मध्ये आम्हाला अगम्यच्या येण्याची चाहुल लागली. त्या नंतर सुनिधी  ही आई होणार हे कळले.पण या सगळ्या काळात सूर्यकांत भाऊंनी आमच्या घरी येणे बंद केले.त्याच्या चित्रांची प्रदर्शने ते स्वतःची स्वतःच भरवू लागले. त्यांनी जवळ जवळ आमच्याशी सगळे संबंध तोडले होते.ही गोष्ट मात्र रावसाहेबांना मनोमन खात होती.रावसाहेबांना हेच कळत नव्हते की सूर्यकांत भाऊ बाबतीत ते कुठे चुकले.त्यांची अशी काय चूक झाली की त्यांचा मित्र त्यांच्या पासून दुरावला गेला.म्हणून त्यांनी सूर्यकांत भाऊंना एक दिवस अचानक भेटायचे ठरवले.

           पण या अचानक भेटण्याचा निर्णयाने एक भयंकर सत्य समोर येणार होते आणि त्यामुळेच आमची आयुष्य कायमची बदलणार होती.एक दिवस सूर्यकांत भाऊंना आवडते म्हणून रावसाहेब रम, स्वतः साठी सॅम्पएन आणि खाण्यासाठी बरंच काही घेऊन मला दहा वाजता मी उशिरा येईन म्हणून सांगून गेले. सूर्यकांत भाऊंची गावाच्या बाहेर जरा आडरानात एक सुंदर अशी बंगली होती.या पेंटिंगमध्ये आहे तीच ती बंगली! त्यांनी स्वतःच ती आडरानातील जागा निवडली होती बंगली बांधायला. कारण त्यांना शांतता हवी होती. बंगली बाहेरून छोटी असली तरी आतून प्रशस्त होती. समोर गेट त्यातून आत गेल्यावर छोटीशी बाग होती.समोर पोर्च आणि अंगणात एक आराम खुर्ची, पोर्च मधून आत गेल्यावर प्रशस्त हॉल आणि एका बाजूला किचन आणि बाकी पाच रूम त्या पाच रुम मधीलच एक रूमला त्यांनी पेंटिंग स्टुडिओ बनवले होते.त्या स्टुडिओला आतून एक दार होतच पण मागच्या बाजूनी ही एक दार होत. बंगलीच्या मागे म्हणजेच परसदारत ही भरपूर मोकळी जागा होती तिथे ही सुनिधीने बरीच झाडे लावली होती.त्याच मागच्या बाजूने त्या  पेंटिंग स्टुडिओमध्ये जाण्यास एक दार होते. तो दरवाजा जास्त कोणाला माहीत नव्हता त्यामुळे त्या दरवाजा जास्त करून फक्त पुढे केलेला असायचा!

         रावसाहेब त्या दिवशी साडेअकराच्या सुमारास चंद्रकांत भाऊंच्या घरी पोहोचले सुनिधीला उठण्याचा त्रास नको म्हणून मागून त्या स्टुडिओकडे निघाले कारण रावसाहेबांना माहीत होतं की या वेळी सूर्यकांत भाऊ स्टुडिओत पेंटींग करत असणार म्हणून ते सरळ बंगलीचा मागच्या बाजूला गेले आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या स्टुडिओ असलेल्या  खोलीचे दार फक्त पुढे लोटलेले होते.ते दार रावसाहेबांनी ढकलले. समोरचा अघोरी प्रकार पाहून रावसाहेब हदरले! सूर्यकांत भाऊ एका पाच-सात वर्षाच्या कोवळ्या मुलाच्या प्रेताचा हात कापून त्याचे रक्त एका वाटीत भरून त्यात रंग मिसळत होते. रावसाहेबांना पाहून ते दचकले. पण रावसाहेब भानावर आले आणि त्यांनी त्या स्टोडिओच्या खोलीचे दार बाहेरून घट्ट लावून घेतले आणि पुढून ते दार वाजवून सुनिधीने  दार उघडता घरात शिरले व सूर्यकांत भाऊंच्या त्याच स्टुडिओच्या खोलीचे दार ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आत ढकलून लावून त्यांना त्याच खोलीत कोंडले.सुनिधीला तर काय चालले आहे तेच कळत नव्हते. सूर्यकांत भाऊ खोलीतून ओरडत होते पण रावसाहेबांनी तिकडे दुर्लक्ष करून त्यांच्याच लँड लाईन वरून पोलिसांना फोन केला. पोलीस रावसाहेब बोलवत आहेत म्हणाल्यावर लगेच आले.सूर्यकांत भाऊंना रंगे हात पोलिसांनी पकडले.त्या मुलाचे प्रेत पेंटिंग बाकीचे साहित्य आणि सूर्यकांत भाऊंना ही ताब्यात घेतले.सुनिधी तर त्या खोलीत ते रक्ताने माखलेले कोवळ्या मुलाचे प्रेत आणि त्या खोलीत सांडलेले  रक्त पाहून चक्कर येऊन पडली” त्या पुढे बोलणार तर मध्येच अगम्य म्हणाला.


अगम्य,“ बाप रे!एका कोवळ्या पाच-सहा वर्षाच्या मुलाला मारून त्याचे रक्त रंगात मिसळून पेंटिंग करत होते ते सूर्यकांत पाटील!किती अघोरी प्रकार आहे हा!”तो संतापाने बोलत होता.


अहिल्याबाई,“ हे इतकंच नव्हतं अगम्य अजून खूप गोष्टींचा उलगडा व्हायचा होता अजून!” त्या एक दीर्घ निःश्वास सोडत म्हणाल्या.

    

          हे सगळं ऐकून खरं तर सगळे सुन्न झाले होते. इतका क्रूर एखादा माणूस कसा वागू शकतो त्याचा  विचार तिथे हजर असणारा प्रत्येक जण करत होता.वातावरण खूपच गंभीर आणि तणावाचे झाले होते.म्हणूनच अभिज्ञा वातावरण हलके करण्यासाठी आणि जेवणाची वेळ झाली म्हणून  ती बोलू लागली


अभिज्ञा,“ बरं जेवण करा आता आणि मग बाकीचे सांगा आऊ! माझा अदु ही एकटाच खेळून कंटाळला बघा!त्याला ही भूक लागली असेल!” ती वातावरण हलके करण्यासाठी म्हणाली आणि  राहुल तिला साथ देत पुढे बोलू लागला.


राहुल,“ होय ग अभी माझ्या पण पोटात कावळे ओरडत आहेत आणि मघाशी तुमच्या दोघांचं आँखो आँखों में काय चाललं होतं ते पण सांगा जरा मला म्हणजे सगळ्यांनाच!” तो पुन्हा खोचकपणे हसून अगम्यकडे पाहत म्हणाला.


अगम्य,“ तुला काय पडले रे इतकं?” तो जरा वैतागून म्हणाला.


अभिज्ञा,“बरं सांगते बाबा राहूल! पण आता जेवायला बसायचे का?” ती त्याला पाहत म्हणाली.


          सगळे जेवण करायला बसले.जेवण करताना राहुल काही बोलणार तर त्याला पाहून अभिज्ञाच बोलू लागली.


अभिज्ञा,“हो राहुल सांगते बाबा थांब! काय आहे आऊ म्हणाल्या की देशमुखांच्यात नवऱ्याला रावसाहेब म्हणतात. तर मी ही कधी कधी अगम्यला देशमुख साहेब म्हणते.आम्ही दोघे  तेच डोळ्यांनी एकमेकांना खुणावत होतो!झालं समाधान!” ती हात जोडत म्हणाली आणि सगळे हसले.


राहुल,“ या अम्याला तू साहेब म्हणतेस?” अगम्यकडे नाटकीपणे पाहत तो म्हणाला.


अगम्य,“ मग त्यात तुझं काय गेलं रे राहुल्या?  ऑफिसमध्ये ही मला देशमुख साहेबच म्हणतात.तुझ्या सारख नाही एवढ्या चांगल्या पोस्टवर असून ही जो-तो राहुल्या म्हणत!” तो त्याला पाहून म्हणाला.


राहुल,“ कारण  तुमच्या सारख आम्ही खडूस नाही ना!” तो म्हणाला.


अगम्य,“ मी खडूस आहे का?”तो रागात असल्याचा आव आणत म्हणाला.


बाबा,“झालं का तुमच्या दोघांचं सुरू परत!जेवण करा गप्प!” ते दोघांना ही दाटावत म्हणाले.


        मीरा मात्र टेन्शन मध्ये होती.अगम्य ही मुद्दाच राहुलला खेळवत होता कारण त्याला चांगलंच माहीत  होत की वरून राहुल किती ही नॉर्मल असल्याचे दाखवत असला तरी तो मीरामुळे आतून दुखावला गेला होता. मीराला ही या तीन वर्षांत राहुलचा स्वभाव कळला होता. राहुल आत्ता जरी शांत असला तरी तो हा विषय सहजा सहजी जाऊ देणार नाही कारण त्याला खोट्याची खूप चीड होती.मीरा आणि अगम्यला ही भीती होती की राहुल मीराशी संबंध तोडेल.


    पण सूर्यकांत पाटील  कोवळ्या मुलाला जीवे मारून त्याच्या  रक्ताने पेंटींग का बनवत होते? आणि अहिल्याबाई या पेक्षा भयंकर पुढे काय सांगणार होत्या? राहुल विषयी मीरा आणि अगम्यला वाटणारी भीती खरी ठरणार होती का? 

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule





                





          


🎭 Series Post

View all