दि लूप होल (भाग २६)

This is thriller and suspense story

      काही वेळ कोणीच काही बोललं नव्हतं पण अगम्यच्या मनात मात्र अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते.त्याला स्वतः बद्दल  सगळं जाणून घ्यायचे होते म्हणजे तो नेमका कोण आहे? कुठला आहे?आणि हो अहिल्याबाईनी त्याला अनाथ आश्रमात का सोडले?त्याचे वडील कोण होते? अगदी सगळं सगळं! म्हणूनच त्याने अहिल्याबाईंना विचारले.


अगम्य,“त्या पेंटींगबद्दल जाणून घेण्यापेक्षा  मला हे जाणून घ्यायचे आहे की मी कोण आहे? माझे वडील कोण?आणि तुम्हीं मला आश्रमात का सोडले?सगळं सगळं ऐकायचे आहे मला!” तो विचारले.


अहिल्याबाई,“ हो सांगते सगळं तुला! तुझ्या मनाची तगमग मला कळते आहे. तुझं नाव अगम्य अप्पासो देशमुख पुणे जिल्ह्यातील श्रीरंगपूरचे जहागीरदार होते  आपले पूर्वज त्यामुळे शंभर एकर शेती आहे आपली गावात! तुझ्या बाबांनी त्यात भरच घातली चार साखर कारखाने आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या पाच फॅक्टरी, एक पिढीजात चौपदरी वाडा इतक्या मोठ्या संपत्तीचा तू एकुलता एक वारस आहेस अगम्य! पण नियतीचा खेळच न्यारा इतकी सगळी संपत्ती आणि आई असताना ही तुला अनाथ आश्रमात अनाथा सारख जगावं लागलं ते फक्त आणि फक्त या पेंटिंगमुळे! खरं तर मी तुझी आई म्हणून तुझ्या समोर कधीच येणार नव्हते कारण तुझ्या डोळ्यातील  माझ्याबद्दलचा तिरस्कार पहायची माझी इच्छा आणि हिम्मत दोन्ही नव्हती. मी गेल्यावर माझ्या मृत्यूपत्रानुसार तुझ्या हक्काचं सगळं तुझ्या स्वाधीन झालंच असत! तशी सोयच केली होती मी! पण जेव्हा तुझा वर्तमानपत्रातील लेख माझ्या हाती लागला तेव्हा मला एन भाग पाडले.मी इतकी वर्षे तुझ्या सुरक्षिततेसाठी तुला माझ्यापासून दूर ठेवले.या दळभद्री पेंटिंगची सावली ही तुझ्यावर पडू नये म्हणून प्रयत्न केले.माझ्यातल्या आईला मारून मरत जगले! पण या पेंटींगने तुला गाठलच शेवटी! आणि तू त्या पेंटींगमध्ये अडकलास ही पण  त्या पेंटींगमधून बाहेर पडून मृत्यूच्या दारातून बाहेर आलास ही! तुला काही झालं असत तर या विचारानेच मला पिसे लागते रे बाळा! जर असे काही झाले असते तर माझी तीस वर्षांपासूनची तपश्चर्या व्यर्थ गेली असती पण त्या भगवंताला माझी दया आली असावी बहुतेक! म्हणून तू यातून सहीसलामत बाहेर पडला आणि माझी पुण्याई कुठे तरी कामी आली म्हणूनच अभिज्ञासारखी प्रेम करणारी बायको तुला लाभली!” असं म्हणून त्या रडू लागल्या. हे सगळं ऐकून सगळेच सुन्न होते.अगम्य मात्र अवाक होऊन त्यांना पाहत होता.अभिज्ञा अहिल्याबाई जवळ गेली.त्यांना पाणी दिले आणि त्यांना शांत केले.


अगम्य,“ बरं पण मग मी गायब झालेले तुम्हाला कळले नाही का? म्हणजे तब्बल तीन वर्षे मी गायब होतो आणि या सगळ्यांनी मला शोधण्याचे खूप प्रयत्न केले तुम्हांला हे कळले नाही का?बरं ते राहू द्या मी आल्या नंतर हॉस्पिटलमध्ये जवळ-जवळ तीन महिने होतो म्हणजे तेथूनच तुम्ही D. N. A. टेस्ट करून आलात ना? मला दाखवायला! मग ते ही तुम्हाला कसे कळले नाही!इतकीच माझी काळजी होती तुम्हाला तर हॉस्पिटलमध्ये का नाही आलात तुम्हीं?” त्याने अहिल्याबाईकडे तिरकस पाहत विचारले.अभिज्ञाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले आणि हे अहिल्याबाईंच्या ही लक्षात आले. त्या अभिज्ञाला पाहत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ अभिज्ञा नको रागवूस अगम्यवर त्याची शंका रास्त आहे. हो अगम्य सांगते मी!” त्या म्हणाल्या आणि अहिल्याबाईंच्या आपण अगम्यवर डोळे वटारले आहेत हे लक्षात आले हे अभिज्ञाला कळल्यावर तिने लाजून मान खाली घातली. अहिल्याबाई मात्र तिच्याकडे पाहून फक्त हसल्या.

                    

अगम्य,“चहा घेऊन येतेस का अभी जरा?” अगम्य अभिज्ञाकडे पाहत तिची झालेली गोची लक्षात घेत म्हणाला आणि हे ऐकून सगळे हसले अभिज्ञा मात्र किचनमध्ये पळाली.खूप वेळ गंभीर असलेले वातावरण जरा निवळले.


          सगळ्यांनी चहा घेतला आणि अहिल्याबाई परत बोलायला लागल्या.


अहिल्याबाई,“ तुझी शंका अगदी रास्त आहे अगम्य! मी त्या तीन वर्षात का नाही आले तुझी चौकशी करायला? आणि तू हॉस्पिटलमध्ये असताना ही का नाही आले?खरं तर गेल्या तीन वर्षात तुझ्या आयुष्यात काय घडतं आहे हेच मला माहित नव्हतं.तुझे लेख मला जाधवांनी (त्यांच्या बरोबर आलेल्या माणसाकडे बोट करून)दाखवले तेंव्हा मला कळले सगळे आणि लगोलग मी दोन दिवसात तुझ्याकडे आले!आता तू म्हणशील की तुम्हाला असे काय माहीत नाही हे सगळे तुम्ही कुठे होतात? तर ऐक गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मी हिमालयात माझ्या गुरूंच्या आश्रमात होते.तिथे कोणत्याच भौतिक सुविधा नाहीत. खरं तर मी एकाकी राहून आणि मुख्य म्हणजे तुझ्यापासून दूर राहून खूप विमनस्क झाले होते.जेंव्हा तुझे लग्न झाले आणि ते फोटो मी पाहिले तेंव्हा मला तुला भेटायचा मोह आवरत नव्हता रे! आणि जेंव्हा मला कळले की अभिज्ञा आई होणार आहे तेंव्हा मात्र माझा संयम सुटत चालला होता. माझ्या मनात खूप जास्त भावनिक वादळे उठू लागली.तुम्हा दोघांना भेटण्याचा मोह अनावर होत होता

            पण मला माहित होतं मी जर तुम्हाला भेटले तर ही दळभद्री पेंटिंग ही माझ्या मागे तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार म्हणून मग मी हिमालयात माझ्या गुरूंच्या आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला.पण तुझ्यावर लक्ष ठेवण्याचे काम मी जाधवांवर सोपवलं होत. दुर्दैवाने  जाधवांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना बायपास करायला सांगितले गेले. यांचा मुलगा अमेरिकेत असतो हे ऐकून तो आला आणि जाधवांना अमेरिकेला घेऊन गेला.त्यांना दहा दिवस झाले आहेत भारतात येऊन. जाधव अमेरिकेला गेल्यामुळे तुझ्यातला आणि माझ्यातला शेवटचा दुवा ही संपला होता आणि  तुझ्यावर लक्ष ठेवण्याचे काम मी दुसरं कोणाला ही सोपवु शकत नव्हते कारण मी सोडून जाधव आणि जोशी वकील या दोघांनाच तू म्हणजेच देशमुखांचा वारस जिवंत हे माहीत होते.जोशी वकील तर हयात नाहीत आता त्यांच्या ऐवजी त्याचा मुलगा आपले सगळे काम आणि बिजनेस ही पाहतो.आणि नेमका याच तीन -साडेतीन  वर्षात या पेंटींगने डाव साधला! मी या भ्रमात होते की सुरक्षित आहेस कारण ही पेंटींग रक्ताचा वास ओळखते.या पेंटींगला तुझ्या पर्यंत पोहचण्यासाठी रक्ताच्या नात्याचे माध्यम लागते आणि ते मध्यम मी होते. मीच तुझ्या पासून दूर आहे म्हणाल्यावर मला वाटले होते की ही पेंटींग तुझ्या पर्यंत नाही पोहचणार!पण माझा कयास चुकला! 

      जाधव भारतात आले आणि त्यांनी पहिल्यादा माझ्या सांगण्यावरून तुझी चौकशी करण्यासाठी औरंगाबाद गाठले.तेंव्हा तुझे लेख वाचून आणि चौकशी अंती हा सगळा उलगडा झाला. हे सगळं कळल्यावर ते तडक माझ्याकडे आले आणि दोन दिवसांतच आम्ही आज तुझ्या घरी आहोत.” त्यांनी हे सगळं सांगितले आणि त्या शांत झाल्या.


अगम्य,“ म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की ही पेंटींग माझ्या मधील तुमच्या रक्ताचा वास काढत माझ्या पर्यंत पोहचणार होती मग ही तुम्ही माझ्या आसपास नसताना ही माझ्या पर्यंत कशी पोहोचली?” त्याने प्रश्न विचारला.

    

      आता इतका वेळ शांत बसलेली अभिज्ञा बोलू लागली.


अभिज्ञा,“ तुला आठवत अगम्य आपण पुरातन वस्तूंच्या लिलावात गेलो होतो आणि तुला पहिल्यांदा या  पेंटिंगने आकर्षित केले होते म्हणजेच ही पेंटींग तिथे होती आणि योगायोगाने तुझा आणि या पेंटिंगचा सामना झाला आणि तुझ्यातील रक्ताच्या वासाने या पेंटींगने तुला ओळखले आणि तुला आकर्षित करून या पेंटींगने डाव साधला.” तिने स्पष्टीकरण दिले.


अहिल्याबाई,“ अभिज्ञा तू बरोबर बोलत आहेस!” त्यांनी दुजोरा दिला.


अगम्य,“ अरे वा! तुमच्याकडे तर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत की पण एक सांगा ही पेंटिंग तुमच्या मुलाच्या म्हणजे माझा बळी का मागत आहे? असं काय शत्रुत्व आहे या पेंटींगच आणि तुमचं पर्यायाने माझं?” त्याने विचारले.


         अहिल्याबाई काही बोलणार तर अभिज्ञाच्या आई अगम्यकडे पाहत बोलु लागल्या.


आई,“ आजच्या पुरते बास झाले अमू! घड्याळ बघ रात्रीचे आठ वाजले आहेत.राहिलेले उद्या विचार मिसेस देशमुख ही थकल्या असतील की!आता जेवण करा आणि झोपा राहीलेले प्रश्न उद्या! ” त्या म्हणाल्या आणि अगम्यचा ना इलाज झाला.


         अहिल्याबाई उठून उभ्या राहत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ ठीक आहे आम्ही उद्या सकाळी लवकर येऊ?” 


      हे ऐकून अभिज्ञाचे बाबा म्हणाले.


बाबा,“ आता कुठे जाणार तुम्ही?कुठे मुक्काम करणार?”


     या प्रश्नावर जाधव म्हणाले


जाधव,“ मी कालच लॉजमध्ये दोन रूम बुक केल्या आहेत.बाईसाहेब आणि मी तिथेच थांबू!” 


       खरं तर अभिज्ञा आणि तिच्या आई-बाबांना ही त्यांना घरीच ठेऊन घेण्याची खूप इच्छा होती पण तो अधिकार आणि कर्तव्य ही अगम्यचे होते म्हणून ते तिघे काहीच बोलले नाहीत.कारण त्याची अपेक्षा होती अगम्यने त्याच्या आईला थांबवावे! त्याच्या मनात त्यांच्या बद्दल किती ही राग असला तरी! 

     पण अगम्य मात्र  ते दोघे दारा पर्यंत जाऊ  पर्यंत शांतच होता.जसे काही तो स्वतःशीच द्वंद्व लढत होता.त्याने काही तरी विचार केला आणि तो म्हणाला.


अगम्य,“ थांबा! मी या शहरात असताना तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याची काहीच गरज नाही बाई तुम्ही इथेच राहा! तुम्ही जरी मला अनाथ आश्रमात सोडले असले तरी मी तुमच्याशी तसंच नाही वागू शकत! अभी या दोघांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कर!” असं म्हणून तो कोणाच्या ही उत्तराची  वाट न पाहता निघून गेला.

         

      अभिज्ञा आणि तिचे आई-बाबा मात्र स्मित हास्य करत होते आणि अहिल्याबाईंच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. कारण टोमणा मारून का होईना त्याच्या लेकाने त्यांना हक्काने माझ्या घरी राहा असे सांगितले होते.त्यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते.


अगम्यच्या घराण्याशी आणि पर्यायाने अगम्यशी  त्या पेंटींगचे काय शत्रुत्व होते? हा प्रश्न मात्र अजून ही अनुत्तरित होता! इतके मोठे घराणे आणि करोडोंची संपत्ती असून ही अगम्यच्या आईला म्हणजेच अहिल्याबाईना त्याला अनाथा सारखे वाढवावे लागले होते असे काय रहस्य त्या पेंटिंगमध्ये दडले होते? सगळे सत्य समजल्यावर अगम्य अहिल्याबाईना माफ करेल  का?

क्रमशः



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule















         


        




🎭 Series Post

View all