दि लूप होल (भाग २५)

This is thriller and suspense story

       अगम्यचा असा अवतार पाहून अभिज्ञा आणि तिचे आई-बाबा चकित होते. पण ती बाई आणि तिच्या बरोबरचा माणूस मात्र शांत होते.जसे काही त्यांना माहीत होते की अगम्य ती फाईल पाहून असा रियाक्ट होणार आहे.अभिज्ञाने अज्ञांकला तिच्या आई जवळ दिले आणि अगम्यच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाली.


अभिज्ञा,“ अगम्य इतकं काय झालं चिडायला आणि त्या फाईलमध्ये अस काय आहे!” तिने खाली पडलेली फाईल उचलली आणि ती पाने पालटून ती वाचू लागली.ती फाईल वाचत-वाचत ती मटकन खाली बसली.


  आता त्या बाई अजून ही शांतपणे बोलू लागल्या.


बाई,“ अगम्य शांत हो तू किती ही आकांडतांडव केला तरी हेच सत्य आहे की माझा…..” त्या पुढे बोलणार तो पर्यंत अगम्यने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि तो रागाने लाल होत म्हणाला.


अगम्य,“ मी तुमचा कोणी ही नाही तुम्ही निघू शकता आता!” तो रागाने थरथरत म्हणाला.


    अभिज्ञाचे आई-बाबा हे नेमके काय चालेले आहे. हे न कळल्यामुळे फक्त पाहत होते.तरी न राहवून त्यांनी आगम्यला विचारले.


बाबा,“ हे काय चालले आहे अगम्य? आम्हाला ही कळू शकेल का?”


अगम्य,“या फाईल नुसार ही बाई माझी आई आहे म्हणे!या फाईलमध्ये  माझे बर्थ सर्टिफिकेट आणि बर्थ डिटेल्स आहे आणि हो मी आता ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो तिथे जाऊन या बाईने माझे आणि यांचे D. N. A. मॅच होतात असे सर्टिफिकेट ही या फाईलमध्ये लावले आहे.” तो त्या बाईकडे तिरस्काराने पाहत बोलत होता.  

  

अभिज्ञाची आई,“ काय बोलतोस काय अमू?” त्या आश्चर्याने म्हणाल्या.


अगम्य,“ एकदा सांगितलेले तुम्हांला कळत नाही का बाई? या तुम्ही!” तो जोरात हातावर हात आपटत हात जोडून म्हणाला.


        इतका वेळ  शांत बसलेली अभिज्ञा आता बोलू लागली.


अभिज्ञा,“ अगम्य please stop this nonsense!त्या तुझ्या आई आहेत तू त्यांच्याशी असं नाही वागू शकत!” तिने अगम्यला दटावले. पण अगम्य कोणाचे ही बोलणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.


अगम्य,“ असले पेपर्स दाखवून कोणी ही उद्या येईल माझी आई म्हणून आणि हो मी अनाथ आहे आणि माझी आई कोणी असेल तर ती आहे!(अभिज्ञाच्या आईकडे बोट करून तो म्हणाला) आणि बायोलॉजीकली ही बाई माझी आई असेल तरी मला काही फरक पडत नाही अभिज्ञा! कारण ज्या वेळी मला या बाईची सगळ्यात जास्त गरज होती ना त्या वेळी या बाईने मला अनाथ आश्रमात फेकून दिले एका अनाथाचे आयुष्य जगायला आणि आता आली का ही बाई माझ्यावर हक्क गाजवायला! मला या बाईचे तोंड ही पहायचे नाही.तुला हिचा पुळका आला असेल तर खुशाल बस या बाईला घेऊन ही बाई गेली की मला सांग!” तो रागाने हे सगळं बोलत होता पण गरम अश्रुंचे कढत त्याच्या डोळ्यातून वाहत होते. तो हे सगळं बोलून तरातरा बेडरूममध्ये निघून गेला आणि दार जोरात आपटले.


       अगम्य बोललेला एक एक शब्द शिशाचा गरम रस ओतावा तसा  अहिल्याबाईच्या कानात जात होता आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्या मटकन खाली बसल्या त्यांची अवस्था पाहून अभिज्ञा किचनमध्ये गेली आणि पाणी घेऊन आली.तिने त्यांना पाणी दिले. बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हते.हॉलमध्ये पाच माणसे त्यांच्या त्यांच्या भाव विश्वास हरवली होती. शेवटी अभिज्ञाची आईच अभिज्ञाला म्हणाल्या.


आई,“ अभी अमू जवळ जा! त्याला सगळ्यात जास्त गरज तुझी आहे आत्ता! त्याला आज खूप मोठा धक्का बसला आहे.बराच वेळ झालं त्याचा आवाज पण नाही जा बाई लवकर!” त्या काळजीने बोलत होत्या.


          अभिज्ञा एकदम भानावर आली आणि ती काहीच न बोलता बेडरूममध्ये गेली.अभिज्ञा बेडरूममध्ये गेली तर तो तिला बेडरूमच्या गॅलरीत उभा असलेला दिसला.  खूप दिवसांनी खपली धरलेल्या जखमेची खपली कोणी तरी ओरबडून काढल्यावर जी अवस्था माणसाची होते तशीच अवस्था अगम्यची झाली होती. त्याला कायमच त्याच्या जन्मदात्यांनी  ओळख, नाव देऊन सुध्दा त्याला नाकारलं आहे ही खंत म्हणण्यापेक्षा दुःख आणि राग होता आणि आज त्याला नाकारलेली त्याची जन्मदात्री अचानकपणे त्याच्या समोर येऊन उभी राहिली  होती ते ही सगळ्या पुराव्या सहित! त्यामुळे अगम्य आतून पूर्णपणे उध्वस्त झाला होता.त्याला हा खूप मोठा मानसिक धक्का होता.अभिज्ञा त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला   तिच्या स्पर्शाने तो भानावर आला. डोळे रडून सुजलेले दिसत होते. तो काहीच न बोलता तिला मिठी मारून रडत होता.अभिज्ञाने ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तो जरा शांत झाल्यावर तिने त्याला आत नेले बेडवर बसवुन त्याला पाणी दिले. अगम्यने पाणी पिले व तो अभिज्ञाला म्हणाला.


अगम्य,“ही बाई का आली आहे अभी? हिने मला जन्म देऊन सोडून दिले अनाथ आश्रमात आणि मग आता माझ्यावर हक्क गाजवायला का आली आहे?” तो पुन्हा रडू लागला. अभिज्ञाने त्याचे डोळे पुसले व ती बोलू लागली.


अभिज्ञा,“ बास अमू रडणं! किती त्रास करून घेशील तू स्वतःला? माझं एक ऐकशील का?” ती त्याचा हात धरत म्हणाली.


अगम्य,“ हुंम” तो तिच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाला.


अभिज्ञा,“ तुला सांगू मी ही एक आई आहे! कोणती ही आई तिच्या मुलाला तसच मोठं कारण असल्या शिवाय स्वतः पासून दूर करणार नाही.मला वाटत तू त्यांचे म्हणणे एकदा ऐकून घ्यावेस! तूच म्हणालास की त्या तुझ्या वाढदिवसा दिवशी त्यांचा मुलगा गेला व त्याचा वाढदिवस आहे म्हणून दर वर्षी आश्रमात यायच्या म्हणजेच त्या तुझ्याचसाठी येत असणार ना! पण त्यांनी तुला आश्रमात का सोडले? त्या इतकी वर्षे तू कुठे आहेस हे माहीत असून तुझ्या आसपास राहून ही तुला बिन ओळख दाखवता का राहिल्या? आणि आत्ताच त्यांना तुला ओळख दाखवावी तुझ्याकडे यावे ते ही तुझा लेख वाचून का वाटले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून ऐक! त्या तुझ्याशी अशा का वागल्या? या प्रश्नांची  उत्तरे तुला पटतात का बघ? जर तुला ती नाही पटली तर आपण त्यांना जायला सांगू. मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या बरोबर आहे.पण त्यांचं काही ही न ऐकून घेता असा रागाच्या भरात आततायी निर्णय घेणे चुकीचे आहे!” तिने त्याला समजावले.


अगम्य,“ ठीक आहे! पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं!जर मला त्या बाईचे कारण समर्पक नाही वाटले तर तू आत्ता म्हणाली तसं मला माझा निर्णय घेण्यापासून अडवणार नाही!” तो तिच्या  पुढे हात करत म्हणाला.


अभिज्ञा,“ दिलं प्रॉमिस! मग उठ आता आणि फ्रेश हो मी स्वयंपाकाचे पाहते आणि पानं वाढल्यावर तुला हाक मारते. तू ना नाष्टा केलायस ना सकाळची औषधे घेतली आहेस.दुपारची औषधे चुकायला नकोत!” ती  काळजीने म्हणाली आणि तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या कपाळाचे चुम्बन घेतले.


अगम्य,“नको आहे मला जेवायला!” तो तोंड फुगवून म्हणाला.


अभिज्ञा,“ ठीक आहे.पण तुला माहीत आहे तू नाही जेवलास तर आमच्या पैकी कोणीही जेवणार नाही.आपण सगळे उपाशी राहू मग आज!” ती असं म्हणून उठली.


अगम्य,“ बरं बाई मी जेवण!” तो म्हणाला.

     

       हे ऐकून अभिज्ञा हसली आणि निघून गेली.अगम्य मात्र पुन्हा त्याच विचारांच्या तंद्रीत हरवला.इकडे अभिज्ञा हॉलमध्ये आली आणि अहिल्याबाईंना म्हणाली. अगम्य तुमचं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे.  पण तुम्हाला स्वीकारायचे की नाकारायचे सर्वस्वी शेवटचा निर्णय त्याचा असेल.तुम्ही बसा मी स्वयंपाक करते आपण जेवू मग सविस्तर बोलू अगम्य ही येईल आणि ती किचनकडे वळणार तर अहिल्याबाई संकोचून म्हणाल्या. 


अहिल्याबाई,“ तुम्हीं जेवून घ्या आम्ही जातो माझा फोन नंबर लिहून घे तुमचं आवरलं की मला कॉल कर” त्या उठत म्हणाल्या.


अभिज्ञा,“ थांबा! तुमच्या मुलाचे घर आहे हे कोणा परक्याचे नाही!जर तुम्ही जेवणार नसाल तर आम्ही ही थांबतो.मी अगम्यला बोलवते.तुम्हांला काय सांगायचे बोलायचे ते आत्ताच बोलू!” ती हक्काने म्हणाली.


      हे तिचे बोलणे ऐकून अहिल्याबाईंनी पाणावलेले डोळे पुसले व त्या म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ठीक आहे आम्ही जेवू आणि त्या पुन्हा सोप्यावर बसल्या. पण त्या बराच वेळ रागाने त्या पेंटिंगकडे पाहत होत्या.


      अभिज्ञा आणि त्याच्या आईने स्वयंपाक केला.खरं तर जो काही धक्का आज  अभिज्ञाला आणि तिच्या कुटुंबाला बसला होता त्यामुळे कोणाचीच जेवायची  इच्छा नव्हती आणि पुढे अहिल्याबाई काय सांगणार आहेत आणि त्याचा अजून काय परिणाम अगम्यवर त्यामुळे कुटुंबावर होणार होता. या विचाराने सगळ्यांच्याच मनात विचारांचे  काहूर माजले होते.अगम्य तर आतून पूर्ण उध्वस्त झाला होता त्याला जेवायची काय पण काहीच करायची इच्छा नव्हती पण अभिज्ञा आणि तिच्या आई-बाबामुळे तो जेवायला बसला होता. तो कसा तरी सगळ्यां बरोबर एक एक घास गिळत होता. पण त्याचे कशातच लक्ष नव्हते.अहिल्याबाईंची तर अवस्था वेगळीच होती. त्या या सगळ्यां बरोबर  विशेष करून अगम्य बरोबर जेवताना अवघडल्या होत्या आणि अगम्य काय निर्णय घेईल तो आपले सगळे ऐकून घेईल का?आपलाच मुलगा आपल्याशी कसा वागेल या विचारांचे काहूर त्यांच्या मनात उठले होते.

           प्रत्येकाच्या मनात वेगळा प्रश्न प्रत्येकाच्या मनात वेगळं काहूर पण  सगळ्यांच्या विचारांना सांधणारा आणि सगळ्यांना एका माळेत ओवणार धागा एकच तो म्हणजे अगम्य! 

          सगळ्यांचे विचार आणि भावना व जीवनाचा केंद्र बिंदू अगम्यच बनला होता.सगळ्यांनी कसे बसे थोडे-फार जेवण केले.अगम्य कोणालाच काही ही न बोलता हॉलमध्ये जाऊन बसला. त्याच्या मागेच सगळेच हॉलमध्ये आले.बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हते. हे पाहून अभिज्ञानेच बोलायला सुरुवात केली.


अभिज्ञा,“ तुम्हांला काय बोलायचे ते बोला आता!”अभिज्ञा अहिल्याबाईंना पाहून म्हणाली.


       अहिल्याबाई जणू मनात शब्दांची जुळवाजुळव करत बोलू लागल्या.


अहिल्याबाई,“ पहिल्यांदा मला सांगा ही पेंटींग तुमच्या घरात कशी केव्हा आली आणि त्यानंतर काय काय घडले?” त्यांनी विचारले

          अगम्यने अभिज्ञाला डोळ्याने खुणावले.तशी अभिज्ञाने अगम्य पेंटींगकडे आकर्षित होऊन ती पेंटिंग घरात कशी आली.त्यानंतर तीन वर्षे अगम्य गायब झाला आणि परत आला. त्याची अवस्था आणि त्याने मी पेंटींगमध्ये अडकलो होतो हे सांगितल्यावर कोणाचा ही त्याच्यावर विश्वास न बसणं याचा थोडक्यात आढावा अभिज्ञाने दिला.ती पुढे काही अजून सांगणार होती पण अहिल्याबाई मधेच भावूक होत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ तुझ्या प्रेमाने तारले अगम्यला एकदा नाही दोनदा! प्रत्येकाचेच प्रेम इतकं भाग्यवान नसत पोरी! माझ्या लेकाला तुझ्या सारखी बायको मिळाली हे आमचं भाग्य!” त्या डोळे पुसत म्हणाल्या.

       

        पण  माझा लेक हे अहिल्याबाईंच्या तोंडून शब्द ऐकून अगम्य भलताच चिडला आणि चिडून बोलू लागला.


अगम्य,“ वो बाई कोणाचा लेक? मी तुमचा कोणी ही नाही! उगीच नाती जोडू नका मी  तुमचं ऐकून घेतोय कारण माझ्या बायकोचा तसा हट्ट आहे दुसरं कारण काहीच नाही! आणि आत्ता बरी आठवण झाली लेकाची?बाकी सगळं राहूच द्या तुम्ही जर माझ्या आसपास होतात तर मी गायब झालो तेंव्हा कुठे होतात तुम्ही आणि ज्या हॉस्पिटलमधून तुम्ही माझ्या रक्ताचे नमुने घेऊन D. N. A टेस्ट करून मला दाखवायला आणले आहेत ना त्याच हॉस्पिटलमध्ये मी जवळजवळ दोन महिने होतो.मृत्यशी झुंज तिथेच दिली आहे मी! तेंव्हा का नाही आलात तुम्हीं? बोला ना?”तो रागाने बोलत होता.


अहिल्याबाई,“ तू विचारलेले सगळे प्रश्न योग्य आहेत आणि तुझा राग सुद्धा! तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील पोरा! मला या दळभद्री पेंटींगने तुझ्या बरोबर काय-काय केले ते सविस्तर कळू दे! आपल्या सगळ्या दुःखाच मूळ ही दळभद्री पेंटींग आहे!या पेंटींगचा कायमचा बंदोबस्त कारायलाच मी आले आहे आणि तो केल्या शिवाय तू किती ही जा म्हणालास ना अगम्य तरी मी जाणार नाही! अभिज्ञा बेटा त्यानंतर काय झाले?” असं म्हणून त्यांनी स्वतः ला सावरले.


अभिज्ञा,“ खरं तर आमचा कोणाचाच म्हणजे अगदी  माझा देखील अगम्यच्या बोलण्यावर विश्वास नव्हता की तो या पेंटींगमध्ये अडकला होता म्हणून पण नऊ  दिवसा पूर्वी अमावस्येच्या रात्री मला अगम्य बेडवर नाही दिसला म्हणून मी त्याला शोधत हॉलमध्ये आले तर खरंच अगम्य काही अदृष्य पायऱ्या चढून या पेंटिंगमध्ये जात असलेला मला दिसला मी घाबरून त्याला ओढले. त्या दिवशीच मला कळले की अगम्य खरं बोलत होता!” तिने एक सुस्कारा सोडत सांगितले.हे ऐकून अभिज्ञाचे बाबा आणि आई चकित होते.अभिज्ञाची आई  बोलू लागली.


आई,“ एवढं सगळं घडत होतं पण तुम्ही दोघांनी आम्हाला एका शब्दानी ही सांगितले नाही! काय रे अमू आई म्हणतोस ना मला?आणि अभी तू ही?” त्या तक्रारीच्या सुरात म्हणाल्या.


अगम्य,“ मीच सांगितलं होतं  अभीला की तुम्हांला काही कळू देऊ  नको म्हणून कारण अभी सारखं तुम्ही ही टेन्शनमध्ये आला असतात आणि ते मला नको होते”त्याने स्पष्टीकरण दिले.


बाबा,“ मग तुमच्या दोघांचे भांडण या पेंटींगमुळे तर झाले नव्हते?” बाबांनी शंका उपस्थित केली.


अभिज्ञा,“ हो बाबा अगम्यला या पेंटींगचा अभ्यास  करायचा होता.त्याला तिथे अडकलेल्या लोकांना सोडवायचे होते.आणि हो त्या पेंटींगमधले लूप होल अमावस्येला खुलते आणि ते अगम्यला आकर्षित करते. एक वेळ चुकून अगम्य पेंटींगमध्ये गेला आणि मरणासन्न अवस्थेत बाहेर आला किती  मुश्किलीने त्याचा जीव वाचला आहे.पुन्हा मला ते सगळं नको आहे म्हणून मी त्याच्याकडून त्या पेंटींगचा नाद सोडायचे वचन घेतले आणि ती पेंटींग मी घरातून बाहेर काढणार असे सांगितले. त्यामुळेच माझे व अगम्यचे भांडण झाले होते!” तिने सांगितले.


अहिल्याबाई,“ त्या पेंटिंगला बाहेर काढणे इतके सोपे नाही. ती आपल्या मर्जीने येत ही नाही आणि जात ही नाही. त्या पेंटिंगचा उद्देश पूर्ण झाला की गायब होते.” त्या गंभीरपणे म्हणाल्या.


अभिज्ञा,“मग आमच्या आयुष्यात  त्या पेंटींगचा येण्याचा उद्देश काय आहे?” तिने विचारले.


अहिल्याबाई,“ अगम्यचा बळी घ्यायचा आहे त्या पेंटिंगला!” त्या गंभीरपणे म्हणाल्या. 


       हे ऐकून सगळेच भेदरलेल्या नजरेने अहिल्याबाईंकडे पाहू लागले. अभिज्ञा मात्र घाबरून रडायला लागली होती. अगम्य तिच्या जवळ तिला समजवायला गेला तशी अभिज्ञा त्याला बिलगून रडायला लागली. बाकी सगळे शांत होते फक्त अभिज्ञाचा रडण्याचा आणि हुंदके देण्याचा आवाज येत होता. अभिज्ञा शांत होऊन भानावर आली तशी ती अगम्य पासून दूर झाली. अगम्य तिचे डोळे पुसत म्हणाला.


अगम्य,“ घाबरू नकोस अभी मला काही होणार नाही!(आणि अहिल्याबाईंकडे रागाने पाहत म्हणाला) तुम्ही इथे माझ्या कुटूंबाला घाबरवायला आला आहात का?” 


            अहिल्याबाईंच्या अगम्यचे बोलणे जिव्हारी लागत होते पण त्यांनी अगम्यचे  असे वागणे बोलणे गृहीत धरले होते आणि त्या मनाची तयारी करून आल्या असल्या तरी त्या ही एक माणूस आणि एक आई होत्या! तरी त्या धीर न सोडता म्हणाल्या. 


अहिल्याबाई,“ हेच कटू असलं तरी सत्य आहे.एका प्रश्नाच उत्तर दे अगम्य! या पेंटिंग मधला तो बंगलीच्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या इसमाने एक विशिष्ट  हत्यार घेऊन तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला का?”त्यांनी अगम्यकडे पाहत विचारले.


अगम्य“हो त्या पेंटींग मधील त्या विचित्र इसमाने माझ्यावर बऱ्याच वेळा त्याच्या कडील हत्याराने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो कशाला तरी घाबरून माझ्या जवळ येत नव्हता. जेव्हा मी लक्ष दिले तेंव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो अभिज्ञाने माझ्या गळ्यात ओमचे पेंटल असलेल्या लॉकेटला घाबरत होता.पण हे सगळे तुम्हाला कसे माहीत” तो आश्चर्याने म्हणाला.


अहिल्याबाई,“  केवळ अभिज्ञाचे तुझ्यावर असलेल्या उत्कट प्रेमाने तू वाचला आहेस अगम्य!पण आता या पेंटिंगचा सोक्षमोक्ष आपल्याला लावावा लागेल नाही तर  ही पेंटींग तुझ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या ही जीवावर उठणार आहे” त्या गंभीर होत म्हणाल्या.


अगम्य त्याच्या जन्मदात्या आईला स्वीकारेल का? पण अहिल्याबाईंनी अगम्यला अनाथ आश्रमात का सोडले होते? त्या पेंटिंग मधल्या इसमाचा आणि अगम्यचा काय संबंध होता जो त्याच्या जीवावर उठला होता?अहिल्याबाई जर अगम्यच्या असपास होत्या तर अगम्य म्हणाला तसं तो गायब झाला तेंव्हा आणि तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता तेंव्हा त्या का नाही आल्या?

क्रमशः



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule














           




  

🎭 Series Post

View all