दि लूप होल (भाग २३)

This is a thrilling and suspense story

                 दुसऱ्या दिवशी अगम्यचा मूड बरा पाहून अभिज्ञाच्या आई-बाबांना बरे वाटले. आता अभिज्ञा तिचा मोर्चा त्या पेंटिंगकडे वळवायला निश्चिंत झाली होती.त्या पेंटींगची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार आता ती करू लागली होती.पण अगम्यने अभिज्ञाला त्या पेंटिंगचा नाद सोडण्याचे वचन दिले असले तरी तो मनातून अस्वस्थ होता पण अभिज्ञाच्या आनंदासाठी तो तसे दाखवत नव्हता आणि त्याला मनातून असे सारखे  वाटत होते की ती पेंटिंग त्याचा पिच्छा इतक्या सहजासहजी नाही सोडणार!


                 अभिज्ञा मात्र आता त्या पेंटिंगला कोठे तरी दूर सोडून येण्याच्या तयारीत होती पण ती योग्य वेळेची वाट पाहत होती.इकडे तिच्या आई-बाबांना मात्र यातले काहीच माहीत नव्हते. तिची आई अगम्यला नॉर्मल पाहून खुश होती. दुपारची जेवणे झाली.अगम्य टी. व्ही. पाहत सोफ्यावर बसला होता.अभिज्ञा अज्ञांकला बेडरूममध्ये नेऊन झोपवत होती. तिची आई किचन मधून काही तरी करून बाहेर आली आणि सोफ्यावर जाऊन बसली.अगम्य अपचुकच त्याच्या मांडीवर डोके ठेऊन झोपला.त्या त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत त्याच्याशी बोलू लागल्या.


आई,“ अमू  तुला बरं वाटतंय ना आता?” त्यांनी काळजीने विचारले.


अगम्य,“ हो आई मी बरा आहे आता!” तो म्हणाला.


आई,“ तुला किती वेळा सांगितले की अभी काही बोलली तर मला सांगत जा!  तू गावगप्पा करशील माझ्याशी पण अभी बद्दल तक्रार नाही करणार! ती जरा वेडी आहे रे जरा हुड आहे अजून तू नको तीच बोलणं मनाला लावून घेत जाऊस!” त्या म्हणाल्या.


अभी,“ माहीत आहे आई ते मला! मी नाही घेणार मनाला लावून तिचे बोलणे!” तो म्हणाला.


       इकडे अभिज्ञा बेडरूम मधून आई म्हणून हाक मारत येत असताना बाबांनी पाहिले आणि त्यांनी तिला तिथेच अडवले आणि बोटाने सोफ्याकडे इशारा केला.अभिज्ञा आणि तिचे बाबा हॉलच्या एका कोपऱ्यात उभे राहून दोघे त्या दोघांकडे कौतुकाने पाहत त्यांचे बोलणे ऐकत होते. अभिज्ञा हळू आवाजात तिच्या बाबांना म्हणाली.


अभिज्ञा,“ बाबा मला काय भाकरी देऊन घेतलं आहे का या आईने? बघा बघा काल मला नाही नाही ते बोलली आणि आज मला वाटले होते माझे लाड करेल तर पहा लाड कोणाचे चालले आहेत?”ती नाटकीपणे म्हणाली या तिच्या बोलण्यावर दोघे ही तोंड दाबून हसले.


बाबा,“ अग काही ही काय बोलतेस अभी! तुझ्या आई बद्दल तुला एक गोष्ट सांगतो. तुझी आई दहा वर्षांची आणि तुझी सुलू मावशी बारा वर्षांची असेल तेव्हा त्यांचे बाबा गेले. गावाकडे शेती भरपूर आहे. तुझ्या आईचे बाबा सरकारी नोकर असल्याने अनुकंपा तत्वावर तिची आई नोकरीला लागली पण त्यांच्या भावकीला जमीन हवी होती यांच्या वाटणीची! कारण या बाईला दोन मुलीच आहेत कशाला यांना जमीन हवी? म्हणून या तिघींना खूप त्रास दिला त्यांनी पण तुझी आजी खमकी होती ती बधली नाही. या दोघींना शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं आणि लग्न ही केली दोघींची! इथे प्रश्न जमिनीचा नव्हताच मुळी तर हक्काचा होता.दोघींची लग्न झाल्यावर तुझ्या आजीनी जमीन दोघींच्या नावावर केली. पण या सगळ्यात तुझ्या आईच्या मनावर परिणाम झाला की आपल्याला भाऊ असता तर कोणी त्रास दिला नसता आपल्याला! तिला भाऊ,बाप,मुलगा  या नात्यांचे कायम अप्रूप होत आणि हो आपल्याला मुलगा असावा ही तिची इच्छा होती. तुझ्या जन्माच्या वेळेस तिला मुलगा हवा होता ती मुलगा मुलगी असा भेद करते म्हणून नाही! तर कमीत कमी मुलाच्या रुपात आपल्याला एक वेगळं नात मिळावं त्याच तिला आकर्षण होत. तुझ्या जन्माच्या वेळेस खूप कॉप्लिकेशन्स आल्या आणि डॉक्टरांनी दुसऱ्या मुलाचा चान्स घेऊ नका असे सांगितले तरी ही फॅमेली प्लॅनिंगचे ऑपरेशन करून घ्यायला तयार होई ना! कारण हिला मुलगा हवा होता मग मीच ते करून घेतले.तेंव्हा ही ती माझ्याशी खूप भांडली महिनाभर बोलली नाही पण कालांतराने तुझ्या संगोपनात रमली. तिची मुलाची सुप्त इच्छा आणि एक पोकळी कायम राहिली.तिने अगम्यला पाहिले आणि तिच्या मनाने त्याला मुलगा म्हणून निवडले.अभी तुझा नवरा किंवा जावई म्हणून तिला अगम्य आवडलाच पण तिला तो मुलगा म्हणून आवडला होता.अगम्यच्या रुपात तिला मुलगा मिळाला.म्हणून तिने जी इतके वर्षे मुलासाठी माया,प्रेम राखून ठेवले होते ते ती अगम्यवर मुक्त हस्ताने उधळते! आणि आईच्या प्रेमासाठी  तरसलेल्या अगम्यने ही तिला तितकाच जीव लावला आहे.पण असं अजिबात नाही की तुझ्या आईचा तुझ्यावर जीव नाही!” ते हसून म्हणाले.


अभिज्ञा,“ बाबा खरंच प्रत्येक नात्याला किती वेगवेगळे पदर आणि छटा असतात ना! प्रत्येक माणूस कोणतं ना कोणतं नात कुठे ना कुठे शोधत असतो!”ती त्या दोघांकडे पाहत म्हणाली.


बाबा,“हो ना बघ काय बोलणं चालले आहे दोघांचे!” असं म्हणून पुन्हा दोघे त्यांचे बोलणे ऐकू लागले.


अभिज्ञाची आई अगम्यला बोलत होती.


आई,“ काय हे अमू केस किती रुक्ष झालेत तुझे!   चंपी करून देते आज रात्री तुझी! आणि हो तब्बेतीकडे लक्ष असू द्या जरा!” त्या काळजीने बोलत होत्या.


अगम्य,“ हो आई! तुम्हीं काळजी नका करू आणि  हो खूप दिवस झाले तुमच्याकडून चंपी करून घेऊन आज कराच!” मांडीवर डोके ठेऊन तो त्यांचा हात धरून बोलत होता.


      अभिज्ञा हे सर्व ऐकून तिच्या बाबांना म्हणाली.

अभिज्ञा,“ या दोघांच गुळपीठ सुरूच राहणार आहे.मी चहा करते सगळ्यांसाठी!”  ती असं म्हणून हसत किचनमध्ये निघून गेली.  


      बाबा चुपचाप हॉलमध्ये खुर्चीवर जाऊन बसले. टी. व्ही.पाहत आणि त्या दोघांचे बोलणे कौतुकाने ऐकत!

★★★★


       अगम्य सकाळी सकाळी कोणाशी तरी  मोबाईलवर बोलत होता. आज रविवार होता आणि अगम्यच्या लेखमालेचा पुढचा भाग छापून आला होता.कदाचित तो त्याच संदर्भात कोणाशी तरी बोलत असावा. अभिज्ञा चहा घेऊन आली  आणि आगम्यने फोन ठेवला. अभिज्ञाने त्याला चहाचा कप देत विचारले.


अभिज्ञा,“ कोणाशी बोलत होतास अमू!” ती म्हणाली.


अगम्य,“ अग त्या सप्तरंगच्या संपादकाशी बोलत होतो.त्यांना सांगत होतो की ‛मी आणि माझा वेडेपणा’ ही लेखमाला मी इथून पुढे लिहू शकणार नाही पण ते म्हणत आहेत की माझी  लेखमाला खूप गाजत आहे वाचक वाट पाहतात म्हणे पुढच्या भागाची! त्यामुळे मी लिहणं बंद नाही करू शकत.” तो चहा पित म्हणाला.


अभिज्ञा,“ पण तू का नाही लिहू शकणार? छान लिहतोस की लिही!” ती म्हणाली.


अगम्य,“ अग ती लेखमाला  सुरू करण्या मागे एक उद्देश होता आणि तो उद्देश आता राहिला नाही.मग कशाला उगीच लिहा तरी आता लिहावी तर लागेलच!” तो म्हणाला.


अभिज्ञा,“ म्हणजे?” तिने विचारले.


अगम्य,“ मला वाटत होते की ती लेखमाला वाचून कोणी तरी माझ्यासारखे  लूप होल मध्ये अडकलेले माझ्याशी संपर्क साधेल आणि मला त्याचा फायदा या पेंटींगचा अभ्यास करताना होईल पण आता त्या पेंटिंगचा अभ्यासच नाही करायचा तर लेख तरी का लिहा? असा विचार करत होतो मी पण any way मला ती लेखमाला पूर्ण लिहावी लागेल आता!” तो कप टेबलावर ठेवत म्हणाला.


अभिज्ञा,“ अच्छा! पण तू ती लेखमाला पूर्ण कर आता! आणि तो कप टेबलावर का ठेवलास? आन तो इकडे मी घेऊन जाते!” तिने  असं म्हणून त्याच्या पुढे हात केला.


   तर अगम्यने तुला कप देण्या ऐवजी जोरात स्वतः जवळ ओढले. अचानक लागलेल्या या झटक्यामुळे सहज उभी राहिलेली अभिज्ञा त्याच्या अंगावर पडली आणि अगम्यने तिला घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला.


अगम्य,“ अशी कशी जाशील?मी सोडल्या शिवाय!” तो तिचा चेहरा स्वतः कडे वळवत म्हणाला.


अभिज्ञा,“ काय हे अमू! सोड मला दार उघड आहे” ती त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


अगम्य,“ कोण म्हणाल दार उघड आहे म्हणून बघ जरा मी तुझ्याशी बोलत बोलत केंव्हाच ते लावलय!” तो तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाला.


अभिज्ञा,“ तू दिवसेंदिवस बिघडत चालला आहेस!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ तूच बिघडले आहेस मला! भोग आता तुझ्या कर्माची फळं!” असं म्हणून त्याने तिच्या ओठावर अलगद ओठ ठेवले.

            अभिज्ञा ही त्यांच्या श्वासात गुंतत गेली.बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये गुंतत होते.थोडा वेळाने अभिज्ञाच लांब होत म्हणाली.


अभिज्ञा,“ बास झालं! जाते मी आता तू असच करतोस नेहमी! उद्या पासून चहा प्यायला बाहेर यायचं!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ जा! नाही येणार तुला रोजच इथेच आणावा लागेल चहा!” तो तिला पुन्हा मिठी मारत हळूच कानात म्हणाला.


अभिज्ञा,“नालायक आहेस तू!बरं जाते ना मी कामं आहेत मला!” ती त्याच्या मिठीत विसावली होती पण तोंडाने असं बोलत होते.


अगम्य,“ थांब ना अजून थोडा वेळ!” तो त्याची मिठी अजून घट्ट करत म्हणाला.


अभिज्ञा,“सोड आता खूप कामे आहेत! रोज सकाळी तुझ्यामुळे मला उशीर होतो!” ती तक्रार करत त्याच्या मिठीतुन सुटत म्हणाली.


अगम्य,“ बरं जा मग! मी उद्यापासून नाही अडवणार तुला!”तो तिला चिडून म्हणाला.


अभिज्ञा,“ अरे वा! म्हणजे माझी रोज सकाळची ती गोड मॉर्निंगची कटकट मिटली म्हणायची!” ती बेडवर बसत त्याला चिडवत म्हणाली.


अगम्य,“ तुला आता उशीर नाही होत का?” तो चिडक्या आवाजात म्हणाला.


अभिज्ञा,“ होतय पण माझं काम राहिल आहे एक!” ती त्याला  बेडवर बसवत म्हणाली.


अगम्य,“ काय राहीलय आता! बरं कर मी जातो बाहेर” तो उठून जात म्हणाला.


अभिज्ञा,“ तुझ्या शिवाय नाही होणार ते!” असं म्हणून तिने त्याला पुन्हा बेडवर बसवले आणि  त्याला जवळ ओढले आणि त्याच्या कपाळावर ओठ ठेवत म्हणाली “ I love you” पुन्हा त्याच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली“I love you” पुन्हा दुसऱ्या गालावर आणि शेवटी ओठावर ओठ ठेवले आणि म्हणाली“ I love you so much”


अगम्य,“ अच्छा! तर आत्ता आठवण झाली म्हणायची!” तो हसत तिला म्हणाला आणि तिच्या आणखीन जवळ जाणार तर ती उठून पळून गेली.अगम्य मात्र तिथेच बसून राहिला हसत!


       दुपारची जेवणे झाल्यावर सगळे झोपले आहेत याची खात्री करून अभिज्ञा तयार झाली.ती  हॉलमध्ये आली तिने ती पेंटिंग कसला ही आवाज न करता काढली आणि पेंटींग कारमध्ये ठेवून ती गावा बाहेर एका निर्जंन ठिकाणी गेली. तिथे ती पेंटींग जवळजवळ फेकतच ती घरी आली आणि सुटकेचा निःश्वास सोडला. ती हॉलमध्ये येऊन बसली पाहते तर काय ती पेंटिंग त्याच जागेवर शाबूत होती. अभिज्ञा पूर्ण चक्रावली तिला वाटले की तिने पेंटिंग फेकल्याचे स्वप्न पाहिले की काय! म्हणून तिने स्वतःला चिमटा घेऊन पाहिला तर  खरंच ती जागी होती आणि तिने पेंटिंग दूरवर नेऊन फेकली होती पण ती घरी येण्याच्या आधीच ही पेंटिंग घरी कशी पोहोचली याच विचारात ती पडली होती. 

    

     पण तिने अगम्यला काहीच सांगायचे नाही असं ठरवलं आणि पुन्हा एकदा या पेंटींगला कुठे तरी सोडून येऊ किंवा ही पेंटिंग नष्टच करू आता! ती असा विचार करून संध्याकाळची कामे आवरू लागली. अगम्य किचनमध्ये आला आणि त्याने तिला विचारले.


अगम्य,“ दुपारी कुठे गेली होतेस अभी?” तो म्हणाला.


अभिज्ञा,“ जरा मैत्रिणीकडे गेले होते. घरात बसून कंटाळा आला होता मला!” ती त्याची नजर टाळत म्हणाली.


          हे ऐकून अगम्य नुसती बरं म्हणून निघून गेला.दुसऱ्या दिवशी पुन्हा ती सकाळ पासून त्या पेंटिंगचा विचार करत होती. तुझं कशातच लक्ष लागत नव्हतं.सतत हाच विचार सतावत होता की तिने तर पेंटिंग फेकली होती पण ती घरात येण्या आधीच ती पेंटिंग घरी तिच्या आहे त्या जागेवर कशी पोहोचली.विचाराने तीच डोकं सुन्न होत होतं.पण तिने ठरवले हार मानायची नाही. आज काय होतंय पाहू.

          ती आज पुन्हा दुपारी सगळे झोपल्यावर पेंटिंग घेऊन बाहेर पडली.घरापासून थोडे अंतर गेल्यावर ती एका मैदानात गेली.कार मधून पेंटिंग काढली आणि पेट्रोलची बाटली काढली. पेंटिंग खाली ठेवली आणि त्यावर पेट्रोल ओतले आणि आगपेटीची काडी ओढून त्यावर टाकली पण काय आश्चर्य पेंटिंगला आग लागलीच नाही! तिने पुन्हा पेट्रोल ओतले पुन्हा काडी ओढून टाकली तरी काही फायदा झाला नाही. असं करत करत पेट्रोल आणि आगपेटी संपली. पण पेंटिंगवर काहीच परिणाम झाला नाही.हे पाहून अभिज्ञा आता घाबरली होती तरी तिने धीर सोडला नाही. तिने तिथलाच एक मोठा दगड मोठ्या कष्टाने उचलून त्या पेंटिंगवर प्रहार केला तरी पेंटिंग आहे तशीच होती.आता मात्र अभिज्ञा घाबरली आणि ती तिथून कशी बशी घरी पोहोचली. ती येऊन सोफ्यावर बसली तर समोर पेंटिंग तिच्या जागी जैसे थे! त्या पेंटिंगमधला तो खुर्चीवर बसलेला इसम तिच्याकडे पाहून हसत आहे असा तिला एक क्षण भास झाला! आधीच भीतीने आणि दमून घामाघूम झालेली अभिज्ञा अजून घाबरली.अगम्य तिथेच अदुला खेळवत बसला होता त्याने तिला असे पाहून काय झाले असे विचारले पण तिला काहीच ऐकू गेले नाही आणि ती बेडरूममध्ये गेली.

          अगम्यने ते पाहिले आणि तो ही तिच्या मागे अज्ञांकला काडेवर घेऊन बेडरूममध्ये गेला.त्याने पाहिले तर अभिज्ञा बेडवर बसली होती.ती पूर्ण घामाने भिजली होती, चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगम्यला तिची अवस्था पाहून आश्चर्य आणि काळजी वाटली. त्याने अज्ञांकला खाली बसवले आणि  अभिज्ञा जवळ बसून तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला.

अगम्य,“ काय झालंय अभी इतकी का घाबरली आहेस?कुठे केली होती?” तो तिला खांद्यावर हात ठेवत म्हणाला.


    त्याच्या स्पर्शाने अभिज्ञा भानावर आली आणि अगम्यला मिठी मारून रडत बोलू लागली.


अभिज्ञा,“ अगम्य ती पेंटींग साधीसुधी नाही. ती आपल्या पिच्छा इतक्या सहजासहजी सोडणार नाही! मला खूप भीती वाटतेय त्या पेंटिंगची!” ती घाबरून रडत त्याला बोलत होती.


      अगम्यला मात्र ती काय बोलते आहे ते कळत नव्हते पण तिची अवस्था पाहून त्याने तिला प्रश्न विचारणे टाळले.तिला धीर देऊन शांत केले आणि पाणी दिले. अभिज्ञा पाणी घटाघटा प्यायली आणि थोडी शांत झाली.आता अगम्यने तिला विचारले.


अगम्य,“ काय झालं अभी कुठे गेली होतेस?आणि इतकी का घाबरली आहेस?पेंटिंग विषयी काय बोलत होतीस?” त्याने एका दमात प्रश्न विचारले.


       अभिज्ञाने काल पासून घडलेला सगळा घटनाक्रम त्याला सांगितला आणि त्याला म्हणाली.


अभिज्ञा,“ आपल्याला जितकं हे पेंटिंग प्रकरण  सोपं वाटते तितके ते नाही अमू! त्या पेंटिंगमध्ये नुसतं लूप होल नाही तर त्या पेंटिंगचे आपल्या आयुष्यात येण्या मागे काही तरी उद्दिष्ट आहे. ती पेंटींग तिच्या मर्जीने आपल्या आयुष्यात आली आहे आणि ती तिचे उद्दिष्ट पूर्ण झाल्या शिवाय आपल्या आयुष्यातून जाणार नाही! मला खूप भीती वाटते आहे त्या पेंटींगची!” ती पुन्हा रडत बोलत होती.


    अगम्यने तिचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि तो काही विचार करून  म्हणाला.


अगम्य,“ तू शांत हो आधी! आपण दोघे जाऊ उद्या ती पेंटींग घेऊन तिची विल्हेवाट लावायला!” तो शांतपणे तिची समजूत काढत म्हणाला.


         अभिज्ञाने नुसती होकारार्थी मन हलवली. ती आता जरा सावरली होती. अज्ञांकला कडेवर घेऊन  हॉलमध्ये येऊन इकडे तिकडे पाहत तिने अगम्यला विचारले.


अभिज्ञा,“ आई-बाबा कोठे गेले अमू?” तिने विचारले.


अगम्य,“ अग ते बाहेर गेले आहेत जरा फिरून येतो म्हणून अदुला घेऊन निघाले होते तू नाही म्हणाल्यावर! पण मीच म्हणालो; की सांभाळेन मी अदुला तुम्ही जा!” त्याने सांगितले.


अभिज्ञा,“ मी कुठे गेले विचारले नाही का त्यांनी?” तिने विचारले.


अगम्य,“ हो विचारले पण मी सांगितले की तू मैत्रिणीकडे गेलीस!खरं तर मला ही माहीत नव्हतं तू कुठे गेलीस तरी त्यांना काळजी वाटू नये म्हणून खोट सांगितले” तो म्हणाला.


अभिज्ञा,“बरं मी चहा करते!” असं म्हणून ती अज्ञांकला त्याच्याकडे देऊ लागली.


अगम्य,“ नको मी करतो आणि हो असलं नसतं धाडस करण्या आधी विचारत जा! सांगत जा! मूर्ख कुठली! दोन दिवस झाले काय-काय करत आहे!” तो तिला ताकीद देत म्हणाला.


अभिज्ञा,“ सॉरी! मला हे जितके सोपे वाटत होते तितके सोपे नाही हे लक्षात आले आहे !” ती गंभीर होत म्हणाली.


        त्या पेंटींगला दोन वेळा अभिज्ञा घरा बाहेर सोडून आली होती तरी ती घरी येण्या आधीच  पेंटींग तिच्या जागेवर हजर होती.


   नेमका त्या पेंटिंगचा अगम्य आणि अभिज्ञाच्या आयुष्यात येण्याचा काय उद्देश असावा? ती पेंटिंग त्यांचा पिच्छा केंव्हा आणि कसा सोडणार होती? की अगम्य म्हणत होता तसा त्या पेंटींगचा त्याच्याशी संबंध होता?

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


         













      

            





   


🎭 Series Post

View all