Login

दि लूप होल (भाग २१)

This is a thrilling and suspense story

      आज घरात कोणीच नसल्यामुळे अगम्य आणि अभिज्ञा जरा मोकळीक होती. अभिज्ञा अजून झोपलीच होती. पण अगम्यने उठून तिच्यासाठी चहा बनवून आणला आणि  तिच्या केसातून हात फिरवत तिला म्हणाला.


अगम्य,“ उठ अभी!किती वाजले बघ!” तो म्हणाला


अभिज्ञा,“ किती वाजले?अरे बाप रे आठ वाजले! मी चहा आणि नाष्ट्याचे पाहते!” ती डोळे चोळत घड्याळ पाहून उठून बसत म्हणाली.


अगम्य,“त्याची काही गरज नाही! हा घे चहा आणि नाष्टापण बनवला आहे मी! हा चहा घे आणि फ्रेश होऊन ये लवकर!” तो तिच्या समोर चहाचा कप धरत म्हणाला. 


अभिज्ञा,“ अरे वा! आज स्वारी मेहेरबान आहे!खरं तर खूप दिवस झाले रे तुझ्या हातचा फक्कड चहा पिऊन! I really miss it!(चहा एक सीप घेत) मस्तच!” ती चहा घेत बोलत होती.  


अगम्य,“अच्छा! मग आज पासून सकाळचा चहा मीच करत जाईन!” तो हसून म्हणाला.


अभिज्ञा,“ हो का? बरं मी आलेच!” असं म्हणून ती बाथरूम मध्ये गेली. अगम्य पुन्हा किचन मध्ये गेला.


                अभिज्ञा विचार करतच बाहेर आली.आज बोलावे का अगम्यशी नाही म्हणजे खूप दिवसातून तो खुश दिसतोय आज! पण आज नाही बोलले तर असा चान्स पुन्हा नाही मिळणार! आज काय ते बोलूच पण हा माझं ऐकेल का? म्हणजे त्याने तर त्या पेंटींगचा अभ्यास करायचा असे ठेवलेले दिसतंय मनोमन! पण विषाची परीक्षा का घ्या! नाही ऐकलं तर मी त्याला ऐकायला भाग पडेन त्याला शपथ घालेन! वचन घेईन! पण त्याला पुन्हा मी गमवू नाही शकत.ती या सगळ्या वैचारिक द्वंद्वात डायनींग टेबलवर जाऊन बसली.अगम्यने तिच्या समोर उपम्याची डिश ठेवली तरी तिचे लक्ष नव्हते. त्याने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत विचारले.


अगम्य,“ काय विचार करते आहेस अभी? मी पाहतोय दोन दिवस झाले तुझे कशातच लक्ष नाही. काय झालंय तुला?” त्याने काळजीने विचारले.


अभिज्ञा,“काही नाही रे असंच बरं बाबांचा फोन नाही आला पोहचले  का ते? फोन करून पाहते मी!” असं म्हणून ती विषय टाळत उठून मोबाई कुठे आहे पाहणार तेव्हढ्यात अगम्यने तिचा हात धरला आणि तिला बसवत म्हणाला.


अगम्य,“ अग आला होता बाबांचा फोन पण तू झोपली होती म्हणून तुला नाही उठवले!इतकी काय काळजी करत आहेस ड्रायव्हर आणि गाडी घेऊन गेलेत ते इथं तर तासाभराच्या अंतरावर!तू नाष्टाकर” तो तिला म्हणाला.


अभिज्ञा,“बरं जेवायला काय करू?” तिने उपमा खात विचारले.


अगम्य,“ मी करेन आज स्वयंपाक ही! तुला आज सुट्टी!” तो हसून म्हणाला.


अभिज्ञा,“ अरे बाप रे! आज झालंय काय? काय हवं आहे आज अजून?” तिने त्याला तिरकस पाहत विचारले.


अगम्य,“अच्छा म्हणजे मला काही हवं असल्यावरच करतो का मी हे सगळं तुझ्यासाठी?” तो लटक्या रागाने म्हणाला.


अभिज्ञा,“ अरे रागवायला काय झालं! मी तर चेष्टा केली तुझी! बरं काय खायला घालणार आहेस तू मला लंचमध्ये आज?” तिने त्याला  विचारलं.


अगम्य,“सरप्राईज आहे!” तो डोळे मिचकावत म्हणाला.


अभिज्ञा,“ अच्छा म्हणजे मला आज सुट्टी आणि वरून माझ्या आवडीचे खायला मिळणार  तर! लॉटरिच लागली माझी!” ती हसून म्हणाला.


अगम्य,“ हो जा मग टी. व्ही पहा नाय तर मोबाईल घेऊन बस असं ही तुला या दीड दोन महिन्यात वेळच मिळाला नाही. रिल्याक्स व्हायला.” तो हसून तिला हॉलमध्ये पिटाळत म्हणाला.


      अभिज्ञाने टी. व्ही सुरू केला खरा पण तीच लक्ष मात्र टी. व्ही पाहण्यात नव्हतं. ती पुन्हा विचारात गुंतली होती.आज बोलावे की नको! आज अमूचा मूड छान आहे पण या नंतर अशी संधी मला मिळणार नाही कारण आज घरात कोणीच नाही. नाही जेवण झाल्यावर मी आज त्याच्याशी बोलणारच! आता ही पेंटींग मी माझ्या डोळ्यासमोर अजून जास्त दिवस पाहू शकत नाही आणि पुढची अमावस्या येणारच की काही दिवसांनी अजून  पुन्हा तो पेंटिंगकडे आकर्षित झाला तर! नाही मी हि रिस्क नाही घेऊ शकत.आज जेवण झाल्यावर मी त्याच्याशी बोलणारच! असा निश्चय करून तिने डोळ्यातून आलेले पाणी तिने पुसले.

           पाहता पाहता जेवणाची वेळ झाली.अगम्य बराच वेळ हाक मारत होता किचन मधून पण अभिज्ञा मात्र काहीच उत्तर देत नाही म्हणाल्यावर तो हॉलमध्ये आला आणि अभिज्ञाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.


अगम्य,“किती वेळ झालं हाक मारतोय अभी लक्ष कुठे आहे तुझे? (तो म्हणाला पण त्याच्या स्पर्शाने अभिज्ञा दचकली ते पाहून अगम्य म्हणाला) अभी इतकं दचकायला काय झालं ग?” 


अभिज्ञा,“ काही नाही चल!झाला का तुझा स्वयंपाक?” ती स्वतःला सावरून उठून किचनकडे जात म्हणाली.


          अगम्यला मात्र अभिज्ञाचे वागणे जरा विचित्र वाटले आणि तिच्या मनात काही तरी चालू आहे याची जाणीव ही झाली. पण त्याने तिला त्याबद्दल काही न विचारता. तो तिच्या मागे गेला. डायनींग टेबलवर सगळे पदार्थ पाहून अभिज्ञा खुश होत म्हणाली.


अभिज्ञा,“ अरे वा पुलाव, चपाती, मिक्स भाजी आणि हे काय कोशिंबीर ही! सगळं माझ्या आवडीचे क्या बात! नवरा असावा तर असा!” ती त्याच्या गळ्या भोवती हात गुंफूण त्याच्या गालावर किस करत म्हणाली.


अगम्य,“ बास बास माझी स्तुती बस आणि खाऊन बघ मग सांग कसं झालंय ते?” त्याच्या गळ्या भोवतीचे तिचे हात सोडवून तिला बसवत तो म्हणाला.


अभिज्ञा,“ मस्त झालय सगळं!” ती टेस्ट करत म्हणाली.

     

            दोघ ही जेवले. अभिज्ञा मात्र वरून  शांत असल्याचा दिखावा करत असली तरी तिच्या मनात मात्र खळबळ सुरू आहे हे एव्हाना अगम्यच्या ही लक्षात आले होते पण तिने तिच्या मनात काय चालले आहे ते स्वतःहून बोलावे असे त्याला वाटत होते म्हणून तो गप्प होता.

★★★★

                   अभिज्ञा सोफ्यावर बसून टी. व्ही. पाहत होती व अगम्य तिच्या मांडीवर डोके ठेऊन झोपला होता. अभिज्ञाने काही तरी विचार केला आणि बोलायला सुरुवात केली.


अभिज्ञा,“ अमू मला तुझ्याशी बोलायचे आहे!” ती म्हणाली.


अगम्य,“बोल मी ऐकतो आहे!” तो डोळे झाकूनच म्हणाला.


अभिज्ञा,“ मला या पेंटिंग बद्दल बोलायचे आहे!” ती पेंटींग पाहत म्हणाली.


अगम्य,“ आता त्याच्या बद्दल काय?त्या पेंटींग बद्दल सगळं तर तुला सांगितले!” तो उठून बसत म्हणाला.


अभिज्ञा,“ मला ही पेंटींग आता आपल्या घरात नको आहे!” तिने  अगम्यकडे पाहत डायरेक्ट विषयाला हात घातला.


अगम्य,“ म्हणजे?” तो आश्चर्याने तिला पाहत म्हणाला.


अभिज्ञा,“म्हणजे ही पेंटिंग या घरात मला नको आहे.अजून किती स्पष्ट सांगू तुला?” ती जरा चिडतच म्हणाली.


अगम्य,“ अग पण का? अजून या पेंटींग बद्दल बराच उलगडा बाकी आहे आणि…” तो पुढे बोलणार तर त्याचे बोलणे तोडत ती बोलू लागली.


अभिज्ञा,“ का हे तू मला विचारत आहेस अगम्य?तुला नाही माहीत का? का ते? तू या पेंटिंगमध्ये तीन वर्षे अडकून होतास ती तीन वर्षे मी कशी काढली हे माझे मला माहित! परत आलास तर तुझी अवस्था काय होती.तू स्टेबल होऊ पर्यंत त्या I. C. U च्या बाहेर मी कसे दिवस काढले आहेत मला माहित? तुला या सगळ्यातून सावरायला किती दिवस लागले! अजून ही तुझी तब्बेत म्हणावी तशी ठीक नाही आणि वर मलाच विचारतो का म्हणून? बरं हे सगळं एवढ्यावरच थांबल नाही.दोन दिवसांपूर्वी परत तू त्याच पेंटिंगमध्ये जात होतास मी आडवल म्हणून! नाही तर काय झालं असत विचार करून माझ्या अंगावर काटा येतो!आणि पुढच्या अमावस्येला मी नाही रोखू शकले तुला तर? या विचाराने झोप उडाली आहे माझी! त्या पेंटींगशी आणि त्याचा उलगडा होण्याशी मला काही देणंघेणं नाही आणि या दळभद्री पेंटिंग विषयी जाणून घेण्यात मला रस ही नाही! समजलं तुला!” ती तावतावने बोलत होती पण डोळ्यातून मात्र अश्रू धारा लागल्या होत्या तिच्या! राग आणि दुःख हे संमिश्र भाव होते त्यात!


अगम्य,“ अग पण आता मला  माहीत झाल आहे बाहेर येण्याचा रस्ता मी आधी कसा आलो तसा येईन की बाहेर आणि अभी तिथे अजून माणसे अडकली आहेत तुझ्या सारखं त्यांची ही कोणी तरी वाट पाहतच असेल की बाहेर!त्यांना पण बाहेर काढायला हवं!” तो तिला समजावत म्हणाला.


अभिज्ञा,“मूर्ख आहेस का तू? म्हणे तुला बाहेर येण्याचा रस्ता माहीत आहे अरे! तूच म्हणाला ना की त्या पेंटींग मधील लूप होल फक्त अमावस्येला उघडते. मग तू जर या अमावस्येला त्यात गेलास तर तू पुढच्या अमावस्येपर्यंत अडकून पडशील! बरं पण तुला कळेल तरी का तिथे अमावस्या कधी आहे ते! आणि तूच म्हणालास ना त्या पेंटिंग मधील इसम तुला मारायचा प्रयत्न करत होता त्याने तुला काही केले तर? आणि सगळ्या जगाचा मक्ता मी घेतलेला नाही तिथे अडकून पडलेल्या लोकांचा विचार करायला! मला फक्त तुझी काळजी आहे समजलं!” ती पोटतिडकीने बोलत होता.


अगम्य,“ अग माझं एकदा ऐकून तर घे!  त्या पेंटिंगशी माझा काही तरी संबंध आहे ….” तो पुढे बोलणार तर परत अभिज्ञाने त्याचे बोलणे तोडले आणि ती बोलू लागली.


अभिज्ञा,“खड्ड्यात गेला तो संबंध तू माझे ऐकणार आहेस की नाही ते सांग मला!” ती काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती.


अगम्य,“ अग पण अभी!” तो  तिला समजावत म्हणाला तरी पुन्हा अभिज्ञाने त्याचे बोलणे  मध्येच तोडले.


अभिज्ञा,“ मला तुझ्याकडून वचन हवे!” ती म्हणाली.


अगम्य,“,कसले वचन?”त्याने असमंजसपणे विचारले.


अभिज्ञा,“ या पेंटिंगची मी विल्हेवाट लावणार आहे तू मला अडवणार नाहीस आणि मी त्या पेंटिंगचे काय केले हे तू मला कधीच विचारणार ही नाहीस!” ती म्हणाली.


अगम्य,“काही तरी वेड्यासारखे बोलू नकोस तू!” अग पण माझं ऐकून तर घे शांतपणे जरा”तो अजून ही शांतपणे बोलत होता.


अभिज्ञा,“ पण नाही आणि बिन नाही! मी जे आत्ता पर्यंत सहन केले ते या पुढे सहन करू शकणार नाही रादर माझ्याकडे इतकी सहनशीलता आता उरली नाही! तुला माझ्यात आणि या पेंटींग मध्ये एकाची निवड करावी लागेल!” ती रागात म्हणाली.


अगम्य,“ काय बोलते आहेस तू?तुझे  तुला तरी कळते आहे का?” तो जरा रागानेच  म्हणाला.


अभिज्ञा,“ हो कळते आहे! जर तुला ही पेंटिंग हवी असेल तर मी तुला या घरात काय पण या जगात…” ती त्याला रागाने बोलत होती हे ऐकून अगम्यचा मात्र संयम सुटला आणि तिचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच तो ओरडला.


अगम्य,“ अभीSss!” हे ऐकून  त्याचा हात रागाने तिला मारण्यासाठी उचलला पण त्याने तो मधेच रोखला. तो रागाने लाल झाला होता. त्याचे शरीर रागाने थरथरत होते.


            अभिज्ञाना त्याचा हा अवतार पाहून जरा घाबरली कारण तिने या आधी अगम्यला इतक्या रागात कधीच पाहिले नव्हते.त्याचा तो  अवतार पाहून तिच्या हे लक्षात आले की ती रागाच्या आणि भावनेच्या आवेगात काही तरी चुकिचे बोलून गेली आहे पण ती आता माघार घेऊ शकत नव्हती कारण तिला कुठे तरी माहीत होतं की  अगम्य आता तिचे म्हणणे ऐकणार! म्हणून ती त्याच्या समोर तशीच काहीच न बोलता उभी राहिली होती. पाच मिनिटे दोघांमध्ये फक्त शांतता होती. शेवटी अगम्यच बोलू लागला.


आगम्य,“ सॉरी! ठीक आहे दिलं तुला वचन! तुला त्या पेंटिंगचे जे करायचे ते कर मी तुला या पुढे त्या पेंटिंग बद्दल काहीच विचारणार नाही!” असं म्हणून अभिज्ञाकडे न पाहतच तो बेडरूम मध्ये निघून गेला.


             अभिज्ञा मात्र तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर पडून राहिली.ती ही रडत होती.तिला माहीत होतं की आज तिने अगम्यला दुखावले आहे पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अभिज्ञाच्या अचानक काही तरी लक्षात आले आणि तिने घड्याळ पाहिले. तर चार वाजले होते. हा मधला दोन तासांचा काळ कसा गेला हे तिला ही कळले नाही. तिला काही तरी आठवल्यामुळे ती उठली आणि बेडरूममध्ये गेली. अगम्य बेडवर गाढ झोपला होता.त्याच्या चेहऱ्यावरून लगेच कळत होते की तो ही रडला होता. ती त्याच्या जवळ बेडवर बसत त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.


अभिज्ञा,“ अगम्य उठ! चार वाजले आहेत साडे पाच वाजता तुझी अपॉइंटमेंट आहे आज  चेकअपसाठी डॉक्टर शिंदेंकडे!”ती त्याला उठवत म्हणाली.


             अगम्य उठला आणि तिला काहीच न बोलता फ्रेश होण्यासाठी निघून गेला.अगम्यच्या अशा वागण्याची  कुठे तरी कल्पना अभिज्ञाला होती.त्यामुळे तिने तिच्या मनाची तयारी केली होती.अभिज्ञाने तो बाहेर येऊ पर्यंत त्याचे कपडे बाहेर काढून ठेवले आणि किचनमध्ये चहा करायला निघून गेली.तो पर्यंत अगम्य तयार होऊन बाहेर हॉलमध्ये येईन बसला. अभिज्ञाने ही काहीच न बोलता त्याला चहाचा कप दिला आणि ती चहा घेऊन तयार व्हायला निघुन गेली.


              आज ड्रायव्हर नसल्यामुळे अभिज्ञाने कार ड्राइव्ह केली. पूर्ण रस्ता भर ही अगम्य तिच्याशी एक शब्द ही बोलला नाही. अभिज्ञा ही शांत होती. तिला स्वतःला ही  या सगळ्यातून सावरायला वेळ हवा होता कारण इतक्या वर्षात तिच्या आणि अगम्यमध्ये इतकं मोठं भांडण कधीच झाले नव्हते.खरं तर तिला त्याची माफी मागायची होती कारण आज ती त्याला जास्तच बोलली होती.


                  हॉस्पिटलमध्ये ते दोघे पोहचले अगदी वेळेत आणि डॉक्टरकच्या केबिनमध्ये गेले.डॉ.शिंदे त्यांना पाहून हसून म्हणाले. 


डॉ शिंदे,“या मिसेस आणि मिस्टर देशमुख बसा!” ते म्हणाले.


     जुजबी चौकशी करून त्यांनी आगम्यला तपासले. अभिज्ञाने काळजीने डॉक्टरांना विचारले.


अभिज्ञा,“ डॉक्टर ठीक आहे ना अगम्य?” ती म्हणाली.


डॉ.शिंदे,“ हो ठीक आहेत मि. देशमुख फक्त जरा बी.पी वाढला आहे त्यांचा मी औषध लिहून देतो आणि आधी सुरू असणारी टॉनिक आणि सप्लिमेंट सुरू ठेवा. पण हो आठ दिवसांनी परत या बी.पी. चेक करू आपण! इतक्या कमी वयात बी.पी.वाढणे  चांगलं नाही मि. देशमुख!”ते काळजीने बोलत होते.

         अगम्य मात्र शांत होता पण अभिज्ञा मात्र थोडी चिंतीत दिसत होती तिने डॉक्टरांना विचारले.


अभिज्ञा,“ डॉक्टर काळजी करण्या सारखे काही आहे का?”ती म्हणाली.


डॉ.शिंदे,“तसं काही काळजी करण्यासारखे नाही मिसेस देशमुख पण काळजी घ्या मि. देशमुखांची!” ते म्हणाले.


      इतका वेळ शांत बसलेला अगम्यने आता डॉक्टरांना विचारले.


अगम्य,“डॉक्टर मी ऑफिस जॉईन करू शकतो का आता?”तो चेहऱ्यावरची एक रेष ही न हलू देता  म्हणाला.


डॉ. शिंदे,“घ्या कोणाचं काय तर कोणाचं काय? मि. देशमुख मी मिसेस देशमुखांना तुमची काळजी घ्यायला सांगतोय आणि तुम्ही ऑफिसला कधी जाऊ म्हणून विचारात आहात! बरं तुम्ही अजून पंधरा दिवसांनी जा ऑफिसला! ठीक आहे.” ते म्हणाले.


अभिज्ञा,“ इतकी काही घाई नाही डॉक्टर! ऑफिसला जायची गरज ही नाही असं मला वाटते.” ती काळजीने म्हणाली.


डॉ. शिंदे,“मिसेस देशमुख काळजी करू नका तुम्हीं! खरं तर बी.पी.वाढलेला नसता तर मी उद्या पासून जा म्हणालो असतो ऑफिसला!”डॉक्टर म्हणाले.


           अभिज्ञा आणि अगम्य हॉस्पिटलमधून घरी आले तो पर्यंत अभिज्ञाचे आई-बाबा आणि अज्ञांक घरी आले होते.अज्ञांक अभिज्ञा पाहून तिला चिकटला. अगम्य बाबांना प्रवास कसा झाला वगैरे जुजबी बोलून.बेडरूममध्ये निघून गेला आणि  लॅपटॉपवर काही तरी करत बसला खरं तर ही वेळ त्याची आज्ञांकशी खेळण्याची असे पण आज त्याचा मूड नव्हता. अभिज्ञा कपडे बदलून किचनकडे जायला निघाली तेंव्हा तिच्या बाबांनी तिला अडवले आणि बाबांनी विचारले.


बाबा,“ अभी आज अगम्यला डॉक्टरकडे घेऊन गेली होतीस ना चेकअपसाठी काय म्हणाले डॉक्टर?”त्यांनी काळजीने चौकशी केली.


अभिज्ञा,“अ हो त्याची तब्बेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही!” ती जरा चाचरत म्हणाली.


आई,“ अग मग इतकी उदास होऊन का सांगत आहेस? बरं मग केंव्हा पासून जॉईन करणार आता ऑफिस तो?  घरात बसून कंटाळला आहे ग तो! त्याच काम म्हणजे त्याच्यासाठी श्वास आहे!”त्या म्हणाल्या


अभिज्ञा,“ अजून पंधरा दिवसांची विश्रांती घ्या मग जॉईन व्हा असं सांगितले आहे डॉ.शिंदेंनी!” अभिज्ञा म्हणाली



         अभिज्ञा माहीत होतं आता तिची आई सतरा चौकशा करणार आणि अगम्यचा बी.पी.वाढलाय हे कळल्यावर आई तिलाच वेठीस धरणार! कारण तिच्या आईचा अगम्य जीव की प्राण होता.अभिज्ञा असं वाटायचं की तिची आई तिच्या पेक्षा पण जास्त अगम्यवर प्रेम करते आणि खरं पहायला गेलं तर ते खरं ही होत. अगम्य आणि तिच्या आईच बऱ्याच वर्षा पासून चांगलच गुलपीठ जमलं होत. अगम्य गायब होता तेंव्हा तिच्या आईला तिने त्याच्या आठवणीत रोज रडताना पाहिलं होतं.अगम्य हॉस्पिटलमध्ये असताना तिने तिच्या प्राध्यापक असणाऱ्या आईला त्याच्यासाठी नवस-सायास करताना पाहिले होते.  अगम्य ही त्यांना आईच मानायचा त्याच्या मनातील बऱ्याच गोष्टी तो त्यांना सांगत असे.अभिज्ञाच्या आईची त्यांना मुलगा नसण्याची खंत आणि मुलगा नसल्याची कमी अगम्यने भरून काढली होती. त्यामुळे अभिज्ञाच्या आईच्या अंगात कधी कधी अगम्यच्या आईच्या रूपाने अभिज्ञाची सासू संचारत असे आणि तिच्या आईतील त्या सासूला अभिज्ञा घाबरत असे.आज ही तशीच ती घाबरली होती. अभिज्ञा विचारात असताना अभिज्ञाच्या आईने तिला हलवले आणि त्या म्हणाल्या.


आई,“ अग काय विचारतेय मी अभी!लक्ष कुठे आहे तुझे?” त्या जरा चिडूनच म्हणाल्या.


अभिज्ञा,“ अग त्याचा बी.पी वाढला आहे जरा! आठ दिवसांनी पुन्हा बोलवले आहे डॉ.शिंदेंनी चेकअपसाठी!” ती खाली मान घालून म्हणाली.


आई,“ काय? बी.पी.कसा वाढला त्याचा अचानक?” त्या काळजीने म्हणाल्या.


बाबा,“अग तिला काय विचारतेस? पण अभी इतक्या कमी वयात बी.पी.चांगले नाही.आपल्याला त्याची जरा जास्तच काळजी  घ्यायला हवी!” ते काळजीने म्हणाले.


अभिज्ञा, “हो बाबा!” इतकंच म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली  आज ती बाबांमुळे आईच्या कचाट्यातून सुटली होती. पण तिला चांगलंच माहीत होतं की अगम्यच्या वागण्यातील  बदल तिच्या आईच्या लगेच लक्षात येणार होता.


         अगम्य आज जेवताना शांतच होता.झोपताना ही तो अभिज्ञाने दिलेले औषधे घेऊन अभिज्ञाशी एक शब्द ही न बोलताच झोपला होता.


    अगम्यने अभिज्ञाला तो त्या पेंटिंगचा नाद सोडून देईल असे वचन दिले होते खरं पण तो ते पाळू शकणार होता का? अभिज्ञा त्या पेंटिंगची विल्हेवाट लावू शकेल का? ते इतके सोपे असेल का?त्या पेंटिंगशी अगम्यचा काय संबंध होता आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे आता अगम्यला मिळू शकणार होती का?  अभिज्ञा अगम्यचा रुसवा कसा काढणार होती?

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


         


 






       



       

      

 


     


🎭 Series Post

View all