Dec 05, 2021
Kathamalika

दि लूप होल (भाग २०)

Read Later
दि लूप होल (भाग २०)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

   अभिज्ञाला जाग आली तेंव्हा सात वाजले होते. आज पुन्हा तिला उठायला उशीर झाला होता. खरं तर तिला पहाटे-पहाटे डोळा लागला होता. त्यामुळे तिची झोप आज पूर्ण झाली नव्हती. अगम्य ही अजून उठला नव्हता. अभिज्ञा मात्र त्याला पाहून विचारात पडली. अगम्य बरोबर इतकं सगळं होऊन ही हा इतका कसा गाढ झोपू शकतो? याच्याकडे किती सहनशीलता आहे.याच्या जागी दुसरं कोण असत तर केंव्हाच वेड झालं असत.असा विचार करत तिला त्याच्या डोक्यावरून हात फिरण्याचा मोह झाला पण तिने तो आवरला कारण जर तो जागा झाला तर तिला असा सोडणार नाही.हे तिला चांगलं माहीत होतं आणि अजून उशीर होणार! हा विचार करून ती स्वतःशीच हसली आणि त्या विचारांच्या तंद्रीतच ती अंघोळ करून बाहेर आली. नेहमी प्रमाणे आवाज न करता बेडरूम बाहेर पडली.  आज तिला खूप काम होते कारण आज रविवार असल्याने तिने राहुलला व त्याच्या होणाऱ्या बायकोला दुपारी जेवायला बोलवले होते. त्याच्या मागचा एक उद्देश राहुलच्या होणाऱ्या बायकोला मीराला अगम्यशी भेटवण्याचा ही होता.


                     तिची आई किचनमध्ये काही तरी करत होती. बाबा अज्ञांकला खेळवत होते. आई तिला येताना पाहून म्हणाली.


आई,“ उठलीस तू! बरं नाष्टा करून घे! मी दुपारच्या स्वयंपाकाची निम्मी तयारी करून ठेवली आहे बाकीचे आता तू बघ आणि हो अगम्यला पण उठव आणि आवरायला सांग तुला माहीत आहे राहुल लवकरच येणार आज!” त्या बोलत होत्या पण अभिज्ञा मात्र तिच्याच तंद्रीत होती.


 ती खरं तर कालच्या घटनेमुळे जरा काळजीतच होती. तिला खरं तर ती  पेंटिंग आता तिच्या घरात नको होती.पण ती त्या पेंटिंगची पूर्ण माहिती घेतल्या शिवाय  ती काहीच करू शकत नव्हती.ती काही ही उत्तर देत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला.त्यांच्या स्पर्शाने ती दचकली.हे पाहून आई म्हणाली.


आई,“ काय ग अभी तब्बेत ठीक आहे ना तुझी? किती वेळ झाला मी  एकटीच बडबडतेय!” त्या काळजीने म्हणाल्या.


अभिज्ञा,“ मी ठीक आहे ग! फक्त रात्री झोप पूर्ण नाही झाली! बरं तू का तयारी केलीस? तुला  मी किती वेळा सांगितले आहे की तू नको करत जाऊस काही आत्ता येईल चपाती भाकरी करायला सखू ताई! मग काय मला फक्त भाजी आणि भात करायचा असतो आणि नाष्टा मी उठून करत जाईन ना! आज पुन्हा उशीर झाला बघ मला उठायला!” ती थोडी नाराजीने म्हणाली.


आई,“ अग हो हो! मला लवकर जाग येते मग नुसतं बसून काय करणार म्हणून करते काही तरी तू उठूपर्यंत असं पण तू रोज उठतेसच की! एक दिवस मी केलं तर काय फरक पडणार आहे!” त्या तिला समजावत म्हणाल्या.


         अभिज्ञा काहीच बोलली नाही पण तिने कामाला सुरुवात केली. नाष्टा करायला  आणि लवकर आवर म्हणून उठवायला अभिज्ञा बेडरूम मध्ये गेली तर अगम्य आधीच उठून  अंघोळीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. ती परत किचनमध्ये गेली. तो पर्यंत आई आज्ञांकला भरवत असलेल्या तिला दिसल्या. ती सरळ किचनमध्ये निघाली आणि जाताना तिचे लक्ष  हॉल मधल्या त्या पेंटिंगकडे गेले. ती पेंटिंग पाहून तिच्या चेहऱ्यावर एक भीतीची लकेर आणि अंगावर सरसरून काटा उभा राहीला पण कोणाचे आपल्याकडे लक्ष तर नाही हे बघून ती किचन मध्ये गेली. अगम्य तोपर्यंत तयार होऊन आला.सगळ्यांनी बरोबरच नाष्टा केला. तासा भराने राहुल मीरला घेऊन आला. मीरा गव्हाळ रंगाची,शिडशिडीत बांध्याची दिसायला छान अशी मुलगी! राहुल तिची ओळख अगम्यशी करून देत म्हणाला.


राहुल,“ अम्या ही माझी होणारी बायको मीरा!” तो म्हणाला.


     अगम्य काही बोलण्याच्या आधीच मीरा जशी काही अगम्यशी खूप जुनी ओळख आहे अशा आविर्भावत म्हणाली.


मीरा,“ तुमची तब्बेत आता बरी आहे ना भाऊ?अभी ताई कुठे आहेत?” तिला पाहून आज्ञांक पळतच आला त्याच्या मागे आई होत्या.तिने अज्ञांकला उचलून घेतले. अगम्य मात्र तिच्याकडे पाहतच राहिला व उत्तरला


अगम्य,“ मी ठीक आहे!” तो म्हणाला.


       अभिज्ञाची आई तिला किचन मध्ये घेऊन गेली.तिला पाहून अभिज्ञा म्हणाली.


अभिज्ञा,“ किती दिवसांनी आलीस मीरा कुठे होतीस ग इतके दिवस?” तिने विचारले.


मीरा,“ ताई अग आश्रमातल्या पन्नास मुलांना एका ट्रॅव्हल कंपनीने  दक्षिण भारतात फिरवण्यासाठी फ्री पास दिले होते. मला पण त्यांच्या बरोबर जावे लागले केअर टेकर म्हणून”ती म्हणाली.


           इकडे अगम्य राहुलला म्हणाला.

अगम्य,“ काय रे राहुल्या हिला आपल्या आश्रमात पाहिली नाही मी! आणि तू म्हणतोस आपल्या आश्रमातील आहे?” त्याने विचारले


राहुल,“ तू म्हणतोस ते बरोबर आहे.अरे ही तीन वर्षांपूर्वी आश्रमात आली!” तो म्हणाला


अगम्य,“म्हणजे?” तो म्हणाला


राहुल,“अरे ही मीरा कसबे! औरंगाबाद जिल्ह्यातील छोट्याशा गावातली आहे. तिचे आई-वडील तिच्या लहानपणीच एका अपघातात गेले. हिला मामा- मामीने नेले. मामा दारुडा पण मामीला मूल-बाळ नाही म्हणून तिने हिला आईच्या मायेने सांभाळले. पदवी पर्यंतचे शिक्षण दिले.हिची मामी एक दिवस अचानक हार्ट अट्याकने गेली.मामा मात्र पक्का दारुडा आहे त्याने दारूसाठी हिला एका इसमाला विकायचा प्रयत्न केला! ही तिथून कशी बशी मैत्रिणीच्या मदतीने औरंगाबाद मध्ये आली आणि तिच्या घरीच राहत होती पण तिच्याकडे ही किती दिवस राहणार मग आपल्या आश्रमात लहान मुलांना शिकण्यासाठी एक शिक्षिका हवी होती त्याचा इंटरव्ह्यू द्यायला ही आली होती आणि इंटरव्ह्यू घायला मला बोलावले होते तिथे हिची ओळख झाली आणि हिची कहाणी समजली मी तिला नोकरी दिली. तिची राहायची  सोय ही आश्रमात झाली. मीरा तीन वर्षांपासून तिथेच राहते. मी आपण जात होतो तसेच आश्रमात जात असतो.मग मीराशी मैत्री आणि मग प्रेम झाले. बरं माझ्या तर्फे हिला अभिज्ञानेच विचारले माझ्याशी लग्न करण्या विषयी!” त्याने एका दमात सगळी माहिती दिली. 


अगम्य,“ चांगली पोरगी पटवलीस की राहुल्या नाय तर मला वाटले होते. तुझ्यासाठी मला आणि अभिलाच पोरगी शोधावी लागते की काय?” असं म्हणून तो हसला आणि हे ऐकून राहुल आणि अभिज्ञाचे बाबा हसले.


राहुल,“ ते जाऊदे आज तुझा लेख ‛ मी आणि माझा वेडेपणा’ वाचला पेपरमध्ये!लेका तू कधीपासून लेखक झालास?” तो उत्सुकतेने म्हणाला.


अगम्य,“ काही नाही रे असच आपलं!” असं म्हणून त्याने राहुलचा प्रश्न टाळला.       आज घरात वातावरण प्रसन्न होते. अगम्य ही खुश दिसत होता पण अभिज्ञाचे लक्ष मात्र कशातच लागत नव्हते. राहून राहून तिला काल रात्रीचा  घटनाक्रम आठवत होता आणि सतत तिचे लक्ष त्या पेंटिंगकडे जात होते.ती पेंटिंग तिच्या डोळ्याला खटकत होती. तिला कधी एकदा रात्र होते आणि अगम्यकडून  त्या पेंटींगची कधी एकदा सर्व माहिती मिळवून कधी एकदा त्या पेंटींगची विल्हेवाट लावीन असं झाले होते.


          पण या सगळ्या गोंधळात आजचा दिवस कसा गेला आणि रात्रीची जेवणे कधी उरकली हे ही अभिज्ञाला कळले नाही. ती किचन आवरून बेडरूममध्ये गेली तर अगम्य लॅपटॉपवर काही तरी करत होता. ते पाहून अभिज्ञा त्याला म्हणाली.


अभिज्ञा,“ ठेवतोस का आता तो लॅपटॉप?” ती  वैतागून म्हणाली.


अगम्य,“ हा बघ ठेवला! मला तुझ्याशी थोडं बोलायचं होत!” तो लॅपटॉप बंद करत म्हणाला.


अभिज्ञा,“ बोल!” ती म्हणाली.


अगम्य,“ राहुलला चांगली मुलगी मिळाली ना! पण मीरा माझ्याशी आधी पासून ओळख असल्या सारखी वागत होती ते कसं काय?” तो आश्चर्याने विचारले.


अभिज्ञा,“ अरे तू जरी इथे नसलास तरी राहुलने तिला तुझ्याबद्दल सगळं सांगितले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून ती आपल्या घरी येते मग साहजिक आहे ना तिचं तुझ्याशी ओळख असल्या सारख वागणं! आणि मुळातच मीराचा स्वभाव मनमिळाऊ आहे” ती म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! अजून एक अग माझ्या नोकरीच काय इतके दिवस कामावर हजर नव्हतो म्हणल्यावर  माझी नोकरी गेलीच असणार आता एखाद्या कॉलेजवर मला प्राध्यापकाची नोकरी शोधावी लागेल!” तो जरा गंभीर होत म्हणाला.


अभिज्ञा,“ दुसरी नोकरी शोधायची काही गरज नाही तुला कारण तुझी नोकरी अजून शाबूत आहे. सरकारी नियमानुसार एखादी व्यक्ती गायब होऊन  सात वर्षे झाल्या शिवाय तिला मृत घोषित केले जात नाही आणि हो जर एखादी व्यक्ती कामावर असताना अचानक गायब झाली आणि ती जर दोन-तीन वर्षात  परत आली आणि ती गायब असण्याचे योग्य कारण दिले तर ती व्यक्ती नोकरीवर पुन्हा रुजू होऊ शकते आणि तू हॉस्पिटलमध्ये असतानाच बाबांनी ही सगळी प्रोसिजर केली आहे आणि तू मेंटल ट्रॉमामध्ये होता हे कारण ही दिले आहे. त्यामुळे तू नोकरीवर कधी ही जॉईन होऊ शकतो पण तुला तीन वर्षांचा इंक्रिमेंट आणि पगार मिळणार नाही.” तिने त्याचा हात हातात घेऊन त्याला सविस्तर माहिती दिली.


अगम्य,“ बाप रे बाबांनी सगळं केलं पण! मग मी काय म्हणतो आपण दोघ ही जॉईन होऊया का ?घरात बसून मला बोअर झालं आता!” त्याने तिला पाहत विचारले.


अभिज्ञा,“नाही! डॉक्टर  जो पर्यंत तुला ग्रीन सिग्नल देत नाहीत तो पर्यंत नाही माझं म्हणशील तर अजून मी काढलेली तीन महिन्यांच्या राजेचे पंधरा दिवस शिल्लक आहेत.उद्या तुझी असं ही रेग्युलर चेकअपसाठी अपॉइंटमेंट आहे त्यांना विचारुया मग ठरवू तुझ्या जॉयनींगचे काय ते!” ती म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे मॅडम!” अगम्य हसून म्हणाला.


        त्याचा मूड चांगला आहे हे पाहून अभिज्ञाने हळूच पेंटिंगच्या विषयाला हात घातला.


अभिज्ञा,“ बरं तू त्या पेंटींगमधून  बाहेर कसा आलास अमू? आणि सायकॉलॉजिस्ट डॉ.पाटील तुला क्लीन चीट कसे काय देऊन गेले तुमच्या दोघांमध्ये काय बोलणे झाले?” तिने पुन्हा प्रश्न विचारला.


अगम्य,“ मला माहित होतं तू मला हे प्रश्न विचारणार कारण आता तुला सगळं जाणून घ्यायचे असणार!” तो हसून तिला जवळ ओढत म्हणाला.


अभिज्ञा,“ मग सांग ना!”  ती त्याच्या जवळ बसत म्हणाला.


अगम्य,“ सांगतो! तिथे असणारा प्रत्येक माणूस आता मेल्या शिवाय येथून आपली सुटका नाही असंच समजून हार मानून बसलेला मला दिसत होता. पण मला त्या पेंटिंगमधून बाहेर निघायचे होते तुझ्यासाठी आपल्या होणाऱ्या बाळासाठी! जो वेळ विश्रांतीसाठी मिळत होता त्या वेळात मी त्या पेंटिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो कारण जिथे येण्याचा मार्ग आहे तिथून जाण्याचा ही मार्ग असणार हे मला पक्के माहीत होते. मी रोज तोच मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण तो सापडत नव्हता मग मी विचार केला की जर मी सप्तचक्र साधना केली तर   इथून बाहेर पडण्याचा मार्ग मला नक्की मिळू शकेल. तरी मनात भीती होती की शेतात खुट्ट जरी झाले तरी त्या बंगलीतल्या इसमाला कळते मग मी साधना केली तर त्याला समजेन आणि मग तो काय करेल कारण माहीत नाही का? त्याचा माझ्यावर जास्तच रोष होता तरी एक दिवस मी जरा लांब जाऊन सप्तचक्र साधना सुरू केली. का आणि कसं माहीत नाही पण त्या इसमाला शेवट पर्यंत कळलेच नाही की मी ही साधना करतोय असं ही असू शकेल की सप्तचक्र साधनेमुळे आपल्या शरीरा भोवती एक पवित्र ओरा तयार होतो त्यामुळे कदाचित त्याला कळले नसेल! जशी मी साधना सुरू केली तसे हळूहळू चित्र साफ होत गेले आणि त्या क्षितीजाच्या पलीकडे मला मार्ग सापडत गेला पण त्या रस्त्यावर चालत गेलं तरी तो मार्ग एका ठिकाणी संपत होता पण एक दिवस तो मार्ग जिथे संपतो तो रस्ता खुलला आणि मी आपल्या घरात पोहचलो म्हणजेच तो मार्ग फक्त अमावास्येला खुलतो. त्या पेंटींगचा संबंध ग्रह नक्षत्रांशी  निगडित आहे.” तो बोलता बोलता थांबला.


अभिज्ञा,“पण ती पेंटींग तुलाच का आकर्षित करते मला का नाही?”तिने प्रश्न विचारला.


अगम्य,“ हे बघ त्या पेंटिंगमध्ये अडकलेले सगळे पुरुष आहेत अभी! म्हणजे ती पेंटिंग स्त्रियांना आकर्षित करू शकत नाहीत आणि हो त्या पेंटिंगने बाबांना नाही आकर्षित केले म्हणजेच त्या पेंटींगशी काही तरी संबंध असणाऱ्या व्यक्तीलाच ती पेंटिंग आकर्षित करू शकते.माझा असा कयास आहे अभी की त्या पेंटिंगशी माझा काही तरी संबंध आहे पण तो काय हे मला शोधून काढावे लागेल!” तो तिला म्हणाला.


अभिज्ञा,“ आणि डॉ. पाटील आणि तुझ्यात काय बोलणे झाले?” तिने पुन्हा विचारले.


अगम्य,“ अग डॉक्टर पाटील दहा दिवसांत सगळा स्टडी करून आले होते. त्यांना कळून चुकले होते की मला कोणताच मानसिक रोग झालेला नाही पण मग पेंटिंगमध्ये अडकलो होतो असे  खोटं का बोलतोय? हे विचारायला ते आले होते कारण त्यांचा ही माझ्यावर विश्वास नाही. पण त्या दिवशी त्यांच्यात आणि माझ्यात वाद झाला तेंव्हा मी त्यांना चॅलेंज केले आहे की मी त्यांना एक ना एक दिवस मी खरं बोलतोय हे सिध्द करून दाखवेन म्हणून मग ते मला त्या दिवसाची वाट पाहीन असे म्हणून क्लीन चिट देऊन गेले!”त्याने सांगितले.


अभिज्ञा,“ असं आहे तर पण मग तू ती ‛मी आणि माझा वेडेपणा’ ही लेखमाला का लिहीत आहेस”तिने पुन्हा प्रश्न विचारला.


अगम्य,“ बास ना आता रात्रभर काय पोलिसांसारखी चौकशीच करणार आहेस का? बघ किती वाजले जरा प्रेमाच्या चार गोष्टी पण कर की!” तो हसून तिला जवळ ओढत म्हणाला.


अभिज्ञा,“ राहू दे तुझ्या प्रेमाच्या गोष्टी तू प्रेमाच्या गोष्टी करणार म्हणजे उद्या मला परत उठायला उशीर आणि बिचारी माझी आई पुन्हा किचनमध्ये राबत बसणार!” ती त्याला ढकलत म्हणाली.


अगम्य,“ अग पण आई-बाबा सकाळी सहा वाजता जाणार आहेत अज्ञांकला घेऊन बाहेर गावी कोणाच्या तरी लग्नाला!” तो पुन्हा तिला जवळ ओढत म्हणाला.


अभिज्ञा,“ अरे देवा! मी तर विसरलेच होते” ती डोक्याला हात लावत म्हणाली.


अगम्य,“ मग करूयात ना प्रेमाच्या चार गोष्टी!” ,तो हसून तिच्या नायटीचे बंद सोडत म्हणाला.


          अभिज्ञा मात्र विचार करत होती की आत्ता आपला त्या पेंटिंगबद्दलचा निर्णय अगम्यला सांगून त्याचा मूड स्पॉईल करण्यापेक्षा असं ही उद्या घरात कोणी नाही तर उद्या अगम्यशी  या विषयावर सविस्तर बोलु! या सगळ्या विचारत ती असताना अगम्यच्या बोलण्याने आणि त्याच्या कपाळावर हात ठेवण्याने भानावर आली.


अगम्य,“ अभी तुझं लक्ष कुठं आहे? मी किती वेळ झालं तुला बोलतोय! तुला बरं नाही वाटत आहे का? तू झोप!” तो तिच्या कपाळावर हात ठेवून  काळजीने म्हणाला.


अभिज्ञा,“ नाही रे मी ठीक आहे!” असं म्हणून तिने हसून  त्याच्या मानेवर ओठ टेकवले आणि त्याला अजून जवळ ओढले.


             अगम्य अभिज्ञाच्या प्रेमात रंगून आणि तिच्यावर बेभान प्रेमाचा वर्षाव करून पुन्हा अभिज्ञाच्या मिठीत निश्चिंतपणे विसावला होता पण अभिज्ञाची मात्र त्या पेंटिंगच्या विचाराने आणि अगम्यच्या काळजीने झोप उडाली होती. तिला आता त्या पेंटिंगचा सोक्षमोक्ष लावल्या शिवाय चैन पडणार नव्हते.

              


         अभिज्ञा  त्या पेंटिंगची विल्हेवाट  कशी लावणार होती? अगम्यचा आणि त्या पेंटिंगचा नेमका काय संबंध होता?अगम्य अभिज्ञाचा जो काही निर्णय असेल तो मान्य करेल का?

क्रमशः या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


         
          

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swamini Chaughule

Author

I am Crazy Read & Passionate Writer